News Flash

अष्टावधानी कलाकार

‘श्रीकांत मोघे आपल्याला बातम्या देत आहेत..’ अशा खडय़ा आवाजात दिल्ली आकाशवाणीवर बातम्या देण्याचे काम त्यांनी केले.

(संग्रहित छायाचित्र)

वसंत कानेटकर यांच्या ‘लेकुरे उदंड जाली’ नाटकामधील राजशेखर ऊर्फ राजा, पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’मधील बोरटाके गुरुजी आणि या नाटकामध्येच ‘दिल देके देखो’ या गीतावर रंगमंचावर नृत्य करून रसिकांना मनमुराद आनंद देणारे कलाकार अशी नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे यांची ओळख होती. किलरेस्करवाडीचे (जि. सांगली) कीर्तनकार मोघे यांचे श्रीकांत हे ज्येष्ठ चिरंजीव. शिक्षणासाठी सांगलीला आल्यानंतर विज्ञान शाखेत पहिल्या वर्षांला असताना विलिंग्डन महाविद्यालयात पु. ल. देशपांडे यांच्याशी त्यांची ओळख झाली. पुढे त्यांच्या ‘अंमलदार’ या नाटकाचा प्रयोग त्यांनी पुण्याच्या स. प. महाविद्यालयात केला होता. राज्य शासनातर्फे आयोजित १९५५ सालच्या राज्य नाटय़ स्पर्धेत मामा वरेरकर यांचे ‘अपूर्व बंगाल’ हे नाटक मोघे यांनी सादर केले होते. त्यासाठी त्यांना अभिनयाचे पारितोषिक मिळाले होते. पुण्याच्या किलरेस्कर ऑइल इंजिन कंपनीत नोकरी करत असताना नाटकात काम करण्याची ओढ स्वस्थ बसू देत नसल्याने त्यांनी नोकरी सोडली.

‘श्रीकांत मोघे आपल्याला बातम्या देत आहेत..’ अशा खडय़ा आवाजात दिल्ली आकाशवाणीवर बातम्या देण्याचे काम त्यांनी केले. ‘प्रपंच’ या चित्रपटाद्वारे १९६१ साली त्यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. याच दरम्यान ‘जमाना’, ‘उलझन’, ‘ढाँग’, ‘मिट्टी की गाडी’ अशा हिंदी नाटकांमधूनही त्यांनी काम केले. ‘कृष्णाकाठी कुं डल’ या नाटकाद्वारे पुलंसमवेत काम करण्याची त्यांना संधी लाभली.

‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकातील ‘श्याम’ या व्यक्तिरेखेने मोघे यांना वयाच्या तिशीमध्ये ओळख दिली. नाटकांमुळे त्यांना जगभर भ्रमंती करण्याची संधी लाभली. अगदी लंडनला गेल्यानंतरही तेथील रंगभूमी चळवळीशी ते जोडले गेले होते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आणि ताणतणावाच्या काळात माणसाला हसायला हवे आहे, ही बाब ध्यानात घेऊन ‘मला उमजलेले पुलं’ हा एकपात्री प्रयोग ते गेल्या काही वर्षांपासून करत होते. सांगली येथे झालेल्या नाटय़संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. आपल्या नाटय़प्रवासावर आधारित ‘नटरंगी रंगलो’ या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले होते.

‘लेकुरे उदंड जाली’! या नाटकामुळे श्रीकांत मोघे रंगभूमीवर अजरामर झाले.  पद्यात्मक लयबद्ध संवादशैलीतील हे नाटक त्याच्या फॉर्ममुळे तर लक्षवेधी होतेच; त्याचबरोबर संततीहीन जोडप्याचा आपल्या दु:खाकडे पाहण्याच्या वेगळ्या, खेळकर दृष्टिकोनामुळेही ते गाजले. भावनांची असंख्य आंदोलने आविष्कृत करण्याचे आव्हान या नाटकात होते. श्रीकांत मोघे यांनी कथकाची भूमिका निभावतानाच यातल्या कष्टी जोडप्याची व्यथा अधिकच गहिरी केली. या नाटकाचे आव्हान त्यानंतर सुमीत राघवन यांनीही पेलले. अर्थात ‘लेकुरे’चा उल्लेख निघाला की श्रीकांत मोघेच जुन्या-जाणत्या रसिकाना आजही आठवतात.

बाळ कोल्हटकर यांचे ‘सीमेवरून परत जा’ हे १९६२ च्या चिनी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवरचे ऐतिहासिक नाटक. त्यात श्रीकांत मोघे यांनी सिकंदरची प्रमुख भूमिका अत्यंत तडफेने साकारली होती. या नाटकाच्या वेळचा श्रीकांत मोघे यांच्या प्रसंगावधानाचा एक किस्सा : बाहेरगावच्या एका प्रयोगात ऐन प्रयोग रंगात आलेला असताना एक साप रंगमंचावर अवतरला. बहुधा त्यालाही नाटकात आपणही ‘एन्ट्री’ घ्यावी अशी इच्छा झाली असावी. मात्र, श्रीकांत मोघे यांनी त्याला पाहताच प्रसंगावधान राखून त्याला यमसदनास पाठवले आणि प्रयोग निर्विघ्नपणे पार पाडला.

