भीमा कोरेगावच्या निमित्ताने पुन्हा एकदा बाळासाहेब आंबेडकर व डावा विचारप्रवाह चच्रेत आलेला आहे. गेल्या तीन-चार वर्षांत देशात अशा काही घटना घडत आहेत ज्यामध्ये रोहित वेमूला, जेएनयूचा कन्हैयाकुमार, गोविंद पानसरेंची हत्या इत्यादीवरून महाराष्ट्रातील व एकूणच देशाच्या दलित चळवळीत आंबेडकरी विचारांबरोबरच मार्क्‍सवादी विचारप्रवाह एकत्र येऊ पाहत आहे.

डॉ. आंबेडकरांनी आपला वैचारिक वारसा महात्मा फुले यांच्याशी जोडलेला होता. फुल्यांच्या विचारात आर्थिक शोषणाचा मुद्दा हा जातीय शोषणापेक्षा जास्त होता. म्हणून फुले हे ‘एक्सप्लॉयटेशन’ला प्राधान्य देतात. याचा अर्थ असा आहे की, फुले जात व वर्गशोषणाच्या अंताचा विचार मांडतात. म्हणून भारतीय मार्क्‍सवाद्यांना आंबेडकरांपेक्षा फुले अग्रक्रमाचे वाटतात. त्यामुळे म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात बाबासाहेब व डावे यांच्यात फारसे जमले नाही.

डॉ. आंबेडकर यांना वर्गापेक्षा सांस्कृतिक गुलामी किंवा परात्मभाव जो जातीतून येतो तो वर्गापेक्षा महत्त्वाचा वाटला. म्हणून ते म्हणतात की, जात हा बंदिस्त वर्ग आहे. इथे श्रमाचे विभाजन झालेले नसून श्रमिकांचे त्यांच्या जातीनुसार विभाजन झालेले आहे. फुल्यांचा लढा शेटजी व भटजी असा होता, तर आंबेडकरांचा लढा ब्राह्मण्यवाद व भांडवलशाही असा होता. आंबेडकरांनी मार्क्‍सऐवजी बुद्ध पसंत केला होता. मार्क्‍सचे आकर्षण आंबेडकरांना भारतीय मार्क्‍सवाद्यांच्या विरोधात जाऊन होते. कम्युनिस्ट व समाजवादी या दोघांपैकी आंबेडकरांनी समाजवाद्यांना प्राधान्य दिलेले दिसून येते. म्हणून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत समाजवाद्यांसोबत व १९५२ला शेतकरी कामगार पक्षासोबत युती केलेली होती. डॉ. आंबेडकर जसे कम्युनिस्टविरोधी होते तसेच कम्युनिस्टही आंबेडकरविरोधी होते. म्हणून तर १९५२च्या निवडणुकीत १५ हजार मतांनी आंबेडकरांचा पराभव केला.  स्वातंत्र्यपूर्वकाळात दलित व मार्क्‍सवादी यांचे परस्परसंबंध प्रस्थापित न होण्याचे कारण म्हणजे कम्युनिस्ट चळवळीत असलेले उच्च जातीय पुढारीपण कम्युनिस्टांची भाषा शोषणांताची व वर्गविग्रहाची आहे; पण पुढारीपण मात्र उच्च जातीयांच्या हाती आहे. महाराष्ट्रातील कम्युनिस्ट चळवळीचा आढावा घेतला तर असे लक्षात येते की, कम्युनिस्ट पक्षाचे नेतृत्व हे एस. एम. जोशी, एस. ए. डांगे, कॉ. नाना पाटील इत्यादींकडे होते. याच कम्युनिस्टांनी अण्णा भाऊ साठेंना वंचित ठेवले होते. म्हणून ते आयुष्याच्या उत्तरार्धात आंबेडकरवादाकडे वळतात ही वस्तुस्थिती आहे. स्वातंत्र्यलढय़ाचे नेतृत्व जेव्हा गांधींकडे गेले तेव्हा काही उच्चवर्णीय हिंदुत्ववादी पक्षात गेले व काहींनी मार्क्‍सवादी पक्षात प्रवेश केला. काही अपवाद गांधीवादाकडे. या देशातील वर्णव्यवस्थेवर जातिव्यवस्थेचे प्रतिबिंब पडलेले आहे आणि बहुसंख्य लोकांच्या मनावर जातिनिष्ठेचा प्रभाव आहे. म्हणून येथील जातीचा प्रश्न जोपर्यंत समजून घेणार नाही तोपर्यंत वर्गअंताचा प्रश्न अप्रासंगिक आहे.

