जळगावसारख्या ४५-४८ अंश से. तापमानातल्या परिसरात फिरायला येणाऱ्यांची संख्या तशी कमीच. कडाक्याचे ऊन आणि थंडी असलेल्या या जिल्ह्य़ातल्या चाळीसगावमध्ये आम्ही एका अवलिया कलाकाराचे हे प्रतिष्ठान जपले, मात्र ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून केकी मूस प्रतिष्ठान राज्यात सर्वदूर पोहोचले. विज्ञानाने निर्माण केलेल्या वस्तूंमुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होऊ शकते; परंतु एका vv02वस्तूने मात्र सामान्य माणसाचं आयुष्य घडतं, चांगलं वळण घेतं. प्रेमभंगाच्या दु:खातून उद्ध्वस्त न होता छायाचित्रणाच्या माध्यमातून केकी मूस हे पाच दशकांत अनेक कलाकृती घडवत आयुष्य जगले. दररोज रात्री १२.५५ वाजताच्या ट्रेनमधून प्रेयसी येण्याची वाट, न कंटाळता आयुष्यभर पाहताना केकी मूस यांनी अगणित छायाचित्रे टिपली. ही सर्व छायाचित्रे, शिल्प, ओरिगामीचे नमुने, काष्ठशिल्पाकृती, हस्तकलाकृती, व्यक्तिचित्रे, आभासी चित्रे अशा दोन हजारहून अधिक कलाकृती केकी मूस प्रतिष्ठानमध्ये जपल्या आहेत. या प्रतिष्ठानला आता २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून वाचकांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचा उपयोग या कलाकृती जपण्यासाठी होणार आहे. केकी मूस यांनी निर्माण केलेली चित्रसंपदा, साहित्य जतन करण्यासाठी, संवर्धनासाठी या मदतीचा उपयोग होईल. त्या काळी काचेच्या मोठय़ा निगेटिव्ह होत्या. या निगेटिव्ह जतन करणे कौशल्याचे काम आहे. त्यासाठी सर्वकार्येषुच्या माध्यमातून मिळालेला निधी वापरला जाईल. हा निधी प्रतिष्ठानसाठी महत्त्वाचा आहेच; पण या निधीपेक्षाही सर्वांपर्यंत पोहोचणे अधिक महत्त्वाचे वाटते. वाचकांनी, देणगीदारांनी, कलारसिकांनी आमच्या संस्थेमध्ये यावे, कलाकृती पाहाव्यात, प्रतिष्ठानला सूचना द्याव्यात असा आग्रह आहे.
योगेश्वर गंधे, कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान, चाळीसगाव,  दूरध्वनी क्रमांक : ०८६९३८८०००४

 अवर्णनातीत आनंद
ज्या दिवशी ‘लोकसत्ता’मध्ये आमच्या संस्थेबद्दल माहिती छापून आली त्या दिवशी मी मुंबईत होतो. पहाटे साडेपाच वाजताच मी उत्सकुतेने ‘लोकसत्ता’ उघडला. पहिल्याच पानावर आमच्याबद्दलची माहिती वाचून vv03जो आनंद झाला तो केवळ वर्णनातीत आहे. मी माझ्या सहकाऱ्यांना भल्या पहाटेच फोन करून ही आनंदवार्ता कळवली. नांदेडसारख्या मराठवाडय़ातील दुर्लक्षित गावात नरहर कुरुंदकरांसारख्या विचारवंतांच्या नावाने सुरू झालेल्या आमच्या संस्थेच्या कार्याची तुम्हाला दखल घ्यावीशी वाटते, वैचारिकदृष्टय़ा तुम्हाला ते महत्त्वाचे वाटू शकते याचेच कौतुक जास्त वाटले. सामाजिक परिवर्तन रोखले जाऊ शकत नाही, पण वैचारिक परिवर्तन रोखणे