साधकबाधक विचार न करता केलेला विरोध, तो विरोध कायम राहावा यासाठी सातत्याने होणारा अपप्रचार, हे बीटी बियाण्यांच्या भारतातील वाटचालीमधील मोठे अडथळे आहेत. या विषयावर जनमत पोखरले गेलेले असतनाही, राज्यात बीटी बियाण्यांचा वापर वाढविण्यासाठी मशागत करणाऱ्या लेखाचा हा उत्तरार्ध.. अपप्रचाराला आणि संभाव्य आक्षेपांना उत्तरे देऊ पाहणारा..
बीटी बियाण्यांच्या बाजूने कितीही पुरावे देऊन बोलले, तरी विरोध शिल्लक राहातोच. हा विरोध अपप्रचारवजा अधिक आहे. अशा प्रकारे विरोध करणे का योग्य नाही, हे समजण्यासाठी वैद्यक शास्त्रामध्ये औषधांच्या (drugs) वापराबाबतीत स्वीकारलेल्या एका व्यावहारिक मार्गाचा उल्लेख करणे प्रस्तुत ठरेल. एखाद्या आजारावरील औषधीच्या विपरीत (अपायकारक) परिणामाची व्याप्ती अत्यंत मर्यादित असेल तर अशा औषधीच्या सर्वत्र वापरास वैद्यकशास्त्राकडून परवानगी दिली जाते. बहुतांश औषधांच्या बाबतीत हाच नियम पाळला जातो. अन्यथा औषधीमधील किरकोळ अपायकारक परिणामांच्या भीतीपायी त्यामधील उपायकारक गुणधर्माचा मानवजातीला कधीच उपयोग करून घेता येणार नाही. तसेच व्यापक वापरातून, निरीक्षणातून उपलब्ध होणाऱ्या माहितीशिवाय संशोधनातील दोषदेखील दूर करता येणार नाहीत आणि संशोधनाला दिशाही प्राप्त होणार नाही. BT आणि तत्सम तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या बाबतीतही यापेक्षा वेगळे नियम, निकष असू नयेत.
या अपप्रचाराचे एक उदाहरण म्हणजे, बोंडअळीवगळता अन्य किडींचा वा कांही नवीन किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव  जास्त प्रमाणात होतो हे फसवे आणि चकवे ‘निरीक्षण’. पिकाखालची जमीन न बदलल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे असे प्रतिपादन आपण याआधीच केले आहे. त्याचा BT शी काहीही संबंध नाही. BT पूर्व कापसाच्या पिकावर शेतकरी किमान ६ ते कमाल १५पर्यंत कीटकनाशकांच्या फवारण्या करत असत. त्यात पातेअळी, बोंडअळीवगळता अन्य किडींसाठी होणाऱ्या २ ते ३ फवारण्याची संख्या सरासरी आजही तेवढीच आहे, किंवा काही प्रमाणात काही ठिकाणी वाढली असेल. मूलत: वेगवेगळ्या जातींमध्ये अन्य विविध कीटकांना प्रतिकार करण्याची आनुवंशिक क्षमता कमी-अधिक असते. त्यांमध्ये (जैविक तंत्रज्ञानाने) घातलेल्या BT जनुकाचा परिणाम केवळ बोंडअळी या एका किडीपुरताच मर्यादित असतो. (या अन्य कीटकांपासून पिकांना संरक्षण मिळण्याचे उपाय कदाचित BT वा अन्य तंत्रज्ञानातूनच शोधावे लागणार आहेत.) बिगर BT कापसाला, बोंडअळीसाठी कराव्या लागणाऱ्या आणि पायरॅथ्रॉईडसारख्या घातक कीटकनाशकांच्या वापरांपर्यंत पोहचलेल्या उर्वरित फवारण्या मात्र BT कापसाच्या आगमनानंतर आता थांबल्या आहेत.
शेळ्या-मेंढय़ा BT कापसाचा झाडपाला खाण्यास फारशा इच्छुक नसतात, हाही आणखी एक अपप्रचार. आमच्याकडे (परभणी परिसरात) कापूस लागवडीखालचा प्रदेश असल्यामुळे सर्व कापूस वेचून झाल्यानंतरच्या काळात दरवर्षी देशभरातून मोठय़ा प्रमाणात शेळ्या-मेंढय़ांचे मोठमोठाले कळप येतात. कापसाचा शिल्लक झाड-पाला, नख्या हे या जनावरांचे आवडते खाद्य आहे. BT बियाणांमुळे कापसाची लागवड जशी वाढत गेली तसे उन्हाळ्यात चराईसाठी येणाऱ्या या कळपांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झालेली आहे. मेंढपाळांकडून (मेंढय़ांच्या वतीने) अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. ‘BT कापसाचे अवशेष खाण्यात आल्यामुळे आंध्र प्रदेशात काही शेळ्या-मेंढय़ांचा मृत्यू ओढवला आहे.’ अशा प्रकारची माहिती काही गैरसरकारी संस्था प्रसृत करतात. हा BT तंत्रज्ञानाविरोधातील एक खोडसाळपणाचाच प्रकार आहे.
