News Flash

आपल्याला बद्ध संशोधक हवे आहेत का?

सर्व पुस्तकांत गझनीच्या महंमदाबद्दल काय लिहिले आहे ते मांडत आहे.

‘रविवार विशेष’मध्ये (५ नोव्हेंबर) ‘इस्लामच्या आक्रमणामुळेच बौद्ध धर्माचा लोप?’ हा लेख प्रसिद्ध झाला होता.  या विषयाच्या दुसऱ्या पैलूंची चर्चा करणारा बी. व्ही. जोंधळे यांचा ‘बौद्ध धर्म व आक्रमक इस्लामी’ हा लेख १२ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाला होता. त्या लेखाला साठे यांनी  २६ नोव्हेंबरच्या अंकात उत्तरही दिले होते. साठे यांच्या मूळ लेखातील काही मुद्दय़ांचा प्रतिवाद करणारे हे पत्रलेख..

साठे यांच्या लेखात पं. नेहरू, व्हिन्सेंट स्मिथ आणि मार्क्‍सवादी इतिहासकार यांचे उल्लेख आहेत. सुदैवाने नेहरू यांचे ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ आणि स्मिथ यांचे ‘ऑक्स्फर्ड हिस्टरी ऑफ इंडिया’ मला उपलब्ध होऊ शकले. रोमिला थापर यांनी सातवीसाठी लिहिलेले क्रमिक पुस्तक महाजालावर मिळाले. तसेच त्यांचे हिस्टरी ऑफ इंडिया हे पुस्तक उपलब्ध झाले. या सर्व पुस्तकांत गझनीच्या महंमदाबद्दल काय लिहिले आहे ते मांडत आहे.

स्मिथ यांच्या पुस्तकात त्यासाठी (या तीन लेखकांत) सर्वात जास्त जागा दिली आहे. डिस्कव्हरीमध्ये सर्वात कमी जागा गझनीने व्यापली आहे. साठे यांनी डिस्कव्हरीमधील जो परिच्छेद उद्धृत केला आहे तेवढाच वाचल्यास गझनी हा आक्रमक नसून कलाकृतींचा उपासक होता असे मानावे लागेल हे बरोबर आहे. परंतु डिस्कव्हरीमधील, गझनीला दिलेली साधारण अडीच पाने वाचली तर तसे मानता येणार नाही. इ. स. १००० पासून गझनीने हिंदुस्थानवर अनेक छापे मारले असे नमूद करून हे छापे निर्मम आणि रक्तलांच्छित होते असे नेहरूंनी नमूद केले आहे. या प्रत्येक छाप्यात त्याने प्रचंड संपत्ती वाहून नेली असेही नेहरू सांगतात. अल्बेरुणी याबाबत काय म्हणतो हेदेखील नेहरूंनी उद्धृत केलेले आहे. अल्बेरुणीने केलेले वर्णन पुढीलप्रमाणे –

The Hindus became like atoms of dust scattered in all directions and like a tale of old in the mouths of people. Their scattered remains cherish of course the most inveterate aversion towards all Moslems.

