|| संतोष प्रधान

एकाच पक्षाला भरभरून मते नाहीत आणि चित्रपट तारेतारकांनाही स्थान नाही, हे तमिळनाडूतील विधानसभा निवडणूक निकालातून स्पष्ट झालेच. मात्र, वेगवेगळ्या प्रयोगांची चाचपणी करूनही भाजपला चार जागांच्या पल्याड यश मिळाले नाही आणि ‘भाजपमुळेच नुकसान’ झाल्याची भावना मित्रपक्ष अण्णाद्रमुकमध्ये निर्माण झाली आहे…

एकाच पक्षाला भरभरून मते नाहीत, द्रविडी पक्षांचेच वर्चस्व आणि चित्रपट तारेतारकांना स्थान नाही, हेच तमिळनाडूतील विधानसभा निवडणूक निकालाचे वैशिष्ट्य. तब्बल दहा वर्षांनी द्रमुकचा ‘सूर्य उगवला’ (उगवता सूर्य हे द्रमुकचे निवडणूक चिन्ह) आणि एम. के . स्टॅलिन यांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. गेल्याच आठवड्यात स्टॅलिन सरकार सत्तेत आले आणि लगेचच लोकानुनयाचे निर्णय घेण्यात आले. त्यात खासगी रुग्णालयांमधील करोना रुग्णांच्या उपचाराचा खर्च शासकीय विमा योजनेतून करणे, गरीब कुटुंबांना करोनाकाळात मदत म्हणून चार हजार रुपये, सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बसगाड्यांमध्ये महिलांना मोफत प्रवास, आपल्याकडील आरे किंवा महानंदप्रमाणे तमिळनाडू सरकारच्या मालकीच्या ‘आविन’ दुधाच्या दरात लिटरला तीन रुपये कपात… असे विविध निर्णय घेण्यात आले. करुणानिधी आणि जयललिता यांच्या पश्चात झालेल्या पहिल्याच निवडणुकीत द्रमुकने बाजी मारली. करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर पक्षाची सारी सूत्रे हाती आलेल्या स्टॅलिन यांनी गेली दोन-अडीच वर्षे भरपूर मेहनत घेतली होती. लोकसभा अणि विधानसभा निवडणुकांपूर्वी यात्रा काढून राज्य पिंजून काढले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३९ पैकी ३८ जागा जिंकल्याने स्टॅलिन यांचा आत्मविश्वास वाढला. विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘स्टॅलिन तुमच्या मतदारसंघात’ या यात्रेतून त्यांनी जनतेशी संवाद साधला आणि मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार केले.

स्टॅलिन यांनी सत्तेत येताच पारदर्शक कारभाराची ग्वाही दिली. द्रमुक सरकार आणि पारदर्शक कारभार हे समीकरण जरा विरळाच. करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर नेहमीच भ्रष्टाचाराचे नुसतेच आरोप झाले नाहीत, तर काही ज्येष्ठ मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले होते. केंद्र सरकारमधील द्रमुकच्या मंत्र्यांची कामगिरी सर्वश्रुत आहेच. शेवटी अमुक  हे आपल्या मंत्रिमंडळात नकोत, अशी द्रमुकच्या नेतृत्वाला सांगण्याची वेळ सौम्य व शांत स्वभावाच्या तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आली होती. २-जी घोटाळ्यात तत्कालीन मंत्री ए. राजा आणि करुणानिधी यांची कन्या कनिमोळी यांना तुरुंगाची हवा खावी लागली. स्टॅलिन यांच्या नव्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांवर पूर्वी सत्तेत असताना भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते वा त्यांना राजीनामे द्यावे लागले होते. केंद्रात बंदर खाते द्रमुककडे असताना मुंबईसह सर्वच बंदरांच्या कारभारात द्रमुकच्या समर्थकांनी ठेके  किंवा अन्य कामांमध्ये उच्छाद मांडला होता आणि त्याबाबत तेव्हा ओरडही झाली होती. यामुळेच द्रमुक सरकारची प्रतिमा सुधारण्याचे मोठे आव्हान स्टॅलिन यांच्यावर असेल. करुणानिधी यांच्या हयातीत पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत व कारभारात नातेवाईकांचा गोतावळा मोठा होता. स्टॅलिन यांनी पक्षाचे नेतृत्व हाती आल्यावर अगदी सावत्र बहीण कनिमोळीसह अन्य नातेवाईकांना प्रथम पक्षाच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले. स्टॅलिन यांचे पुत्र विधानसभेत निवडून आले; पण उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे किंवा तेलंगणाचे के . चंद्रशेखर राव-रामा राव या पितापुत्रांच्या जोडीप्रमाणे स्टॅलिन यांनी मुलाला मंत्रिमंडळात लगेचच स्थान दिलेले नाही. सरकारमध्ये वित्त खाते हे बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील जाणकार, ‘वॉल स्ट्रीट’चा अनुभव असलेले तसेच अमेरिकेतील ‘एमआयटी’ या विख्यात विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या पलानीवेल थैगराजन यांच्याकडे सोपविले. यावरून करुणानिधी यांच्या पावलावर पाऊल न ठेवता सरकारचा कारभार गंभीरपणे करण्याची इच्छा स्टॅलिन यांची दिसते आणि तसे त्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमधून सूचितही केले आहे.

