डॉ. अरुणा ढेरे यांनी ९२ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणाचा हा संपादित अंश.. दुसऱ्या प्रबोधनपर्वात जगताना समूहांना जोडणारं सूत्र मौखिक परंपरेत शोधायला हवं, संतांचा विद्रोह ओळखायला हवा आणि ‘हे विरुद्ध ते’ असा विचार सोडून विवेक बाळगायला हवा, याचं स्मरण देणारं..

साहित्य ही आपल्यासाठी एक ठेव आहे आणि आज कधी नव्हे ती ही ठेव तिच्या प्रेरक शक्तींसकट सांभाळण्याची जोखीम तुमच्या-माझ्यावर आली आहे. आजवर आपण इतक्या गांभीर्यानं कधी साहित्याकडे बघितलं नसेल. आपल्या साहित्यकार, लेखक आणि साहित्यप्रेमी वाचक या भूमिकांचा फारसा विचारही आपण केला नसेल; पण आज तो करण्याची वेळ आली आहे. निरनिराळ्या काळात अशा वेळा येऊन गेल्याही असतील, आणि आपण ती आव्हानं स्वीकारण्यात कमीही पडलो असू; पण आता जुन्या चुका आठवून हताश होणं किंवा जुन्या पराभवांच्या आठवणीनं दुबळं होणं दूर ठेवायला हवं.

साहित्यामधल्या शक्तीला आपण ओळखलं नाही. आपल्या हातून तिची अवहेलना झाली, तर आता त्या गोष्टीची भरपाई करण्याची वेळ आली आहे. केवळ मराठीतच नव्हे तर जगभरातलं साहित्य आणि केवळ आजचंच नव्हे, तर संस्कृतीच्या जन्माआधीपासून आदिमांनी जन्माला घातलेलं मौखिक साहित्य हा आमचा वारसा आहे, आमचं संचित आहे आणि त्याचा गौरव करणारा एक लहानसा मेळा म्हणजे आमचं साहित्य संमेलन आहे. कोणीही यावं आणि वाङ्मयबाह्य़ कारणांसाठी वा वाङ्मयीन राजकारणासाठी हे संमेलन वेठीला धरावं असं आता आपण होऊ देता कामा नये. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या अत्यंत गौण, क्षुद्र, कित्येकदा लाजिरवाण्या कारणांनी संमेलनं ही वादाचा विषय झाली. निर्मळ साहित्यप्रेमींनी व वृत्तीगांभीर्यानं लेखन करणाऱ्यांनी संमेलनाच्या या स्वरूपाबद्दल चिंता व्यक्त केली. काहींनी या अमंगळ वातावरणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि संमेलनाचं स्वरूप नकोशा वाटणाऱ्या अनेक गोष्टींनी विकृत होत राहिलं.

काय चांगलं आणि काय वाईट, काय हितकारक आणि काय हानीकारक, याचा विवेक करण्याची वेळ आपल्या व्यक्तिजीवनात अनेकदा येते तशी समूहजीवनातही येते आणि इतिहासात अशा अनेक वेळा आल्याही आहेत, की अगदी आणीबाणीच्या प्रसंगी समाजानं आपला विवेक जागा ठेवला आहे. अनपेक्षितपणे आपली शहाणीव प्रकट केली आहे. सुसंस्कृतपणे प्रकट केली आहे. तशी आपली शहाणीव, आपला विवेक जागा ठेवण्याची ही वेळ आहे. आपलं साहित्यप्रेम प्रगल्भ जाणिवांसकट व्यक्त करण्याची ही वेळ आहे.

आदरणीय नयनतारा सहगल इथे येणार होत्या. वयाची नव्वदी पार केल्यानंतरही केवळ महाराष्ट्रातल्या या निमंत्रणाचा आदर करण्यासाठी त्या इथे येणार होत्या. त्या भारतीय पातळीवरच्या महत्त्वाच्या लेखिका आहेत आणि वाङ्मय व्यवहारात अत्यंत सजगतेनं वावरणाऱ्या, नागरिक म्हणून आणि लेखक म्हणून स्वातंत्र्याचं मोल जाणणाऱ्या, आपल्या अनुभवसिद्ध मतांचा आग्रही पुरस्कार करणाऱ्या आणि त्यासाठी ताठ कण्यानं उभ्या राहिलेल्या लेखिका आहेत. पण तेवढय़ाच महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मराठी मातीशी त्यांचं मौलिक नातं आहे आणि ते ज्ञानवंतांच्या घराण्यातून पुढे आलेलं नातं आहे.

त्यांचे चुलत आजोबा शंकर पांडुरंग पंडित हे गेल्या शतकातले मान्यवर वेदाभ्यासक. त्यांचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे त्यांनी ‘ऋग्वेदा’चं केलेलं मराठी आणि इंग्रजी, सटीक भाषांतर. त्यांची मुलगी क्षमा राव हीसुद्धा उत्तम संस्कृतज्ञ होती. रणजित सीताराम पंडित हे शंकर पांडुरंग यांचे पुतणे. नेहरू घराण्याच्या विजयालक्ष्मीशी त्यांचा विवाह झाला आणि नयनतारा या त्यांच्या कन्या. म्हणजे ही पंडित नेहरूंची भाची. स्वातंत्र्य चळवळीत तुरुंगवास भोगणाऱ्या आणि तुरुंगात असतानाच बाराव्या शतकातल्या काश्मीरच्या कवी कल्हणाची ‘राजतरंगिणी’ इंग्रजीत अनुवादित करणाऱ्या रणजित पंडिताचा अनुवंश त्या रक्तात वागवणाऱ्या आहेत. प्रशांत तळणीकरांबरोबर मी मराठीत अनुवादलेल्या ‘राजतरंगिणी’ला त्यांनी अगदी लहानसं मनोगतही जोडलं आहे.