नेहरूंच्या मताने त्याला धार्मिक श्रद्धावानापेक्षा योद्धा समजणे योग्य ठरले असते आणि इतर जेत्यांप्रमाणे त्यानेही त्याच्या विजयासाठी धर्माचा वापर केला. भारत हा त्याच्या दृष्टीने संपत्ती आणि इतर साधनसामग्रीचा एक स्रोत होता. नेहरू अशीही माहिती देतात की गझनीने भारतात एक सन्य उभारले. हे सन्य त्याचा एक हिंदू सेनापती ‘तिलक’ याच्या आधिपत्याखाली त्याने दिले. या सन्याचा वापर गझनीने मध्य आशियामधील स्वधर्मीयांविरुद्ध केला. गझनीने काश्मीर जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात त्याला अपयश आले असे नेहरूंनी नमूद केले आहे. तळटिपेमध्ये त्यांनी ‘तारिख ई सोरठ’ नावाच्या फारशी बखरीमधील माहिती दिली आहे. त्यानुसार सोमनाथहून परत जाताना राजपुताना मरुभूमीमध्ये त्याला मोठय़ा पराभवाला सामोरे जावे लागले. गझनी हा लुटारू होता, त्याने रक्तपात, विध्वंस केला हे नमूद करून त्याच्या व्यक्तिमत्त्वाची दुसरी बाजू नेहरू दाखवितात. तो पाल्डर (पाडणारा) होता तसाच बिल्डरही होता. मथुरा शहर, तेथील मंदिरे बघून तो प्रभावित झाला हे सांगण्यासाठी नेहरूंनी साठे यांना आक्षेपार्ह वाटणारा परिच्छेद दिलेला दिसतो. कारण त्याच परिच्छेदात त्यांनी असेही नमूद केले आहे की भारतामधून कारागीर आणि संपत्ती तो त्याच्या राज्यात घेऊन गेला. नेहरूंनी असे सांगितले आहे की गझनीच्या आधी तीन शतकांपासून इस्लाम हा भारतामधील इतर अनेक धर्माप्रमाणे शांततेत नांदत होता. परंतु गझनीच्या स्वाऱ्यांमुळे तो निर्मम लष्करी विजयाच्या रूपात अवतीर्ण झाला. या नवीन रूपामधील आगमनाने लोकांच्या मनात खोलवर प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यांची मने कडवटपणाने भरून गेली. नवीन धर्माबद्दल आक्षेप नव्हता तर बळजबरीबद्दल तीव्र आक्षेप होता, असेही त्यांनी नमूद केले आहे. गझनीच्या सर्व स्वाऱ्यांचे सविस्तर वर्णन त्यांनी दिलेले नाही हे खरे आहे (अडीच पानांत काय काय देणार?) परंतु त्यांनी गझनीबद्दल जेवढे लिहिले आहे तेवढे सर्व वाचले तर, ते काही लपवीत आहेत असे म्हणता येणार नाही. मथुरेच्या मंदिरामधील मूर्तीबद्दल स्मिथ लिहितात – The idols included ‘ five of red gold, each five yards high ‘.

स्मिथ यांनी दिलेली पुढील माहिती साठे यांनी दिलेली नाही. ही माहिती अशी – कनौजचा राजा परिहार घराण्यामधील राज्यपाल हा होता. गझनी हा यमुना ओलांडून बुलंदशहरवर हल्ला करण्याच्या तयारीत असताना हरदत्त नावाच्या राजाने गझनीसमोर शरणागती पत्करली. आपल्या दहा हजार सन्यासह इस्लामचा स्वीकार  केला. पुढे कनौजचा राजा राज्यपाल याने राजधानीच्या रक्षणासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत. तो गंगापार पळून गेला. कनौजचे रक्षण करणारे सात दुर्ग एका दिवसात गझनीने घेतले. कनौजमध्ये दहा सहस्र मंदिरे होती. त्यांचा विध्वंस करण्यात आला असे स्पष्टपणे नमूद केले गेलेले नाही. राज्यपालाच्या भ्याड वर्तनामुळे संतप्त होऊन गंडा / गांडा (Ganda) चंदेल या राजाच्या नेतृत्वाखाली इतर राजमंडळ एकत्र आले. राज्यपालाचा त्यांनी वध केला आणि त्याच्या जागी त्रिलोचनपाल यास राजपद दिले. गझनी हा राज्यपालास आपला मांडलिक समजत असल्यामुळे त्याने पुन्हा यमुना ओलांडून चंदेल राज्यात प्रवेश केला. चंदेलांनी एकत्र केलेले सन्य एवढे मोठे होते की सुलतानदेखील घाबरला. पण चंदेल राजा एवढा घाबरट होता की रात्रीचा फायदा घेऊन तो पळून गेला. ५८० हत्ती आणि इतर लूट घेऊन सुलतान परत गेला. १०२१-२२ मध्ये गझनी परत आला, परंतु याही वेळी युद्ध करण्याऐवजी नजराणा देऊन आक्रमकाचे समाधान करण्याचा मार्ग चोखाळण्यात आला. भारतीयांचा तेजोभंग करणारी ही माहिती नेहरूंनी टाळली आहे. ते एवढेच नमूद करतात की गझनीच्या स्वाऱ्यांमुळे भारतीयांमधील कमतरता स्पष्ट झाल्या. तारिख ई सोरठच्या आधाराने राजस्थानच्या मरुभूमीत गझनीचा मोठा पराभव झाला हे नमूद करून पराभूत कैदी स्त्री-पुरुषांना हिंदू करून घेण्यात आले असेही नेहरूंनी नमूद केले आहे. पण त्या स्रोताच्या विश्वासार्हतेबद्दल खात्री नाही हे त्यांनी कबूल केले आहे.

