05 July 2020

News Flash

किरण नगरकर.. मराठीतले आणि इंग्रजीतले!

मराठीतले किरण नगरकर ‘सात सक्कं त्रेचाळीस’ लिहितात. नायकाला ‘कुशंक’ असं नाव देतात.

(संग्रहित छायाचित्र)

प्रशान्त बागड

मराठीतले किरण नगरकर ‘सात सक्कं त्रेचाळीस’ लिहितात, सरळ गोष्ट न सांगता जरा वेगळ्या प्रकारचं कथन करतात. मात्र, इंग्रजीतले किरण नगरकर सरळ गोष्टी सांगतात, कथनाचे प्रयोग करत नाहीत.

मराठीतल्या आणि इंग्रजीतल्या नगरकरांमधला जाणवण्याइतका मोठा.. कदाचित मूलभूत.. फरक हा मराठी साहित्यव्यवहार आणि भारतातला इंग्रजीभाषक साहित्यव्यवहार यांच्यातल्या फरकाचं प्रतिबिंब आहे का?

मराठीतले किरण नगरकर ‘सात सक्कं त्रेचाळीस’ लिहितात. नायकाला ‘कुशंक’ असं नाव देतात. सरळ गोष्ट सांगत नाहीत. जरा वेगळ्या प्रकारचं कथन करतात. काही वेळा काव्यात्म भाषेवर भिस्त ठेवतात. या कादंबरीला स्पष्ट विषय नसतो. कुशंकच्या क्रिया-प्रतिक्रिया, त्यांचं वर्णन असं तिचं स्वरूप असतं. सौंदर्यवादी, आनंदवादी वगैरे समजलं जाणारं ‘मौज प्रकाशन’ ही कादंबरी प्रकाशित करतं. इतर मराठी पुस्तकं खपतात तशाच मंद गतीनं ही कादंबरी खपते. भाषेवर प्रेम करणारे, नव्या कथनशैली वाचायला इच्छुक असलेले वाचक ही कादंबरी मिळवून वाचतात. ‘ती महत्त्वाची कादंबरी आहे’ असं आवर्जून म्हणतात. नगरकरांचे समकालीन विलास सारंग या कादंबरीवर प्रतिकूल टीका करतात. ही मुळात फडकेपंथीय कादंबरी असून तिनं नवतेचा बुरखा फक्त पांघरला आहे, असा निर्णय देतात. पुण्याचं ‘प्रतिमा प्रकाशन’ तिची नवी आवृत्ती काढतं. नंतर मुंबईचं ‘शब्द पब्लिकेशन’ एक खास आवृत्ती काढतं. नगरकर इंग्रजीतही लिहितात, प्रसिद्धी मिळवतात, ते वेळोवेळी राजकीय मतं मांडतात, याचं ‘सात सक्कं त्रेचाळीस’ वाचणाऱ्या-आवडणाऱ्या मराठी वाचकांना कौतुक असतं.

इंग्रजीतले किरण नगरकर ‘कुशंक’सारखी पात्रं घडवत नाहीत. ते सरळ गोष्टी सांगतात. कथनाचे प्रयोग करत नाहीत. भाषेवरच, वर्णनावरच अवलंबून राहण्याची जोखीम घेत नाहीत. मीराबाई, कबीर अशा ऐतिहासिक व्यक्तींविषयी लिहितात. एका पात्राला ‘रावण’ असं नाव देतात. ही नावं आणि या व्यक्ती परिचित किंवा अतिपरिचित तर आहेतच; शिवाय त्या ‘भारतीय’ जीवनाचं दर्शन घडवणाऱ्या आहेत, असं अनेक साहित्यिक, अकादमिक, सांस्कृतिक वर्तुळांत मानलं जातं. या इंग्रजी पुस्तकांना स्पष्ट विषय असतात, लगेच कळणारे थेट संदर्भ असतात. ही पुस्तकं ओळखीच्या मानवी भावभावनांना आवाहन करतात. मराठीत १९७४ साली प्रकाशित झालेल्या आणि तेव्हापासून निदान काही वर्तुळांत नावाजल्या गेलेल्या ‘सात सक्कं त्रेचाळीस’ची इंग्रजी व जर्मन भाषांतरं प्रसिद्ध होतात आणि ती प्रयोगशील वगैरे मानली जातात.

