News Flash

बौद्ध धर्म व आक्रमक इस्लामी : दुसरी बाजू

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा मुस्लीम आक्रमकांमुळे बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला, असे म्हट

‘इस्लामच्या आक्रमणामुळेच बौद्ध धर्माचा लोप?’ हा रवींद्र माधव साठे यांनी लिहिलेला लेख वाचला. लेखक हे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक आहेत हे लक्षात घेता त्यांनी हा लेख बौद्ध धर्माच्या प्रेमातून नव्हे तर इस्लामद्वेषातून लिहिला आहे, हे उघड आहे. देशात आणि १८ राज्यांत भाजपचे सरकार आल्यापासून हिंदुत्ववाद्यांच्या मुस्लीमविरोधी द्वेषमूलक धर्माध राजकारणाने उच्छाद मांडला आहे हे उघड आहे. उदा. गोरक्षणाच्या नावाखाली मुस्लिमांसह दलितांना मारणे, ताजमहालच्या जागी शिवमंदिर होते, ताजमहाल हा भारतीय राष्ट्रावरील कलंक आहे, असा द्वेषाची पेरणी करणारा वाद उकरून काढणे, रामजादे-हरामजादे अशी हिंदू-मुस्लीम विभागणी करणे, घरवापसी, लव्ह-जिहादचे नारे देणे, मुस्लीम मतांची आम्हाला गरज नाही हे दर्शविण्यासाठी उत्तर प्रदेशात एकाही मुस्लीम उमेदवारास भाजपने उमेदवारी न देणे वगैरे जे काही मुस्लीमद्वेष्टे राजकारण देशात सुरू आहे त्यास अनुसरूनच लिहिलेला लेख म्हणजे साठेंचा उपरोक्त लेख होय. पण लेखकाने आता बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचा विषयच छेडला आहे तर या विषयाच्या दुसऱ्या बाजूचीही चर्चा व्हावी म्हणून हा लेखनप्रपंच करीत आहे.

रवींद्र साठेंच्या मते मार्क्‍सवादी विचारवंतांच्या म्हणण्यानुसार इस्लामच्या शिकवणुकीमुळे नव्हे तर संपत्तीच्या लुटीसाठी हिंदू मंदिरांचा विध्वंस इस्लामी आक्रमकांनी केला हे मत बरोबर नसून मूर्तिभंजक इस्लामी तत्त्वानुसारच येथील देवळांचा व बुद्धमूर्तीचा इस्लामी आक्रमकांनी विध्वंस केला. रवींद्र साठे यांचे हे मत म्हणजे पूर्णसत्य नसून अर्धसत्य आहे. कारण इस्लामी आक्रमक हे जसे मूर्तिभंजक होते तसेच त्यांनी संपत्तीसाठी मंदिरांची लूट केली हेही तेवढेच खरे आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा मुस्लीम आक्रमकांमुळे बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला, असे म्हटले आहे. पण त्यांनी असेही नमूद करून ठेवले आहे की भारतातून बौद्ध धर्म समूळ नष्ट झाला ही गोष्ट आपणास मान्य नाही. ऐहिकदृष्टय़ा बौद्ध धर्माचा प्रसार वा चिन्हे भारतात दिसून येत नसतील पण आध्यात्मिक शक्ती म्हणून बौद्ध धर्म भारतात ज्वलंत प्रभावाने अस्तित्वात आहे. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म नाहीसा होण्याचे एक कारण दिले आहे, ते असे की वैष्णव आणि शैव धर्माच्या प्रचारामुळे बौद्ध धर्म हळूहळू नाहीसा झाला. बौद्ध धर्माची नक्कल या धर्र्मानी केली. नकलेने बौद्ध धर्म नाहीसा करण्याची ही क्लृप्ती होती. त्यांनी अजून एक कारण असे दिले की हिंदू धर्म आचरण्यास सोपा आहे म्हणून तो शाबूत राहिला आणि बौद्ध धर्म आचरणास कठीण असल्यामुळे तो अस्तास गेला. शिवाय भारतातील राजकीय वातावरण जसे हिंदू धर्माला अनुकूल होते तसे ते बौद्ध धर्माला नव्हते. बाबासाहेबांनीच बौद्ध धर्म लोप होण्याची कारणमीमांसा करताना असेही म्हटले आहे की वैदिक धर्माशी विरोध असणाऱ्या बौद्ध धर्माचा पाडाव करण्यासाठी ब्राह्मणांनी सर्व प्रकारच्या साधनांचा उपयोग केला. बौद्ध धम्म ज्या गोष्टीमुळे लोकप्रिय झाला त्या गोष्टी आपल्या पूर्वापार धर्मास संमत नसल्या तरी त्यांचा त्यांनी उपयोग केला. या प्रचारपद्धतीस अनुसरूनच वेरुळच्या बौद्ध लेण्यांजवळ त्यांनी आपली ब्राह्मणी लेणी कोरली. वस्तुत: ब्राह्मण हा गृहस्थाश्रमी. अग्निहोत्र हे त्यांचे नित्यव्रत. त्याला परिमार्जित भिख्खूसारखे गुहेत राहण्याचे कारण नव्हते. भिख्खूंना पावसाळ्याच्या तीन महिन्यांत कुठे तरी निवाऱ्याच्या जागी वास करण्याचा बुद्धाचा आदेश होता. त्यामुळे त्यांना लेण्यांची आवश्यकता होती. गृहस्थाश्रमी ब्राह्मणांना ती तशी नव्हती. परंतु बौद्ध लेण्यांकडे उपासकांचा मोठा मेळावा आकृष्ट होतो म्हणूनच केवळ त्यांच्या लेण्यांच्या बाजूला आपली लेणी कोरून आपल्या धर्माकडे उपासक ओढून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