सहज शक्य असते. सामाजिक परिवर्तनाला वैचारिक जोड दिली नाही, तर काय होऊ शकते याची कल्पना आपल्या सर्वाना आहेच. आपल्या विचारांची प्रगती झाली नाही, तर सांस्कृतिक हानी होते हे आमचे गुरू नरहर कुरुंदकर यांनी सांगितले होते. त्यांचा हा विचार आम्हाला पटला आणि त्यातून या संस्थेची निर्मिती झाली. देणग्यांच्या स्वरूपात मिळालेल्या रकमेने कुरुंदकरांच्या स्मारकाच्या बांधकामामध्ये हातभार लागणार तर आहेच शिवाय एका सामाजिक परिवर्तनाच्या प्रयत्नालाही देणगीदारांचे हातभार लागणार आहेत. गेली कित्येक वर्ष संस्थेच्या इमारतीच्या बांधकामासाठी निधीची जुळवाजुळव करण्याचे काम आमच्याकडून होत आहे. तसेच संस्थेच्या पायाभूत सोयीसुविधा वाढवण्यासाठीसुद्धा मोठय़ा रकमेची गरज आम्हाला होती. या देणगीच्या स्वरूपातच मिळालेल्या रकमेमुळे या कामांना नक्कीच हातभार लागेल. संस्थेतर्फे वेगवेगळ्या क्षेत्रांध्ये काम करणाऱ्या संशोधकांना त्यांच्या संशोधन प्रकल्पांमध्ये मदत करण्याचे काम करण्यात येते. आतापर्यंत संस्थेतर्फे विविध विषयांत आठ संशोधन वृत्ती प्रदान करण्यात आल्या आहेत.
प्रा. दत्ता भगत, नरहर कुरुंदकर अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज ट्रेनिंग सेंटर, नांदेड दूरध्वनी क्रमांक :  ०२४६२-२६१६३६

गै र स म ज  पु सू न  टा क ण्या स  म द त च
अनाथ बालके आणि निराधार महिला यांच्या कल्याणार्थ ६० वर्षांपासून कार्यरत असलेल्या आधाराश्रममध्ये आज साडेसहा हजारांहून अधिक अनाथ बालके, निराधार मुले-मुली आहेत. लोकांना आमच्या कार्याची जास्त vv04माहिती नव्हती, आजही थोडय़ाफार प्रमाणात तीच परिस्थिती आहे. मात्र, ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमामुळे एक वेगळी ओळख आम्हाला मिळाली. या उपक्रमामुळे एकूणच अशा संस्थांबद्दल लोकांच्या मनात असलेले गैरसमज पुसून टाकण्यास मदतच होईल. अनाथ मुलांच्या संस्थेतील मुलाच्या होणाऱ्या शोषणाच्या बातम्या रोज वृत्तपत्रांमध्ये वाचल्यावर अशा संस्थांमध्ये अशीच कामे होतात असा समज लोकांमध्ये झाला होता. पण ‘लोकसत्ता’मध्ये आमच्या कामाबद्दल माहिती छापून आल्यावर लोकांना आमच्या कामाची सत्यता पटली. या उपक्रमाच्या माध्यमातून जमा झालेला निधी संस्थेतील १२ ते १८ वयोगटातील निराधार मुलींसाठी विधायक कामे करण्याच्या कार्यासाठी वापरला जाईल. आमच्याकडे अगदी नवजात बालकापासून ते १२ वर्षांच्या मुलींना प्रवेश दिला जातो. त्यांना योग्य घर पाहून दत्तकही दिले जाते. आधार योजनेतंर्गत १८ वर्षांपुढील मुलींनाही संस्थेतर्फे मदत करता येणे शक्य झाले आहे. पण १२ ते १८ वर्षांच्या वयोगटातील मुलींना परवान्याअभावी आम्हाला दुसऱ्या संस्थेमध्ये पाठवावी लागतात. ही दरी आम्हाला भरून काढायची आहे.