बाबासाहेबांनी दलितांना संघटित करण्यासाठी सांस्कृतिक, सामाजिक आशय व प्रतीकांचा वापर केला; पण १९३० नंतर त्यांनी चळवळ राजकीय व वर्गीय अंगाने उभी केली. दलितांचे आर्थिक प्रश्न व शहरी प्रश्न तसेच ग्रामीण भागातील सरंजामी अर्थव्यवस्था मोडीत काढण्यासाठी बलुतेदारी, महार वतने खालसा, खोती पद्धत इत्यादी प्रश्न हाती घेतले. १९३२ ते १९३७ या काळात डॉ. आंबेडकरांनी वर्गीय राजकारण केलेले आहे. या काळात त्यांनी शेतकरी, शेतमजूर, गिरणी कामगार, रेल्वे कामगार इत्यादी पातळ्यांवर एकजूट करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी म्हणून त्यांनी १९३६ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून मुंबई विधिमंडळात १५ पैकी १३ आमदार निवडून आणलेले होते. बाबासाहेबांना मार्क्‍सच्या शोषणाचा विचार मान्य होता; पण साध्य करण्याची पद्धत व धर्माबद्दलचे विचार मान्य नव्हते. त्याऐवजी ते बुद्धाचा सम्यक, शांततेचा, अिहसक मार्ग अनुसरतात.

गेल्या ७० वर्षांत कम्युनिस्टांनी अनेक कोलांटउडय़ा घेतलेल्या आहेत. डाव्यांनी भारतातील पारंपरिक, प्रादेशिक, जातीय, भाषीय तत्त्वाकडे लक्ष दिले नाही. म्हणून या देशात फुटीरतावादी व जातीय आंदोलने यशस्वी होतात, पण साम्यवाद्याची नाहीत. रशिया व चीन यांचे उसने आदर्श घेऊन या देशात कम्युनिस्टांना सत्ताप्राप्ती शक्य नाही. विशेषत: केरळ, प. बंगाल व मिझोराममध्ये ते सत्तेत आहेत याचे कारण पक्षाचे सर्व नेतृत्व उच्च जातीच्या हातात आहे. म्हणून कम्युनिस्टांनी सत्तेचे नेतृत्व दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक यांच्या हातात देऊन पाहावे.  मार्क्‍सच्या मूळ मार्गाने या देशात क्रांती होऊ शकत नाही. हे सर्व वास्तव डॉ. आंबेडकरांना माहीत होते म्हणून त्यांनी काँग्रेसला विरोध म्हणून, पण मार्क्‍सवाद्यांना जवळ न घेता लोकशाही समाजवाद्यांना सोबत घेऊन  रिपब्लिकन पक्ष व बौद्ध धम्म स्वीकार या दोन कार्यासाठी उर्वरित आयुष्य  जगण्याचा मनोदय व्यक्त केला.