नटवर्य ही ओळख..

श्रीकांत मोघे यांनी ‘सिंहासन’सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या असल्या तरी रंगभूमीवरील त्यांचा सहज वावर, भूमिकेच्या अंतरंगात शिरून ती साकारण्याची विलक्षण हातोटी आणि संवादोच्चारांवरील हुकूमत यामुळे रंगभूमी समृद्ध करणारे नटवर्य म्हणूनच ते आधिक्याने ओळखले जातात. सांगली येथील नाटय़संमेलनाचे अध्यक्षपद बहाल करून त्यांचा यथोचित सन्मानही रसिकांकडून झाला.

वृत्तनिवेदक..

साठच्या दशकात ‘श्रीकांत मोघे बातम्या देत आहेत’, असा खडा आवाज दिल्ली आकाशवाणीवर ऐकू येऊ लागला. दिल्लीमध्ये ऑल इंडिया रेडिओमध्ये त्यांना नोकरी मिळाली आणि तेथेच तब्बल पाच वर्षांहून अधिक काळ त्यांनी रंगभूमीची सेवा केली. पुस्तक, नाटक वाचनासोबतच रेडिओवरुन बातम्या द्यायच्या म्हटल्या की, वर्तमानपत्रांचे वाचनही तितकेच महत्त्वाचे. त्यामुळे दररोजच्या वाचनामध्ये वर्तमानपत्रांच्या वाचनाचा छंदही त्यांना जडला. दिल्लीहून मुंबईत बदली झाल्यानंतर ते चित्रपटसृष्टीकडे वळले.

श्रद्धांजली

सतीश आळेकर : माझ्या महाविद्यालयीन कालखंडात श्रीकांत मोघे हे नाव रंगभूमीवर गाजत होते. बाळ कोल्हटकर यांच्या ‘सीमेवरून परत जा’ नाटकातील ‘अ‍ॅलेक्झांडर’, वसंत कानेटकर यांच्या ‘लेकुरे उदंड जाहली’ नाटकातील ‘राजा’ आणि पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’ नाटकातील बोरटाके गुरुजी, अशा भिन्न प्रकृतीच्या नाटककारांच्या नाटकांतील त्यांच्या भूमिका मला भावल्या. श्रीकांत मोघे हे हसरं आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते.

‘मी नट असल्यामुळे शब्दांमध्ये प्राण फुंकल्याखेरीज मला स्वस्थ बसवत नाही. माझ्या वेगवेगळ्या भूमिकांचे संवाद म्हणत असतो. कधी मी ‘गरुडझेप’ नाटकातील शिवाजी होतो, कधी ‘अंमलदार’मधील सर्जेराव, कधी ‘अश्रूंची झाली फुले’तील शंभू महादेव, तर कधी ‘कथा कुणाची व्यथा कुणा’ नाटकातील अरविंद होतो. ‘तुझे आहे तुजपाशी’मध्ये तर मी सतीश, राजेश आणि श्याम अशा भूमिका साकारतो. ‘जन्म आणि मृत्यू या दोन टोकांदरम्यान नियतीने माणसाची चालवलेली फसवणूक एकदा लक्षात आली की, प्रेमाने भोवती जमणाऱ्या माणसांची जमेल तशी, जमेल तेवढी आणि जमेल तेव्हा हसवणूक करण्यापलीकडे आपल्या हातात काय राहतं?’

– श्रीकांत मोघे यांनी दोन वर्षांपूर्वी

‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीमधील भाग.

‘आमच्यामध्ये विकण्याची पात्रता नाही. विकाऊ  होणे हे मराठी माणसाला कमीपणाचे आणि सवंगपणाचे वाटते. या गोष्टींमुळे मराठी नाटक व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी होताना दिसत नाही. आता नव्याने मराठी रंगभूमीवर आलेल्या शेक्सपीअरच्या ‘हॅम्लेट’ या नाटकाला व्यावसायिक यश मिळते आहे, ही चांगली गोष्ट आहे; पण आमच्या मातीतील ‘एकच प्याला’ व ‘तो मी नव्हेच!’ ही नाटके इंग्रजीत कधी जाणार, हा प्रश्न मला पडतो.’’

– अलिकडच्या मराठी रंगभूमीबद्दल मोघे यांनी काढलेले उद्गार

गाजलेली नाटके

* लेकुरे उदंड जाली

* सीमेवरून परत जा

* तुझे आहे तुजपाशी

* आंधळ्याची शाळा

* वाऱ्यावरची वरात

* लग्नाची बेडी

* अंमलदार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 1:00 am

Web Title: ashtavadhani artist srikant moghe abn 97
Next Stories
1 राज्यावलोकन : विरोधी अवकाशात नवभरती..
2 मनस्वितांचा पथदर्शकु..
3 चाँदनी चौकातून : ‘ब चमूं’च्या देशा..
Just Now!
X