    तसेच कित्येक घरांमध्ये मुले ऑफिसला गेल्यावर त्यांचे आई-वडील घरी एकटे असतात. त्यांच्या सुरक्षिततेची काळजी त्यांच्या मुलांना सतत लागून राहिलेली असते. या वृद्धांची दिवसभर काळजी घेण्यासाठी एक ‘डे केअर’ इमारत उभारण्याची इच्छा आहे. जेथे दिवसभर या वृद्ध आई-वडिलांची काळजी घेतली जाईल आणि संध्याकाळी त्या आपल्या मुलांसोबत घरी परतू शकतील. तसेच काही काळासाठी परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या मुलांच्या पालकांना आश्रय देण्यासाठी तात्पुरत्या निवासाची सोय करण्याची इच्छा आहे. जेथे त्यांच्या निवासापासून ते औषधपाण्यापर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेतली जाईल.
प्रभाकर केळकर, आधाराश्रम, नाशिक
दूरध्वनी क्रमांक : ०२५३-२५८०३०९ किंवा ९९२२३६६७७३

भुकेल्याला पोळीचे महत्त्व
बाबा आमटे यांच्या आशीर्वादाने आम्ही आतापर्यंत जगलो, वाचलो, तरलो, सावरलो आहोत. वरोरा हे छोटंसं गाव. येथील आमच्या ज्ञानदामध्ये येणारे विद्यार्थी गरीब घरातले असतात. दोन-पाच एकर कोरडवाहू शेती vv06असलेल्या या घरातील मुलांचा सर्व खर्च, सरकारकडून एक रुपयाही न घेता, ज्ञानदाकडून केला जातो. महिन्याभराच्या जेवणासाठीच ३५ लाख रुपये खर्च होतात. इतर खर्च वेगळाच. अनेकदा हा खर्च भागवण्याएवढेही पैसे नसतात, मात्र लोक देवदूतासारखे पाठीशी उभे आहेत. ‘लोकसत्ता’ने अशा देवदूतांपर्यंत आम्हाला पोहोचवले आहे. पोट भरलेल्या माणसाला पुरणपोळीचे महत्त्व कळणार नाही, मात्र भुकेल्याला एका पोळीचे महत्त्व कळते. आम्हाला मिळालेल्या या मदतनिधीचे म्हणूनच खूप कौतुक वाटते. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमातून आम्हाला प्रसिद्धी मिळाली. मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्य़ांतून फोन आले, लोकांनी आम्हाला पत्रे लिहिली, उपक्रमाबाबत जिव्हाळा दाखवला, अनेक माणसे संस्थेशी जोडली गेली. आज आमच्या संस्थेतील विद्यार्थी उच्चपदावर काम करत आहेत. नऊ देशांमध्ये नोकरीसाठी गेले आहेत. दरवर्षी या माजी विद्यार्थ्यांच्या निधीतून संस्थेला काही लाख रुपयांचा निधी गोळा करता येतो. समाजातील देवदूतांकडून आलेल्या निधीतूनच वसतिगृहाच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. आमच्याकडे मुलांची बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय होते. त्यानंतर मात्र अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा इतर उच्च शिक्षणासाठी मुलांना शहरात जावे लागते. या मुलांसाठी शहरात वसतिगृहाची, त्यांच्या अभ्यासाची सोय करणे आम्हाला कठीण जात आहे. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमातून मिळालेला निधी या कामासाठी उपयोगात आणण्याची इच्छा आहे.