मराठीतल्या आणि इंग्रजीतल्या नगरकरांमधला जाणवण्याइतका मोठा.. कदाचित मूलभूत.. फरक हा मराठी साहित्यव्यवहार (मराठी साहित्य नव्हे) आणि भारतातला इंग्रजीभाषक साहित्यव्यवहार (भारतीय इंग्रजी साहित्य नव्हे) यांच्यातल्या फरकाचं प्रतिबिंब आहे. मराठी साहित्यव्यवहार लहान असेल; पण नव्याला, प्रयोगाला, निव्वळ भाषिक वा कथनात्म क्रीडेला त्यात वाव आहे असं म्हणता येईल. नव्याचं, प्रयोगाचं त्यात स्वागत होतं, थोडीफार चिकित्साही होते. न खपणारी, कथानकरहित, निव्वळ वाङ्मयीन वगैरे म्हणता येईल अशी कादंबरी मराठीत प्रकाशित होऊ  शकते. त्यामुळे नवं काही, स्वत:चं काही लिहिण्याचं स्वप्न लेखकाला अशा वातावरणात पडू शकतं. याउलट, भारतीय इंग्रजी साहित्यव्यवहारात आकलनसुलभता, कथानकप्रधानता, ‘भारतीयत्वा’चं दर्शन-प्रदर्शन यांना कमालीचं महत्त्व आहे. इंग्रजीतल्या नगरकरांचं लेखन या वातावरणात, या मानदंडांचा आब राखून आकाराला आलेलं दिसतं.

नेमाडे, सारंग, चित्रे, कोलटकर हे साठोत्तरी लेखकांपैकी मातब्बर लेखक. ‘सात सक्कं त्रेचाळीस’च्या लेखकाची महत्त्वाकांक्षा या लेखकांच्या महत्त्वाकांक्षेच्या प्रकारची आहे असं म्हणता येईल. कोलटकर, सारंग, चित्रे इंग्रजीतही लिहीत. स्वत:ला ‘द्वैभाषक लेखक’ म्हणवून घेत. इंग्रजी भाषा आणि इंग्रजीत लिहिल्यामुळे (आपोआप?) लाभणारी वाङ्मयीन परंपरा मराठीहून वेगळं काही करू देते, म्हणून इंग्रजीतही लिहून पाहू, अशी एक मनीषा त्यांच्यात दिसून येते. मोठा, देशोदेशींचा (निदान इंग्रजीभाषक देशांतला), कदाचित जास्त बहुश्रुत वाचकवर्ग मिळेल, असाही त्यांचा एक आडाखा दिसतो. कुणाही चांगल्या लेखकाच्या ध्यासात अशा विविध प्रेरणा सरमिसळलेल्या असतात. नगरकरांच्या इंग्रजी लेखनामागेही त्या असाव्यात. इंग्रजीत थोडीफार कीर्ती मिळायला लागल्यावर मराठीत एक-दोन मुलाखती देणारे नगरकर मराठी प्रकाशकांच्या आणि वाचकांच्या उदासीनतेबद्दल बोलतात. मराठी पुस्तकाची पहिलीच आवृत्ती वर्षांनुवर्षे खपत नाही, अशी तक्रार करतात. मराठीत लेखकाला उचित मानधन मिळत नाही याबद्दल खंत व्यक्त करतात. इंग्रजी वा जर्मन भाषेतला साहित्यव्यवहार (साहित्य नव्हे) या बाबतींत बरा आहे, असं निरीक्षण नोंदवतात. हे मुद्दे अर्थात रास्त आहेत आणि महत्त्वाचे आहेत. पण मराठी साहित्यात जे जमतं वा जमत नाही आणि भारतीय इंग्रजी साहित्यात जे जमतं वा जमत नाही, याबद्दल नगरकर काही बोलताना दिसत नाहीत. मराठी भाषा, साहित्य व संस्कृती लेखकाला वाङ्मयीन पातळीवर, संहितारचनेच्या पातळीवर काय करू देते वा करू देत नाही; कोणती शाब्दिक, सांकल्पनिक, तात्त्विक, सांस्कृतिक सामग्री मराठी लेखकाला मिळते वा मिळत नाही; इंग्रजी या बाबतींत जास्त चांगली आहे का, असल्यास कशी, नसल्यास कशी; असे प्रश्न, असे विषय नगरकरांच्या बोलण्यात फारसे येत नाहीत.

मराठी साहित्यव्यवहारात ‘प्रयोगशील’ हे कौतुकार्थी वर्णन वा विशेषण न राहता लेखनाचा एक प्रकार असल्यासारखं भासवलं जातं, मानलं जातं. परंतु नावीन्यपूर्ण लिखाणाला ‘प्रयोगशील’ म्हणून मोकळं होणं म्हणजे त्या लिखाणाला मुख्य प्रवाहात प्रवेश नाकारणं, त्याला परकं वा तिऱ्हाईत लेखणं, कोणतीही साहित्यकृती अपूर्वतेचा ध्यास घेतल्याशिवाय साहित्यकृती ठरू शकत नाही याकडे डोळेझाक करणं. मराठी साहित्य- व्यवहाराबद्दलच्या नगरकरांच्या उद्वेगात एक धागा असाही असावा.