हिंदुत्वाच्या मुशीत घडलेला एखादा प्रखर राष्ट्रवादी इतिहासकार अडीच पानांत यापेक्षा वेगळे काय बरे लिहू शकला असता? स्मिथ यांच्या मताने गझनी हा कडवा धर्मनिष्ठ होता आणि मूíतपूजकांना मारणे हे तो कर्तव्य समजत असे आणि त्यात त्याला आनंदही मिळत असे. स्मिथ असेही सांगतात की तो संपत्तीचा लोभी होता आणि त्याच्या सर्व धर्मयुद्धांमधून चांगला फायदा व्हावा याची तो खबरदारी घेत असे. रोमिला थापर यांच्या मते गझनीला (राज्यविस्तारासाठी) खजिना हवा होता. भारत त्यासाठी प्रसिद्ध होता आणि मंदिरांमध्ये धनसंपत्ती मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे त्याने या मंदिरांवर छापे घातले. मूíतभंजन हा त्याचा दुसरा हेतू होता हे त्या नमूद करतात. सोमनाथ येथील मूíतभंजनामुळे गझनी आणि मुस्लीम राज्यकत्रे यांच्याबद्दल भारतीय मानस प्रतिकूल बनले हेदेखील त्या नमूद करतात. सोमनाथ विध्वंसाबद्दल एका अरब स्रोताच्या आधाराने त्यांनी सविस्तर लिहिले आहे (दडविलेले नाही.) गझनीच्या सुलतानांना चीन – भूमध्य समुद्र यांमधील व्यापारी मार्गामध्ये रस होता, भारतामध्ये नाही असे त्यांनी सांगितले आहे. यामध्ये राजकीय खेळ काय आहे बरे? प्राचीन काळामध्ये भारतीय गोमांस भक्षण करीत होते यासाठी पुरावा असला तरी तो दडपायचा, ही माहिती टाळायची, यामध्ये स्पष्टपणे राजकीय खेळ आहे. १८५७ मध्ये वरसईकर गोडसे भटजी ग्वाल्हेर येथे यज्ञासाठी म्हणून गेले. तीर्थयात्रा करीत अयोध्येस गेले. तेथे (त्या वेळच्या ) रामजन्मस्थानाचे त्यांनी दर्शन घेतले. त्या स्थळाचे वर्णन त्यांनी केले आहे. ते स्थळ कुठल्या मशिदीत असल्याचे दिसत नाही. या पुराव्याकडे दुर्लक्ष करून एक मशीद हेच रामजन्मस्थान आहे असा आग्रह धरणे हा राजकीय खेळ आहे. मार्क्‍सवादी इतिहासकार जागा अडवून बसल्याचा उल्लेख साठे यांनी केला. या तथाकथित मार्क्‍सवादी लेखकांमध्ये रोमिला थापर, आर एस शर्मा यांचा समावेश होत असावा या समजुतीमधून मी महाजालावर त्यासंबंधी शोध घेतला. विकिपीडियावर त्यांबद्दल माहिती आहे. त्यावरून असे दिसते की इतिहासाच्या क्षेत्रामधील हे सुप्रतिष्ठित विद्वान आहेत. त्यांना देशात आणि विदेशात मान्यता आहे. रोमिला थापर यांनी दोन वेळा ‘पद्मभूषण’ नाकारले आहे. कारण? त्या म्हणतात की माझ्या इतिहास संशोधन क्षेत्रामधील संशोधकांनी दिलेले मानसन्मान स्वीकारणे त्यांना पसंत आहे. सरकारी सन्मान त्यांना स्वीकारार्ह नाहीत. अशा व्यक्तींना, ‘जागा अडवून बसणारे’, असे संबोधणे हे कितपत योग्य आहे? आणीबाणीच्या काळात सरकारला बद्ध न्यायसंस्था हवी होती.  आता आपल्याला बद्ध संशोधक हवे आहेत का?