मधुकर उपलेंचवार, ज्ञानदा वसतिगृह, वरोरा. दूरध्वनी क्रमांक : ०७१७६-२८२३०९ किंवा ९८२२४६९४५३

 पैशाबरोबरच कार्यकर्त्यांचीही गरज
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात घराडी गावामध्ये वसलेले स्नेहज्योती निवासी अंध विद्यालय ही संस्था अंधांसाठी दीपज्योतीचे काम करते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. घराडीसारख्या लहान गावामध्ये अंध मुलांना वाऱ्यावर सोडून द्यायची प्रथा आहे. आमच्याकडे अशी परिस्थिती आहे की, या मुलांचे vv05पालक एक तर अर्धशिक्षित आहेत किंवा अशिक्षित आहेत. त्यामुळे अशा मुलांना सोडून द्यायचे प्रमाण जास्त आहे. खरे तर ही मुले जन्मत:च हुशार असतात, त्यांना एखादी गोष्ट कळण्यासाठी एक छोटासा इशारापण पुरेसा असतो. त्यांचा हाच कलागुण शोधण्याचे काम संस्थेमध्ये होते. ‘लोकसत्ता’च्या उपक्रमामुळे मिळालेला प्रतिसाद भारावून टाकणारा होता. संस्थेविषयी छापून आल्यावर कित्येक लोकांनी प्रत्यक्ष येऊन आमच्याशी संपर्क साधला. त्यांना प्रसिद्धी नको होती म्हणून धनादेश आमच्या हाती सुपूर्द केले. केवळ या धनादेशांमधून मिळालेली रक्कम अडीच लाखांच्या घरामध्ये जाते. आपल्याला देव दिसत नाही, पण या उपक्रमातून त्या देवाने या माणसांच्या रूपाने आम्हाला मदत केली, असेच वाटते. पण पैशांसोबतच आज आमच्या संस्थेला कार्यकर्त्यांचीही गरज आहे. सध्याच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करून आम्ही अंध मुलांसाठी तयार केलेल्या विशेष अभ्यासक्रमाने या मुलांचे शिक्षण व्हावे यासाठी आम्ही शासनाच्या परवानगीची वाट पाहत आहोत. हा अभ्यासक्रम आमच्या गेल्या कित्येक वर्षांच्या अनुभवावरून तयार केलेला आहे आणि त्यामुळे अंध मुलांना व्यावहारिक जीवनात वावरणे अधिकच सुकर होऊ शकते. प्रसारमाध्यमांनी अशा प्रकारचे उपक्रम अधिकाधिक राबवावेत अशी आमची इच्छा आहे, कारण आमच्या कामाच्या रहाटगाडय़ामध्ये प्रसिद्धीसाठी पुरेसा वेळ आम्हाला मिळत नाही. त्यामुळे या उपक्रमांमुळे आमचे काम लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होते. या उपक्रमातून मिळालेल्या निधीचा वापर संस्थेतील शिक्षकांसाठी केला जाईल. आमच्याकडील शिक्षकांना पुरेशी निवासाची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे या उपक्रमातून मिळालेल्या देणग्यांचा वापर आम्हाला त्यांच्यासाठी निवासघर तयार करण्यासाठी नक्कीच होईल.
आशाताई कामत, स्नेहज्योती निवासी अंध विद्यालय, मंडणगड. दूरध्वनी क्रमांक : ०२३५०-२०२५०१

कर्करोगाविरोधात र्सवकष लढा
