News Flash

आदरांजली : पुस्तकाबाहेरची प्राध्यापकी..

रुईया महाविद्यालयात १९७२ ते १९९९ या काळात अध्यापन केले.

पुष्पा भावे यांनी केवळ साचेबद्ध प्राध्यापकी न करता विद्यार्थ्यांना पुस्तकांबाहेरचे जग पाहायला शिकवले. सामाजिक बांधिलकी मानणारे, प्रश्न विचारणारे, सदसद्विवेकबुद्धी वापरणारे विद्यार्थी आणि कार्यकर्ते त्यांनी घडवले. एलफिन्स्टन महाविद्यालयातून मराठी आणि संस्कृतमध्ये एमए केल्यानंतर पुष्पा भावे यांनी सिडनहॅम महाविद्यालयात अध्यापन सुरू केले. नंतर म. ल. डहाणूकर, महर्षि दयानंद, चिनाई या महाविद्यालयांत अध्यापन केले. त्यानंतर त्यांनी रुईया महाविद्यालयात १९७२ ते १९९९ या काळात अध्यापन केले.

आजच्या आदर्श हरवण्याच्या काळात पुष्पा भावे यांच्यासारखी व्यक्तिमत्त्वे आपल्यातून निघून जाणे ही समाजाची मोठी हानी आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गळा घोटणाऱ्यांविरोधात त्या कायमच उभ्या राहिल्या. वर्गीय, जातीय लढय़ात सक्रिय सहभाग घेऊन व्यासपीठावरून त्यांनी ठाम भूमिका मांडल्या. दुर्गा भागवत यांच्यानंतर स्त्रीचा बुलंद आवाज म्हणजे पुष्पा भावे या होत्या. तो संयतपणे, ठामपणे आणि भेदकपणे व्यक्त होत होता. त्या राजकीय धमक्यांची पर्वा न करता प्रश्न विचारत, लढा देत. आमच्यासाठी त्या आदर्श होत्या.

– नीरजा, कवयित्री

पुष्पा भावे यांच्याशी माझे नाते शिक्षक आणि विद्यार्थिनीचे होते. पुस्तकाच्या पलीकडच्या जीवनाच्या वाटचालीची शिदोरी त्यांनी दिली. वर्गात मराठी वाङ्मय शिकवताना जो सामाजिक पट उलगडून दाखवायच्या त्याचा मोठा प्रभाव माझ्या वाटचालीत झाला. ‘लढे आणि तिढे – चिकित्सक गप्पा पुष्पाबाईंशी’ हे पुस्तक मी लिहावं असं त्यांनी सुचवलं. हे पुस्तक लिहिताना मोठा सामाजिक काळ शब्दबद्ध करता आला.

-मेधा कुलकर्णी, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्यां

जनता दलाच्या कामापासून त्यांचे सामाजिक चळवळीतील योगदान दिसते. अनेक प्रसंगांना त्या धीराने सामोरे गेल्या. विचारांची स्पष्टता आणि कुणाचाही मुलाहिजा न बाळगता आपले मत स्पष्टपणे मांडणे हे गुण त्यांनी शेवटपर्यंत जपले. त्यांनी सृजनशीलता शेवटपर्यंत टिकवली. 

 अरविंद पाटकर,मनोविकास प्रकाशन

पुष्पा भावे यांच्याबरोबर विविध सामाजिक चळवळी, आंदोलनांत सहभागी होता आले. रमेश किणी खून प्रकरण बाहेर काढून शीला किणी यांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. आम्ही पहिले ‘विद्रोही साहित्य संमेलन’ धारावीत घ्यायचे ठरवले तेव्हा काही लोकांनी धमक्या दिल्या. त्या वेळीही त्या आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. मुंबईतील गिरणी कामगार, दलित-आदिवासी अथवा नामांतराचा लढा असो या सर्व लढय़ा-आंदोलनांत सहभागी होत्या. आमच्या चळवळीचा हक्काचा माणूस गेला.    

– सुबोध मोरे, सामाजिक कार्यकर्ते

पुष्पा भावे यांच्याबरोबरच्या ३५ वर्षांच्या आठवणी आहेत. नाटकांमध्ये नाटकातील कलात्मकता आणि सामाजिकता त्या ज्या पद्धतीने एकत्रित आणत ते वैशिष्टय़पूर्ण होते. त्यांचा व्यासंगही अतिशय मोठा होता. त्यांचे जगभरातील साहित्याचे वाचन होते. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधताना अनेक पदर उलगडत जात.   

 – मकरंद साठे, लेखक

पुष्पा भावे यांच्याबरोबर रुईया महाविद्यालयात २६ वर्षे काम करण्याची संधी मिळाली. या काळात त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व जवळून अनुभवता आले. व्यासंगाबरोबर कृतिशील उपक्रम नेतृत्व त्यांनी दिले. संस्कृत, इंग्रजी, मराठी, भाषाशास्त्र या सर्वाचा त्यांचा व्यासंग होता. दुसऱ्या बाजूला सामाजिक, राजकीय जाणिवेतून कार्य केले. मराठीच्या प्राध्यापकालाही त्यांनी एक वेगळी उंची आणि प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्यांना मिळालेले पुरस्कार त्यांच्या कामाची पावती होती. आयुष्याच्या शेवटी आजारपणातही त्यांच्यातील निर्भयपणा आणि खंबीरपणा दिसून आला.

 मीना गोखले, प्राध्यापिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 3:15 am

Web Title: authors pay tribute to pushpa bhave zws 70
Next Stories
1 पुष्पाबाईंना पत्र..
2 जनआंदोलनांच्या समर्थकांतील तारा..
3 आयुष्यं उजळणाऱ्या पुष्पाबाई..
Just Now!
X