–  हेमंत गोळे, पुणे

 

सोयीस्कर तेवढाच पुरावा वापरण्याची क्लृप्ती

मूळच्या लेखात रवींद्र माधव साठे यांनी बौद्ध धर्माच्या भारतातून झालेल्या लोपाची कारणमीमांसा केली आहे. या लेखाच्या शीर्षकातील ‘आक्रमणामुळेच’ या शब्दातील ‘च’ हे अक्षर सदर प्रतिक्रिया लिहण्यास प्रवृत्त करते. कदाचित या ‘च’मुळेच जोंधळे यांनी यास ‘अर्धसत्य’ असे संबोधले असावे. तसे वाटण्यास जागा आहे, कारण साठे यांनी जे पुरावे वापरलेत त्यातील एक अत्यंत हुशारीने वेचक स्वरूपात वापरलेला दिसतो. या मूळ लेखात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनाचा (खंड ३ पान २२९) संदर्भ दिला आहे. परंतु त्याच लेखात पुढे डॉ. आंबेडकरांनी दिलेली बौद्ध धर्माच्या लोपाची कारणमीमांसा करताना जी तीन कारणे दिली आहेत ती विचारात घेतलेली दिसत नाहीत. ती कारणे आहेत- (१) मुसलमानी आक्रमणांच्या काळात येथील सर्व राजे सनातनी ब्राह्मणी धर्माचे अनुयायी होते. त्यामुळे ब्राह्मणी धर्मास राजाश्रय होता. हा राजाश्रय पुढे मुसलमानांचा मूर्तिभंजनाचा जोश कमी होईपर्यंत कायम राहिला. (२) असा राजाश्रय बौद्ध धर्मास नव्हता. (३) भिक्खूंच्या कत्तलीनंतर, ब्राह्मणी धर्माच्या राजांकडून होणारा छळ टाळण्यासाठी त्या काळातील उरलेल्या (भिक्खूंची कत्तल/पलायन झाल्यावर) बौद्ध जनतेने मोठय़ा संख्येने मुस्लीम धर्म स्वीकारला.

वरील कारणांचे विश्लेषण केल्यास हे स्पष्टपणे दिसून येते की ब्राह्मणी धर्माच्या राजांचे त्यांच्याच राज्यातील बौद्ध जनतेला संरक्षण तर नव्हतेच, उलट ते बौद्धांचा द्वेष करीत असावेत आणि त्यामुळे त्यांच्याकडून होणारा छळ टाळण्यासाठी उरलेल्या बौद्ध जनतेला मोठय़ा संख्येने मुस्लीम धर्म स्वीकारावा लागला, हे दुर्लक्षून कसे चालेल? आपल्या जनतेचे संरक्षण करण्याचा साधा ‘राजधर्म’सुद्धा जर तत्कालीन राजांनी पाळला असता व उरलेल्या बौद्धांचा छळ केला नसता, तर कदाचित बौद्ध धर्म थोडा का होईना टिकून राहिला असता. तसेच मोठय़ा प्रमाणात त्यांचे मुस्लीम धर्मात झालेले धर्मातरसुद्धा टळले असते. खरे तर राजांच्या या अशा प्रवृत्तीमुळेच धर्मात मोठय़ा प्रमाणात बौद्ध लोक आल्याने मुस्लीम धर्म इथे स्थिरावला असे म्हणायला वाव आहे. असो, मुसलमानी आक्रमणामुळे बौद्ध धर्म मरणासन्न झाला असला तरी त्याचे ‘प्राण’ जाण्यासाठी अंतिम प्रहार ब्राह्मणी धर्मसमर्थक राजांनी धर्मद्वेषातून केला हेच यावरून दिसून येते.  यामुळेच साठे यांनी इस्लामच्या आक्रमणावरच बौद्ध धर्माच्या लोपाची टाकलेली संपूर्ण जबाबदारी ही पूर्ण-सत्य ठरत नाही, हे मान्य करावे लागेल. नुकताच उद्भवलेला रोहिंग्या मुसलमानांचा प्रश्न व नेमक्या त्याच वेळी आलेला त्यांचा लेख यामुळे जोंधळे यांना लेखकावर इस्लामद्वेषाचा आरोप करावासा वाटणे स्वाभाविक आहे. हे अर्धसत्य प्रामाणिकपणे मान्य केल्यास या आरोपातील हवा निघून जाईल.