कर्करोगाच्या रुग्णांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी गेली ४५ वर्षे संस्था काम करत आहे, मात्र आजपर्यंत कधीही आमची एवढय़ा मोठय़ा प्रमाणात दखल घेतली गेली नव्हती. जेव्हापासून ‘लोकसत्ता’त संस्थेची माहिती आली तेव्हापासून अनेक लोक स्वत:हून संस्था पाहायला आले. त्यांना संस्थेबद्दल अधिक जाणून vv07घ्यायचे होते. काहींनी थेट आर्थिक मदतही केली. कर्करोग ही केवळ एका रुग्णाची लढाई न राहता ती संपूर्ण कुटुंबाचीच व्यथा होते. वैद्यकीय उपचारांसोबत आर्थिक, मानसिक आधारही महत्त्वाचा ठरतो. रुग्णांना कर्करोगाविरोधात लढण्यासाठी सर्व प्रकारची मदत करणे हेच संस्थेचे उद्दिष्ट आहे. रुग्णांच्या गरजांमधूनच संस्थेने गेल्या ४५ वर्षांत नवनवीन योजना हाती घेतल्या. उपचार, औषधे, अन्न, निवासी व्यवस्था, कपडे, छत्री यांपासून समुपदेशन तसेच रोजगारापर्यंत सर्व प्रकारे साहाय्य करण्यात संस्था पुढाकार घेते. रक्ताच्या कर्करोगासाठी लागणाऱ्या औषधांची किंमत पेटंटची वर्षे संपल्यानंतरही कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नोवार्टिस कंपनीविरोधात संस्थेने यशस्वी लढा दिला व एका लाख रुपयांचे औषध आठ हजार रुपयांमध्ये उपलब्ध झाले. भारत-पाकिस्तान सीमेवरील गावांमध्ये संस्थेने सैन्यदलाच्या मदतीने कर्करोगावरील शिबीर घेतले. राज्याच्या ग्रामीण भागातली संस्थेच्या पुढाकाराने हजारो शिबिरे झाली आहेत. समाजातील कर्करोगाचे वाढते प्रमाण तसेच या आजारानंतर होणारी सर्व कुटुंबाची ओढाताण लक्षात घेता या आजारासंबंधी अधिकाधिक जनजागृती करणे व प्रतिबंधात्मक उपाय योजण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमातून प्राप्त झालेल्या आर्थिक मदतीच्या साह्य़ाने कर्करोगाविरोधातली मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल.
नीता मोरे, कॅन्सर पेशंट एड असोसिएशन, मुंबई. दूरध्वनी क्रमांक : ०२२-२२६९८९६४, २२६९३७९०.

कार्यकर्त्यांची निकड
चांगल्या संस्थांची ओळख, त्यांना असलेल्या देणग्यांची गरज ‘लोकसत्ता’तून वाचकांपर्यंत पोहोचल्यावर अनेक दाते उत्सुकतेने आमच्यापर्यंत पोहोचले. समाजातील हे अत्यंत चांगले परिवर्तन आहे. नाही तर vv08आमचा निम्मा वेळ संस्थेसाठी आर्थिक मदत शोधण्यासाठी जात असे. ग्राममंगल ही प्रामुख्याने बालशिक्षणासाठी, विशेषत: सहा वर्षांखालील मुलांसाठी शैक्षणिक साधने, रचनावादी शिक्षण पद्धती उपलब्ध करून देणारी संस्था आहे. प्राथमिक शिक्षणपद्धतीत वेगाने तसेच कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी विविध पद्धती विकसित केल्या आहेत. ग्राममंगलच्या साहाय्याने घरी राहूनही शाळेचा अभ्यास करता येतो. सातारा, महाबळेश्वर, मराठवाडा, राजस्थानपर्यंतही ग्राममंगल पोहोचले आहे. सर्वच सामाजिक संस्थांना कार्यकर्त्यांची गरज असते. आर्थिक तसेच  वस्तूंच्या साधनसामग्रीसोबत माणूस हे साधन सामाजिक चळवळीत महत्त्वाचे ठरते. मात्र सध्या याच साधनांची कमतरता सर्वच संस्थांना जाणवत आहे. संस्थेचे वाढलेले काम कोणाच्या खांद्यावर टाकावे, अशी खंत वाटते आहे. त्यामुळे अधिकाधिक तरुणांनी स्वत:चा वेळ या सामाजिक कार्यासाठी द्यावा, अशी अपेक्षा करतो.