बाबासाहेबांचे उपरोक्त मत लक्षात घेता इस्लामी आक्रमकांमुळे बौद्ध धर्माचा लोप झाला हे जसे खरे आहे तसेच ब्राह्मणी कटकारस्थानामुळेही बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला हेही तितकेच खरे आहे. साठे यांना हे अर्थातच मान्य नसावे. कारण त्यांचा हिंदुत्ववादी दृष्टिकोन फक्त मुस्लीम आक्रमकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी अधीर झाला आहे. म्हणूनच एकतर्फी सोयवादी निष्कर्ष काढून ते मोकळे झाले आहेत.

हिंदुत्ववाद्यांकडून मुस्लीम आक्रमकांमुळेच बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला असे जेव्हा पुन:पुन्हा सांगण्यात येते तेव्हा मग असाही एक प्रश्न उपस्थित होतो की इस्लामी राजवटींनी दलितांना विषमतेची वागणूक कुठे दिली? इस्लामने समता कुठे नाकारली? मशिदीत प्रवेश कुठे नाकारला? इस्लामने धर्माच्या नावाखाली दलितांना कुठे गावकुसाबाहेर ठेवले? अस्पृश्यांचा विटाळ कुठे मानला? हिंदू धर्माने दलितांना जनावरांपेक्षाही नीच वागणूक दिल्यामुळेच येथील अस्पृश्य जातींना इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करावा लागला ना? हा सारा इतिहास नजरेआड करून इस्लामी आक्रमकांमुळेच बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला, असे अर्धसत्य सांगण्याचे मग प्रयोजन ते काय? बौद्ध नि मुस्लीम समाजात दुरावा निर्माण करणे हेच ना?

इस्लामी आक्रमक धर्माध होते हे मान्य. पण स्वातंत्र्योत्तर भारतात बाबरी मशीद उद्ध्वस्त करून देशाच्या धर्मनिरपेक्षतेसच धक्का पोहोचविणाऱ्या कृत्यास आपण काय म्हणणार आहोत? बाबासाहेबांच्या धर्मातरानंतर गावोगावी बाबासाहेबांबरोबरच भगवान बुद्धाच्या पुतळ्यांचीही विटंबना झालीच होती याची संगती साठे कशी लावणार आहेत?

इस्लामी आक्रमकांमुळेच बौद्ध धर्माचा लोप झाला, हे जरी क्षणभर मान्य केले तरी इस्लामी आक्रमकांनी जी चूक केली त्याची दुरुस्ती भाजपची सरकारे करतील काय? केंद्र सरकार बौद्ध धर्माला राजाश्रय मिळवून देईल काय? देशभर बुद्धविहारे-बुद्धमूर्ती उभारल्या जातील काय? मुस्लीम आक्रमकांनी बौद्ध भिक्षूंची कत्तल केली असेल तर आता मात्र बौद्ध धर्मीयांवर अत्याचार होणार नाहीत, असे सामाजिक न्यायाचे धोरण सरकार आखील काय? रोहित वेमुला, ऊना येथील दलितांना न्याय मिळेल काय? अवघड आहे. मग साठे यांच्या लेखाचे प्रयोजन काय? तर हिंदू-बौद्ध एकच आहेत. बुद्ध धर्म हा स्वतंत्र धर्म नसून ती हिंदू धर्माचीच एक शाखा आहे. बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, अशी दिशाभूल करून बौद्धांच्या मनातही मुस्लीम समाजाविषयी संशय निर्माण करणे, सद्भावात अडथळे निर्माण करणे, पण हे थांबले पाहिजे. सर्वानीच लोकशाही धर्मनिरपेक्षतेची कास धरणे सामाजिक सौहार्दाच्या दृष्टीने हिताचे ठरणारे आहे. इतिहासातील अनावश्यक मढी उकरून काढत निर्थक वाद उपस्थित करणे  समाज नि देशहिताचे ठरेल काय, याचा सर्वानीच अंतर्मुख होऊन विचार केलेला बरा, असे म्हटले तर गैर ठरू नये. दुसरे काय?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2017 12:34 am

Web Title: articles in marathi on buddhism vs islam religion
Next Stories
1 मराठमोळ्या मराठेंची अमेरिकी यशोगाथा
2 प्रतिजैविके – वेळ निघून चाललीय..
3 फेरीवाल्यांवर नियंत्रण, मग पार्किंगचे काय?