समकालीन दृश्यकलेच्या क्षेत्रात भारतीय स्त्रियांनी घडवलेल्या इतिहासाचा वेध घेणारं हे सदर आता आजच्या ज्येष्ठ चित्रकर्तीपाशी पोहोचलं आहे. त्यापैकी हा लेखांक नलिनी मलानी यांचा प्रतीक-पुनशरेध आणि त्याची नवनवीन रूपं या दोन्हीबद्दल सांगणारा..

भारताच्या फाळणीची पहिली ओळख झाली ती सआदत हसन मंटो यांच्या तोबा तेक सिंगच्या कथेनी. शाळेच्या इंग्रजीच्या पाठय़पुस्तकात ही कथा आली आणि तोपर्यंत फक्त इतिहासाच्या पुस्तकामधून येणारी फाळणीची माहिती अनुभवाच्या पातळीवर उतरली. हीच कथा रूपक म्हणून पुन्हा पाहता येते ती नलिनी मलानी यांच्या ‘रिमेम्बरिंग तोबा तेक सिंग’ याच नावाच्या इन्स्टलेशनमध्ये. पण इथं ती केवळ एका अनुभवापुरती मर्यादित राहात नाही. ती मानवी समाजाला व्यापून टाकणाऱ्या वेदनेवर भाष्य करते. तिचा तळ गाठायचा प्रयत्न करते. या इन्स्टलेशनमध्ये खोलीच्या मधोमध मोठय़ा भिंतीवर हिरोशिमा, नागासाकी या शहरांवर अमेरिकेने टाकलेल्या अणुबॉम्बच्या व्हिडीओ फुटेजमधले काही तुकडे मलानी त्यांच्या काही रेखाचित्रांबरोबर गुंफलेले होते. बाजूच्या भिंतींवर मोठाल्या स्क्रीनवर स्त्रियांचे चेहरे दिसतात, दोन बाजूंच्या त्या दोघी एका साडीची कधीच न जुळणारी दोन टोकं जुळवण्याचा प्रयत्न करू लागतात. मध्ये खोलीभर रचून ठेवलेल्या ट्रंका आणि काही गाद्या जगभराच्या निर्वासित लोकांचं प्रतीक बनतात. या ट्रंकांमध्ये छोटे मॉनिटर लावून त्यात काही प्रतिमा, फिल्म्स दिसत राहतात. त्यात युद्ध, दंगली, फाळणी, स्थलांतरं यामुळं स्वत:चा देश सोडून बाहेर जावं लागणाऱ्या जगभरातल्या असंख्य माणसांची व्यथा आणि वेदना दाखवतात. एका मॉनिटरवर दुसऱ्या महायुद्धाचं तर दुसऱ्या मॉनिटरवर भारत-पाकिस्तान फाळणीचं तर तिसऱ्यावर १९९२च्या मुंबईच्या दंगलीचं चित्रीकरण दाखवलं जातं. या दृश्यरचनेतून या ऐतिहासिक दस्तावेजांची त्या आजच्या संदर्भात मांडणी करतात. या दस्तावेजांमधून इतिहासाचं आकलन तर होतंच पण १९९५-९९मध्ये चालू असलेल्या भारताच्या अणुचाचण्या आणि अणुऊर्जा कार्यक्रमावर त्या बोचरी टीका यातून करतात. १९९० च्या दशकात मुंबईच्या छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयात (तेव्हाचं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझिअम) आंतरराष्ट्रीय व्हिडीओ आर्ट फेस्टिव्हलमध्ये हे इन्स्टलेशन (मांडणशिल्प) मांडण्यात आलं, आणि संग्रहालय बघायला येणाऱ्या हजारो लोकांच्या विचारविश्वाचा ते भाग बनलं.

१९४६ साली कराचीत जन्म झालेल्या नलिनी मलानी या फाळणीनंतर त्यांच्या कुटुंबाबरोबर ‘निर्वासित’ म्हणून भारतात आल्या. अर्थात, अगदी लहान असताना आल्याने त्यांना फाळणीच्या आठवणी नाहीत. पण तो धागा धरून आपल्या कलाकृतीतून त्या इतिहासाची सत्यता पडताळत राहतात. आपला अस्वस्थ भूतकाळ, त्याच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक आठवणी, आपला भवताल समजून घेण्यात असलेलं त्यांचं अपुरेपण याचा माग लावण्याचा त्या प्रयत्न करतात. हे करत असताना त्या मिथकं आणि त्यातील निरनिराळी पात्रं यांचं चित्रण करतात. भागवत पुराण, रामायण असेल किंवा ग्रीक मिथकांमधील मेदिया किंवा कासान्ड्रा ही पात्रं असतील. त्यातले साहित्यिक, मिथिकीय, धार्मिक संदर्भ महत्त्वाचे ठरतात. पण ते उलगडत जाताना इतिहासाचा, त्यातल्या अनेक शक्यतांचा – मार्गाचा, लौकिक-पारलौकिक संदर्भाचा खोलवर शोध घेतात. ही मिथकं वारंवार सांगितली जाताना, सादर केली जाताना त्यांचे अर्थ आणि संदर्भ बदलत राहतात. त्यांचं एकसंध नसणं हाच मलानी यांच्या कलाकृतीचा गाभा बनतो. परंपरा आणि संस्कृती या अशा एकसंध, शुद्ध मानण्याच्या मर्यादा त्या दाखवून देतात.