संमेलनामधला गेल्या काही वर्षांचा एक सुंदर प्रघात म्हणजे मराठीखेरीज इतर भाषांमध्ये कसदार लेखन करणाऱ्या एखाद्या साहित्यकाराला संमेलनाच्या उद्घाटनासाठी निमंत्रित करणं.

नयनतारा सहगल यांना याच कारणानं आपण आमंत्रित केलं होतं. अखिल भारतीय मराठी माणसांच्या वतीने त्यांना आमंत्रण दिलं होतं; पण अत्यंत अनुचित पद्धतीनं आपण त्यांना पाठवलेलं आमंत्रणच रद्द केलं. ही अतिशय नामुष्कीची आणि निषेध करण्याची गोष्ट आहे, यात शंका नाही.

संयोजकांकडून ती गंभीर चूक घडली आहे, यात शंकाच नाही. संमेलन हे सध्याच्या परिस्थितीत, सतत साहित्यबाह्य़ शक्तींच्या ताब्यात जाण्याचा धोका स्पष्ट असताना ती जोखीम पुरेशा समजशक्तीनं उचलली गेलीच पाहिजे, ही काळाची गरज संयोजकांना ओळखता आली नाही.

झुंडशाहीच्या बळावर कोणी जर आपल्याला भयभीत करत असेल, तर आपण केवळ नमतं घेऊन टीकेचे धनी होण्याचा मार्ग स्वीकारणार का? पण तसं घडल्यामुळे यात केवळ संयोजन समिती नव्हे, केवळ साहित्य संमेलन नव्हे, तर सगळ्या मराठी साहित्यप्रेमींच्याच माना खाली जाताहेत याची गंभीर जाणीव आपल्याला असायला हवी.

शिवाय या धमक्या बळाच्या जोरावर का होईना, पण कोणत्याही विधायक गोष्टींचा आग्रह धरणाऱ्या नव्हेत. साहित्याशी किंवा भाषेच्या जाणत्या प्रेमाशी ज्यांचा सुतराम संबंध नाही अशा कोणा समूहानं दिलेल्या धमक्यांपुढे वाकणं ही शोभनीय गोष्ट नव्हे.

नयनतारांचं साहित्य मराठी वाचकांना फारसं परिचित नाही. त्यांनी हाताळलेले लेखन प्रकार, त्यांचं अनुभवविश्व व भारतीय साहित्य जगतातलं त्यांचं स्थान या विषयीचा मराठी वाचकांना परिचय फारसा नाही. यानिमित्ताने त्यांच्या साहित्याच्या अनुवादाचा विचार कदाचित पुढे गेला असता.

पण आज आपल्याला बहुधा त्यांचे विचार, तेही साधारणपणेच माहीत असतील. त्यांचं नियोजित भाषण आता आपल्यासमोर आलेलंच आहे आणि त्यांचे राजकीय विचार काही थोडे अपवाद वगळता वाचकांसमोर आता आले आहेत. संमेलनाला त्यांना निमंत्रित करताना जो हेतू मराठी माणसांच्या मनात होता, त्याला त्या राजकीय विचारांचा रंग आता चढला आहे. त्यांच्या तशा विचारांशी सहमत असणारे आणि नसणारे असे दोन्ही प्रकारचे वर्ग मराठी वाचकांमध्ये अद्याप तयार व्हायचे असतानाच त्यावरून एक लढाई इथे सुरू झाली.

त्यांनी यावं आणि अगदी मोकळेपणाने, निर्भयपणानं आपले विचार या व्यासपीठावरून मांडावेत. त्यांचं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य अबाधित राखलं जावं, त्यांची मतं आपण जाणून घ्यावीत, ती आपल्याजवळच्या विवेकानं पारखावीत. स्वत:च्या मतांच्या मांडणीचं संपूर्ण स्वातंत्र्य त्यांना आहे, असलंच पाहिजे आणि त्या मतांशी संपूर्ण सहमत होण्याचं, असहमत होण्याचं किंवा वेगवेगळ्या बाजूंनी त्यांच्या मतांचा विचार करत त्यांची मौलिकता तपासत जाण्याचं स्वातंत्र्य इथल्या वाचकांनाही आहेच, अशा जाणिवेनं आपण या निमंत्रणाकडे पाहू शकलो नाही.

हे व्यासपीठ संवादाचं आहे. मुख्यत: साहित्यावरच्या डोळस प्रेमाचं आहे. ते तसं नसेल, तर तसं त्याचं रूप आपण घडवलं पाहिजे आणि जबाबदारीने टिकवलंही पाहिजे. आज भोवती जे प्रचंड विपरीत घडतं आहे, त्याला जबाबदार कोण आहे? केवळ शासन नाही. तसं असतं तर स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या साठ-सत्तर वर्षांच्या काळात वारंवार बदलत गेलेल्या सरकारांच्या अधिपत्याखाली कमी-जास्त प्रमाण असेल, पण वारंवार धार्मिक आणि जातीय अहंतांचे उद्रेक झालेच नसते. केवळ राज्यकर्त्यांनी नव्हे, तर कोणत्याही सार्वजनिक सत्तांनी विशिष्ट जातीधर्माच्या पाठीशी उभं राहणं हे केव्हाही स्वीकारणीय नाही आणि त्याचा निधर्मी लोकशाहीत आपण निषेध केला पाहिजे. कडवा विरोधही केला पाहिजे.

