23 January 2018

News Flash

होता गुणी; तरीही..

नुक्कड, वागले की दुनिया यांसारख्या मालिकांचे दिग्दर्शक कुंदन शहा यांचे शनिवारी निधन झाले.

अरुणा अन्तरकर | Updated: October 8, 2017 4:36 AM

जाने भी दो यारो, चित्रपट आणि नुक्कड, मालिकांचे दिग्दर्शक कुंदन शहा

जाने भी दो यारो, कभी हां कभी ना या सारखे चित्रपट आणि नुक्कड, वागले की दुनिया यांसारख्या मालिकांचे दिग्दर्शक कुंदन शहा यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या कारकीर्दीचा धांडोळा घेणारा लेख..

दिग्दर्शक हा चित्रपटाचा कप्तान असतो, हे हिंदी चित्रपटाच्या बाबतीत प्रत्यक्षात खरं असो वा नसो; निदान पक्कं ठरलेलं आहे, मान्य झालेलं आहे. पण निर्माता चित्रपटाचा कोण असतो, हे सांगण्याची हिंमत मात्र आजवर कुणी केलेली नाही. चित्रपटाच्या आर्थिक यशापयशाचा बोजा त्याच्यावर टाकून ‘मी तो  हमाल भारवाही’ ही भूमिका त्याच्यावर लादली गेली आहे. चित्रपटाच्या सृजनशील प्रक्रियेत आणि कलात्मक यशात त्याचा हिस्सा, त्याचं श्रेय याची कुणालाच आठवण दिसत नाही.

जो चित्रपटाचा कणा असतो त्या निर्मात्याची अशी वधुपित्यासारखी दयनीय अवस्था असण्याचं एक कारण म्हणजे पन्नास वर्षांपूर्वीच्या चित्रपट व्यवसायामध्ये निर्माता म्हणजे हीरो व त्याचे ‘मित्र’ (ऊर्फ चमचे) आणि हीरॉइन व तिची आई यांची बडदास्त राखताना अन् मनधरणी (खरंतर पायधरणी) करताना दिसायचा. मुशीर आणि  रियाज यांच्यासारखे मूठभर अपवाद सोडले, तर ज्यांच्या नावावर चित्रपट पाहायला जावं असे निर्माते आपल्याकडे क्वचित दिसतात.

आणि ते दिसत नाहीत म्हणून कुंदन शहा नावाच्या गुणसंपन्न दिग्दर्शकाच्या नावावर चोवीस वर्षांच्या कारकीर्दीत फक्त सात चित्रपट दिसतात! या सातांपैकी फक्त दोन गाजले- ‘जाने  भी दो यारों’ आणि ‘कभी हां, कभी ना’. ‘क्या कहना’ रौप्यमहोत्सवी ठरला, पण त्याची या दोन चित्रपटांसारखी चर्चा झाली नाही. ‘दिल ने कहा’मधे रेखा असूनही त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. हे दोन्ही चित्रपट रखडले, हे या दु:स्थितीचं खरं कारण. कुंदन शहा हा दिग्दर्शक तिथे कमी पडला नव्हता. अर्थात ‘जाने भी दो यारों’ आणि ‘कभी हां, कभी ना’ यांची सर त्यांना नव्हती. तरीही त्याच काळातल्या इतर अमिताभग्रस्त, मनमोहन देसाईत्रस्त, हिंसायुक्त आणि सुबुद्धतेपासून मुक्त चित्रपटांच्या तुलनेत शहांच्या दिग्दर्शकाची धार कमी झालेली असूनही हे चित्रपट खूपच चांगले होते.