सोयीस्करपणे पुरावा वापरणे या प्रकारची प्रचीती साठे यांनी नेहरूंच्या लिखाणाचा दाखला देऊन गझनीचे जे उदाहरण दिले आहे त्यातूनसुद्धा येते.  गझनी याने जर भारतवर्षांतील तत्कालीन स्थानिक स्थापत्यकलेचे कौतुक केले असेल व तसे नेहरूंनी लिहिले असेल तर गझनी कलेचा उपासक होता, आक्रमक नव्हता असे नेहरूंना वाटत होते, या निष्कर्षांवर साठे कुठल्या आधारावर येतात? काहीतरी भव्य-दिव्य पाहिल्यावर जर कोणी क्रूरकर्मा आश्चर्यचकित होत असेल तर यात वावगे काय आहे? तो केवळ मुसलमान होता म्हणून त्याला तसे वाटूच शकणार नाही असा आग्रह धरणे किंवा तसा निष्कर्ष काढणे तर्काला धरून वाटत नाही, उलट त्यातून नेहरूद्वेषच जाणवतो.

साठे यांना मार्क्‍सवाद या प्रकाराचे वावडे असावे व मार्क्‍सवाद पाळणारे लोक इतिहासकार असू शकत नाहीत किंवा होऊ शकत नाहीत असे त्यांना वाटत असावे असे दिसते. याआधी काँग्रेसचे राज्य असताना, साठे यांच्या मते, खरा इतिहास लोकांना कळला नाही, कारण मार्क्‍सवादी मंडळी विविध संस्थांमध्ये जागा अडवून बसली होती, हा तर्क कशाच्या आधारावर केला आहे ते लक्षात येत नाही. चच्रेसाठी ते मान्य केले तरी एक प्रश्न उरतोच की ‘खऱ्या’ इतिहासकारांना ‘खरा’ इतिहास मांडण्यापासून कोणी अडवले होते? यापूर्वी, इतिहास लेखनात तरी आतासारखी अघोषित आणीबाणीची परिस्थिती नव्हती किंवा पाकिस्तानात जाण्याचा आदेश मिळत नव्हता.

मूळ लेखात मुसलमानांची वृत्ती दाखवून देण्यासाठी तालिबान अतिरेक्यांनी बामियान बुद्ध मूर्ती फोडल्याचा दाखला लेखक देतात. शेकडो वर्षे तिकडे मुसलमानी राज्य असतानासुद्धा त्या तोडल्या गेल्या नव्हत्या या बाबीकडे मात्र ते सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. तसेच भारतातच अनेक बौद्ध लेण्यांमध्ये एका कोपऱ्यात दगडाला शेंदूर फासून, बुद्ध मूर्तीमध्ये बदल करून त्यास शेंदूर फासून ही लेणी हिंदू लेणी असल्याचे जबरदस्तीने दाखवायचा जो निंदनीय प्रकार गेल्या काही वर्षांपासून सर्रास चालू आहे त्याबद्दल लेखक काही बोलत नाहीत. यात काही प्रसिद्ध लेणीसुद्धा येतात. या बौद्ध लेण्यांचे असे विद्रूपीकरण व ‘धर्मातर’ करणारे लोक मुसलमान आहेत काय? पाली भाषेचे अभ्यासक जेव्हा अशा काही विविध लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी जातात तेव्हा आसपासचे गावकरी घोळक्याने येऊन ही हिंदू लेणीच आहेत हे ‘नम्रपणे’ ठसवायचा प्रयत्न करतात असा अनेकांचा अनुभव आहे. शिक्षकसुद्धा विद्यार्थ्यांना ते चूपचाप ऐकून घ्यायला सांगतात. हे तर सरळ सरळ आक्रमण आहेच, शिवाय दडपशाहीसुद्धा आहे. बौद्ध धर्माविषयी काही ब्राह्मणी धर्मीयांमध्ये असलेली तिरस्काराची बीजे इतिहातील घटनांमध्ये तर दडलेली नाहीत ना?

– उत्तम जोगदंड, कल्याण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2017 1:35 am

Web Title: articles in marathi on buddhism vs islam religion part 4
Next Stories
1 अभिव्यक्तिस्वातंत्र्याला मग अर्थच काय उरला?
2 आरक्षणाचा पक्षी
3 फेरनिवडीचे महत्त्व किती?
Just Now!
X