डॉ. आंबेडकरांच्या पश्चात त्यांच्या अनुयायांत मात्र काहीसा संभ्रम दिसून येतो. बाबासाहेबांच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्यांनी केवळ जातीच्या प्रश्नावरून जातिअंताचा प्रश्न सुटणार नाही. तसेच स्वातंत्र्यानंतर देशासमोरील प्रश्न व समस्या यांचे स्वरूप बदलले. इंग्रजांऐवजी आपलेच सरकार होते म्हणून चळवळ जातीय प्रश्नात किंवा दलितांतच अडकून न राहता इतर पुरोगामी विशेषत: ब्राह्मणेतर व समाजवादी घटकांना सोबत घेण्याचा मानस केला; पण आंबेडकरांनंतर काही अनुयायी स्वतंत्र दलित चळवळ चालवत होते, तर काही कम्युनिस्टांकडे आकर्षित झालेले होते. उदा. १९५९ व १९६४च्या काळात एके काळाचे सर्वात जवळचे विश्वासू कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी कम्युनिस्टांसोबत राहून भूमिहिनांचा सत्याग्रह केला; पण यशवंतराव चव्हाणांच्या बेरजेच्या राजकारणाने दादासाहेब गायकवाडांचे काँग्रेसीकरण करण्यात आले. पुढे १९७०च्या दशकात दलित चळवळीच्या नेतृत्वाने जाती-पोटजातीतून बाहेर पडून राजकारणात वर्गीय भूमिका घेऊन मार्क्‍सवादाचे विचार अनुसरू लागले. डॉ. आंबेडकरांनंतर इतर पुरोगामी घटकांशी समरस होण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर दादासाहेब गायकवाड व दलित पँथर यांनी. १९७२ला दलित पँथरचा उदय झाला. दलितांचे रिपब्लिकन पक्षामुळे लयास गेलेले स्वतंत्र राजकीय अस्तित्व पँथरच्या माध्यमातून पुढे आले. दलित पँथर व्यापक पायावर उभी राहू इच्छित असल्यामुळे त्यांना जात-वर्गीय भूमिका स्वीकारणे क्रमप्राप्त होते; पण याच मुद्दय़ावरून दलित पँथर फुटली. पँथरमध्ये दोन गट पडले. एक होता जात-वर्ग आधारित काँग्रेसविरोधी गट, तर दुसरा राजकारणाऐवजी धर्मातराचा पर्याय. या फुटीतून जोगेंद्र कवाडे यांनी ‘दलित मुक्ती सेना’, प्रकाश आंबेडकरांनी ‘भारतीय रिपब्लिकन पक्ष’, तर नामदेव ढसाळांनी वेगळी ‘पँथर’ काढली; पण नामदेव ढसाळ, आंबेडकर इत्यादी नवनेतृत्वांनी आंबेडकरवादाला कमी न लेखता मार्क्‍सवादाचे अनुसरण केले. ढसाळांनी १९७४ला जॉर्ज फर्नाडिसच्या रेल्वे कामगार चळवळीला पािठबा दिलेला होता. याच काळात साहित्यिक व विचारवंतांनी जे साहित्य निर्माण केले ते समाजवादी-साम्यवादी अंगाने विचार करून मार्क्‍सवादी विचाराशी नाते जोडण्याचा प्रयत्न केला. या विचारवंतांत कॉ. शरद पाटील (माफुआ), डॉ. रावसाहेब कसबे, बाबूराव बागूल, डॉ. आनंद तेलतुंबडे व डॉ. गोपाळ गुरू इत्यादी वर्गजाणिवांच्या आधारावर जातीचा प्रश्न मांडला. रोहित वेमूला, कन्हैयाकुमार, जिग्नेश मेवानी इत्यादींसारखे तरुण एकविसाव्या शतकातील डाव्या तत्त्वज्ञानाची भाषा बोलत आहेत. तेव्हा भारतातील प्रस्थापित कम्युनिस्ट चळवळीला ही भाषा अवगत नाही. भारतातील कम्युनिस्ट हे वर्गशोषणाच्या वैचारिक परिभाषेत अडकून पडले आहेत.

नव-आंबेडकरवाद्यांनी डाव्यांवर विसंबून न राहता डावी वर्गजाणीव आत्मसात करून पुरोगामी शक्तीचे सहकार्य घेऊन जात-वर्गअंताची नवी लढाई स्वत: उभारून तिचे नेतृत्व केले पाहिजे. कारण मार्क्‍सवादी सामाजिक व्यवहाराचे भौतिक वास्तव बदलू शकत नाहीत. दलितांसोबत ओबीसी, भटके, अल्पसंख्याक, पुरोगामी मराठे यांना एकत्र करून डावा आंबेडकरवादी किंवा नवा-आंबेडकरवादी प्रवाह निर्माण करावा. त्यासाठी डॉ. भारत पाटणकर, प्रतिमा परदेशी, बाळासाहेब रेणके, आमदार कपिल पाटील, किशोर ढमाले, मराठा सेवा संघ इत्यादींना एकत्र घेऊन बाबासाहेबांनी  रिपाइंच्या माध्यमातून पाहिलेले स्वप्न व मार्क्‍सवाद्यांनी जातीय प्रश्नाकडे केलेले दुर्लक्ष व इतिहास पाहता नव-आंबेडकरी नेतृत्वाने एकविसाव्या शतकाची गरज व स्वातंत्र्यानंतर पुन्हा एकदा धर्म, जात, विचारधारा या मुद्दय़ांवरून अंतर्गत सामाजिक संघर्ष सुरू झालेला आहे. तेव्हा प्रत्येकाने पोथिनिष्ठ कर्म, स्वाभिमान व टोकाच्या अस्मिता त्यागून एका प्रवाहात येऊन उद्याच्या भारताचे स्वप्न पाहावयाचे आहे. सर्वाचा व सर्वासाठीचा भारत घडवू, हीच आजच्या काळाची गरज आहे.

विश्वांभर धर्मा गायकवाड

vishwambar10@gmail.com