पण धर्माच्या नावानं, संस्कृती आणि परंपरांच्या नावानं झुंडशाही धुमाकूळ घालत असताना भारतीयत्वाच्या प्राणभूत संकल्पनांवरचं आपलं लक्ष विचलित करणारे आपापले छुपे राजकीय, सामाजिक, आर्थिक किंवा इतर समाजघातक उद्देश जर कोणी पुढे नेत असेल, तर त्या प्रयत्नांचं अस्तित्व आणि स्वरूपही आपण ओळखलं पाहिजे.

मिथक आणि समाजपरिवर्तन

संस्कृतिसंशोधनाचा व्यवहार दोन पातळ्यांवर चालत असतो. तात्कालिक महत्त्वाच्या प्रश्नांशी निगडित अशा पातळीवरचा एक व्यवहार आणि तात्कालिकपेक्षाही कालनिरपेक्ष, दीर्घजीवी अशा पातळीवरचा दुसरा व्यवहार. या दोन्ही पातळ्यांवर थोरले काम करणाऱ्या संशोधकांची-ज्ञानोपासकांची एक मोठी परंपरा महाराष्ट्राला-मराठीला लाभली आहे. या ज्ञानोपासकांनी महाराष्ट्र संस्कृतीची जडणघडण अनेक बाजूंनी तपासली आहे. आपल्याकडे डोंगराएवढं काम एकेकटय़ानं करून गेलेली माणसं आहेत. अशा माणसांची एक परंपराच आहे; पण आपण त्या माणसांबरोबरच त्यांचं कामही सहज बाजूला करत, विस्मरणात टाकत पुढे येत राहिलो आहोत.

आपण माणूस म्हणूनच काय, पण लेखक म्हणूनही स्वयंभू उगवून आलेले किंवा अवतरलेले नसतो. त्यामुळे परंपरेनं काय काय भलं आणि बुरंही जन्माला घातलं आहे, याचं एक ऐतिहासिक भान वर्तमान जगणाऱ्या आणि भविष्याचा वेध घेऊ पाहणाऱ्या कोणाही लिहित्या-वाचत्या जगातल्या माणसाला असलं पाहिजे. तसं भान ठेवून आपापल्या प्रातिभ धर्मानुसार आधुनिकतेचे, वर्तमान जगण्याचे पेच मांडणाऱ्या मोठय़ा ताकदीच्या साहित्यकारांनीही पुढे जाताना मागच्याचं काय केलं, हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. शिवाय केवळ या साहित्यकारांनी आपल्या सांस्कृतिक परंपरांचं काय केलं, एवढाच विचार करून भागणार नाही. परंपरा आणि नवता यांचे पेच इतरही क्षेत्रांतल्या गंभीर कलोपासक माणसांनी कसे स्वीकारले आहेत आणि संघर्ष-समन्वयाच्या कोणत्या भूमीवरून ते पुढे गेले आहेत, याकडेही लक्ष दिलं पाहिजे.

एक संस्कृतिसंबद्ध विचार केला, तर परंपरांचं पुनर्वाचन आणि पुनर्नवीकरण करण्याची एक प्रक्रिया चालू आहे असं आपल्या लक्षात येतं आणि परिवर्तनाच्या पृष्ठस्तरीय सामाजिक प्रश्नांशी जोडलेल्या थराखालून ती अखंड, सातत्याने चालू आहे असंही ध्यानात येतं. इतिहास पुनर्रचित करावा लागतोच. आपल्या कालभानानुसार त्याची विधायक पुनर्रचना करणं हे जाणत्या प्रतिभावंतांनी आपल्या निर्मितीतून अनेक वेळा केलेलं सहजकर्म आहे.

कोणतीही संस्कृती ही मानवी जीवनातूनच आकाराला आलेली आणि जीवनाइतकीच रंगीत गुंतागुंतीची गोष्ट आहे. तिच्यातून टिकाऊ आणि दीर्घजीवी असं पुष्कळ काही जन्म घेतं आणि टाकाऊ, निरुपयोगी, कालसापेक्ष असंही पुष्कळ काही निर्माण होत राहतं. या ‘पुष्कळ काही’मध्ये जशा समाजरचना, धर्मकल्पना, दैवतं आणि त्यांच्या उपासना, समाजघटकांचे (उदा. स्त्री-पुरुषांचे इ.) परस्परसंबंध, आर्थिक व्यवस्था, सत्ता आणि सत्तेच्या परिसंस्था समाविष्ट असतात, तशाच या सर्वाकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन, विविध धारणा आणि मूल्यसंकल्पनाही निर्माण होत असतात. संस्कृतीत सामावणाऱ्या या मूर्त आणि अमूर्त अशा दोन्ही घटकांचं प्रधान लक्षण म्हणजे परिवर्तनशीलता! मानवी जीवनावरही मिथकांचा प्रभाव विलक्षण आहे. त्याचा वापर अनेकदा दुधारी शस्त्रासारखा केला गेला आहे. अभिजन-बहुजन संबंधांत सत्ता आणि प्रतिष्ठा यांच्या संपादनासाठी आणि दृढीकरणासाठी मिथकं कशी वापरली गेली आणि त्यांच्या विरोधातली हत्यारं म्हणूनही मिथकं कशी वापरली गेली, याची कितीतरी उदाहरणं वर्तमान जीवनातही अगदी अर्थकारणासह अनेक क्षेत्रांमधून देता येतील.