मराठी साठोत्तरी मातब्बर लेखक वाङ्मयीन व सांस्कृतिक परंपरेचं पुनर्वाचन करतात. उदाहरणार्थ, बहुजनांची साधीसुधी भाषा वापरणं, दैनंदिन अनुभव गाळून न घेता कवितेत येऊ  देणं, वैताग व्यक्त करणं हे तुकारामांच्या कवितेचे पैलू त्यांना भावतात. या पुनर्वाचनातून ते वाङ्मयीन प्रेरणा मिळवतात. त्या प्रेरणांची आपल्या वाङ्मयीन आधुनिकतावादाला जोड देतात. इंग्रजीतल्या नगरकरांच्या लेखनात कथाकथनाची कारागिरी लोकप्रिय कथांमधून, मिथकांमधून विषयद्रव्य मात्र मिळवताना दिसते.

मराठी साहित्यव्यवहार स्वागतशील आहे आणि नव्याला वाव देणारा आहे, पण तो काही बाबतींत भाबडा आहे. एखाद्या पुस्तकाचा इंग्रजीत वा जर्मनमध्ये अनुवाद झाला, की मराठी साहित्यव्यवहार त्याला ‘इंग्रजी/जर्मन साहित्यानं घेतलेली दखल’ किंवा ‘जागतिक दर्जा’ मिळाल्याची खूण मानतो. हा कदाचित खुल्या दृष्टीचाच एक परिणाम असावा. नव्या प्रकारचं, प्रयोगशील, माहीत नसलेलं शोधू बघणारं साहित्य वाचण्याची आवड असणाऱ्या इंग्रजीभाषक वा जर्मनभाषक वाचकाच्या पसंतीस उतरण्याची किंवा त्या वाचकाचं निदान लक्ष वेधून घेण्याची शक्यता मराठी ‘सात सक्कं त्रेचाळीस’मध्ये नगरकरकृत इंग्रजी पुस्तकांपेक्षा तुलनेने जास्त आहे, हे मराठी साहित्यव्यवहाराला आपल्या भाबडेपणामुळे लवकर उमगत नाही.

किरण नगरकरांनी अलीकडच्या काही इंग्रजी मुलाखतींमध्ये चिकित्सक दृष्टिकोनाची निकड अधोरेखित केली आहे. ज्ञानविज्ञानाच्या समृद्ध देशी-विदेशी परंपरांशी जोडून घेतल्याशिवाय आपलं काही खरं नाही, असं कळकळीनं मांडलं आहे. मराठी साहित्यव्यवहारानं आपल्या खुल्या वाङ्मयीन आस्थेला तीक्ष्ण चिकित्सकतेची जोड दिली पाहिजे.

किरण नगरकर मला एकदा दिल्लीच्या ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’च्या भोजनगृहात अचानक दिसले होते. उंच, बारीक, पांढरेशुभ्र कपडे घातलेले. एकटेच होते. दुसऱ्या दिवशी चर्चासत्रात वाचणार असलेल्या निबंधाच्या विवंचनेत मी होतो. धाकधूक मला मनातल्या मनात खूप फिरवून आणत होती. जणू मला स्वत:चं केंद्र सोडून बघायचं होतं. समोर लेखक किरण नगरकर. ‘‘मी प्रशान्त बागड.’’ ‘‘मी किरण नगरकर.’’ मग ते जेवत असताना आम्ही मराठी, इंग्रजी, नेमाडे, सारंग, विज्ञान, होमर, लहान मुलांचं विश्व, ‘ककल्ड’, मीराबाई, एस्थेटिक्स या गोष्टींबद्दल थोडं थोडं बोललो असू. ‘‘मी फार हळू जेवतो,’’ ते मधेच म्हणाले. या वाक्यातला प्रत्येक शब्दही त्यांनी हळू उच्चारला होता. मग बोलणं जणू फडफडत गेलं. आणि एका क्षणी नगरकर माझ्या मनगटी घडय़ाळात बघत स्तंभित झाले होते. मलाही निबंध, चर्चासत्र, झोप, दिल्ली वगैरे आठवू लागलं होतं. काळातून आमचं बोलणं वजा झाल्यासारखं झालं होतं. वेळ उरली होती. माझ्या केंद्री परतून मी केंद्र हरवण्याचा विचार करू लागलो होतो..

(लेखक कथाकार-कादंबरीकार असून साहित्यविषयक चिकित्सक लेखनही करतात.)

prashantbagad@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2019 1:57 am

Web Title: author and novelist kiran nagarkar memories article abn 97
Next Stories
1 व्यक्तिस्वातंत्र्याचा खंदा शिपाई
2 चाँदनी चौकातून : दिल्लीवाला
3 सर्वकार्येषु सर्वदा २०१९ : मृत जलस्रोतांना संजीवनी
Just Now!
X