विशेषत: ‘क्या कहना’चं रौप्यमहोत्सवी यश हे शहांच्या दिग्दर्शन कौशल्याचंच फलित म्हटलं पाहिजे. हा चित्रपट ज्या काळात पडद्यावर आला, तेव्हा पडद्यावर आणि समाजावरही (अर्थात शहरी, शिक्षित समाजात) कुमारी माता ही दारुण समस्या राहिली नव्हती. गर्भनिरोधक, संततीप्रतिबंधक इ.इ. साधनं व औषधं सामान्य व्यवहारातही रुळली होती. (सौजन्य- टीव्ही, रेडिओ आणि वृत्तपत्रं यांच्यातून होणाऱ्या बेसुमार जाहिराती) गर्भपाताला कायदेशीर मान्यता मिळाली होती. पण संवेदनशील आणि (योग्य प्रमाणात) आदर्शवादी असलेल्या शहांनी कुमारवयीन मातृत्व या पैलूवर भर न देता सत्याची निर्भिड स्वीकृती या पैलूला महत्त्व दिलं. वय लहान असूनही चित्रपटाची नायिका गर्भपाताला नकार देते. सहाध्यायी, शेजारीपाजारी, परिचित यांच्या टोमण्यांना आणि कुचेष्टेला तोंड देते, पण अपराधाचा गंड मनात बाळगत नाही. उलट संधी मिळते तेव्हा व्यासपीठावर जाऊन ‘माझं मातृत्व हा माझा अपराध आहे का’ असा जाहीर सवाल करते. या  प्रखर सत्यदर्शनानं मोठय़ांचे डोळे उघडतात आणि मग सगळेच तिच्या बाजूने उभे राहतात.

शहा जेवढे चांगले दिग्दर्शक होते, तेवढेच चांगले लेखक होते. सत्य आणि माणुसकी या जीवनमूल्यांना जेव्हा सर्वोच्च महत्त्व होतं, त्या काळातले लेखक व दिग्दर्शक होते. टॉलस्टॉय, चेकॉव्ह आणि गॉर्की या रशियाई लेखकांचा आणि महात्मा गांधीजींचा त्यांच्या मनावर प्रभाव होता. त्यामुळे त्यांच्या लेखनात व दिग्दर्शनात सत्याग्रह प्रकर्षांनं दिसायचा. ‘कभी हां, कभी ना’चा नायक हर प्रकारे खोटं बोलतो- वाईट वागतो. परीक्षेच्या खोटय़ा निकालापासून मित्राची प्रेयसी पळवण्यापर्यंत (हा पुढे शाहरुख खानचा ‘नियमित उद्योग’ होऊन बसला!) सगळे नैतिक गुन्हे तो करतो. मात्र शेवटी विजय सत्याचाच होतो- नायकाला कायदा किंवा वडीलधारी माणसं सजा देत नाहीत. तो स्वत:च पश्चात्तापदग्ध होतो, आपल्या अपराधांची कबुली देतो.

बस्स! शहांना एवढंच हवं असायचं. वाट चुकलेल्या माणसानं किंवा समाजानंही सत्य स्वीकारावं, हाच त्यांचा आग्रह असायचा. कुणालाही त्यांनी कोर्टात नेलं नाही.

‘दिल ने कहा’मधे नायिकेच्या (रेखा) दोन मुलींपैकी एक सावत्र असते. नवऱ्याला परस्त्रीपासून झालेल्या मुलीचं पालनपोषण त्याच्या निधनानंतर ती सख्ख्या मुलीप्रमाणे करते, पण त्या पालनात कर्तव्य असतं, मायेचा ओलावा नसतो. पुढे नायिकेच्या सख्ख्या मुलीच्या लग्नात सावत्र मुलीचा भूतकाळ हत्यार म्हणून वापरला जातो. नायिकेवर चारित्र्यहिनतेचा आरोप करून तिचे विरोधक हे लग्न उधळू बघतात तेव्हा सावत्र मुलगी (प्रिती झिंटा) वरपित्याला थेट भेटते अन् स्वत:बद्दलचं सत्य सांगते. ‘माझ्या कमनशिबाची शिक्षा माझ्या आईनं आणि बहिणीनं का भोगावी’ असा सवाल करते.

