पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपैकी आसाममधील निवडणूक पार पडली आहे. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत ४९ मतदारसंघांत मतदान झाले असून आज (रविवार) ५६ मतदारसंघांत मतदान होत आहे. तामिळनाडू, केरळ आणि पुद्दूचेरी या तीन राज्यांमध्ये १६ मेला मतदान होणार आहे. या पाचही राज्यांमधील निकाल काय असेल, याचे अंदाज राजकीय वर्तुळात बांधले जाऊ लागले आहेत. आसाममध्ये विक्रमी ८५ टक्के मतदान झाल्याने निकाल काय लागेल याची उत्सुकता आहे.

ईशान्य भारतात अन्य राज्यांच्या तुलनेत जास्त मतदान होते हा कल असला तरी आसाममध्ये यंदा सर्वाधिक मतदान झाले. पाच राज्यांपैकी भाजपला आसाममध्येच सत्ता मिळण्याची संधी आहे. आसामचे भौगोलिकदृष्टय़ा अप्पर आणि लोअर आसाम असे दोन भाग पडतात. अप्पर आसामध्ये आसामी, आदिवासी, बिहारी, मारवाडी मतदारांची संख्या जास्त आहे. लोअर आसाममध्ये बांगलादेशी स्थलांतरित तसेच अल्पसंख्याक मतदारांची संख्या लक्षणीय आहे. अप्पर आसाममध्ये भाजप-आसाम गण परिषद आणि बोडो पीपल्स फ्रंट या युतीला ६४ पैकी किती जागा मिळतात यावर सत्तेचे सारे गणित अवलंबून आहे. लोअर आसाममध्ये काँग्रेस आणि अजमल बद्रुद्दीन यांच्या युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट यांच्यात लढत होत आहे. मुस्लीम मतांमध्ये किती विभाजन होते हासुद्धा कळीचा मुद्दा ठरणार आहे. हिंदूबहुल भागांमध्ये पहिल्या टप्प्यात मोठय़ा प्रमाणावर मतदान झाल्यावर मुस्लीमबहुल विभागात त्याची प्रतिक्रिया उमटली आणि भरघोस मतदान झाले. अर्थात, काँग्रेस आणि अजमल यांच्या पक्षात मुस्लीम मते किती विभागली जातात यावर सारे अवलंबून आहे. ‘आसाममध्ये बदल झाला पाहिजे’, अशी सामान्य नागरिकांची भावना होती. लोअर आसाममध्ये भाजपला किती पाठिंबा मिळाला आणि मुस्लीम मतांचे किती विभाजन होते यावर सत्तेची गणिते अवलंबून असल्याचे, आसामच्या राजकारणाचे अभ्यासक आणि पत्रकार अमलज्योती हजारिका यांचे म्हणणे आहे. विक्रमी मतदान झाल्याने साऱ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांना मतदान यंत्रांमध्ये नक्की दडलेय काय, याचा अंदाज येत नाही; पण सर्वाधिक जादा भाजपला मिळतील, असा अंदाज आहे.

