पारंपरिक शिवणकाम, विणकाम आणि अगदी गोधडी शिवण्याची कामं ही सारी स्त्रियांशी संबंधित कौशल्यं म्हणून आपल्याकडे पाहिली जातात. ‘फावल्या वेळात’ करायचं काम; पण त्याचबरोबर, त्यात मायेची ऊब असलेल्या आणि जिव्हाळ्याचा स्पर्श असलेल्या गोष्टी म्हणूनही पाहिलं गेलं. या कामात एकत्र येऊन काम करण्याचा अनुभव होता, आणि नंतर काही प्रमाणात आíथक सबलतेचे मार्गदेखील. पण या पिढय़ान्पिढय़ा चालत आलेल्या कलाकुसरीच्या कामांना नव्याने भिडण्याचं काम काही समकालीन कलाकार करत आहेत. मुंबईच्या शकुंतला कुलकर्णी यांच्या ‘गोधडी’ या मालिकेत स्त्रीच्या नग्न देहाचं चित्रण करताना त्यांनी बाईसाठीचं संकुचित होत जाणारं अवकाश दाखवलं, तर दुसरीकडे तिच्या सबलीकरणातून येत जाणारा आत्मविश्वासदेखील. यात बायका चालताना, बसलेल्या, उभ्या अशा अनेक कृती करताना दिसतात. ते करताना त्यात एक तोचतोपणा जाणवतो. बिनचेहऱ्याच्या या स्त्री-प्रतिमा परात्मता दर्शवतात. पण त्या एकत्रितरीत्या काम करताना त्यांच्यात एक सामूहिकतेची भावना निर्माण झालेली जाणवते. अर्थात, या ‘हस्तकले’ला कलेचं मूल्य प्राप्त होतं का, हा प्रश्न उरतोच. हे मूल्य जरी प्राप्त होत असेल तरी ते मिळवून देण्यात कुलकर्णी या ‘कारक’ बनतात.

याच धर्तीवरच्या ‘फॅब्रिक असेम्ब्लाज’ या रचनाप्रकारात वैशाली ओक सुती कापडांचे तुकडे, चिंध्या यांतून अनेकविध आकार तयार करतात. गोधडीप्रमाणे रचलेल्या थरातून खालचे थर उलगडत जातात. जीर्ण झालेल्या तर कधी खरवडून काढलेल्या या कापडाच्या आणि धाग्यांच्या थरातून आतले उसवलेले धागे, निराळ्या रंगाच्या कापडाचे पदर दाखवतात. त्यावर घातलेली वीण डोळ्यांना स्पष्ट दिसत राहते. ‘टाइम स्क्रॅचेस’, काळ आणि अवकाशाचे असंख्य पदर भुऱ्या, लाल, राखाडी, तपकिरी, निळसर रंगांच्या छटांतून ही चित्रं आकार घेतात. अमूर्त वाटणाऱ्या त्यांच्या चित्रांतून अनेक कथनं आकाराला येतात. ‘फ्लो ऑफ डेथ’मध्ये लाल आणि काळ्या कापडांच्या रचलेल्या थरांतून छातीवर लागलेली गोळी आणि त्यातून पसरत जाणारं रक्त, त्याचे खालपर्यंत आलेले ओघळ दिसतात तर गोध्रा २००२ या मालिकेत निळ्या, तपकिरी कापडातून बंदुकीचे आकार स्पष्ट होत जातात.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
artificial intelligence generating revolution in film industry
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेने चित्रपटांना संजीवनी
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

धागे, कपडे, विणकाम यांचा अधिक रूपकात्मक वापर अलीकडच्या काळातल्या काही कलाकार करताना दिसतात.