तमिळनाडूच्या राजकारणात १९६७ पासून राष्ट्रीय पक्षांना संधी मिळालेली नाही. द्रमुक व अण्णाद्रमुक या दोन प्रादेशिक पक्षांमध्येच चुरस असते. यंदाच्या निवडणुकीत एकूण मतांच्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक मते (द्रमुकला ३७.७० टक्के, तर अण्णाद्रमुकला ३३.२९ टक्के) या दोन पक्षांनाच मिळाली. जयललिता यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर राज्यात हातपाय पसरण्याचा प्रयत्न भाजपने केला. यासाठी अण्णाद्रमुकमधील वाद मिटवले व अण्णाद्रमुक सरकार स्थिर राहील याची खबरदारी घेतली; पण भाजपला चार जागांच्या (२.६२ टक्के मते) पलीकडे यश मिळालेले नाही. केंद्रात २०१४ साली सत्तेत आल्यापासून भाजपने संघटन कमकुवत असलेल्या राज्यांमध्ये ताकद वाढवली. ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजप नगण्य होता; पण आजघडीला सातपैकी सहा राज्यांमधील सत्ता भाजपने हस्तगत केली आहे. तमिळनाडूत मात्र वेगवेगळ्या प्रयोगांची चाचपणी करूनही भाजपला यश मिळालेले नाही. भाजप म्हणजे हिंदी भाषकांचा पक्ष, ही तमिळनाडूत झालेली प्रतिमा भाजपला त्रासदायक ठरते. केंद्राच्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात त्रिभाषा सूत्राचा समावेश करण्यात आला असता, त्याला तमिळनाडूत प्रचंड विरोध झाला होता. शेवटी केंद्राला- हिंदीची सक्ती करणार नाही, हे जाहीर करावे लागले. भाजपबरोबर युती केल्याने नुकसानच झाल्याचे अण्णाद्रमुकचे नेते आता उघडपणे बोलू लागले आहेत. केरळात भोपळा, तमिळनाडूत चार जागा, तर शेजारच्या केंद्रशासित पुदुच्चेरीत सहा जागांच्या माध्यमातून सत्तेत वाटा- एवढेच मर्यादित यश दक्षिणेकडील राज्यांत भाजपला मिळाले.