सुदैवानं वरपिता भला माणूस निघतो आणि ‘सत्य सांगायचं धैर्य दाखवल्याबद्दल नायिकेचं अभिनंदन करतो. इतकंच नाही, तर तिला सून करून घेतो. शहांच्या चित्रपटामध्ये सत्य बोलणाऱ्या माणसाला पुरस्कार मिळतोच.  ‘दिल ने कहा’मधे नायिकेला तिचं प्रेम मिळतं, तर ‘कभी हां, कभी ना’मध्ये नायकाला नवी मैत्रीण मिळते! अर्थात हे पुरस्कार म्हणजे चित्रपट हलके फुलके, खेळकर करण्याची युक्ती होती. हुकमी युक्ती!

शहांच्या सगळ्या चित्रपटांमध्ये विनोदाचा प्रवाह आवाज न करता वाहताना दिसतो. विनोदासाठी विनोद म्हणून तो येत नाही. कथेचाच भाग म्हणून तो चित्रपटाशी एकजीव करण्याचं कौशल्य शहांकडे होतं. हा विनोद चित्रपटाच्या विषयानुसार असायचा. त्यामुळे त्यात विविधता पाहायला मिळायची. ‘जाने भी दो यारो’ बांधकामातला भ्रष्टाचार होता. तिथे औपरोधिक विनोद दिसतो. मात्र अभावित प्रासंगिक विनोदाला तिथे मज्जाव नाही. म्हणूनच (चित्रपटातल्या) नाटकातला दुर्योधन (की दु:शासन) गॉगल लावून काम करताना दिसतो (ओम पुरीच्या सहजसुंदर हास्यअभिनयाची ती पहिली झलक होती).

‘कभी हां, कभी ना’चा नायक नवतरुण आहे. त्याच्या सगळ्या खोडय़ा त्याच्या वयाला साजेलशा अवखळ आणि बालिश आहेत. मुळात ही व्यक्तिरेखा न-नायकी (अँटी हीरो) वळणाची असली तरी बनेल, सराईत गुन्हेगाराची होत नाही. त्याच्या सगळ्या उचापती तारुण्यसुलभ आणि म्हणून क्षमाशील ठरतात. शहांनी या नायकाला बालगुन्हेगारासारखी उदार, समंजस वागणूक देऊन त्याला ‘लव्हेबल रास्कल’ बनवलं आहे. शाहरुख खानच्या सबंध कारकीर्दीत ज्या मोजक्या उत्तम व्यक्तिरेखा व भूमिका आहेत, त्यात ‘कभी हां, कभी ना’ची भूमिका अव्वल ठरावी. ती त्याच्या तेव्हाच्या वयाला अनुरुप आहेच, पण पुढे त्याचा ‘ट्रेडमार्क’ ठरलेल्या सर्व लकबी, हावभाव आणि बोलण्याच्या शैलीपासून प्रदूषणमुक्त आहे.

या चित्रपटातला भाई हळवा आहे. नाटक-सिनेमातले दु:खद प्रसंग बघून तो घळाघळा रडतो अशी मजेशीर डूब या व्यक्तिरेखेला दिली होती. हिंदी चित्रपटातला हा पहिला हसरा आणि हसवणारा डॉन! पुढे अनेक चित्रपटांनी ही डूब उचलली. ‘कभी हां कभा ना’ सर्व बाजूंनी सुंदर जमला  होता. त्याला समीक्षकांची प्रशंसा, प्रेक्षकांची वाहवा आणि तिकीटखिडकीची पसंतीदेखील मिळाली. याचा लाभ घेऊन शहा-खान या दिग्दर्शक-नायकाची युती आणखी दोन-चार वेळा पडद्यावर बघायला मिळाली असती, तर शहांचं तकदीरच बदलून गेलं असतं. आधुनिक काळातल्या दहा श्रेष्ठ दिग्दर्शकांच्या मालिकेत त्यांना मानाचं- त्यांच्या हक्काचं स्थान मिळालं असतं. पण ते व्हायचं नव्हतं. ‘सेलेबल स्टार’ नसताना त्याला एवढी चांगली भूमिका देणाऱ्या दिग्दर्शकाची आठवण शाहरुखनं स्टार झाल्यावर ठेवली नाही. स्वत:च्या चित्रपटसंस्थेतून त्यानं आधी अजीज मिर्जा यांच्यासारख्या गुणी (आणि पुढे फराह खानसारख्या सुमार) दिग्दर्शकाला संधी देणाऱ्या शाहरुखला शहांचा विसर पडावा, हे शहांचं मोठं नुकसान झालं. कारण शाहरुखबरोबरचा एखाददुसरा चित्रपट यशस्वी झाला असता, तर शहांना पुढे नवख्या, अननुभवी निर्मात्यांबरोबर काम करावं लागलं नसतं. त्यांनाही मोठे ‘बॅनर्स’ मिळाले असते. मात्र शहांपेक्षा मोठं नुकसान शाहरुखमधल्या कलाकाराचं झालं. स्वत:चं ‘स्टार’पण कायम ठेवण्यासाठी त्यानं नंतर मिर्जांचीही साथ सोडली. त्यानंतरची त्याची निरंतर घसरण आपण गेली काही वर्ष बघतोच आहोत. असो.