बडोद्याच्या रोली मुखर्जी या ‘आय हर्ड देअर स्टोरीज फ्रॉम द क्लाउड्स’सारख्या चित्रमालिकांतून काश्मीरसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या विषयाची मांडणी भरतकामातून करतात. ‘फॉलिंग थ्रेड्स’ आणि ‘मार्टअिर’ या चित्रांत काश्मीरमधल्या आंदोलक, साडीवर किंवा उशीच्या अभ्य्रावर केली जाणारी वेलबुट्टीची नक्षी व त्यातून गोलाकार घुमट तयार होतात. त्या ओळी चित्राला विभागत अनेक प्रतलं तयार करतात. या प्रतलांमध्ये काश्मीरमधले मूलतत्त्ववादी, स्वतंत्र काश्मीरची मागणी करणारे, राजकीय नेते, शिकारा हाकणारे अशा अनेक प्रतिमा दिसतात. दृष्टिआड केली जाणारी, शासन संस्थांकडून केली जाणारी हिंसा या चित्रातून दृश्यरूपात आपल्या समोर येते. आपलं पाहणं, मनात तयार होत गेलेल्या साचेबंद प्रतिमा, मांडणीच्या पद्धती या साऱ्याला मुखर्जी या चित्रप्रतिमांतून आव्हान देतात. भरतकाम, कांथाचे धावदोरे, झगझगीत निळ्या-गुलबाक्षी रंगांत रंगवलेल्या ‘एग्झाइल्ड होम’मध्ये घराचं उलटं प्रतिबिंब आणि एकमेकींना बिलगलेल्या माय-लेकी किंवा ‘वेटिंग’मध्ये हातात नवऱ्याचा फोटो घेऊन उभी असलेली ‘अर्ध विधवा’ दिसतात. भरतकामासारख्या अत्यंत नाजूक समजल्या गेलेल्या कलाकुसरीचा वापर त्या करतात. उसवलेलं, जुनं, विटलेलं रेशमी किंवा सुती कापड यात मानवी शरीराचं आणि त्यावर सतत होणाऱ्या जखमांचं प्रतीक बनतं. मानवी शरीरावर दिसणारे हिंसेचे, जखमांचे व्रण या टाक्यांतून दिसतात. ते धाग्यांनी घातलेल्या टाक्यांतून, विणकामातून या उघडय़ा जखमा शिवून, भरून काढायचे प्रयत्न वाटतात. काश्मिरी समाजाची उसवत चाललेली वीण, त्याच्या खोलवरच्या खुणा यांच्या रूपकात्मक चित्रणाबरोबरच मुखर्जी आत्ताच्या प्रतिमा वापरून त्याला समकालाशी जोडून घेतात.

मुखर्जीप्रमाणेच राखी पेसवानी यांच्या कलाकृतींतदेखील हे कापड मानवी शरीर आणि त्वचेचं रूपक बनतं. पण ते विशिष्ट संदर्भापुरतं मर्यादित न राहता वैश्विक रूप घेतं. कष्ट आणि श्रमातून आलेले मानवी शरीरावरचे व्रण आणि ओरखडे भरतकामातून केलेल्या रेखाटनांतून अत्यंत तरलपणे आपल्यासमोर येतात. हातरुमालावर केलेल्या ‘अब्रेजन अ‍ॅण्ड इरेजर (ऑन लेबर)’ या चित्रमालिकेत आठ शब्द-चित्रांच्या माध्यमातून श्रमिक शरीर आणि त्याचं रूपक असलेलं रेखाटनं केलेलं, डागाळलेलं कापड यांचं नातं उभं राहतं. ‘डीप’ शब्दाबरोबर खोल जखम झालेलं बोट, ‘ड्राय’बरोबर भेगाळलेली, कोरडी पडलेली त्वचा, ‘स्कार्ड’बरोबर लालसर व्रण असलेली त्वचा तर ‘टॉर्न’बरोबर ठिकठिकाणी बारीक फाटलेला रुमाल अशा प्रतिमांतून हे नातं आकाराला येतं. बॉडी एकोज (लोकेटिंग क्राफ्ट) हे काश्मिरी रेशमी साडीवर खादीच्या धाग्यांनी आणि कापडानं नजाकतीनं केलेलं रफूकाम मुळात असलेल्या वेलबुट्टीला उठाव आणतं. विरलेल्या कापडावरचे टाके हे मानवी संवेदना, आकांक्षा आणि त्यातली छुपी हिंसा याचं पण रूपक बनतात. त्या निनावी कारागिरीबरोबर पेसवानी एका प्रकारे संवादच करत असतात. यात एकीकडे काश्मीरच्या जखमांचे व्रण दिसतात आणि दुसरीकडे, या हस्तकलेकडे आजच्या संदर्भात पाहायचा प्रयत्नही दिसतो.