मात्र, अशी मिथकं म्हणजे परिवर्तनाच्या वाटेवर लावलेल्या ताठर आणि निर्जीव परंपरांच्या पिंजऱ्यांमधली आमिषं होता कामा नयेत यासाठी विचारशील माणसांनी कायम सावध राहण्याची गरज असते. इतिहास मोठा आहे आणि तो जसा गौरवशाली आहे तसा वेदनादायक आणि हिंसकही आहे. संस्कृतीही मोठीच आहे, उदार आहे तशी अनुदार आणि क्रूरही आहे. कारण शेवटी ती माणसांचीच निर्मिती आहे. मात्र, वर्तमान जीवन त्या दोहोंहून मोठं आहे, माणूस त्याहून महत्त्वाचा आहे आणि भविष्य त्याहून गौरवशाली, न्यायपूर्ण आणि सुखमय बनवायचं आहे या धारणेनं पुढे जात राहिलं पाहिजे. वाङ्मय क्षेत्रातही ती धारणा आपण कायम ठेवली पाहिजे.

काळ तर मोठा कठीण आला..

आपण सगळे एका वाङ्मयीन विश्वाचे घटक आहोत आणि वाङ्मयविश्वाचं आज जे काही भलं-बुरं स्वरूप आहे, त्याला आपण सगळेच- लेखक, प्रकाशक, पुस्तक विक्रेते आणि वाचक जबाबदार आहोत. आजचा ‘काळ तर मोठा कठीण आला’ आहे. नव्या युगातल्या आजच्या साहित्यकाराला कितीतरी सामाजिक-सांस्कृतिक आणि नतिक आव्हानांना सामोरं जावं लागत आहे. केवळ कलात्मक आनंद हेच साहित्याचं अंतिम उद्दिष्ट असं मानून आज चालणार नाही. आजचे नवे साहित्यकार समकालीन वास्तवाचा वेध अतिशय सामर्थ्यांने घेताहेत, पण मनुष्यजीवनापुढे ठाकलेल्या प्रश्नांचं स्वरूप इतकं गुंतागुंतीचं आणि इतकं जगड्व्याळ आहे की, द्रष्टय़ाच्या पदावर आरूढ होणं साहित्यकाराला फार कठीण झालं आहे आणि निर्मितीतली सर्वस्पर्शी आवाहकता टिकवणंही अवघड झालं आहे.

हे शतक विसंगतींनी भरलेलं शतक म्हणता येईल. एका बाजूने यंत्रांच्या मदतीने माणूस अखंड कृत्रिम जग उभारण्यात गुंतला आहे; पण दुसऱ्या बाजूने त्याला जिवंत, अकृत्रिम, अनावृत्त अशा जीवनाची आस आहे. एकीकडे तो नसर्गिक जगण्यापासून दूर गेला आहे; निसर्गापासून तुटून निघाला आहे. कृत्रिम, आभासी जगातल्या जादूई नगरीत शिरला आहे आणि दुसरीकडे आंतरिक ओसाडीत ओलावा निर्माण करणारे खरेखुरे मानवी संबंध त्याला हवे आहेत.

खरं म्हणजे द्वंद्वांच्या अतीत जाणाऱ्या अनेक वाटा मोकळ्या करणाऱ्या तत्त्वप्रणाली आपल्याकडे निर्माण झाल्या, पण आधुनिक जगाने जन्माला घातलेली जी द्वंद्वं आहेत- उदाहरणार्थ, विज्ञान आणि अध्यात्म, राष्ट्र, धर्म आणि मानवी मूल्यं, जातीयता आणि सर्वसमानता- यांच्यापलीकडे जाण्याचे सर्वमान्य आणि सर्वजनसुलभ असे रस्ते माणसाला अजून सापडलेले नाहीत. अशा वेळी आत्यंतिक स्वार्थपरायण आणि स्पर्धात्म झालेला व्यक्तिवाद हे साहित्याचा परीघ आक्रसत जाण्याचं एक मुख्य कारण आपल्याला दिसतं. मराठीत साठोत्तरी साहित्यानं केलेल्या विद्रोहात इतर अनेक गोष्टींबरोबरच या आक्रसल्या परिघाला पहिला जबरदस्त नकार दिला आणि नव्वदोत्तर साहित्यिकांच्या तरुण पिढीने तर व्यक्तिवादाने आखलेल्या जवळजवळ सगळ्या मर्यादा पार करण्याची धडपड केली. साहित्यव्यवहारात मात्र अजूनही या स्पर्धात्मक आणि स्वार्थकेंद्री व्यक्तिवादाचा प्रभाव टिकून आहे.