‘BT कापूस लागवडीनंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. BT मुळेच आत्महत्या होत आहेत’ असा आरोप करणाऱ्यांचा बालिशपणा व खोटेपणा कापूस पिकणाऱ्या प्रदेशातून एक फेरफटका मारला तरी सहज सिद्ध होईल. BT कापसाच्या आगमनानंतर देशपातळीवर पटीने वाढलेल्या कापूस उत्पादनाचा ढळढळीत पुरावा समोर असताना, प्रत्यक्ष सर्वेक्षण, अभ्यास न करताच असे निष्कर्ष जाहीरपणे मांडणाऱ्यांच्या धाडसाचे नवल वाटते. कापूस पिकात BT तंत्रज्ञान आले नसते तर कदाचित शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण कापूस प्रदेशात तरी पटीने जास्त राहिले असते. गेल्या कैक दशकात झालेल्या आणि आजही होत असलेल्या शेतीमालाच्या लुटीमध्ये या आत्महत्यांचे कारण दडलेले आहे. BT सारख्या एका उपायाने वा औषधाने हा रोग संपूर्ण बरा होण्याची अपेक्षा बाळगणारे, शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबतीत एक तर पूर्ण अजाण असावेत किंवा अजिबात गंभीर नसावेत.
BT कापसात आंतर पीक म्हणून घेतलेल्या तुरीचे झाड लवकर वाळत आहे असे एक निरीक्षण समोर आले आहे. तुरीमध्ये एका विशिष्ट रोगामुळे उभी झाडं वाळून (उन्मळून) जाण्याचा प्रकार खूप मोठय़ा प्रमाणावर अस्तित्वात होता. संशोधनातून या रोगाला प्रतिरोध, प्रतिबंध करणाऱ्या हकछळ WILT Resistant  जातीची निर्मिती झाल्यामुळे गेल्या काही वर्षांत या रोगाला बळी पडण्याचे प्रमाण जवळजवळ थांबले आहे. पाणी साचलेल्या जागेवर कोणतीही तूर लवकर उन्मळते हा एक वेगळा अनुभव सर्वानाच आहे. तात्पर्य : तुरीचे झाड उन्मळण्याचा संबंध सोबत लागवड केलेल्या वा शेजारी असलेल्या BT कापसाच्या झाडाशी वा पिकाशी काहीएक नाही. BT कापसात सर्वत्र तुरीचे आंतर पीक घेतले जाते. गतवर्षी उशिरा झालेल्या पावसामुळे आंतर पिकांमधील तुरीचे पीक कापसापेक्षाही जास्त चांगले आले होते. कुठेही तूर वाळलेली वा उन्मळलेली आढळली नाही.
पारंपरिक बियाणे नष्ट होतील ही भीती वादाकरिता कदाचित खरी मानली तरी शेवटी न परवडणाऱ्या सर्वच वस्तू, तंत्रज्ञानांची शेवटी हीच गत होते. हे निसर्ग आणि व्यवहार नियमाला धरूनच आहे. हेच काय पण किफायतशीर न ठरणारी पिकेदेखील कदाचित हळूहळू चलनातून बंद होतील. सेंद्रिय शेतीच्या पुनरुज्जीवनाचा दुराग्रहदेखील याच पाश्र्वभूमीवर तपासून पाहावा लागेल. सद्य:परिस्थितीत सेंद्रिय शेती व्यवहार्य ठरत नाही. परंतु नव्या संशोधनातून कदाचित अशा शेती पद्धतीला पूरक आणि प्रतिसाद देणारी बियाणी निर्माण होऊ शकतील. पण त्यासाठी नवीन तंत्रज्ञान-संशोधनाची (आणि ती वापरण्याची) वाट मोकळी ठेवणे गरजेचे ठरते.
