समाजातील वंचितांसाठी, दुर्लक्षितांसाठी, शोषितांसाठी मोलाचे कार्य करणाऱ्या दहा सेवाव्रती संस्थांना समाजातील दानशूरांनी सढळ हस्ते दिलेल्या मदतीच्या धनादेशांच्या वाटपाचा हृद्य सोहळा बुधवारी, २९ ऑक्टोबर रोजी पार पडला. प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते या धनादेशांचे वाटप करण्यात आले. या वेळी अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केलेले मनोगत..त्यांच्याच शब्दांत..
काही प्रसंग असे असतात की, ज्या वेळेला आपण किती छोटे आहोत, किती नगण्य आहोत, आपण कसे काहीही करत नाही आहोत आणि खूप काही करायला हवं, असं वाटायला लावणाऱ्या प्रसंगांपैकी हा एक प्रसंग आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो, कारण ‘लोकसत्ता’मुळे, आपल्यामुळे आणि आज इथे तुमचे सर्व ऐकल्यामुळे जे भान येतं, आजूबाजूच्या जगाचं, मला असं वाटतं की, त्या भानापासून बाकी सगळ्याची सुरुवात होते, कारण मुळात कळलं तर पाहिजे, की आजूबाजूला काय चाललं आहे, चुकीचे काय घडते आहे किंवा कशामध्ये काम करण्याची गरज आहे. तुम्हा लोकांच्या कामामुळे तुम्हाला जे भान आलं आहे, त्यामुळे इतर लोकांना भान येतं. हा, मला असं वाटतं की, हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे.
   दोन-तीन मुद्दे माझ्या डोक्यात येत आहेत तेवढे फक्त सांगण्याचा प्रयत्न करतो. भारताबद्दल बोलताना अर्थातच प्रत्येक वेळेला, जे वाईट घडतंय अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला दिसतात, तसं सामाजिक क्षेत्रात अशाच गोष्टी जास्त दिसतात ज्याच्यामध्ये खूप काही करणं आवश्यक आहे, ज्यात प्रचंड समस्याच जास्त दिसतात त्यात काम करण्याची आवश्यकता आहे.. परंतु मला असं वाटतं की, इतकं सगळं दिसत असूनसुद्धा गेली ७० वर्षे हा देश चालू आहे आणि तो फार वाईट चालला आहे, असं माझं मत नाहीये. अर्थात फॅशन आहे असे म्हणायची.. गेल्या काही वर्षांमध्ये; परंतु इथपर्यंत आपण आलो आहोत. भारताच्या आजूबाजूचे देश आपण जर बघितले, तर त्यांच्याकडे जे चाललंय त्यामानाने भारताने चांगली प्रगती केली आहे. हे कशामुळे, असा जेव्हा मनात विचार येतो तेव्हा अनेक कारणे डोळ्यासमोर येतात. त्यापैकी दोन कारणं मला अत्यंत महत्त्वाची वाटतात. त्यातलं एक म्हणजे राजकारणी म्हणजे १०० टक्के वाईट अशी जी आपली समजूत आहे किंवा करून दिलेली आहे, ती मुळात चूक आहे. त्यातील निदान काही जण जर चांगले नसते, तर आपण इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो, हे एकदा मान्य करू.. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की, भारताच्या समस्या असा जर आपण विचार करायला लागलो, तर कोणीही माणूस दबून जाईल, उदासीन होईल आणि घरात बसेल. त्यामुळे भारताचा विचार करताना कोणत्याही बाबतीत फक्त समस्या किंवा सामाजिक कारणे असे नव्हे, तर मॅक्रो विचार करण्यापेक्षा मायक्रो विचार जर केला.. तर या देशाच्या समस्या सोडवणं जास्त सोपं होईल आणि तेच, मला असं वाटतं की, होत आलं आहे गेली अनेक र्वष.. आणि तुम्ही सगळे जण त्याची उदाहरणं आहात. एक छोटासा भाग निवडून, समस्या निवडून त्याच्यावरती सातत्याने काम करत राहणं, त्यात येणाऱ्या अडचणींवरती मात करत राहणं हा मायक्रो विचार भारतासाठी अत्यंत आवश्यक आहे. कुणी फक्त अनाथ मुलांसाठी काम करतं, तर कुणी कर्करुग्णांसाठी काम करतं किंवा कुणी केवळ बालशिक्षण हा विषय निवडून त्यात खोलवर काम करतं. ते गांधींना कळलं होतं आणि म्हणूनच त्यांनी, मला असं वाटतं की, डीसेंट्रलायझेशनचा आणि ग्रामस्वराज्यचा विचार केला होता.
आज जे ‘लोकसत्ता’ने घडवून आणलं तो दुसरा महत्त्वाचा भाग. फक्त मराठी माणसं नव्हे, तर एकूणच भारतामध्ये दातृत्व या दृष्टीने.. ज्याला दान आपण म्हणतो.. ते शक्यतोवर धर्म आणि देव यांच्याशीच निगडित आहे, ट्रॅडिशनली. कदाचित आपली सामाजिक व्यवस्था जातीवरती आधारित असल्यामुळे जो खाली आहे त्याला खालीच राहू द्यावं, त्याच्यामुळे कदाचित ती आली असेल, मला माहिती नाही; परंतु फिलॉसॉफीबद्दल, दातृत्वाबद्दल फार ठोकळेबाज विचार आहेत भारतीय समाजामध्ये आणि या ठोकळेबाज विचारांच्या पलीकडे जर लोकांना न्यायचं असेल, तर मला असं वाटतं की, ‘लोकसत्ता’सारख्या प्लॅटफॉर्मचा उपयोग हा ‘लोकसत्ता’च्या लक्षात येणं आणि तो त्यांनी तसं करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एक तर दान हा शब्दप्रयोग, म्हणजे जे आपण देतो दुसऱ्याला, त्याची देव आणि धर्म सोडून इतर ठिकाणीसुद्धा गरज आहे आणि फक्त जुने कपडे किंवा अन्न देणे याच्यापलीकडेही ही गरज आहे. केवळ भटक्या कुत्र्यांसाठी, मुक्या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेला धनादेशांची पिशवी देत असताना तिचंही वजन कमी नव्हतं हे बघून मला फार आनंद वाटला.. आणि ही जाणीव मला वाटतं अत्यंत महत्त्वाची आहे. ते भान जे मी मघाशी म्हणालो ते अत्यंत महत्त्वाचं आहे. हे भान ‘लोकसत्ता’च्या माध्यमातनं समाजामध्ये आलं पाहिजे आणि त्या भानाचं रूपांतर आज या धनादेशांच्या पिशव्यांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचलं, हा अत्यंत महत्त्वाचा विषय मला वाटतो..
