समाजावर नजर ठेवणाऱ्या पत्रकारितेची जागा हितसंबंधी पत्रकारिता घेत आहे. माध्यमे सत्तेचा आदर करत आहेत आणि विरोधी विचारांप्रति असहिष्णू बनत आहेत.. एका ज्येष्ठ जाणत्या पत्रकाराच्या नजरेतून आजची ‘हॅशटॅगी’ पत्रकारिता..

सध्याचा काळ भारतीय प्रसारमाध्यमांसाठी फारसा चांगला नाही. माध्यमे नेभळट बनल्याचे माझे मत झाले असल्याचे अनेक जण जाणतात. पूर्वी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि वर्तमानपत्रे सरकारला उघडे पाडण्यात धन्यता मानायची. आता ती तसे करण्यापासून कचरत आहेत. त्याहूनही वाईट म्हणजे आमचा आवाज कधी उठलाच, तर तो सरकारच्या विरोधकांच्या, टीकाकारांच्या – आणि खासकरून कोणी पंतप्रधान, लष्करप्रमुख आदींच्या विरोधात बोलण्याची हिंमत दाखवलीच तर – मुस्लीम आणि काश्मिरी, विद्यार्थी आणि दलित, मुक्त विचारवंत आणि लेखक यांच्या विरोधातच उठतो.

दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या बाबतीत परिस्थिती अधिक वाईट आहे हे मान्यच आहे. पण मुद्रित माध्यमेही स्वत:लाच आवर आणि लगाम घालताना दिसत आहेत. माध्यमे पहारेकऱ्याप्रमाणे वागण्याऐवजी, म्हणजे सरकारवर आणि अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर प्रसंगी ‘वॉचडॉग’प्रमाणे गुरगुरण्याऐवजी, मालकाला वाचवण्याचा किंवा त्याची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एखाद्या अंगरक्षक किंवा पाळीव कुत्र्याप्रमाणे वागत आहेत.

दूरचित्रवाणी माध्यमांत ३५ वर्षे व्यतीत केलेली व्यक्ती म्हणून मला गेल्या काही वर्षांतील चार प्रमुख पायंडे अस्वस्थ करतात. आता मी त्या माध्यमातून काही काळ बाजूला गेल्यामुळे हे बोलण्याची नैतिक जबाबदारी मला जाणवते. तसे न करणे म्हणजे मी ज्या व्यवसायावर प्रेम करतो त्याच्याशी प्रतारणा केल्यासारखे होईल.

प्रथमत:, टीव्हीचे वृत्तनिवेदक पंतप्रधानांची मुलाखत ज्या प्रकारे घेतात ती पद्धत. मुलाखत अगदी लीन होऊन घेतली जाते. एखाद्या मुद्दय़ावर आव्हान देणे, प्रतिप्रश्न विचारणे याची शक्यताच त्यात अगदी लुप्त होऊन जाते. काही ठरावीक मुद्दय़ांचा सखोल अभ्यास करून त्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा प्रत्येक प्रश्नागणिक विषय बदलला जातो. त्याचा पाठपुरावा केला जात नाही. त्यातून अनेक प्रश्न नुसते उभे केले जातात आणि त्यातून अर्थपूर्ण असे काहीही साध्य होत नाही. तसेच पंतप्रधानांना इतका वेळ उत्तर देण्याची संधी दिली जाते, की त्यात ते विषयांतर करतात आणि मूळ प्रश्नाला बगल देतात. अगदी डोनाल्ड ट्रम्प यांचीही मुलाखत कधी अशा प्रकारे घेतली गेलेली नाही. प्रश्नांचा पोत तर त्याहून खालच्या थराचा असतो. अडचणीत आणणारे प्रश्न टाळले जातात. प्रश्न खूपच सौम्य पद्धतीने विचारले जातात. पंतप्रधानांच्या चुका उघड पाडण्याऐवजी त्यांना विरोधकांच्या कथित चुका उघड करण्याची संधी दिली जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या बाबी चुकल्या त्याबद्दल प्रश्नच विचारले जात नाहीत. परिणामी मुलाखत – मग ती सीएनएन, न्यूज १८, टाइम्स नाऊ किंवा झी अशा कोणत्याही वाहिनीवरील असो – अगदीच सोपी बनते.

दुसरी गोष्ट म्हणजे वृत्तनिवेदकांची चर्चेदरम्यान वागण्याची पद्धत. टीव्हीवरील चर्चेत जे पाहुणे आपल्याला अनुकूल मते नोंदवतात त्यांनाच बोलण्याची संधी दिली जाते. त्यांना फारसे अवघड प्रश्न विचारले जात नाहीत. हवे तितका वेळ बोलू दिले जाते. पण जे विरोधी मत नोंदवतात त्यांना एखाद्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या गुन्होगारासारखी वागणूक दिली जाते. त्यांच्यावर एकामागून एक अवघड प्रश्नांची सरबत्ती केली जाते. प्रश्न विचारण्याचा स्वर उंच आणि आविर्भाव आरोप करण्याचा असतो. त्यांना मधेमधे रोखले जाते. बोलूच दिले जात नाही.