रमेश पानसे, ग्राममंगल, डहाणू , दूरध्वनी क्रमांक : ०२०-२५३३८६६८७/९८८१२३०८६९

गरजू विद्यार्थ्यांना दिशादर्शक मिळाला
समाजाच्या गरजांप्रमाणे आवश्यक शिक्षण आणि गरजा बदलतील तसा अभ्यासक्रम तयार करणे या उद्देशातून १९८३च्या सुमारास पाबळ येथे डॉ. श्रीनाथ शेषगिरी यांच्या कल्पनेतून विज्ञानआश्रमाचा जन्म झाला. येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा व्यवहारिक जीवनामध्ये कसा वापर करावा याचे धडे दिले जातात. गणेशोत्सवादरम्यान आमच्या संस्थेबद्दल ‘लोकसत्ता’मध्ये माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर vv11आमच्याकडे दररोज अक्षरश: शेकडो दूरध्वनी खणखणू लागले. अनेक गरजू विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी आमच्याशी संपर्क साधला. कित्येक जण प्रत्यक्ष संस्थेत येऊन आम्हाला भेटून गेले. ‘लोकसत्ता’मध्ये छापून आले आहे ना, मग ते आमच्यासाठी ब्रह्मवाक्यच आहे, पुन्हा आम्हाला वेगळी प्रसिद्धी नको’, असे सांगणारे कित्येक देणगीदार आमच्याकडे येऊन देणगी देऊन गेले. प्रत्यक्ष भेटून, कार्याची खात्री करून घेऊन मग देणगी देणाऱ्यांची संख्याही या काळात वाढली. विशेष लक्षात घेण्याची बाब म्हणजे वृत्तपत्रामध्ये आलेल्या या बातमीमुळे अशा अनेक गरजू विद्यार्थ्यांना कधी आणि कोणाशी संपर्क साधावा हे लक्षात आले. त्यासाठी ‘लोकसत्ता’चे शतश: आभार! या उपक्रमातून मिळालेल्या रकमेचा उपयोग संस्थेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी केला जाईल. पै न् पै संस्थेच्या कार्यासाठी वापरला जाईल, अनेक प्रलंबित कामे या देणग्यांमुळे आम्हाला पूर्ण करणे शक्य होणार आहे. आमच्या संस्थेचे स्वयंपाकघर हे ३० वर्षे जुने आहे. याचे छत गळके असल्यामुळे दर पावसाळ्याला स्वयंपाकघराची अवस्था दयानीय होते. काही काळापासून आम्ही ते दुरुस्त करण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करत होतो. पण आता या उपक्रमातून मिळालेल्या रकमेचा वापर आम्हाला या दुरुस्तीच्या कामामध्ये नक्कीच होईल.
योगेश कुलकर्णी,  विज्ञान आश्रम, पाबळ (जि. पुणे) दूरध्वनी :  ०२०-२५३६०२०३ किंवा ९९७५०८३१४३

अहिंसक चळवळ..
रस्त्यांवरचे भटके कुत्रे हा खरं तर मुंबईकरांसाठी भीती, हेटाळणी, तिरस्काराचा विषय आहे. रस्त्यांवरील भटकी कुत्री मारून टाकण्यासाठी मुंबई महापालिकेने मालाड येथे इलेक्ट्रिकवर चालणारा कत्तलखाना vv09उभारला होता. त्याच ठिकाणी आज अहिंसा ही संस्था उभी आहे. कुत्र्यांना मारण्यापेक्षा त्यांची नसबंदी करून भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात ठेवण्याचा निर्णय पालिकेने १९९५ मध्ये घेतला होता. त्यामागे अहिंसा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केलेला पाठपुरावा हेही एक कारण आहे. माणसांसारखाच कुत्र्यांनाही ताप येऊ शकतो, ते आजारी पडू शकतात, त्यांनाही दम्याचे विकार होऊ शकतात, कर्करोग होऊ शकतो, मधुमेह होऊ शकतो, त्यांनाही अपंगत्व येऊ शकते याची जाणीव इतरांना नसते. कायमस्वरूपी अपंगत्व आलेले अनेक भटके कुत्रे आज आमच्याकडे निवासाला आहेत. आतापर्यंत संस्थेत एक लाखांहून अधिक प्राणी-पक्ष्यांवर उपचार झाले आहेत. या सर्व मुक्या प्राण्यांचा सांभाळ, केंद्राची देखभाल, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन या सर्वावर दरमहा तीन-साडेतीन लाख रुपये खर्च होतो. हा खर्च उभारण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतात. ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून आमच्या या प्रयत्नांना बळ लाभले आहे. अहिंसेचे हे आम्ही स्वीकारलेले व्रत यापुढेही सुरूच राहील व मिळालेल्या निधीचा विनियोग या कार्यासाठी होईल.