शेवटचा एक मुद्दा फक्त. कार्यकर्ते.. व्हॉलेंटिअर्स, जे अत्यंत कमी मानधनामध्ये आपलं आयुष्य समाजाला देतात अशी माणसं. मला असं वाटतं की, काळ बदलला आहे, लोकांच्या गरजा बदललेल्या आहेत. त्यामुळे सामाजिक संस्था, सामाजिक समस्यांवरती काम करणाऱ्या संस्था यांनीसुद्धा प्रोफेशनल, व्यावसायिक होणं आता खूप गरजेचं झालं आहे. कुठल्या अर्थाने प्रोफेशनल, तर त्यात काम करणारे लोकसुद्धा योग्य पद्धतीने जगू शकतील इतका पैसा त्यांच्याकडे येणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे यापुढे विचार करताना, माझे असे ठाम मत आहे की, फक्त त्या कार्याबद्दल प्रेम किंवा कळकळ याच्यापलीकडे जाऊन, जगायला इतक्या अवघड झालेल्या जगामध्ये व्यवस्थितपणे जगता येईल इतका पैसा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मिळणं हे गरजेचं आहे. अन्यथा ही कामं जुन्या पिढीबरोबर मरून जातील, कारण या क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणारा तरुण हा व्यवस्थित जगला पाहिजे, त्याचं स्वत:चं घर त्याला बनवता आलं पाहिजे, त्याच्या मुलांची शिक्षणं त्याला उत्तम करता आली पाहिजेत, भविष्यासाठी चांगली बचत त्याला करता आली पाहिजे, किंबहुना त्याच्या मोबाइलचं बिलदेखील त्याला भरता आलं पाहिजे आणि त्यामुळे सामाजिक कार्यासाठी आवश्यक असलेल्या पैशाबरोबरच त्या कार्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक वेल-बीइंगसाठी, कल्याणासाठी पैसा उभा करणं हीदेखील समाज म्हणून आपली जबाबदारी आहे. त्या कार्यासाठी उभा केलेलाच तो पैसा आहे. मुळात ‘सामाजिक बांधीलकी’ या शब्दाची मला भीती वाटते म्हणून मी तो शब्द वापरत नाही, कारण असं काही अस्तित्वात नसतं, असं माझं मत आहे. कारण मला वाटणारं समाधान हा फार महत्त्वाचा भाग आहे. तो नाकारण्याचं कारण नाही. हे समाधान शेवटपर्यंत टिकवायचे असेल, तर माझ्या व्यावहारिक गरजा पूर्ण होणं आवश्यक आहे आणि या अर्थाने कार्यकर्ता हा शब्द आपण बदलू या का, असा एक विचार मला आज मांडावासा वाटतो. बदलणाऱ्या राजकीय, आर्थिक आणि त्यामुळे बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीमध्ये व्हॉलेंटिअर्स, कार्यकर्ते मिळतील किंवा मिळावेत अशी अपेक्षा न धरता सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे प्रोफेशनल्स, व्यावसायिक निर्माण करू या का? काही ठिकाणी ही प्रोसेस सुरू झाली आहे; परंतु नवीन पिढी सामाजिक कार्यामध्ये जोडली जावी याकरिता असे प्रोफेशनल्स निर्माण होण्याकरिता ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून आवाहन करू या का संस्थांना, देणगीदारांना आणि तरुणांना.. असा एक विचार नक्की माझ्या मनात आज आला. खूप बरं वाटलं, छानही वाटलं.
सगळ्याच एसएमएसना उत्तरं मी देत नाही; परंतु सतत माहिती असतं आपल्याला कोण एसएमएस करतंय, काय दर्जाची ही माणसं आहेत, काय दर्जाचं हे पब्लिकेशन आहे, काय दर्जाचं काम त्यांनी अनेक र्वष केलं आहे आणि आज ‘दीपस्तंभासारखा’ वगैरे म्हणणं हे फार गुळगुळीत शब्द झाले, पण तरीसुद्धा या सगळ्या पद्धतींच्या पब्लिकेशनमध्ये अशा पद्धतीचं पब्लिकेशन सतत उभं ठेवण्ां हे काम काय नेटानं ही माणसं करतायत. मार्केटिंगवाल्यांकडून किती प्रेशर असेल याची मला जाणीव आहे, कारण रोज फ्रण्ट पेजवर असं काही तरी कुठल्याशा सामाजिक संस्थेबद्दल देत राहणं, तेही जाहिराती कमी करून, याचं प्रचंड प्रेशर असणार त्यांच्यावरती.. आता तर सगळंच वाढलं असेल हे; परंतु अशा स्थितीतसुद्धा ‘लोकसत्ता’ आणि ‘एक्स्प्रेस समूह’ असं वाटतं की, फार महत्त्वाचं काम अनेक ठिकाणी करतात त्यापैकी हे एक अतिशय महत्त्वाचं काम आहे आणि त्याचा एक छोटासा भाग होणं, एक साक्षीदार म्हणू या.. मला होता आलं आणि ती संधी ‘लोकसत्ता’ आणि ‘एक्स्प्रेस समूहा’ने मला दिल्याबद्दल खूप आभार.