अशा कार्यक्रमांचा उद्देश नि:पक्षपाती चर्चा घडवणे, अन्वेषक वृत्तीने आणि कलात्मक पद्धतीने माहिती खणून काढणे आणि शेवटी प्रेक्षकांना सज्ञान करून सोडणे.. म्हणजे त्या माहितीआधारे प्रेक्षक स्वत: निर्णय घेऊ शकतील.. हा असला पाहिजे. पण तसे घडण्याऐवजी निवेदक आपलीच लंगडी बाजू उघडी पाडून विश्वासार्हता कमी करून घेतात. हे ‘रिपब्लिक टीव्ही’ आणि ‘टाइम्स नाऊ’ या वाहिन्यांवर सातत्याने पाहायला मिळते. मात्र अन्य वाहिन्यांचे तरुण निवेदकही सवंग प्रसिद्धीच्या हव्यासापोटी तसे वागताना दिसतात.

माझी तिसरी चिंता आहे ती बरीचशी एनडीटीव्हीच्या प्रसारणातून व्यक्त होते. इंग्रजीत प्राइम-टाइममध्ये खात्रीशीर बातम्या देणारी ही एकमेव वाहिनी असल्याचे दिसते. पण तेथेही प्रत्येक बातमीनंतर निवेदक स्वत:चे मत मांडतात. हे म्हणजे वृत्तपत्रात बातमीच्या शेवटी त्यातून काय बोध घ्यायचा हे लिहिल्यासारखे आहे. त्यातून वाचक किंवा प्रेक्षकाच्या वैयक्तिक मतप्रवाहांवर अतिक्रमण होत असते. त्यातून प्रेक्षकांना अगदी लहान मुलासारखी वागणूक दिली जाते आणि बोधामृत पाजले जाते. ते वाचकांना अवमानकारक आहे. एनडीटीव्हीसारख्या वाहिनीचे संपादक अशा बाबी कशा चालू देतात याचे आश्चर्य वाटते.

माझा चौथा आक्षेप दूरचित्रवाणी वाहिन्या एखादी बातमी रेटून नेण्यासाठी वापरतात त्या हॅशटॅगवर आहे. त्यांना बनावट देशभक्तीचा वास येतो. ते हॅशटॅग एखाद्याकडून आपल्याला अपेक्षित वागणूक करवून घेण्यासाठी वाजवलेल्या वाद्यवृंदासारख्या भासतात. ते तुम्हाला स्वतंत्र विचार करण्याची संधी नाकारतात. उलटपक्षी ते तुमचे विचार हाकण्याचे प्रयत्न करतात. आणखी वाईट बाब म्हणजे ते अत्यंत कलाहीन आणि कच्चे असतात. ‘फाइट फॉर इंडिया’, ‘लव्ह माय फ्लॅग’, ‘प्राऊड इंडियन’, ‘टेरर स्टेट पाक’, ‘अँटिनेशन जेएनयू’ यांसारख्या हॅशटॅग्जमधून आपल्या भावनांशी खेळण्याचा आणि आपल्याला बालकासारखी वागणूक देण्याचा प्रयत्न केला जातो.

या नव्या काळाच्या पत्रकारितेत श्रद्धेचा अभाव आहे. मी थोडा जुन्या विचारांचा असेन, पण नव्या तंत्रज्ञानाबरोबर बातमी सादर करण्याची पद्धत बदलत असली, तरी त्यातील सत्याची आस बदलता कामा नये. सादरीकरण कसेही असले तरी चांगली पत्रिकारिता नेहमी उठून दिसते. आणि वाईट पत्रकारिता काहीही  केले तरी झाकली जात नाही किंवा जनभावनेच्या नावाखाली लपवली किंवा माफ केली जाऊ शकत नाही. आणि नि:संशयपणे, पत्रकारितेला प्रसिद्ध करण्याच्या नादात तिचा दर्जा खालावू दिला जाऊ देता किंवा तिची वस्तुनिष्ठता लोप पावू देता येत नाही.

अखेर, हे केवळ आपल्या दूरचित्रवाणी वाहिन्यांपुरते मर्यादित नाही. ते त्याहून अधिक व्यापक आहे. त्याचा आवाका आपल्या लोकशाहीच्याही पुढे जाणारा आहे. हे आपल्याबाबत आहे आणि आपण खुले सत्य कसे स्वीकारतो याबाबत आहे. जर आपण अर्धसत्य आणि चुकीचा अन्वयार्थ लावणे खपवून घेणार असू, तर दोष फक्त आपल्यालाच देता येईल.

अनुवाद – सचिन दिवाण