कृपाली शहा, अहिंसा, मालाड
दूरध्वनी क्रमांक : ०२२-२८८०४१९५ किंवा ९८२००८८२१४

पाठीवर कौतुकाची थाप महत्त्वाची
आतापर्यंत आम्ही केलेलं काम हे एकटय़ाचं काम नसून टीमवर्क आहे. या कामामध्ये अनेकांचा सहभाग आहे, त्यामुळे सन्मान सोहळ्यामध्येसुद्धा एकत्र जाण्यास आम्ही प्राधान्य देतो. ‘सर्वकार्येषु सर्वदा’मध्ये आमच्या संस्थेबद्दल माहिती छापून आल्यावर अगदी पुण्यामध्येही अनेक जणांना आमच्या कामाची ओळख झाली. vv10बहुतेकदा अशा सामाजिक संस्था गावांमध्ये असतात. पण आमचे काम शहरी भागात होते. माझी मुलगी गतिमंद होती, तेव्हा तिच्यासाठी आणि माझ्यासाठी सुरू केलेल्या या कामाला आज ३५ वर्षे झाली आहेत. अशा विशेष मुलांसाठी संस्था सुरू करायची ठरवल्यावर जागा मिळणेसुद्धा कठीण झाले होते. जेव्हा जागा मिळाली तेव्हाही शेजारच्यांनी गतिमंद मुले पाहून अनेक तक्रारी सुरू केल्या. पण कालांतराने त्याच लोकांनी आमच्यासाठी मदतीचा हात पुढे केला. संस्थेला आज आर्थिक मदतीचा गरज आहेच, पण त्याच सोबत लोकांचे प्रेम आणि आशीर्वादही तितकेच महत्त्वाचे आहेत. आर्थिक मदतीपेक्षा लोकांनी प्रत्यक्ष आमच्या संस्थेमध्ये येऊन येथील मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण कितीही वय झाले तरी ही मुले मनाने निरागस असतात. कित्येक देणगीदारांनी केवळ प्रसिद्धी नको म्हणून स्वत:हून संस्थेत येऊन धनादेश दिले. त्या सर्वच अनामिकांचे आभार मानावे तितके थोडे आहे. शासनाकडून अनुदान घेतले की अनेक र्निबध येतात त्यामुळे अनुदान न घेण्याकडेच आमचा कल असतो. एकदा मूल २५ वर्षांचे झाले की, त्यांना संस्थेत कायद्यानुसार प्रवेश मिळत नाही. पण या मुलांच्याबाबतीत या कायद्यांचा फारसा उपयोग होत नाही, कारण ही मुले वयाने जरी वाढली तरी बुद्धीने लहानच असतात. अशांसाठी आम्ही वसतिगृह बांधले आहे. वृद्ध गतिमंदांसाठी वृद्धाश्रामाची गरज आहे. या देणगीतून त्याच्या बांधकामास हातभार लागू शकतो. गतिमंद मुलांसाठी संस्थेमध्ये जागा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे.
मीनाताई इनामदार, जीवनज्योत मंडळ, पुणे
दूरध्वनी क्रमांक : ०२०-२५४४६२२५८, २५४६३२५९ किंवा २५६५२१०१

*धनादेश पावतीकरिता संस्थांच्या प्रतिनिधींचे नाव व दूरध्वनी क्रमांक त्या त्या ठिकाणी देण्यात आले आहेत.
*संकलन : रोहन टिल्लू, प्राजक्ता कासले आणि मृणाल भगत * छायाचित्रे : प्रदीप कोचरेकर
*कार्यक्रमाचा इतिवृत्तान्त पाहा  indianexpress-loksatta.go-vip.net  आणि Youtube.com/LoksattaLive