भाषाशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. अशोक रामचंद्र केळकर यांचे अलीकडेच निधन झाले. चिकित्सक व चिंतनशील विचारवंत म्हणून त्यांची ख्याती होती. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र, जीवशास्त्र, सांस्कृतिक इतिहास आदी विद्याशाखांत त्यांनी भरीव कार्य केले. डॉ. केळकर यांच्याविषयी त्यांच्या कन्या डॉ. रोशन रानडे यांनी व्यक्त केलेल्या भावना.
२० तारखेला दादा गेले. एके दिवशी हे होणार होते. यासाठी कितीही मानसिक तयारी झाली असली तरीही एक प्रकारचं रितेपण जाणवते आहे. गेली दोन वर्षे माझं आयुष्य त्यांच्या ‘टाइमटेबल’शी बांधले गेले होते, त्यातून मोकळेपणा आलाय. पण..
परवापासून अनेकांचे सांत्वन संदेश येत आहेत. वर्तमानपत्रांमधून रकाने भरून त्यांच्या कर्तृत्वाविषयी लिखाण होते आहे. आतून उमाळे येत आहेत. या सर्वात एका मैत्रिणीने असं लिहिलं की, ‘अगं, इतका मोठा माणूस तुझा एक हिस्सा आहे, किती तू भाग्यवान!’
किती ‘खरं’ आहे हे! त्यांच्या लिखाणातून त्यांनी उभारलेल्या संस्थांमधून त्यांच्या देहदानातून जसे ते मागे राहतील; तसेच ते त्यांनी ज्यांना संस्कारित केले आहे, त्या त्यांच्या लेकरांमधूनही मागे राहतील.
मुलांना संस्कारित करणे म्हणजे पुढे बसवून शुभंकरोती म्हणवून घेणे नव्हे, तर हे संस्करण आपल्या वागण्यातून आपल्या आचार-विचारातून होणे आवश्यक असते, या पद्धतीवर त्यांचा विश्वास होता. ते संपूर्णपणे निरीश्वरवादी होते. परंतु आम्हीही तसेच व्हावे, असा त्यांनी कधीही आग्रह धरला नाही. माझी आई मोठय़ा कुटुंबातून आलेली. त्यामुळे आपले सणवार, समारंभ यातून आपली कुटुंबपद्धती टिकून आहे, असा तिचा गाढा विश्वास. त्यामुळे ती आमच्यावर हे संस्कार करीत होती, त्याला त्यांनी कधी शब्दाने आडकाठी घातली नाही. त्यांच्या या वृत्तीचा आम्हा दोघा भावंडांवर खूप खोलवर परिणाम झालाय. यथावकाश मी आणि माझा भाऊ निषाद निरीश्वरवादी झालो, पण तरीही इतर सर्व धर्म-संस्कृतींचा आदर करायला शिकलो. आपल्या नास्तिकपणाचा जो प्रचार करतो, तो निधर्मी नसतो. आपली विचारधारा दुसऱ्यावर न लादणे, हे एका निधर्मी व्यक्तीसाठी आवश्यक आहे, हे मी तरी त्यांच्या वागण्यातून शिकले.
त्यांनी कधी चुकूनही देवाला नमस्कार केलेला मी बघितला नाही. अतिशय अवघड प्रसंगीही त्यांचा धीर खचून ते ईश्वराकडे वळलेले मी बघितले नाही. त्यामुळे तुम्हाला निरीश्वरवादी विचारधारा आत्मसात करायची असेल तर बाक्या प्रसंगी ईश्वराकडे वळायचा भोंगळपणा करता येत नाही.
संपूर्ण निरीश्वरवादी असूनही त्यांचा धर्मविषयक अभ्यास अतिशय खोलवर होता. त्यामुळेच यावर त्यांच्याशी कोणी वाद घालू लागला तर त्याला निरुत्तर करण्यासाठी लागणारी त्यांची वैचारिक बैठक पक्की होती. त्यांनी जे काही कार्य केले, ते त्यांचे श्रेयस होते, म्हणून त्यांनी ते केले. मानमरातब, पुरस्कार वगैरे पदरात पाडून घेण्यासाठी नाही. ‘माझे वडील’ म्हणून त्यांना ओळखणाऱ्या अनेकांचे आज मला संदेश येताहेत की ‘अगं तुझे वडील एव्हढे मोठे होते, हे आम्हाला माहीतच नव्हतं.’ माझ्या मित्र-मैत्रिणींसाठी ते फक्त ‘रोशनचे वडील’ होते किंवा नातेवाईक मंडळींमध्ये कुणाचे मेव्हणे होते, काका, मामा होते. त्यांच्या मोठेपणाचे दडपण समोरच्यावर येत नसे.
त्यांना ‘पद्मश्री’ मिळाल्याचे जाहीर झाले. त्यानंतर त्यांना एका मान्यवर व्यक्तीचे पत्र आले की, ‘आता हा पुरस्कार तुम्ही नाकारणार असालच.’ तेव्हा मला ते पत्र दाखवून ते म्हणाले होते की, ‘म्हणजे ही बातमी काही दिवसांनी लोक सहज विसरून जाणार, त्याऐवजी, त्याचा गाजावाजा करून ती पुष्कळ दिवस वर्तमानपत्रांमधून गाजत ठेवायची, असं मला अजिबात करायचं नाही.’ म्हणजे त्यांचा विनम्रतेचासुद्धा कधी अभिनिवेश नव्हता.