आपल्या मनासारखे चित्रपट बनविण्यासाठी हिंदी चित्रपटातल्या सगळ्याच चांगल्या दिग्दर्शकांना निर्माता बनण्याची जोखीम पत्करावी लागते. बिमल रॉय, मेहबूब खान, शांताराम, बी.आर.चोप्रा, गुरुदत्त, राज कपूर यांच्यापासून आजच्या विधू विनोद चोप्रांपर्यंत कुणाचीच या चक्रातून सुटका झाली नाही. पण निदान या सर्वाच्या गुणांचं आणि कष्टाचं चीज झालं. ते श्रेय शहांना लाभलं नाही. वास्तविक त्यांच्या नावाप्रमाणे त्यांच्या दिग्दर्शनाला सोन्याचा स्पर्श होता. (कुंदन म्हणजे सोनं!) ‘नुक्कड’ आणि ‘वागले की दुनिया’ या टीव्हीच्या इतिहासातल्या दोन उत्कृष्ट मालिका शहांच्या नावावर जमा आहेत. ‘ये जो है जिंदगी’ या खुसखुशीत हास्यमालिकेचे बरेच भाग त्यांनी दिग्दर्शित केले व लिहिले. या सर्व मालिका निखळ हास्यविनोदाचा आनंद देणाऱ्या आहेत. त्यातही विशेष म्हणजे त्यातली बहुतेक पात्र मध्यमवर्गीय, सर्वसामान्य स्तरावरची आहेत. ‘नुक्कड’मधे तर त्यांनी रस्त्यावरच्या, म्हणजे जवळपास ‘वाया गेलेल्यां’मधे जमा होणाऱ्या सामान्य तरुण माणसांच्या अंतरंगातल्या चांगुलपणाचं दर्शन घडवलं.

पडदा छोटा असो की मोठा, शहांनी नेहमीच मन:पूर्वक काम केलं. ‘फिल्म इन्स्टिटय़ूट’ची दिग्दर्शनाची पदवी त्यांनी मिरवली नाही. जगावेगळा अथवा दुबरेध चित्रपट काढण्यात त्यांनी धन्यता मानली नाही. वास्तवतेच्या अथवा धीटपणाच्या नावाखाली चाळवणारे गरम चित्रपट देण्याची आवश्यकता त्यांना वाटली नाही. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाचा विषय वेगळा होता. पण तो नेहमीच्या; किंबहुना प्रेक्षकांच्या सवयीच्या चित्रपटाच्या चौकटीत बसवण्याची आणि सोपा करण्याची हातोटी शहांकडे होती. सिनेमा चालविण्यासाठी त्यांनी विनोद वापरला नाही, तर वेगळा विषय, गंभीर समस्या सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी चित्रपटांमधे व मालिकांत विनोदाचा उपयोग केला, सहजसुंदरपणे केला. यशस्वीपणे केला.