१९९० नंतर भारतीय कलाक्षेत्रात कमालीचे बदल झाले, नवं तंत्र, नवे घाट, नवी माध्यमं कलाकार हाताळू लागले.  भारतात व्हिडीओ आर्टची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सुरुवातीच्या कलाकारांपैकी एक म्हणजे नलिनी मलानी. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण मुंबईच्या जे. जे. कला महाविद्यालयाच्या चित्रकला विभागात पार पडलं. पण १९९० च्या दशकात एकीकडे, जागतिकीकरणामुळे कलाव्यवहार बदलत होता तर दुसरीकडे धार्मिक दंगली, अस्मितेचं राजकारण, हिंसा या पाश्र्वभूमीवर अनेक कलाकारांसाठी नव्या माध्यमाकडे वळणं आणि नवे घाट अंगीकारणं निकडीचं ठरलं. बदलत्या परिस्थितीचं आकलन करताना त्यांची कला, तिचं रूप बदलत गेलं. यापैकी एक म्हणजे व्हिडीओ आर्ट. पाश्चात्त्य कलाजगतात याची सुरुवात १९६०च्या दशकात झाली होती. आता आपण ज्याला व्हिडीओ आर्ट म्हणतो त्यात कलाकार एखादी संकल्पना घेऊन काही प्रतिमा गुंफून त्या मांडणशिल्प स्वरूपात मांडतात. चित्रपटात कथा महत्त्वाची असते तर याउलट इथं काळ, अवकाश, प्रतिमा आणि घाट यांचा मेळ. ते साधण्याकरिता प्रतिमा टिपण्याची, संकलनाची वेगवेगळी तंत्रं कलाकार वापरतात. मलानी त्यांच्या व्हिडीओ-मांडणशिल्पांमध्ये छायाप्रकाशाचा खेळ करतात. प्रोजेक्टरने फेकलेल्या प्रकाशकिरणांमुळे त्यांनी अ‍ॅक्रेलिकच्या तावावर रेखाटलेल्या प्रतिमा उजळून निघतात, पण त्याच्या जोडीला त्या प्रतिमांच्या सावल्या चहुबाजूच्या भिंतींवर पसरतात. त्या संहिताबद्ध आकृतिबंधाचे अंतरंग उलगडून दाखवत असतानाच ही मांडणशिल्पं प्रेक्षकांना अंतर्बाह्य़ व्यापून टाकतात. त्या कलाकृतीच्या अनुभूतीत बघणारे शरीरानं आणि मनानं गढून जातात. एवढंच नव्हे तर त्यांचं तिथलं अस्तित्व, त्यांच्या शारीर जाणिवा आणि पाहण्यातून एक प्रकारचा संवाद इथं उभा राहतो.

लैंगिक अत्याचारातून बाईवर सत्ता प्रस्थापित करणं हे फाळणीच्या काळातही घडलं आणि नंतरही अनेक वेळा म्हणजे जातीय, धार्मिक दंगलींच्या संदर्भात दिसत राहिलं आहे. ते त्या त्या वेळी मलानी यांच्या कलाकृतीत उमटताना दिसतं. दर पाच वर्षांनी जर्मनीच्या कासल शहरात भरणाऱ्या ‘डॉक्युमेंटा’ या जागतिक पातळीवरच्या प्रदर्शनात समावेश झालेलं ‘इन सर्च ऑफ व्हॅनिश्ड ब्लड’ हे त्यांचं इन्स्टलेशन. यात छताला टांगलेल्या अ‍ॅक्रेलिकच्या दंडगोलांवर काही रंगवलेल्या प्रतिमा दिसतात.

