स्वयंपाकघरातल्या वस्तू या कशाची तरी प्रतीकं आहेत, कशाची तरी रूपकं आहेत, असं मानण्याची मुभा घेणाऱ्या कलाकृती स्त्रियांनी केल्या. हे केवळ ‘स्वत:च्या भाषेत बोलणं’ नव्हतं. उलट, समाजात रूढ असलेल्या संकेतांना प्रश्न विचारणंही होतं..  

काही वर्षांपूर्वी मार्था रॉस्लर यांचा ‘सीमिऑटिक्स ऑफ द किचन’ या परफॉर्मन्सचा व्हिडीओ पाहण्यात आला. १९७५ सालात केलेला हा परफॉर्मन्स स्त्रीवादी कलाविष्कारात मैलाचा दगड ठरला आहे. रॉस्लर या अमेरिकन मांडणी शिल्प, छायाचित्रण आणि व्हिडीओमध्ये काम करणाऱ्या कलाकार. स्थिर कॅमेऱ्यासमोर हा परफॉर्मन्स चालू राहतो. टेलिव्हिजन वरच्या खाद्यपदार्थाच्या कार्यक्रमासारखी याची रचना दिसते. हा परफॉर्मन्स त्याचं विडंबनही करतो. यात ती इंग्रजी मुळाक्षरांच्या ‘ए, बी, सीपासून झेड’ या क्रमाप्रमाणे स्वयंपाकघरातली विविध अवजारं, भांडी, कपडे प्रेक्षकांना दाखवत राहते. प्रत्येक वस्तू, हत्यार, भांडं यांच्या वापरानुसार हालचाली व खाणाखुणा करते. भाषेप्रमाणेच हीदेखील एक चिन्हव्यवस्था असते. ती व्यवस्था बाईला अडकवून टाकणारी असते. स्वयंपाकघर व्यवस्थापन, त्यातली कामं, जबाबदारी यासाठी बाईला गृहीत धरलं जातं. त्या श्रमाला मूल्य नसतं. त्यातलं अडकलेपण, त्यातून येणारी उद्विग्नता यात दिसते. ही चिन्हव्यवस्थाही अस्वस्थ करणारी ठरते. बाई ही या स्वयंपाकघराच्या चिन्हव्यवस्थेतील एक चिन्ह बनते. या विडंबनात्मक व्हिडीओतून रॉस्लर या चिन्हव्यवस्थेवर टीका करते.

रोजचं जगणं आणि त्यात अंतर्भूत असलेलं पण सहजपणे लक्षात न येणारं असं हे राजकारण. या राजकारणाचे पडसाद या स्वयंपाकघरात, त्यातल्या वस्तूंमध्ये सहजपणे पडताना दिसतात. स्वयंपाकघर हा घरातील अतिशय खासगी असा कोपरा. त्यातल्या लिंगभावाचं प्रतिबिंब रॉस्लरसारख्या व्हिडीओतून आपल्या समोर येतं. पण हे टीव्ही शोच्या मांडणीतून ते सार्वजनिक बनतं. आपल्या खाण्याच्या, स्वयंपाकाच्या सवयी, पद्धती, नात्यातली उतरंड, शोषणाच्या प्रक्रिया यातून घडत जातात आणि याच प्रक्रियेतून आत-बाहेर, खासगी-सार्वजनिक यांतल्या सीमारेषा धूसर बनत जातात. परफॉर्मन्स आर्टचा घाट वापरून याकडे निराळ्या प्रकारे हाताळणारं अलीकडचं सादरीकरण म्हणजे कल्याणी मुळे व विष्णू बर्वे यांचं ‘अनसीन’. रवींद्रनाथ टागोर आणि पंडिता रमाबाई यांच्यात झालेला पत्रव्यवहार इथं त्यांनी संदर्भ म्हणून वापरला होता. त्या काळातही स्त्रियांच्या साचेबंद प्रतिमेकडे रमाबाई चिकित्सक नजरेतून पाहतात. त्यावर टीका करतात. आजच्या काळातही ते दखल घेण्याजोगं ठरतं.