वाचकांवरची जबाबदारी

समीक्षेची वा संशोधनाची सशक्त साथ नसण्याच्या या काळात वाचकांवरची जबाबदारी मात्र आणखी वाढलेली आहे. केवळ आवड किंवा मनोरंजनाच्या पुढच्या पायरीवर आपलं वाचन नेण्याची गरज वर्तमानानं आपल्या बाबतीत निर्माण केली आहे. वाचन, पुनर्वाचन, वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून वाचन व मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन यांतून आपली अभिरुची पुढे जात राहिली पाहिजे. आपल्या वाङ्मयीन जाणिवा व्यापक, उदार आणि निखळपणे गुणग्राहक ठेवण्याची फार आवश्यकता आहे. वाङ्मयनिर्मिती ही निवळ वाङ्मयीन मूल्यांवर आधारलेली नाही. जातीय, वर्गीय, धर्मीय अहंकार आणि राजकीय डावपेच यांनी पोखरलेल्या आजच्या साहित्यसंस्कृतीचं दर्शन सावधपणे, विवेकानेच घेण्याची जबाबदारी वाचकांवर आहे. शिवाय वाङ्मयाचा रुंदावणारा परीघ वाचकांनी धांडोळला पाहिजे.

साहित्यकारांपुढे नवीन आव्हानं

साहित्यिकांसाठी तर निर्मितीची आव्हानं फारच मोठी आहेत. दीड-दोनशे वर्षांपूर्वी आर्थिक प्रेरणांनी प्रभावित अशा ‘इकॉनॉमिक मॅन’ची संकल्पना मांडली गेली होती. तशी ‘कलामानवा’ची संकल्पना आपण कधीच स्वीकारू शकणार नाही. समकालीन वास्तवापासून दूर जाऊन निव्वळ कलावंत म्हणून किंवा साहित्यकार म्हणून जगणं शक्य नाही आणि योग्य तर नाहीच नाही. गंभीरपणे निर्मितीत गुंतलेल्या समकालीन साहित्यकारांना याचं पुरेसं भान आहे. वाङ्मयेतिहासाच्या प्रदीर्घ वाटचालीत साहित्यापुढे वेळोवेळी अनेक सांस्कृतिक, सामाजिक प्रलोभनं निर्माण केली गेली आणि आपली स्वायत्तता न गमावता निर्मितीवरचा विश्वास दृढ ठेवून लिहीत राहिलेले किंवा संघर्षरत झालेले साहित्यिकही वेळोवेळी पुढे आले.

यानिमित्तानं हेही आपल्या लक्षात येईल की, वाङ्मयाला समाजात नेहमीच एक सत्तानिरपेक्ष सामथ्र्य असतं आणि राजकीय हेतूनं ते सामथ्र्य वापरण्याचे किंवा ते खच्ची करण्याचे प्रयत्नही अनेकदा राजकीय सत्तेकडून होत असतात. अशा प्रयत्नांना अयशस्वी करण्यासाठी साहित्यिकांजवळ असावा लागतो निर्मितीविषयीचा दृढ असा विश्वास आणि आपल्या वाङ्मयीन मूल्यांवरची दृढ अशी निष्ठा. ही मूल्यं मनुष्यजीवनाच्या विरोधात नाहीत आणि सर्वकल्याणकारीच आहेत अशा आंतरिक प्रत्ययानं लिहिणारा साहित्यकार वेळप्रसंगी निषेध, नकार, चळवळी अशी हत्यारं वापरतो आणि सर्वासाठी लढणं म्हणजे शेवटी सर्वाच्या एकमय सुखशांतीसाठी लढणं हेच त्याचं उद्दिष्ट असतं.

खरं तर साहित्याच्या केंद्रस्थानी माणूस असला पाहिजे, यासाठी लेखक-कवींनी वारंवार लढाई केली. ती त्यांना करावीच लागली. ही लढाई जशी अस्तित्वासाठी होती तशीच वेगवेगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्यासाठीही होती. त्या लढाईत समकालीन जगण्याचा, त्यातल्या गुंतागुंतीचा, अवघडपणाचा, विसंवादाचा अनुभव देताना पुष्कळ किंमतही विचारवंतांना, कलावंतांना आणि लेखकांना चुकवावी लागली आहे. शिवाय अंतर्दृष्टी असलेल्या विद्रोहाचीही या देशात एक परंपरा आहे. तिचे अन्वयार्थ शोधत त्याच्याशी नाळ जुळवावी लागली आहे. तिथून या लढाईसाठी बळ मिळवावं लागलं आहे.

बहुविध ज्ञानपरंपरा आणि विद्रोह

भारतासारख्या देशात, जिथे वेगवेगळे लोकसमूह हजारो वर्षएकत्र नांदत आले, तिथे केवळ भाषिक बहुविधताच नव्हे, तर ज्ञानपरंपरांची बहुविधताही दीर्घकाळ नांदत आली. ज्ञानसंपादन, ज्ञानव्यवस्थापन आणि ज्ञानप्रसारण यांच्या प्रत्येक जनसमूहाच्या स्वतंत्र व्यवस्था अस्तित्वात येत गेल्या. भाषा आणि साहित्यही या व्यवस्थांशी निगडित झालं.