सामाजिक संस्था, सामाजिक समस्यांवरती
काम करणाऱ्या संस्था यांनीसुद्धा प्रोफेशनल, व्यावसायिक होणं आता खूप गरजेचं झालं आहे. कुठल्या अर्थाने प्रोफेशनल, तर त्यात काम करणारे लोकसुद्धा योग्य पद्धतीने जगू शकतील इतका पैसा त्यांच्याकडे येणं हे अत्यंत आवश्यक आहे. फक्त त्या कार्याबद्दल प्रेम किंवा कळकळ याच्यापलीकडे जाऊन, जगायला इतक्या अवघड झालेल्या जगामध्ये व्यवस्थितपणे जगता येईल इतका पैसा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मिळणं हे गरजेचं आहे.

एक छोटासा भाग निवडून, समस्या निवडून त्याच्यावरती सातत्याने काम करत राहणं, त्यात येणाऱ्या अडचणींवरती मात करत राहणं हा मायक्रो विचार भारतासाठी अत्यंत आवश्यक आहे. कुणी फक्त अनाथ मुलांसाठी काम करतं, तर कुणी कर्करुग्णांसाठी काम करतं किंवा कुणी केवळ बालशिक्षण हा विषय निवडून त्यात खोलवर काम करतं. ते गांधींना कळलं होतं आणि म्हणूनच त्यांनी मला असं वाटतं की, डीसेंट्रलायझेशनचा आणि ग्रामस्वराज्यचा विचार केला होता.

