कल्पनातीत गोष्टी किंवा ऐतिहासिक घटनांभोवती कथा गुंफल्या जातात. शतकानुशतकं या कथा आपल्या जाणिवेचा, कल्पनाविश्वाचा अविभाज्य भाग बनून सतत आपल्या आजूबाजूला असतात. अशा कल्पितांतून नवनवी मिथकं तयार होत राहतात. दृश्यकला, कलेतिहास आणि कलाभाषा घडवण्यातली मिथकांची भूमिका ही काळाप्रमाणे बदलताना दिसते. पुरातन काळापासून लेण्यांमधली किंवा मंदिरातली चित्रं-शिल्प यात ही मिथकं सहजपणे अवतरलेली दिसतात. त्यातली आख्यानं, कथनं त्या त्या काळातल्या दृक्-संस्कृतीचा भाग असतो. पण ती मिथकं फक्त पुराणातल्या गोष्टी सांगत नाहीत तर त्यांच्या भवतालाशी जोडू पाहतात. उदाहरणार्थ, उदयगिरीच्या विष्णूच्या वराह अवतारातलं शिल्प हे दुसऱ्या चंद्रगुप्ताने सत्ता प्रस्थापित करण्याचं प्रतीकात्मक चित्रण मानलं जातं. नंतरच्या काळातही ही मिथकं, त्यांचे अर्थ बदलतात, नवे अर्थ प्राप्त होतात, काही पलू त्यात भर घालतात. ही घडण्या-बिघडण्याची प्रक्रिया अव्याहत चालू राहते. आधुनिक आणि समकालीन कलेच्या संदर्भातही ती आपल्याला जवळून पाहता येते.

राजा रविवर्मापासून आपल्याकडे मिथकांचं चित्रण हे आधुनिक कलेच्या पटलावर रंग भरताना दिसतं. मिथकं, पुराणकथा, ऐतिहासिक घटना आणि त्याभोवती गुंफलेली कल्पितं यात आढळून येतात. यातली प्रतिमासृष्टी ही निसर्गवादी आणि वास्तववादी चित्रांतून तो काळ आपल्यासमोर उभा करते. पण याच प्रतिमा सामाजिक- राजकीय रूपकं म्हणूनही आपल्यासमोर येत राहतात. चित्रकलेचं आधुनिक तंत्र वापरताना आशय मात्र आपल्या मातीतला असावा, अशा काहीशा विचारातून ही चित्रं साकारली गेली. त्यातून एक विशिष्ट प्रवाह तयार होत गेला. पण अलीकडच्या काळात मात्र अनेक अर्थ व संदर्भ पोटात घेतलेल्या या प्रतिमा नव्याने मांडल्या जात आहेत. गोगी सरोज पाल स्त्रियांच्या इच्छा, आकांक्षांचं आणि त्यांची दखल न घेतली जाणं याचं चित्रण करतात. ‘बीइंग अ वुमन’, ‘कामधेनू’, ‘किन्नरी’, ‘नायिका’सारख्या चित्रमालिकांतून त्या स्त्रीबद्दलच्या त्यागाच्या, सहनशीलतेच्या, स्त्रण भावाबद्दल तयार झालेल्या मिथकांना छेद देतात किंवा ‘हठयोगिनी-काली’ मालिकेतून आजपर्यंत अस्तित्वात नसलेली स्त्रीची प्रतिमा तयार करतात. त्यांची नायिका ही स्त्रीच्या सुप्त अशा जाणिवांना सादर करते. ‘स्त्री ही सतत इतरांसाठी जगत असते. माझ्या नायिका या स्वत:साठी जगतात,’ असं गोगी म्हणतात. याउलट चित्रण मिथकांना घेऊन खेळ करणाऱ्या जयश्री बर्मन यांच्या चित्रात येतं. गेय आणि जादूई जगात नेणाऱ्या या प्रतिमा स्त्रीचं निसर्गाजवळ जाणारं, ऊर्जादायी असं व्यक्तिमत्त्व उभारतात. त्यात ती कधी पक्षी असते, कधी जलपरी, तर कधी देवता. मुक्ती आणि उन्मेषाच्या या साध्यासुध्या रूपकांद्वारे त्या स्त्रीविषयीची त्यांची अनुभूती चित्रातून मांडतात. परंपरा आणि आधुनिकता यातला तोल सांभाळत चालणारी ही प्रतिमा एका विशिष्ट मर्यादेपलीकडे मात्र जाऊ शकत नाही.

Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था मूलभूत संकल्पना, परिशिष्टे आणि सरनामा
us artist richard serra personal information
व्यक्तिवेध : रिचर्ड सेरा

भारतीय आधुनिक कलेतले बिनीचे शिलेदार हुसेन आणि तयब मेहता यांनीदेखील मिथकाचं चित्रण केलं. एकीकडे ते भारताची राष्ट्र संकल्पना उभारण्यात मोलाचं ठरलं आणि दुसरीकडे कलेच्या वैश्विक मूल्यांना धरून राहात आधुनिक कलेची मांडणी करत राहिलं. तयब मेहतांचे महिषासुरमर्दिनीची नाना रूपं ही हिंसा आणि फाळणीची रूपकं म्हणून आपल्यासमोर आली. आधुनिक काळातलं ‘राष्ट्र’ या मिथकाभोवती आधुनिक आणि समकालीन सांस्कृतिक आणि कलेचा व्यवहार घडत गेला. त्याला पुढे नेणारी, विरोध करणारी, त्यातल्या गुंतागुंतीची जाणीव करून देणारी अनेक छोटी-मोठी कथनं आणि मिथकं याबरोबरीनं तयार होत राहिली. दृश्यकलेतले अनेक कलाकार या माग घेताना दिसतात. अबनींद्रनाथ यांच्या ‘बंगमाते’पासून आकाराला येत गेलेली भारतमातेची प्रतिमा सगळ्यांनाच भुरळ घालत आली आहे. पुष्पमाला एन. यांची ‘भारतमाता’ मालिका या प्रतिमेचा इतिहास, तिची पोस्टर व कॅलेंडरवरची रूपं, आधुनिक चित्रकलेतील रूपं यातले दुवे शोधते. त्यातून आधुनिक भारताच्या ‘राष्ट्र’ मिथकाला समजून घ्यायचा प्रयत्न करते. आपल्या कलाव्यवहारातून याला भिडणारी आणखी एक कलाकार म्हणजे शिल्पा गुप्ता. ‘हण्ड्रेड हॅण्ड-ड्रॉन मॅप्स’मध्ये लोकांकडून त्यांच्या देशांच्या नकाशाची चित्रं काढायला सांगून ती गोळा केली आहेत. भारताचे वेगवेगळ्या आकारांतले नकाशे शिल्पा यांनी एकमेकांवर ठेवले आहेत. एकसारखे नसलेले हे नकाशांचे आकार आणि त्यांच्या अजिबात मिळत्याजुळत्या नसलेल्या सीमारेषा आपल्या कल्पनेतल्या राष्ट्राला आणि राष्ट्राच्या कल्पनेला छेद देतात. ‘१२७८ ग्रेव्ह स्टोन्स’ ही काश्मीरमधल्या अनामिक कबरींविषयीची अशीच एक कलाकृती. तितके दगड शिल्पा यांनी गॅलरीत ठेवले. तिथून काही जण ते दगड घरी घेऊन गेले, ती कलाकृती आहे की नाही, त्याचं नेमकं काय करायचं, कुठे ठेवायचं, असे प्रश्न त्यांच्यासमोर होते. काहींनी ते ‘अशुभ’ असल्यामुळे परत आणून दिले, काहींनी घरामागे पुरले. पण अशा प्रकारे लोकदेखील त्या कलावस्तूचे कथनकार बनले आणि त्या कलावस्तूचा प्रवास त्यांच्या कथनातून पुढे चालू राहिला.

कलाकार काम करत असताना यात कधी प्रत्यक्ष चित्रण दिसतं, कधी रूपकात्मकता तर कधी या मिथकांना डोक्यावर उभं करणं. कलाकार, त्यांची आत्मीयता, आशयाच्या मांडणीची गरज यातून ही भूमिका पक्की होत जाते.