शहांच्या या कर्तृत्वाची, त्यांच्या आगळेवेगळेपणाची म्हणावी तशी दखल मात्र घेतली गेली नाही. त्यांना  ‘फाळके पुरस्कार’ मिळायला हवा होता, पण ते वंचित राहिले. ‘पद्म’ पुरस्कारांच्या वार्षिक जत्रेत सैफ अली खान आणि शाहरुख यांच्यासारख्या नायकांची वर्णी लागली. हे दोघे खान ‘स्टार’ नसताना त्यांना सरस भूमिका देणाऱ्या शहांचं नाव मात्र संबंधितांना आठवलं नाही. गेला बाजार एखादा ‘जीवनगौरव’ तरी एवढय़ा गुणी कलाकाराला मिळावा, पण तिथेही शहांचा हात रिकामाच राहिला. त्यांच्या काळात टी.व्ही.सारखी प्रसारमाध्यमं नव्हती. त्यामुळे प्रमोशन वगैरेच्या निमित्तानं सतत लोकांच्या नजरेसमोर राहण्याची आणि प्रसिद्धीचं पाठबळ लाभण्याची संधीही त्यांना मिळाली नाही.

शहांच्या लेखन व दिग्दर्शनगुणातलं सातत्य त्यांच्या पडद्यावरच्या हजेरीत नव्हतं, ही त्यांच्या कारकीर्दीतली उणीव होती. ‘जाने भी दो यारो’ (१९८३) नंतर दहा वर्षांनी त्यांचा ‘कभी हां, कभी ना’ (१९९३) आला. ‘हम तो मुहब्बत करेगा’ (भूमिका- करिष्मा कपूर व बॉबी देओल : २०००), ‘दिल है तुम्हारा’ (२००२) आणि ‘एक से बढकर एक’ (रवीना टंडन, सुनील शेट्टी, शक्ती कपूर : २००४) या चित्रपटांमध्येही असाच मोठा खंड पडला. त्यामुळे हे चित्रपट कधी आले अन् कधी गेले, तेही कळलं नाही. याही चित्रपटांचे विषय वेगळे होते आणि हास्यविनोदाच्या वेष्टनात लपेटलेले होते. पण शहांच्या आधीच्या चित्रपटांमधला टवटवीतपणा आणि प्रसन्न, खेळकरपणा त्यांच्यात तितकासा जाणवला नाही. ‘तीन बहनें’ (२००५) हा त्यांचा एकच चित्रपट संपूर्ण गंभीर होता. देशाच्या काही भागांमध्ये ज्या कुटुंबात दोनपेक्षा जास्त मुली असतात, तिथे हुंडय़ाअभावी लग्नं जमत नाहीत म्हणून मुली सामूहिक आत्महत्या करतात. हा विषय पहिल्यांदाच पडद्यावर येत होता, पण पडदा बघायचं त्याच्या नशिबी नव्हतं. या चित्रपटाचे फक्त ‘प्रेस शो’ज झाले, त्याची भरभरून प्रशंसा झाली. पण त्या अभागी बहिणी प्रेक्षकांसमोर आल्याच नाहीत.

आपण बरे, आपलं काम बरं, या वृत्तीचे शहादेखील कधी छोटय़ा पडद्यावर आले नाहीत. त्यांचे चित्रपटही तिथे दिसले नाहीत. शहांचे ‘फिल्म इन्स्टिटय़ूट’मधले सहाध्यायी विधू विनोद चोप्रा ‘मुन्नाभाई’ ते ‘थ्री इडियट’ यांसारखे चित्रपट करून गब्बर झाले. मात्र यशस्वी निर्माता बनल्यानंतर त्यांनी दिग्दर्शन सोडलं. यातच कुठेतरी शहांची करुण कहाणी दडली आहे का?