पारदर्शक अ‍ॅक्रेलिकने बनवलेले हे दंडगोल सतत फिरत राहतात. त्यामुळे त्यावरच्या प्रतिमा आणि प्रोजेक्टरने त्यावर प्रसारित केलेल्या हलत्या प्रतिमा यांची सरमिसळ होत राहते. त्यांची सावली खोलीच्या भिंतींवर पडून असंख्य प्रतिमा आणि कथनं आकाराला येतात. शिवाय, स्टॉप मोशन अ‍ॅनिमेशनच्या तंत्रानी काही प्रतिमा वेगाने हलत राहतात. जर्मन लेखिका ख्रिस्ता वूल्फची ‘कासान्ड्रा’ आणि महाश्वेतादेवींची ‘द्रौपदी’ या कथांचे संदर्भ दडपशाहीच्या इतिहासाची आणि वर्तमानाची रूपकं म्हणून या मांडणशिल्पामध्ये येतात.

अर्थात, त्यांचा कलाव्यवहार हा व्हिडीओ किंवा मांडणशिल्पांपुरता मर्यादित राहिलेला नाही. चित्रकलेशी त्यांचा असलेला संबंध आणि त्या माध्यमावरची त्यांची पकड हेही तितकंच सर्जनशील आणि संवेदनशील आहे. मिथकांचा शोध घेताना त्या चित्रातही त्यांना गुंफतात.  सीता आणि मेदिया ही दोन पौराणिक किंवा मिथकातील पात्रं. ‘सीता/मेदिया’ याच नावाच्या त्यांच्या चित्रात या दोघींमधले समान धागे आपल्या समोर आणतात : दोघींचं जमिनीशी जवळचं नातं, दोघींना नवऱ्याकरिता हद्दपार व्हावं लागलं आणि दोघींना त्यांच्या नवऱ्यांनी शेवटी अव्हेरलं. स्त्री म्हणून त्यांना जे भोगावं लागलं ते मलानी यांना महत्त्वाचं वाटतंच, पण त्यापुढे जाऊन इच्छा-आकांक्षा, हिंसा, फसवणूक या मानवी व्यवहारातल्या मूलभूत लक्षणांना त्या हात घालतात.

सीता/मेदिया हे चित्र दुभंगलेलं दिसतं. पिवळसर रंगाच्या चौकोनांमध्ये त्यांची गोष्ट उलगडत जाते. निळी, विषारी झालेली जमीन, तिचे खडबडीत अंतरंग एकीकडे दिसतात. दुसरीकडे, नकाराची वाट पाहणारी सीता/मेदिया दिसते. वेषांतर करून आलेला म्हातारा, पृथ्वीला आधार देणारी जंगली श्वापदं, युद्धाच्या गडबडीत असणारे रामाच्या फौजेतले वानर अशा अनेक प्रतिमा भोवताली येतात. तर ‘री-थिंकिंग राजा रविवर्मा’ या चित्रात त्या राजा रविवर्मा यांच्या ‘गॅलेक्सी ऑफ म्युझिशिअन्स’ या सुप्रसिद्ध चित्राची पुनर्माडणी करतात. आधुनिक भारताचं चित्र रंगवताना रविवर्मा यांनी भारतातल्या विविध धर्माच्या आणि प्रांतांतल्या स्त्रियांना या चित्रात एकत्र आणलं होतं. मलानी त्यांच्या चित्रात ही ‘आदर्शवादी’ मांडणी खोडून काढत जिवंत आणि वास्तवातल्या स्त्रीच्या प्रतिमेचं चित्रण करतात. त्याच चित्राचा संदर्भ घेत ‘युनिटी इन डायव्हर्सिटी’ या व्हिडीओमध्ये गुजरात दंगलीत मुस्लीम स्त्रियांवर झालेल्या भीषण अत्याचारावर भाष्य करतात. स्वातंत्र्योत्तर काळातली राष्ट्रीय एकात्मतेची वीण यात उसवत जाताना दिसते; रविवर्मा यांच्या चित्रातल्या एकत्र जमलेल्या त्या देखण्या, वैभवी परंपरेतून आलेल्या स्त्रियांचा तो देखावा आजच्या हिंसेच्या वातावरणात कोलमडून पडताना दिसतो. याच तऱ्हेने, शोषण आणि हिंसेच्या संदर्भात राष्ट्र, परंपरा, स्मृती, मिथकं यांचा पुनशरेध घेणं आणि त्यांचं पुनर्वाचन करणं हा मुद्दा नलिनी मलानी यांच्या कलाकृतींचा केंद्रबिंदू ठरतो.

 

नूपुर देसाई

noopur.casp@gmail.com

लेखिका कला समीक्षक आणि समकालीन कलेच्या संशोधक आहेत.