वास्तविक येत्या अगदी नजीकच्या काळात बदलत्या हवामानात तग धरू शकणाऱ्या, तणनाशकाला प्रतिरोध करणाऱ्या, पोषण मूल्य वाढवणाऱ्या, कीड रोगांना बळी न पडू शकणाऱ्या आणि मुख्यत: जमीन, पाणी, अन्नांश, सूर्यप्रकाशाचा उपयोग कार्यक्षमपणे करू शकणाऱ्या वगैरेसारख्या कितीतरी बियाणांची निर्मिती BT तंत्रज्ञानातूनच करावी लागणार आहे. इंधन, औषधी, कागद, इमारती लाकूड याशिवाय अन्य अनेक औद्योगिक उत्पादनांमध्ये वनस्पतींच्या प्रचलित पिकांचा वापर करता येणे शक्य होईल अशा प्रकारचे जनुकीय बदल इथून पुढे संभाव्य आहेत.
प्रत्येक वेळी सर्व कसोटय़ांवर तपासून झाल्यावरही ते तंत्रज्ञान अधिकृतपणे वापरास जर विनाकारण अडवणूक होऊ लागली तर तंत्रज्ञानाचा प्रवेश चोरवाटेने होण्याची शक्यता जास्त असते. यापूर्वी कापसातील बोंडअळीला प्रतिरोध करणाऱ्या अधिकृत BT  बियाणांची उपलब्धी होण्याआधीच शेतकऱ्यांनी गुजरातेत तयार होणाऱ्या अनधिकृत कापूस बियाणांचा वापर मोठय़ा प्रमाणावर सुरू केलाच होता. तीच परिस्थिती आज ग्लायफोसेट या तणनाशकाला प्रतिरोध करणाऱ्या BT तंत्रज्ञानाबाबत तयार झालेली आहे. तण निवारणाची अत्यंत जटिल समस्या दूर करण्यास मदत करणारे हे तंत्रज्ञान अन्यत्र बऱ्याच पिकांमध्ये वापरले जात आहे. महाराष्ट्रातही त्याच्या तपासण्या झाल्या आहेत. पण वापरास अद्याप अधिकृत परवानगी नाही. शेतकऱ्यांच्या सोयीच्या आणि उत्पादन खर्च कमी करणाऱ्या या तंत्रज्ञानयुक्त (अनधिकृत) कापूस बियाणांचा मार्गही आता गुजरातेतूनच प्रशस्त झाला आहे. पण विविध जमिनीत, विविध हवामान परिस्थितीत अनुकूल आणि उत्पादनक्षम ठरलेल्या संशोधित बियाणांमध्ये जोपर्यंत अशा तंत्रज्ञानाचा (अधिकृत) वापर होत नाही तोपर्यंत ते पूर्णतया उपयुक्त आणि फायद्याचे ठरत नाही. अशा अशास्त्रीय पद्धतीने उपलब्ध झालेल्या अनधिकृत तंत्रज्ञानाचा वापर (स्वीकार) ग्राहकास (शेतकऱ्यास) तडजोड म्हणून मजबुरीने करावा लागतो. र्निबधामुळे उद्भवणाऱ्या या समस्या आहेत.
वाढत्या लोकसंख्येच्या सामाजिक आणि आर्थिक गरजा भागवण्याची क्षमता असलेल्या या तंत्रज्ञानाच्या बाजूने आणि विरोधात बाजू मांडणारे दोन्ही पक्ष त्यांच्याकडे शास्त्रीय पुरावा असल्याचा दावा करतात. सरकारनियुक्त तज्ज्ञ समितीच्या किंवा नियामक यंत्रणेच्या निष्कर्षांवर भरवसा ठेवण्याची लोकांची (साहजिकपणे) बऱ्याचदा तयारी नसते. सामान्य लोकांमध्ये गोंधळ निर्माण होण्यासाठी ही परिस्थिती पूरक ठरली आहे. या पाश्र्वभूमीवर असे संशोधन प्रमाणित करण्यासाठी खाजगी क्षेत्रातून सेवा पुरवणाऱ्या व्यावसायिक संस्था, संघटना पुढे आल्यास या समस्येवर दीर्घकालीन उपाय ठरू शकतो. विश्वासार्हता कमावलेल्या अशा बऱ्याच संस्था विविध क्षेत्रांत दीर्घकाळ कार्यरत आहेत. अशा नामवंत व्यावसायिक संस्था, संघटनांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारावर जगभरातील उत्पादक, ग्राहक, गुंतवणूकदार, पुरवठादार, संशोधक तसेच असंख्य हितसंबंधी आणि एवढेच नाही तर देशोदेशीची सरकारेदेखील आपली धोरणे ठरवत असतात. (खुल्या) बाजारपेठेच्या परिसरात व्यावसायिक स्पर्धा करणाऱ्या अशा व्यवस्था, यंत्रणांसाठी सक्षम कायदे आणि नियमदेखील बाजारपेठेतच तयार होतील.
लेखक शेतकरी संघटनेचे कार्यकारिणी सदस्य आहेत.