या व्यवस्था लवचीक होत्या. जगताना येणाऱ्या प्रत्यक्ष अनुभवांतून निर्माण झालेल्या होत्या. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते अनुभवजन्य ज्ञान संक्रांत करण्याची साधनंही त्या व्यवस्थेत निर्माण केली जात होती. ज्ञान सृष्टीसंबंधीचं असो, कालौघात निर्माण होत गेलेल्या सामाजिक संस्थांविषयीचं असो, समूहाविषयीचं असो, कुटुंबाविषयीचं असो, की मानवी संबंधांविषयीचं असो; परंपरेनं हे ज्ञान वितरित होत होतं. ते ज्ञान जगण्यासंबंधीचंच असल्यामुळे आपोआप जगण्यामधली लवचीकता, परिवर्तनशीलता आणि गतिशीलताही त्या परंपरेत होती आणि जिवंतपणाही होता. व्यक्तीचं जगणं आणि समूहाचं जगणं यासंबंधीच्या त्या-त्या समाजात निर्माण झालेल्या धारणांचं आणि नीतिनियमांचं ज्ञानही परंपरेनं माणसांना ठाऊक होत होतं.

अभिजनांकडून जेव्हा त्यांच्या विशिष्ट ज्ञानपरंपरा सत्तासंपादनाचं माध्यम म्हणून वापरल्या गेल्या, तेव्हा त्यांच्या ज्ञानसंपादनाच्या, व्यवस्थापनाच्या, प्रसारणाच्या साधनांवर त्यांनी पूर्णपणे आपली पकड ठेवली; त्यांना अधिक प्रतिष्ठित, अधिक गौरवशाली स्वरूप दिलं आणि अधिक मोकळ्या, अधिक नसर्गिक, जीवनसंबद्ध आणि सृष्टीशी संवाद साधणाऱ्या जिवंत अशा अनेक लहान-लहान समूहांच्या ज्ञानपरंपरा गौण ठरल्या, उपेक्षित राहिल्या आणि क्षीणबलही झाल्या.

अभिजनवर्गानं समाजनियंत्रणासाठी या ज्ञानपरंपरांना अधिक बुद्धिनिष्ठ तर बनवलंच, पण कृत्रिमही बनवलं. मात्र इथल्या अनुभवजन्य ज्ञानावर आधारलेल्या जीवनसंबद्ध बहुजन परंपरांनी स्वत:च्या आंतरिक सामर्थ्यांवर संस्कृतिसातत्य टिकवलं. बुद्धिप्रामाण्यापेक्षा अनुभवप्रामाण्यावर पुढे जाणाऱ्या या परंपरा प्रवाही राहिल्या. आंतरिक गतिशीलता हे त्यांचं व्यवच्छेदक लक्षण. त्यामुळे त्यांच्याबाबतीत प्रामाण्यांचे पिंजरे झाले नाहीत. अशा विशिष्ट प्रामाण्यांच्या पिंजऱ्यात समाजाला बंदिस्त करणाऱ्यांविरुद्ध कधी बुद्ध, तर कधी चार्वाक उभे राहिलेले आपल्याला दिसतातच.

मध्ययुगात अभिजनांनी सत्ताकारणासाठी वापरलेल्या आणि सामाजिक, सांस्कृतिक अभिसरणाला नकार देणाऱ्या ताठर ज्ञानपरंपरांविरुद्ध एक कसदार, अर्थपूर्ण द्रोह करण्यासाठी सबंध भारतात भक्तिचळवळ उभी राहिली. भाषा आणि साहित्य हे या द्रोहाचं एक हत्यारही होतं आणि माध्यमही होतं. सांस्कृतिक बहुकेंद्रिततेचा अभिमान प्रकट करणाऱ्या आणि भाषेच्या, साहित्याच्या रूपानं जीवनसंबद्धतेचा, जीवनाच्या बहुविधतेचा आणि ज्याला अनेकदा संतांनी ‘सत्य’ म्हणून संबोधलं आहे, त्या अनुभवप्रामाण्याचा निर्भय उच्चार करणारे संत हे सर्वात मोठे विद्रोही होते.

ज्ञानाधिष्ठित, सर्वसमावेशक विश्वसंस्कृतीची घडण कोणत्या मूल्यांच्या आधारे होऊ शकते, याचा वस्तुपाठ संतांनी निर्माण केला. या मूल्यसंघातासाठी  संतांनी चुकवलेली किंमतही दृष्टीआड होता कामा नये. खरं तर प्रत्येक विद्रोही माणसाने अशी किंमत आजवर चुकवलेलीच आहे आणि ती चुकवावीच लागते. ही अभिव्यक्तिस्वातंत्र्याची किंमत तर आहेच, पण त्यापेक्षा किती तरी अधिक गोष्टी त्यात सामावल्या आहेत, याची जाणीव विवेकी परिवर्तनवाद्यांनीही जागती ठेवण्याची गरज आहे.

कोणत्याही सत्ताकारणासाठी स्थितिशीलता आवश्यक असते आणि जीवन तर अखंड प्रवाही, अखंड गतिशील असतं. त्यामुळे व्यवस्थेला घट्ट करीत जीवनाला बांध घालणारे आणि गती रोखणारे जसे समाजकारणात आणि संस्कृतिकारणात सक्रिय असतात, तसे ते बांध फोडून जीवनाला मुक्त करणारे आणि सर्वजनहिताला अनुकूल अशी प्रवाहाला गती देणारेही सक्रिय असतात. या दोहोंच्या संघर्ष-समन्वयातून परिवर्तनाचा वेग आणि दिशाही ठरत असते.