२६ जानेवारी २००२ या दिवशी त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाल्याचे जाहीर झाले. त्यांना भेटायला येऊन त्यांचे अभिनंदन करण्यासाठी लोकांची रीघ लागली. त्यात काही जुन्या ओळखी होत्या, जुने विद्यार्थी होते, आवर्जून त्यांना भेटायला आलेले. दुसऱ्या दिवशी मला फोनवर म्हणाले, ‘अगं रोशन, माझी संपदा किती मोठी आहे. मी आयुष्यात किती जास्त माणसं जोडली आहेत, ते आज मला समजलं.’ त्यांच्या लेखी ‘पद्मश्री’चे महत्त्व एवढेच होते.
पुढे मार्चमध्ये राष्ट्रपती भवनात पुरस्कार सोहळा झाला. त्याला उपस्थित राहायचं भाग्य मला मिळालं. माझ्यासाठी तो प्रसंग फार महत्त्वाचा होता. घरी पोहोचल्यावर मी लगेचच त्यावर लेख लिहिला. नेहमीच्या सवयीने त्यांच्याकडून व्याकरण तपासून घेतले. तेव्हा म्हणाले, ‘हा नको छापायला देऊ. आपणच काय आपली टिमकी वाजवायची.’ आयुष्यातले काही प्रसंग आपल्या आठवणीतही घट्ट रुजून बसतात. कारण त्यांनी तुमच्यावर खोलवर परिणाम केलेला असतो.
त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे माझी मीच सायकल मारत मेडिकल कॉलेजची अ‍ॅडमिशन पक्की करून आले होते. त्यावेळेस माझे मावसे गजाननरावही घरी आले होते. त्या दोघांनी मला मध्ये बसवून घेतले आणि विचारले, की आता तू आम्हाला समजावून सांग की, ‘तुला डॉक्टर का व्हायचे आहे?’ मी दचकलेच. कारण तोपर्यंत वैद्यकीय अभ्यासक्रम निवडण्याचा माझा निर्णय त्यांना फारसा पसंत नाही, हे त्यांनी शब्दानेही दर्शवले नव्हते. फार काय, त्यांच्या चेहऱ्यावर सूक्ष्मशीसुद्धा आठी नव्हती. याविषयी त्यांना विचारल्यावरचे त्यांचे उत्तर माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे. ‘तुला तुझं आयुष्य घडवायचं स्वातंत्र्य दिलं म्हणजे चुका करायचंही स्वातंत्र्य दिलं आहे. फक्त आपले निर्णय शेवटपर्यंत निभावायचे असतात, हे मात्र लक्षात ठेव.’ माझ्यासाठी तर हे ‘प्रमाणवाक्य’ झाले. आज जेव्हा आजूबाजूला बघते, तेव्हा आमच्यावर त्यांनी केलेल्या या संस्काराचे मोल लक्षात येते. तेव्हा मी म्हणते की, ‘त्यांनी संस्कारित केलेली लेकरे’ तेव्हा त्यात फक्त मी आणि माझा भाऊ एवढे दोघेच अभिप्रेत नाही. त्यांनी खूप माणसे जोडली. यामध्ये त्यांचे विद्यार्थी तर आहेतच. दारादारापासून दूर राहणारे त्यांचे देशी-विदेशी विद्यार्थी जेव्हा कधी घरच्या आठवणीने व्याकुळ होत, तेव्हा त्यांना दिलाशाची जागा आमचं घर होतं. माझे आई-वडील त्यांचे मायबाप असत. पण प्रत्यक्ष त्यांच्या हाताखाली न आलेले, परंतु त्यांना गुरुस्थानी मानणारेही पुष्कळजण आहेत. त्या सर्वाचेही ते नुसते शिक्षक नव्हते तर खऱ्या अर्थाने गुरू होते. त्यांच्या वैचारिक शिस्तीमुळे, कडक स्वभावामुळे सर्वानाच त्यांच्याबद्दल आदरयुक्त धाक वाटत असे. परंतु तरीही त्यांच्याशी सहज संवाद साधणे शक्य होत असे.
आपल्या वैयक्तिक अडचणी घेऊनही त्यांचे विद्यार्थी त्यांच्याकडे येत. त्या सोडवायचा ते प्रयत्न करीत, नाही तर निदान ते आस्थेने ऐकून घेतील ही खात्री असे. ही सर्वच त्यांची लेकरे होती.
माझ्या आई-वडिलांचे पालकत्व हे असे एखाद्या वटवृक्षाच्या छायेप्रमाणे शीतल आणि विशाल होते. आजही खूप जण मला आवर्जून सांगताहेत की, ‘माझ्या आयुष्यावर त्यांचा खूप मोठा प्रभाव आहे’ किंवा ‘माझ्या आयुष्याला त्यांनी वळण लावले.’
होय ग सखे! ते आहेतच. ते ‘माझ्यात’ अस्तित्वात आहेत. फार काय, आमच्या पुढल्या पिढीत, त्यांच्या लाडक्या नातवंडांमध्येही ते अस्तित्वात आहेत..