जयललिता यांच्या पश्चात अण्णाद्रमुकचे भवितव्य काय, याचीच चर्चा असायची. पण साऱ्या आव्हानांचा सामना करीत नेतृत्वाच्या स्पर्धेतही नसलेल्या अण्णाद्रमुकच्या पलानीस्वामी यांनी सव्वाचार वर्षे राज्याची धुरा व्यवस्थितपणे सांभाळली. लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पार धुव्वा उडाला होता आणि जेमतेम एक जागा जिंकली होती. पण दोन वर्षांत पलानीस्वामी यांनी परिस्थिती बरीच सुधारली. लोकसभा निवडणुकीत पक्षाला फक्त १८.७२ टक्के मते होती, तर विधानसभा निवडणुकीत ३३.२९ टक्के मते आणि ६६ जागा पक्षाने जिंकल्या. सालेम, कोईम्बतूर या पश्चिम पट्ट्यात अण्णाद्रमुकला चांगले यश मिळाले. भाजपशी युती केल्याने मुस्लीम व ख्रिस्ती समाजाची मते गमवावी लागल्याचे अण्णाद्रमुकचे विश्लेषण आहे. अण्णाद्रमुकमध्ये पलानीस्वामी हे आतापर्यंत मुख्यमंत्री, तर पेनीरसेल्वम हे पक्षाचे संघटक- अशी दुहेरी नेतृत्वाची घडी बसविण्यात आली होती. आता भविष्यात दुहेरी नेतृत्व नको, अशी मागणी होऊ लागली आहे. विरोधी पक्षनेतेपदावरून पलानीस्वामी आणि पेनीरसेल्वम यांच्यात संघर्ष झाला. शेवटी आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर पलानीस्वामी यांनी हे पद मिळवले. पलानीस्वामी हेच अण्णाद्रमुकचे नेते असतील, अशी व्यवस्था तयार केली जात असल्याने पेनीरसेल्वम व अन्य नेते कोणती भूमिका घेतात, यावरही पक्षाचे भवितव्य अवलंबून असेल.

तमिळनाडूच्या राजकारणात चित्रपट तारेतारकांचे बरेच प्रस्थ असायचे. एम. जी. रामचंद्रन, जयललिता, करुणानिधी (पटकथाकार), शिवाजी गणेशन, विजयकांत आदींना मतदारांनी डोक्यावर बसविले. यंदाच्या निवडणुकीत विजयकांत यांच्या पक्षाचा पार धुव्वा उडाला. कमल हासन यांनी वातावरणनिर्मिती केली होती. पण खुद्द कमल हासन पराभूत झाले, त्यांच्या पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. ‘सुपरस्टार’ रजनीकांत यांनी प्रकृतीच्या कारणावरून माघार घेतली; पण र्त रिंगणात उतरले असते तरी फार काही फरक पडला नसता, असेच अनेकांचे म्हणणे आहे.

स्टॅलिन यांनी निवडणुकीत काँग्रेस, डावे पक्ष यांच्यासह स्थानिक विविध पक्षांची मोट बांधून यश प्राप्त केले. द्रमुकला १३३ जागा मिळाल्या असल्या, तरी त्यातील आठ जागा या मित्रपक्षांच्या आहेत. काँग्रेसचे १८ आमदार निवडून आले. केंद्रात संधी मिळाली तेव्हा सत्तेत महत्त्वाचा वाटा घेणाऱ्या द्रमुककडून राज्यातील सत्तेत मात्र काँग्रेसला सहभागी करून घेतले जात नाही. २००६ मध्ये करुणानिधी यांनी अल्पमतातील सरकार चालवले, पण काँग्रेस वा मित्रपक्षांना सहभागी करून घेतले नव्हते. स्टॅलिन यांनी त्याचीच री ओढली. ‘तमिळनाडूतील यापुढे सर्व निवडणुका द्रमुकच जिंकेल,’ असा विश्वास स्टॅलिन यांनी मुख्यमंत्रिपदी निवड होताच दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला आहे. मात्र तसे व्हायचे असेल, तर सरकारचा कारभार त्यांना व्यवस्थितपणे चालवावा लागेल. द्रविड चळवळीचे नवे प्रतीक म्हणून स्टॅलिन यांचा उल्लेख करण्यात येत असला, तरी त्यासाठी त्यांना नेतृत्व सिद्ध करावे लागेल.

santosh.pradhan@expressindia.com