प्रकाश मेहरा यांच्या ‘नमक हलाल’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचा पहिलाच दिवस माझ्या आजही स्मरणात आहे. चित्रपटात मी परवीन बाबी यांच्या ‘आई’ची भूमिका केली होती. मराठी नाटक, चित्रपट यातून माझी ओळख झालेली असली तरी हिंदीत मी तशी नवीन होते. त्यामुळे सेटवर मी एका कोपऱ्यात बाजूला उभी होते.

माझी ही भूमिका ‘आधुनिक’ युगातील (मॉडर्न) आईची होती. माझी रंगभूषा आणि वेशभूषाही वेगळी होती. तेवढय़ात ‘नमस्ते जी’ असा आवाज एका बाजूने आला. ‘नमस्ते जी, मुझे अमिताभ बच्चन कहते है’ अशी त्यांनी ओळख करून दिली आणि त्यांच्या पाठोपाठ शशी कपूर सामोरे आले आणि त्यांनीही ‘मुझे शशी कपूर कहते है’ असे सांगून माझी ओळख करून घेतली.

प्रकाश मेहरा यांनी त्यांना माझ्याबद्दल कल्पना दिली असावी. त्यामुळे मी मराठी रंगभूमीवरील कलाकार आहे हे त्यांना माहिती होते. नमस्कार, अशी ओळख करून दिल्यानंतर ‘आप तो थिएटर से है, थिएटर के लोग तो अ‍ॅक्टिंग मे दादा होते है’ असे शशी कपूर मला म्हणाले.

शशी कपूर आणि माझी ती पहिलीच भेट होती. या आधी आम्ही कधीही भेटलेलो नव्हतो. ते खूप गोड स्वभावाचे होते. हिंदीतील आपण मोठे ‘स्टार’ आहोत असा कोणताही आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. हिंदीतील मोठय़ा स्टारबरोबर आपण काम करतोय, बोलतोय असे मला अजिबात वाटलेच नाही. त्यांच्या मनमिळाऊ आणि सहृदयी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन पहिल्याच भेटीत झाले. पुढे चित्रीकरणाच्या निमित्ताने त्यांच्याशी अधिक परिचय झाला. सेटवर जेवायलाही आम्ही सर्व जण एकत्रच बसत होतो. हिंदी चित्रपट सृष्टीतील कपूर घराण्याबाबत मला पहिल्यापासूनच आदर होता आणि आहे. मी मूळची रंगभूमीवरील अभिनेत्री. शशी कपूर यांचेही रंगभूमीशी नाते असल्याने त्यांच्याबद्दलही अधिक आत्मीयता होती. ‘नमक हलाल’नंतर पुढे आम्ही अनेक हिंदी चित्रपटात एकत्र काम केले. त्यांच्या मनमोकळ्या आणि लाघवी व्यक्तिमत्त्वाने ते कायम स्मरणात राहतील.

‘कलयुग’ आणि ‘जुनून’ चित्रपटासाठी आम्ही बरोबर काम केले होते. सहृदयी व्यक्तिमत्त्व होता.

श्याम बेनेगल, ज्येष्ठ दिग्दर्शक

शशी कपूर यांच्या निधनाने पृथ्वीराज कपूर, राज कपूर आणि शम्मी कपूर यांच्या साखळीतील शेवटचा दुवा निखळला आहे. आता उरल्या केवळ त्यांच्या आठवणी.

सिमी गरेवाल, अभिनेत्री

विविध भूमिका आणि ‘दिवार’ चित्रपटातील त्यांचा ‘मेरे पास मा है’ संवाद कायमचा स्मरणात राहील.

अक्षय कुमार , अभिनेता

माझ्या पहिल्या चित्रपटात ते होते. त्यांच्या बरोबर काम करणे हा खूप चांगला अनुभव होता. देखणे आणि सहृदय व्यक्तिमत्त्व.

पूनम धिल्लन, अभिनेत्री

तुम्हाला कधीच विसरू शकत नाही.

अजय देवगण, अभिनेता

माझ्या सारख्या रंगकर्मीना प्रोत्साहन देण्यासाठी शशी कपूर यांनी ‘पृथ्वी थिएटर्स’ची स्थापना केली. त्यांच्या उमद्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करण्यासाठी शब्दही अपुरे पडतील.

नसिरुद्दीन शहा, ज्येष्ठ अभिनेते

पाच दशकांहून अधिक काळ रुपेरी पडदा गाजविणाऱ्या शशी कपूर यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टी समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व हरपले आहे. नावीन्य आणि उत्कटता हा त्यांचा व्यक्तिमत्त्वाचाच गुण होता.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री