या सादरीकरणातील स्त्री ही चिन्हव्यवस्था मोडून काढायचा प्रयत्न करते. कुठल्याही संवादाशिवाय केवळ शारीरिक हालचाली व देहबोलीतून आणि बादली, चिमटे, चमचे, झारे, सॅनिटरी नॅपकिन्स, पाणी, रेझर, साल काढायची तपासणी यांसारख्या वस्तू वापरून ती प्रेक्षकांशी संवाद साधते. यात ती पुरुषी नजरांना, त्यातून सतत सामोरं जावं लागणाऱ्या हिंसेला, विकृत स्पर्शाना खसखसून धुवत राहते, पुसून टाकण्याचा प्रयत्न करते. स्वत:ला ‘सुंदर’ करण्याचा, तसं दिसण्याचा प्रयत्न करत राहते. साबणाचा फेस करून रेझरने हाता-पायावरचे केस काढते किंवा चाकू-तासणी डूल म्हणून कानात चढवते. फॅशन इंडस्ट्रीतली मॉडेल बनून येताना तिची प्रतिमा बेडय़ा अडकवल्याप्रमाणे दिसते. ती अन्याय आणि लिंगभेद अनुभवत राहते, त्यातली दडपणूक सहन करत राहते. मात्र हे सगळं चालू असताना मागे स्वयंपाकघराच्या कट्टय़ावर गॅस, भांडी मांडलेली दिसतात. कुकरची शिट्टी, मिक्सर-ग्राइंडर वा ड्रिलिंग मशीनचा आवाज, भांडी, चाकू यांतून तयार केलेले नाद पाश्र्वसंगीतासारखे काम करतात. तिच्या कृतींना, हालचालींना पूरक असे ते नाद प्रत्येक ओझरत्या क्षणातून स्त्रीचं जगणं आणि त्यातलं द्वंद्व आपल्यासमोर आणतात.

या चर्चेच्या परिप्रेक्ष्यात हे पाहणंही गरजेचं ठरतं की स्वयंपाकघरात केवळ लिंगभावाचं नव्हे तर सार्वजनिक पटलावरचं राजकारणदेखील सहजतेनं प्रवेश करतं. राजकीय आणि खासकरून लष्करी प्रक्रियेतून उदयाला आलेली अनेक तंत्रं ही नकळत आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनतात. मायक्रोवेव्ह किंवा टेफ्लॉनचं आवरण असलेले तवे हे मध्यमवर्गात सर्रास वापरली जाणारी उपकरणं. त्यांचं तंत्रज्ञान मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या काळातल्या रडार यंत्रणा उभारणीच्या आणि उष्मारोधक पदार्थ तयार करण्याच्या प्रयोगातून विकसित झालं. ठरावीक भूभागातील माणसांना लक्ष्यभेदी पद्धतीनं मारणं यासाठी जे तंत्र वापरलं गेलं तेच तंत्र माणसांच्या जगण्याला आवश्यक असलेलं अन्न शिजवू शकतं, ही जाणीवच मुळात अस्वस्थ करणारी आहे. नेमकी हीच अस्वस्थता प्राजक्ता पोतनीस तिच्या कलाकृतीतून टिपते. त्यात दडलेले संदर्भ आणि आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण, आर्थिक-सामाजिक रचना यातले ताणे-बाणे ती आपल्या कलाकृतीतून बाहेर आणण्याचा प्रयत्न करते. एकीकडे घरातल्या साध्या वस्तूंना ती आपल्या कलाकृतीतून मांडते, पण त्याचबरोबर ती त्यांना राजकीय, ऐतिहासिक घटनांची रूपकं म्हणून आपल्यासमोर उभी करते.

एकीकडे, जांभ्या दगडावर स्वयंपाकघरातील जुन्या, वापरात नसलेल्या साधनांचे ठसे कोरलेले दिसतात. तर दुसरीकडे, भिंतीवरच्या प्रक्षेपित केलेल्या प्रतिमा वॉशिंग मशीन आणि ग्राइंडरची गरगर एकेक फ्रेमने दाखवितात. आवर्तनात चालू असलेल्या जुन्या स्लाइड-प्रोजेक्टरचा क्लिक-क्लिक आवाज दैनंदिन जगण्यातला नित्यक्रम, तोचतोचपणा, त्यातलं अडकलेपण अधोरेखित करतो. तसंच, बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे सार्वत्रिक झालेल्या उपभोगवादी जीवनशैलीकडेही आपलं लक्षं वेधतो. रेफ्रिजरेटरच्या वरच्या कप्प्यात ठेवलेल्या फ्लॉवरच्या मोठय़ा गड्डय़ाची प्रतिमा ही अनेक गोष्टींकडे संकेत करते. भूगर्भात घेतली जाणारी अणुबॉम्ब चाचणी असू शकते किंवा अणुबॉम्बच्या स्फोटानंतर तयार झालेला अवाढव्य ढगही असू शकतो. त्याचबरोबर जेनेटिकली मॉडिफाइड बियाणं आणि अन्नपदार्थ यांसारख्या, जगाला सध्या भेडसावणाऱ्या समस्येचाही प्रामुख्याने विचार करते.