मुंबईच्या विद्या कामत यांचा बराचसा कलाव्यवहार आणि अकादमिक अभ्यास मिथकांबद्दलच आहे. धर्मनिरपेक्ष – कॉस्मोपॉलिटन दृष्टिकोनातून त्या जादूई – मिथकांचा अभ्यास करतात. ‘रीराइट’ या त्यांच्या प्रदर्शनापासून हे मुख्यत: सुरू झालेलं दिसतं. ‘बीइंग कुमारी’ या फोटोमोंटाज मालिकेत त्यांनी कुमारिका म्हणून लहान मुलींच्या होणाऱ्या पूजेबद्दल मांडलं. त्या ज्या परिवारात वाढल्या तिथे अशी पूजा करणं हा रोजच्या धार्मिक विधींचा भाग होता. या रीतिरिवाजांबद्दलच्या त्यांच्या आठवणी, त्यातले विधी, लहान मुलगी असूनही मिळणारं महत्त्व, त्याचं वाटणारं अप्रूप याबद्दल त्या बोलतात. त्या आठवणी त्या त्यांच्या चित्रमालिकेतून जाग्या करतात. हे करताना त्या सजवलेल्या ‘देवी’पासून सर्वसामान्य बाईत झालेल्या रूपांतर दाखवतात. त्या मुलीला देवी बनविण्यातला हा विरोधाभास दाखवताना त्या स्वत:चे फोटो वापरतात. थंड भाव असलेले हे चेहरे रंग आणि दागिन्यांनी मढलेले दिसतात. नऊ फोटोंच्या मालिकेत ही सजावट हळूहळू नाहीशी होत जाते. ‘दैवी’पणाचा एक एक थर उतरत जातो. पण त्या आठवणी केवळ आठवणी राहात नाहीत. त्यांच्या कल्पना, भावविश्व, मिथकांचा केलेला अभ्यास, त्यातले अनेक दुवे दाखवतं. ‘मेकिंग ऑफ कृष्णा’मध्ये त्यांनी आपल्या बहिणीच्या डोहाळजेवणाच्या छायाचित्रांवर काम केलंय. यात मुलगा होईल या आकांक्षेने बाईला कृष्णाच्या रूपात सजवलं जातं, त्याच एका विचाराने सगळ्या कुटुंबाला पछाडलेलं असतं. या मानसिकतेतून बाईचं शरीर हे कायम कर्मकांडांसाठी वापरलं जातं. पिढीजात चालत आलेल्या या रीतिरिवाजांना, त्यातून लादल्या जाणाऱ्या पुरुषसत्ताक रचनेला त्या प्रश्न विचारतात. या कर्मकांडामुळे अदृश्य राहिलेला भेसूरपणा बाहेर काढतात.

पुराण आणि मिथकांचे संदर्भ घेत पुष्पमाला यांची समकालीन पात्रं उभी राहतात. स्त्रियांच्या प्रतिमांचं एखादं संग्रहागार- एखादं अर्काइव्ह असावं अशा नेटकेपणानं त्या या प्रतिमा, त्यांचे संदर्भ, त्यांचं ऐतिहासिक महत्त्व यांचा विचार करतात. तसंच, या प्रतिमांचं आपल्या भवतालच्या संदर्भात पुनर्वाचन करतात. यात त्या प्रतिमा समकालाच्या पटलावर प्रत्यक्षात साकारत या पुनर्निर्मितीतून त्या ‘पॉप्युलर’ आणि ‘हाय आर्ट’ यांच्यातला भेदही सफाईदार सांधतात. पण हे करताना त्या या प्रतिमांची समकालीन मिथकं बांधतात. ही मिथकं वास्तव आणि श्रद्धा यांच्या दरम्यान कुठे तरी असतात. मिथकांना खरवडून, त्यांचे पदर सुटे करून पाहिलं की वास्तवाचा आभास होतो. याउलट, वास्तवातल्या ठोस गोष्टींना पुन:पुन्हा वेगळ्या रूपात मांडून त्यांची मिथकं तयार होतात. निर्मितीची आणि मोडून पडण्याची ही दुहेरी प्रक्रिया अव्याहतपणे चालू राहते.

नूपुर देसाई

noopur.casp@gmail.com