अम्मांचे धक्कातंत्र

पुन्हा सत्तेत आल्यास तामिळनाडूमध्ये टप्प्याटप्प्याने दारूबंदी करण्याचे आश्वासन देऊन मुख्यमंत्री जयललिता यांनी महिला मतदारांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. यापाठोपाठ अण्णा द्रमुकच्या विद्यमान १५० पैकी १०० आमदारांना पुन्हा उमेदवारी नाकारून जयललिता ऊर्फ अम्मांनी दारूबंदीच्या आश्वासनापाठोपाठ दुसरा धक्का दिला आहे. दहा मंत्र्यांसह १०० आमदारांना उमेदवारी नाकारून प्रस्थापितांच्या विरोधातील नाराजीचा फटका बसणार नाही याची खबरदारी घेतली आहे. नवे चेहरे दिल्याने पक्षावरील मतदारांचा रोष कमी होईल हे गणित आहे. पक्षात अम्मांची एकाधिकारशाही असल्याने बंडखोरी, नाराजी वगैरे प्रकार अण्णा द्रमुकमध्ये सहन केले जात नाहीत. कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सत्तेत यायचेच हा निश्चय करून अम्मा रिंगणात उतरल्या आहेत. द्रमुक- काँग्रेस आघाडीचे आव्हान असले तरी चित्रपट अभिनेता विजयकांत यांचा डीएमडीके हा पक्ष स्वतंत्रपणे लढत असल्याने अम्मांच्या पथ्यावरच पडले आहे. ९३ वर्षीय एम. करुणानिधी यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. यात पराभव झाल्यास करुणानिधी यांच्या राजकारणाची अखेर मानली जाईल. बिहारमध्ये ४१ जागा लढवून फायदा झाल्याने तामिळनाडूमध्येही बहुधा काँग्रेसने आघाडीत ४१ जागांवर समाधान मानले आहे. जी. के. वासन यांनी तामिळ मनिला काँग्रेसचे पुनरुज्जीवन केल्याने काँग्रेसचे काही नेते आणि कार्यकर्ते वासन यांच्याबरोबर गेले आहेत. जयललिता आणि करुणानिधी या पारंपरिक प्रतिस्पध्र्याप्रमाणेच चित्रपट अभिनेता विजयकांत, माजी केंद्रीय आरोग्यमंत्री अंबुमणी रामदास हेसुद्धा मुख्यमंत्रिपद मिळविण्याच्या उद्देशाने रिंगणात उतरले आहेत. विजयकांत हे द्रमुकच्या मतांवर डल्ला मारतील, अशी शक्यता आहे. यामुळेच विजयकांत यांनी आघाडीत यावे म्हणून द्रमुकने बरेच प्रयत्न केले होते. तामिळनाडूमध्ये लाटेवर राजकारण चालते, असा अनुभव आहे. सध्या तरी कोणती लाट दिसत नाही. यामुळेच अम्मांना पुन्हा संधी आहे. करुणानिधी प्रचारात कोणती जादू करतात यावरही बरेच अवलंबून आहे.

ममतांची दमछाक

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्याविरोधात काँग्रेस आणि डावे हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकत्र आल्याने ममतादीदींपुढे आव्हान उभे ठाकले आहे. काँग्रेस, डावे आणि भाजप या साऱ्यांनीच प्रचारात ममतादीदींना लक्ष्य केले आहे. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पहिल्यांदाच ममता बॅनर्जी यांच्यावर तिखट शब्दांमध्ये टीका केली. डाव्यांसाठी ‘करो वा मरो’ अशी ही लढाई आहे. सध्या तरी ममता बाजी मारतील अशी चिन्हे असली तरी काँग्रेस व डाव्यांच्या जागा १००च्या आसपास जातील, असाही अंदाज वर्तविला जात आहे. सुरुवातीला सोपी वाटणारी लढत ममतादीदींसाठी आव्हानात्मक ठरली आहे.

परंपरा कायम?

आलटूनपालटून काँग्रेस किंवा डाव्या पक्षांना सत्ता देण्याची केरळची परंपरा यंदाही कायम राहील अशी चिन्हे आहेत. काँग्रेस राजवटीबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. मुख्यमंत्री ओमान चंडी यांच्यासह काही ज्येष्ठ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. केरळात मुस्लीम आणि ख्रिश्चन यांचे पारंपरिकदृष्टय़ा काँग्रेसला मतदान होते, तर हिंदू डाव्या पक्षांबरोबर राहतात, असा अनुभव आहे. भाजपच्या पारडय़ात हिंदू मते पडणार असल्याने डाव्या पक्षांच्या मतांवर परिणाम होईल, असे काँग्रेसचे गणित आहे. केरळात काँग्रेसला निवडणूक सोपी नाही हे मात्र निश्चित.

कोणता स्वामी बाजी मारणार?

३० सदस्यीय पुद्दूचेरी विधानसभेसाठी चुरशीची लढत आहे. काँग्रेस-द्रमुक युती, विद्यमान मुख्यमंत्री रंगास्वामी यांचा एनआर काँग्रेस आणि अण्णा द्रमुक अशी तिरंगी लढत आहे. काँग्रेसमधून फुटून रंगास्वामी यांनी गेल्या वेळी स्वतंत्र पक्ष काढून सत्ता मिळविली होती. यंदा काँग्रेस-द्रमुक आघाडी घेईल, असे मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष आहेत. काँग्रेसचे नारायणस्वामी आणि विद्यमान मुख्यमंत्री रंगास्वामी यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी स्पर्धा आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकीत ममता आणि जयललिता सत्ता कायम राखतील, असे चित्र आहे. केरळ किंवा आसामची सत्ता गमवावी लागल्यास काँग्रेससाठी मोठा धक्का असेल. आसाम जिंकल्यास भाजपचे बळ वाढेल, पण पराभव झाल्यास दिल्ली, बिहारनंतर लागोपाठ तिसरा पराभव असेल.

Untitled-14