संशोधन आणि चिंतन यातून कलाकृती तयार करताना स्थिर चित्रणावर भर देत प्राजक्ता टेबल फॅन, तवा, पिळलेला कपडा, खोलीतला रिकामा कोपरा, टय़ूबलाइट अशा दैनंदिन जीवनातल्या वस्तूंच्या प्रतिमा रेखाटते. तिची फिकट, वॉटरकलरमधली रेखाचित्रं करडय़ा रंगछटा दर्शवितात. या रेखाटनातून अवकाशात तरंगणाऱ्या या वस्तू-प्रतिमांचे तरल आकृतिबंध आकाराला येतात. अर्थात, हे करताना प्राजक्ता त्या दस्तावेजांत अडकून न पडण्याची काळजीही घेते. या अभ्यासातून पुढे आलेली माहिती ती तिच्या कलाभाषेत अत्यंत संवेदनशीलपणे स्वीकारते, त्यांना सजगपणे एकजीव करत आपल्यासमोर मांडते. ‘कॅप्सूल’ या फोटो-मालिकेत ती अत्यंत साध्या वाटणाऱ्या फ्रीजरचे अंतरंग दाखवते. मुंबईसारख्या किनारपट्टीवरच्या शहरात बालपण घालवताना फ्रीजरमधला बर्फच तेवढा प्रत्यक्षात पाहिलेला. हा लहानसा फ्रीजर तिच्या कॅमेऱ्याच्या लेन्समधून मात्र एखाद्या भव्य लॅण्डस्केपसारखा आपल्यासमोर उभा राहतो. त्यात खोलवर शिरताना अनेक अर्थ हळूहळू उमगत जातात. ही छायाचित्रं असली तरी त्यांची रचना एखाद्या मांडणी-शिल्पाप्रमाणे आहे. त्यात  कुकरच्या शिट्टीपासून मिक्सरच्या पात्यांपर्यंत आणि अंडय़ापासून गॅस पेटवण्याच्या लायटपर्यंतच्या अनेक वस्तू, बर्फाचे डोंगर, त्यात शिरणारा प्रकाश हे सगळं तिने रचलेलं आहे. फ्रीजरमध्ये साठलेलं बर्फ शीतयुद्धाच्या पाश्र्वभूमीचं रूपक ठरतं. त्यातला रचलेल्या बर्फाळ प्रदेशात लायटर एखाद्या रणगाडय़ाच्या नळीप्रमाणे तर मिक्सरची पाती लढाऊ  विमानाच्या अवशेषांप्रमाणे भासतात. त्यामुळेच नेहमीच्या वस्तू ठेवलेल्या असूनही ही लॅण्डस्केप्स अनोळखी आणि अस्वाभाविक दिसतात. या राजकीय संदर्भाबरोबरच रोजचे आणि वैयक्तिक संदर्भही आपल्याला विसरता येत नाहीत. हा फ्रीजर आणि त्यातल्या वस्तू हे सारं आपल्या स्मृतिकोशांकरिता रूपक म्हणून इथं येतं. जणू काही या स्मृती अशा गोठवता येतात; किंवा बाहेर काढल्या तर त्यांच्या ऱ्हासाची प्रक्रिया सुरू होते. भिंतींवरच्या रंगाचे पोपडे, भेगाळलेला रंगाचा थर यांत गाडलेल्या अनेक आठवणी, गतकाळाच्या साठलेल्या संवेदनांपर्यंत आपल्याला पोहोचता येतं. घरगुती वापराच्या वस्तू आणि उपकरणं, त्यांचा आपल्या जगण्यातला वापर, त्यांचं स्थान, बदलती उपभोगवादी जीवनशैली आणि त्याचबरोबर बदलत जाणारी या वस्तूंची रूपं, त्यांचं टाकाऊपण-टिकाऊपण यांतून या कलाकृती घडत गेलेल्या दिसतात.

इथे स्वयंपाकघर ही फक्त जेवणाखाणाची जागा राहत नाही तर जुन्या-नव्या मूल्यांच्या घर्षणातून आकाराला येणाऱ्या वाद-संवादाचं, नातेसंबंधांसाठीचं, ऐतिहासिक जाणीव आणि समकालीनतेचं भान यासाठीचं ते अवकाश बनतं.

नूपुर देसाई noopur.casp@gmail.com

लेखिका कला समीक्षक आणि समकालीन कलेच्या संशोधक आहेत. ई-मेल :