या माध्यमांत काम करताना कला-हस्तकला यांचा इतिहास, त्याची सांस्कृतिक बीजं, त्याचे आíथक सामाजिक पडसाद याकडे पाहणंही मोलाचं ठरतं. हे करताना बडोद्याच्या लावण्या मणी या बाटिक, भरतकाम, अ‍ॅप्लिके, कलमकारी यासारख्या माध्यमातून सुती कापडावर काम करतात. ‘ट्रॅव्हलर्स टेल्स’ या कलाकृतीत वसाहतवादाच्या काळातले संदर्भ वापरत मणी कला-हस्तकला या भेदापासून ते इतिहास आणि भाषेच्या गुंतागुंतीच्या रचनांपर्यंत अनेक विषयांना हात घालतात. पूर्वेकडचे भाग ‘शोधून’ काढणारे, त्यांची जहाजं, प्रवासातले नकाशे, कंपास, निळीची आठवण करून देणारा सायनोटाइपने आणलेला निळा रंग यांसारख्या अनेक गोष्टी या कथनाचा भाग बनतात. यात कापडावरचं रंगकाम आणि लिखित मजकूर दोन्ही एकत्र येतात. वसाहतवादाच्या इतिहासाचा वेध घेताना त्याच काळात निर्माण झालेल्या कला आणि हस्तकला या कोटींचा पुनर्वचिार करायला लावतात. ‘कलमकारी’ या शेकडो वर्षे जुन्या पद्धतीत काम करताना त्या कलाकृतीत त्याच्याही इतिहासाकडे पाहतात. कलमकारीच्या लोकप्रियतेमुळे तिथल्या स्थानिक कापड गिरण्यांवर गदा येईल या भीतीतून इंग्लंड आणि फ्रान्समध्ये १७ व्या शतकात या तंत्रावर बंदी घालण्यात आली होती. पण सांकेतिक भाषेत पत्र लिहून त्याची माहिती युरोपात पाठवली जात होती. त्या पत्रातला मजकूरही या कलाकृतीत त्या वापरतात. कलमकारीसारख्या पारंपरिक कलाकुसर आणि सजावटीच्या माध्यमांना समकालीन कलेच्या अवकाशात आणताना त्या इतिहास, कला, हस्तकला यांची सांगड घालतात. शिवणकाम, कपडय़ांना रंग चढवणे, त्याचे अनेक थर देणे या कृतीतून त्यांनी केलेल्या कलाकृतीची प्रत्येक पायरी, प्रत्येक थर सुटा करून पाहता येतो. आधुनिक कलेतल्या कॅनव्हासवर दिलेल्या ऑइलपेंट किंवा अ‍ॅक्रॅलिकच्या थरांना, त्यातल्या जोरकसपणाला आणि कुंचल्याच्या जोमदार फटकाऱ्यांना नाकारताना त्या या पारंपरिक माध्यमांचा अवलंब करतात.

एकीकडे, ही कलाकुसर आणि कौशल्य हा सांस्कृतिक वारसा ठरतो. यात स्त्रियांना मिळणारं अवकाश आणि त्यातून व्यक्त होणं आहे. पण त्याचबरोबर हेही खरं की, त्याला ‘कला’ म्हणून मान्यताही दिली जात नाही. यातला खरा धोका असतो तो या प्रकारांकडे स्त्रण म्हणून आणि ‘हस्तकला’ म्हणून पाहिलं जाण्याचा. समकालीन कलाकारांची मर्मदृष्टी याकडे नव्या पद्धतीने पाहायला लावते. समकालीन कलाजगतातल्या या वर उल्लेखलेल्या कलाकार यातल्या साचेबंद दृष्टिकोनाला धक्का देतात, सुप्त अथवा उघडउघड हिंसेला व्यक्त करतात आणि भरतकाम, विणकाम या माध्यमांची समकालीन कलाप्रकारात पुनर्माडणी करतात.

नूपुर देसाई

noopur.casp@gmail.com