दुसरं प्रबोधनपर्व

गेलं संपूर्ण अर्धशतक आपण या संघर्षांची वेगवेगळी रूपं पाहत, अनुभवत आलो आहोत. या कालखंडाला दुसरं प्रबोधनपर्व असं मला म्हणावंसं वाटत आहे आणि हे र्सवकष परिवर्तनाचं घटित आहे. हे जागतिक पातळीवरचं प्रबोधनपर्व आहे. विसाव्या शतकाच्या अखेरपासून विज्ञान-तंत्रज्ञानाच्या विलक्षण वेगवान प्रगतीनं जे जागतिकीकरणाचं वादळ आणलं आहे, ते सर्व जीवनक्षेत्रांची उलथापालथ करणारं आहे. प्रत्येक क्षेत्रातल्या त्याच्या सुटय़ा सुटय़ा परिणामांविषयी आपण बोलत आहोत; पण या परिवर्तनाचं समग्र चित्र डोळ्यांसमोर ठेवण्याची आवश्यकता आहे. गतिशीलता व परिवर्तन हा जीवनाचा स्थायिभावच आहे. मात्र आज जे बदल होत आहेत ते विराट आहेत, अनाकलनीय आहेत आणि अकल्पनीयही आहेत. मूलगामी स्वरूपाच्या या बदलांमध्ये व्यक्तिजीवनाचा आणि समूहजीवनाचाही पायाच उखडण्याची शक्ती आहे. सर्व जुन्या व्यवस्था कोलमडून पडताहेत. अर्थव्यवस्था कोसळत आहेत, समाजव्यवस्था आणि कुटुंबव्यवस्था कोलमडत आहेत. लहानमोठय़ा भाषा आणि प्रादेशिक संस्कृती हेलपाटून चुरमडत चालल्या आहेत. शासन आणि समाजाचे संबंध बदलत आहेत आणि सत्तेचं स्वरूपही बदलतं आहे. धर्मसत्ता पहिल्या प्रबोधनानंतर कोसळल्या. राजसत्ता, लोकसत्ता यांचे विविध प्रयोग जगभर झाले. आता आर्थिक सत्ता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आणि संहारशक्तीच्या बळावर जगभर

येऊ पाहते आहे.

आज तंत्रज्ञानातल्या, विशेषत: संपर्क क्षेत्रांतल्या नवनव्या शोधांमुळे जग एकत्र येत असल्याचा भास निर्माण झाला आहे. विशेषत: बाजारपेठेच्या पातळीवर ते एकत्र आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्नही होत आहेत. जागतिकीकरणात ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत असा आणि त्यातल्या खऱ्या लाभांपासून वंचित असा- असे वर्ग निर्माण होऊन मुळात जातिधर्माच्या अस्मिता टोकदार करून भंगलेलं समाजमन आणखी छिन्न झालेलं आहे.

प्रबोधनाच्या या दुसऱ्या पर्वातली आव्हानं पहिल्या पर्वापेक्षा फार वेगळी, फार जगड्व्याळ आणि फार गुंतागुंतीची आहेत. भाषेचा प्रश्न त्यातलाच एक आहे. मराठी भाषेचा प्रश्न हा केवळ मराठी भाषेपुरता उरलेला नाही. मराठी संस्कृतीशी, पर्यायाने मराठी समाजाच्या जागतिकीकरणविषयक भूमिकेशीच तो जोडलेला आहे. मराठी समाज जागतिकीकरणाकडे आणि त्यात स्वत:च्या भाषा आणि संस्कृतीकडे कसा पाहतो याचा विचार या संदर्भात महत्त्वाचा आहे.

एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातच तंत्रज्ञानाची प्रगती अशा प्रकारे झाली आहे, की तिनं सर्वच साहित्य व्यवहार किंवा सर्वच कला व्यवहार, नव्हे एकूणच सांस्कृतिक व्यवहार प्रभावित केला आहे. तंत्राच्या अजस्र पंजात दाबली जाणारी संस्कृती, असं एक श्वास रोखायला लावणारं चित्र आपल्याला दिसतं आहे. ही तंत्राची क्रांती सामाजिक दृढीकरणाला अवकाशच देईनाशी झाली आहे आणि मूल्यांच्या स्थिरतेलाही अवकाश मिळेनासा झाला आहे. या काळात एकीकडे साहित्यकार हा व्यापक अशा विश्वाकडे बघतो आहे आणि दुसरीकडे गुंतागुंतीच्या स्थानिक वास्तवाकडे बघतो आहे. या दोहोंनी त्याला असं गुंतवून ठेवलं आहे, की दृष्टी थोडी आत वळवून गंभीर आणि भावनात्मक अशी आंतरविकासाची जी भूमी आहे तिच्याकडे त्याचं लक्ष जाणं अवघड झालं आहे. दुसरीकडे विश्वाचा पसारा माणसाच्या दृष्टीपुढे जेवढा म्हणून खुला होतो आहे, तेवढी त्याची त्या संदर्भातली अशक्तपणाची आणि एकटेपणाची जाणीव आणखी गडद होते आहे.

जगण्याचा लढा सर्व पातळ्यांवर आणि सर्व क्षेत्रांत तीव्र, अधिक तीव्र होत चाललेला आहे.  प्रश्न दारिद्रय़ाचे असोत, भ्रष्टाचाराचे असोत; त्यांचं स्वरूप आणि गुंतागुंत सर्वसामान्य माणसाला पेलवेनाशी झाली आहे. प्रत्येक माणूस सर्व पातळ्यांवर झुंडीमध्ये राहून सर्व लढे एकेकटा लढतो आहे. समूहांना एकत्र बांधणारं सूत्र आज कोणाच्याही हातात नाही आणि तसं सूत्र मिळवून देण्यासाठी, बळकट करण्यासाठी साहित्य आज समर्थ नाही.