प्रतिक्रिया..
महाराष्ट्रात चाललेल्या उत्तमोत्तम कामांना मदतीची गरज आहे, हे अनेकदा जाणवत असते. मात्र देणगी देताना नेमकी कोणत्या संस्थेला द्यावी, हे कळत नाही. ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून ‘लोकसत्ता’ने  दहा संस्थांची ओळख करून दिली. या संस्थांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवले. त्यामुळेच या उपक्रमातील नऊ संस्थांना देणगी देण्याचा मार्ग सापडला. ही देणगी देण्यामागे फक्त आणि फक्त सामाजिक बांधीलकी जपावी, एवढाच हेतू होता. या संस्था करीत असलेले कार्य खूप मोठे आहे. त्यांपुढे आम्ही दिलेली देणगी क्षुल्लक आहे.  या संस्थांच्या प्रतिनिधींना भेटल्यानंतर आपण आणखी मदत करायला हवी होती, हेच जाणवत आहे. यापुढेही असाच योग यावा, ही इच्छा आहे.
– डॉ. ललिता वसंत पटवर्धन.

या उपक्रमात ‘लोकसत्ता’ने लोकांसमोर आणलेल्या दहाही संस्था अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचे कार्य करीत आहेत. मी सात संस्थांना मदत केली. मात्र या कार्यक्रमाला आल्यानंतर सर्वच्या सर्व संस्थांना मदत करायला हवी होती, असे वाटते. मी सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झालो. त्यानंतर मिळालेली रक्कम पुढील पिढीला देणे मला योग्य वाटत नाही. त्यापेक्षा चांगल्या संस्थांना मदत मिळायला हवी. त्यासाठी ‘लोकसत्ता’ने आम्हाला मदत केली आहे. या दहाही संस्थांच्या प्रतिनिधींचे अनुभव ऐकणे, हादेखील समृद्ध करणारा अनुभव होता.      
 – शशिकांत जोशी

‘लोकसत्ता’ने चार वर्षांपासून सुरू केलेला ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम कौतुकास्पद आहे. मात्र आता पाचव्या वर्षी मागील चारही वर्षांतील चाळीस संस्थांची माहिती ‘लोकसत्ता’ने त्यांच्या संकेतस्थळावर एकत्रित केली, तर आमच्यासारख्या इच्छुक देणगीदारांना योग्य संस्थांची माहिती एका झटक्यात मिळेल. संस्थाचालकांच्या हाती देणगी सुपूर्द करण्याचा हा कार्यक्रम दृष्ट लागण्याइतका देखणा होता. या संस्थाचालकांचे अनुभव खूपच विलक्षण आहेत. आम्ही पाचच संस्थांना मदत केली होती. मात्र आता या दहाही संस्थांना मदत द्यायला हवी, असे वाटते. 
– सुधीर दिवाडकर.