First Published on October 8, 2017 4:36 am

Web Title: aruna antarkar article on kundan shah career in bollywood
टॅग Kundan Shah
 1. M
  mahesh
  Oct 9, 2017 at 9:43 pm
  "जाने भी दो यारो" बंडल सिनेमा आहे. फक्त शेवटचा सीन सोडला तर. आत्ता हसू येईल मग हसू येईल म्हणून वाट बघायला लागते. आता कुणी म्हणेल कि ही डार्क कॉमेडी आहे, तुला काय कळणारे. काहीही असले तरी सिनेमा टुकार होता ही सत्यच. कभी हा कभी ना चांगला होता पण १-२ चांगले सिनेमा दिलेला शेकडो डायरेक्टर पडून आहेत. त्यामुळे किती डोक्यावर घायचे यांना. दिग्दर्शक बरे होते पण फाळके पुरस्कार वगैरे म्हणजे खूपच झाले. त्यांचे निधन झाले हे वाईट झाले, इतर कुणाच्या निधनाइतकेच याचे दुःख पण अशी निधन रोजच होत असतात.
  Reply
  1. R
   Rahul
   Oct 9, 2017 at 8:12 pm
   अभय, अंदाज़ अपना अपना अस्सल विनोदी चित्रपट (हो खरंच) आणि गोविन्दा धवन शेट्टी यांचे म्हणजे टुकार पिक्चर! ह्याच तर टोकाच्या भूमिका पटत नाही. मान्य आहे काही चांगल्या कथानकाचे व्यावसायिक आणि बरेचसे समांतर चित्रपट तिकीटवारीवर चालत नाही. माझा मुद्दा तो नाही. लेखिकेने शाहरुखला ज्याप्रकारे टारगेट केले- इतरांच्या प्रेयसी पळवण ( सांगू शकशील कोणाच्या?). SRK ने 25-27 वर्षाच्या कार्यकिर्दीत गोवारीकर, हिराणी, शंकर यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम करण्यास काही कारणास्तव नकार दिला. याचा अर्थ तो चुकीचा आहे असा होत नाही. कुंदन शाह व शाहरुखचे संबंध शेवटपर्यंत चांगले होते. तसेच शाहरुख आणि सैफच्या कार्यकिर्दीची तुलना लेखिकेने कशाच्या आधारे केली हे समजत नाही. गेल्या चित्रपटातील अपयशामुळ त्याची कार्यकिर्द झाकोळली जात नाही. हे प्रत्येक खेळाडू, मेगास्टार वा इतर महनीय व्यक्तिंबाबत घडत असत. ओबामांनी त्यांच्या भाषणात शाहरुखला करोड़ोंचा Idol म्हणून नाव घेतल होत. शेवटी लेखिकेला सांगावस वाटत की, शाहरुखविषयी विकिपीडिया वर वाचा आणि biggest movie star in the world म्हणून गुगल वर सर्च करा. धन्यवाद।
   Reply
   1. P
    prash
    Oct 9, 2017 at 9:46 am
    हा लेख याआधी का आला नाही? लेखकाला हे सगळे गुण आधी का नाही दिसले?
    Reply
    1. A
     abhay
     Oct 9, 2017 at 3:07 am
     राहुल, लेखिकेच्या शाहरुखबद्दलच्या मतांशी कोणीही मतच होईल, खरेच हे आपले दुर्दैवच आहे की इथे गोविंदाचे आंटी न.१,सजन चले सासुराल तसेच रोहित शेट्टीचे मूर्खपणाचा कळस असलेले तथाकथित विनोदी गोलमाल मालिकेचे चित्रपट नुसतेच चालत नाहीत तर भरपूर नफाही कमावतात, पण राजकुमार संतोषीचा अस्सल विनोदी चित्रपट (अंदाज अपना अपना) चित्रपट समीक्षकांकडून भरपूर नावाजल्या जाऊनही तिकीटविक्रीत अयशस्वी ठरतो आणि कुंदन शहा सारख्या कसलेल्या दिग्दर्शकाला निर्माता मिळत नाही.
     Reply
     1. R
      Rahul
      Oct 8, 2017 at 11:57 am
      संकुचित बुद्धितून शाहरूखला नावे ठेवण्यासाठी लिहीलेला लेख
      Reply
      1. Load More Comments