जगातल्या सत्तासंघर्षांचे पवित्रे पाहताना, विज्ञानाची अचाट गती अनुभवताना आणि तंत्रज्ञान नवनवे विलक्षण चमत्कार घडवीत असताना माणसाला मात्र आपण आंतरिक गतिशीलता गमावत चाललो असल्याची आणि बाह्य़ गतिशीलतेचे भक्ष्य बनल्याची विदारक जाणीव होते आहे आणि अनेक अर्थानी एकाकी असल्याचाही अस्वस्थ करणारा अनुभव येतो आहे.

व्यक्तीचं सामाजिकीकरण, शिक्षण आणि संवाद प्रेषण यांच्या फार मोठय़ा शक्यता धारण करणारी मौखिक परंपरा म्हणजे लिखित साहित्य परंपरेचं मायपोट आहे. अनेक पाश्चात्त्य विद्वानांनी लिखित परंपरेला ‘ग्रेट ट्रॅडिशन’ आणि मौखिक परंपरेला ‘लिट्ल ट्रॅडिशन’ म्हणून संबोधलं आहे. पण वस्तुस्थिती नेमकी उलट आहे.

वास्तविक लोकपरंपरा हीच लिखित परंपरेपेक्षा सहस्रपटींनी प्राचीन, इथल्या जनजीवनात प्रतिष्ठित आणि इथल्या सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करणारी अधिक व्यापक, अधिक सकस अशी परंपरा आहे. ती अडाणी माणसांनी सांभाळली हा आणखी एक गरसमज आहे. ती अनक्षर लोकांनी सांभाळली हे वास्तव आहे. अनक्षरत्व हे लिखित परंपरेचा गौरव करणाऱ्या समाजात अज्ञानाशी जोडलं गेलं आणि मौखिक परंपरेकडे उपहासाने आणि तुच्छतेने पाहण्याची वृत्तीही बळावत गेली.

लिखित शब्दानं संस्कृतीतल्या ज्ञानाच्या संकल्पना आणि ज्ञानाच्या समावेशाच्या पद्धतीच बदलल्या. नव्या पद्धती, मानवी देहमनाच्या अनेक प्रेरणा आणि शक्तींना गौण ठरवणाऱ्या होत्या, निरुपयोगी ठरवणाऱ्या होत्या. आपल्या दैनंदिन जीवनाचा विचार केला, तरी याची उदाहरणं सहज सापडतील. मुळाक्षरांची पाठांतरं संपली. पाढे संपले. तोंडी गणितं गेली. कथा-गीतं हरवली. पाठ होतील अशा कविता संपल्या. माणसांना गोष्टी सांगता येईनाशा झाल्या.

असं वाटतं की, आता मानवी सहनशक्तीची गरजही हळूहळू संपुष्टात येत चालली आहे. माणसाचे ऐंद्रिय संवेदनांद्वारे ज्ञान संपादन करण्याचे मार्ग बिनमहत्त्वाचे ठरले. उच्चार आणि उच्चार-स्वातंत्र्याची निकड गौण होत चालली आणि समूहानं जगण्याची ताकदही क्षीण झाली. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर येण्यामागे हा एक अदृश्य असा इतिहास आहे. आज आपलं समूहजीवन म्हणजे एक दु:स्वप्न बनलं आहे. स्वस्थ, प्रगतिशील समूहाऐवजी आज दिशाहीन, अविचारी झुंडी फक्त दिसत आहेत. तशा झुंडींच्या पाशवी रूपाचं भय वाटून सामान्य माणसं अधिक भयभीत होत जात आहेत. समूहात सुखानं आणि सहभावानं जगणं शक्य होत नाही म्हणून सामूहिक जगण्याचाच संकोच ती करत चालली आहेत. अतिवैयक्तिकतेमुळे समूहजीवन धोक्यात आलं आहे आणि समूहाचे प्रश्न सोडवण्यासाठीही एकत्र येण्याची तयारी नसणारी माणसं अधिकाधिक संभ्रमित, भयावह आणि रिकामं जीवन जगत आहेत.

वाङ्मयाला समाजात नेहमीच एक सत्तानिरपेक्ष सामथ्र्य असतं आणि राजकीय हेतूनं ते सामथ्र्य वापरण्याचे किंवा ते खच्ची करण्याचे प्रयत्नही अनेकदा राजकीय सत्तेकडून होत असतात. अशा प्रयत्नांना अयशस्वी करण्यासाठी साहित्यिकांजवळ असावा लागतो निर्मितीविषयीचा दृढ असा विश्वास आणि आपल्या वाङ्मयीन मूल्यांवरची दृढ निष्ठा.

प्रत्येक माणूस सर्व पातळ्यांवर झुंडीमध्ये राहून सर्व लढे एकेकटा लढतो आहे. समूहांना एकत्र बांधणारं सूत्र आज कोणाच्याही हातात नाही आणि तसं सूत्र मिळवून देण्यासाठी, बळकट करण्यासाठी साहित्य आज समर्थ नाही.