अनेकांनी आयुष्य वेचून उभ्या केलेल्या या सामाजिक चळवळींमध्ये आमचा खारीचा वाटा आहे. या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांची कामाबाबतची कळकळ, आत्मीयता याचे मोजमाप करता येणार नाही. एकाच ध्येयाने प्रेरित होऊन त्यासाठी आयुष्यभर काम करत राहणे दुर्मीळ आहे. यांचे अनुभव ऐकणे हा अतिशय भावुक अनुभव होता.
– मुग्धा दिवाडकर

संस्था चालवताना येत असलेल्या अनुभवांचे कथन ऐकून मन भरून आले. आपण वर्षभर सतत नकारात्मक वाचतो, ऐकतो, विचार करतो. मात्र अशा वातावरणात नंदादीपाप्रमाणे काम करणाऱ्या या संस्था समाजासाठी दिलासा आहेत. त्यांच्यामुळे हा देश प्रगतीकडे जातो आहे. या उपक्रमात आम्ही सातत्याने चार वर्षे सहभागी होतो आहोत.
– नीलिमा वीरकर

गेली तीन वर्षे आम्ही ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून सामाजिक चळवळींना मदत करून समाजाप्रतिच्या कर्तव्याचा लहानसा वाटा उचलतो आहोत. राज्याच्या कानाकोपऱ्यात सामाजिक कार्य करणारी ही सर्व मंडळी एकाच व्यासपीठावर येऊन अनुभव कथन करताना ऐकणे हा समृद्ध करणारा अनुभव होता.
– जयश्री शिरसाट

‘लोकसत्ता’तर्फे राबवला जाणारा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि अशा उपक्रमामध्ये आपला खारीचा वाटा असावा असे मला मनापासून वाटत होते, त्यामुळे मी या उपक्रमामध्ये सहभागी झाले. आपल्याकडील जमा पुंजीपैकी काही भाग समाजात अशा प्रकारचे विधायक काम करणाऱ्यांना दिल्याने त्यांच्या कार्यात मदत होत असेल तर त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट नाही. मला ‘लोकसत्ता’ला फक्त एक सूचना करावीशी वाटते ती अशी की, या संस्थांचा सविस्तर पोस्टल पत्ता दिल्यास त्यांच्यापर्यंत पोहचणे आम्हास अधिक सोयीचे होऊ शकते. पण एकूणच सांगता सोहळ्याची मांडणी आणि संस्थेतील लोकांनी मांडलेले मुद्दे दखल घेण्यासारखे होते. आपल्या छोटय़ाशा मदतीने त्यांच्या बऱ्याच अडचणी कमी होतील, हे त्यांच्या तोंडून ऐकून छान वाटले.    
– लीला शेटय़े

आपण आयुष्यभर मेहनत करून जे कमवतो त्याच्यातील काही भाग अशा संस्थांना आणि त्यांच्या कामासाठी दिला जातोय, ही  अभिमानाची गोष्ट आहे. ‘लोकसत्ता’मध्ये छापून आले म्हणजे ती काळ्या दगडावरची रेघ आहे, हा विश्वास आम्हाला वाटतो, म्हणून आम्ही या उपक्रमामध्ये सहभागी झालो. अशा संस्था समाजात सतत कार्यरत असणे, समाजाच्या दृष्टीने फार गरजेचे आहे आहे आणि या माध्यमातून आम्हालाही या संस्थांच्या कामामध्ये एक छोटासा भाग होण्याची संधी मिळाली
– नीरज नेरूळकर