डॉ. प्रसाद पंडकर

आयुर्वेद : विज्ञान की भाकडकथा?’ हा रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांचा लेख १२ मे रोजी प्रसिद्ध झाला होता. या लेखात आयुर्वेदासंबंधी काही महत्त्वाचे आक्षेप आणि प्रश्न उपस्थित केले होते. त्यांचा प्रतिवाद करतानाच काही नवे संदर्भ व मुद्दे मांडणारा पत्रलेख..

‘आयुर्वेद : विज्ञान की भाकडकथा?’ हा रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांचा लेख (१२ मे) वाचला. अत्यंत संतुलित असा हा लेख असला तरी त्याने काही आक्षेप/ प्रश्न नक्कीच उपस्थित केले आहेत. आयुर्वेदीयांसाठी हे आक्षेप नवे नसले तरी त्या मुद्दय़ांवर नव्याने काही चिंतन करणे व समाजासमोर ते आणणेदेखील गरजेचे आहेच.

‘परंपरा व परिवर्तनाचे अद्वैत म्हणून आयुर्वेदाकडे पाहता येईल’ असे म्हणत केलेली लेखाची सुरुवात व नंतरच्या उपस्थित केलेल्या शंका वाचताच सर्वप्रथम पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागाचे प्रमुख व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भूषण पटवर्धन यांच्या एका जुन्या संपादकीयाचे (जर्नल ऑफ आयुर्वेद अँड इंटीग्रेटेड मेडिसिन) स्मरण झाले. ‘आयुर्वेद एक : शास्त्र (सायन्स), परंपरा (ट्रॅडिशन) व रूढी (कस्टम्स),’ असे शीर्षक असणाऱ्या त्या संपादकीयात प्रवाही असते तीच खरी परंपरा, तर साचून राहते ती रूढी अशी मांडणी करत आयुर्वेद हा केवळ रूढीमात्र नसून ती एक जिवंत परंपरा कशी आहे व त्यात शास्त्र कसे आहे याची उत्तम प्रकारे मांडणी केलेली आहे.  खरे तर मूळ सिद्धांत तेच राहिले असले तरी निदान, परीक्षण पद्धती, औषधे या गोष्टी कशा बदलत गेल्या हे प्रथम वर्ष बीएएमएसच्या अभ्यासक्रमातील आयुर्वेद इतिहास या विषयातील एक मोठे प्रकरणच आहे. अगदी साधे उदाहरण द्यायचे तर गुलाबाचा गुलकंद किंवा कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावणे या गोष्टी चरकसंहिता वा सुश्रुतसंहितेत नाहीत! कारण या संहिता हजारो वर्षे जुन्या आहेत आणि गुलाब वा कोरफड आपल्या उपखंडात आली ती १३-१४ व्या शतकात! तेव्हा नव्याने उपस्थित झालेल्या वनस्पतीचा जुन्याच आयुर्वेदाच्या शास्त्रीय तत्त्वांवर नवा वापर शोधण्याचे/करण्याचे सामर्थ्य आयुर्वेदाच्या प्रवाही परंपरेत व तत्कालीन वैद्यवृंदात होते व त्यांनी सुरू केलेल्या या दोन्ही गोष्टी आज घराघरांत वापरल्या जात आहेत!

सर्वात महत्त्वाचा आक्षेप आहे तो आयुर्वेदाला अन्य शास्त्रांच्या फुटपट्टय़ा लावण्यास वैद्य वर्गाचा असणारा विरोध वा उदासीनता. आयुर्वेदाला दुसऱ्या कोणत्या शास्त्राच्या फुटपट्टय़ा लावावयास खरे तर तत्त्वत: विरोध असण्याचे कारण नाही; पण त्याच वेळी, कोणती फुटपट्टी कशास लावली जात आहे याचे भान नसल्याने, आकलन  कमी पडल्याने केवळ अशास्त्रीय नव्हे तर अक्षरश: हास्यास्पद ठरलेल्या अनेक मांडण्या व प्रयोग हे इतिहास म्हणून समोर दिसत असल्यानेच, ‘आयुर्वेदास कोणत्याही फुटपट्टय़ा लावण्याची गरज नाही’ असा सूर वैद्य मंडळींकडून ऐकू येतो.

फुटपट्टय़ा लावण्याच्या या प्रक्रियेपूर्वी आपल्याला दोन्ही शास्त्रांच्या तत्त्वज्ञानातील फरक समजावून घ्यावा लागतो. आयुर्वेदाची केवळ परिभाषा  वेगळी आहे असे नव्हे, तर परिभाषाशास्त्र (reductive) भिन्न आहे! वात-पित्त-कफ यांसारखी क्रियाप्रधान  व एकात्म  मांडणी असणाऱ्या आयुर्वेदाचे विभाजनशील (reductive) व आकृतिप्रधान (structure) अशा आधुनिक वैद्यकाशी इंटीग्रेशन करणे हे त्यातल्या ग्रे एरियाजमुळे अत्यंत अवघड काम होऊन बसते. कोणताही आंतरविद्याशाखीय अभ्यास करताना दोन्ही शास्त्रांचे पुरेसे आकलन असून चालत नाही, तर त्या शास्त्रांचे तत्त्वज्ञान  समजावून घेतल्याशिवाय पुरेसा न्याय देता येत नाही. इथे तर एका उपवेद असणाऱ्या व हजारो वर्षांच्या कालखंडावरील विभाजित अशा साहित्य व तत्त्वज्ञान व साक्षात औषधी प्रयोग असणाऱ्या आयुर्वेदाचे आंतरविद्याशाखीय अध्ययन करण्याचे कार्य आहे. बेंगळूरुच्या ट्रान्स डिसिप्लिनरी युनिव्हर्सिटीचे संस्थापक दर्शन शंकर यांच्या एका प्रसिद्ध उद्धरणात त्यांनी म्हटलेय की, ‘पूर्ण (होल) व  विभाग (पार्ट) हे एकमेकांशी संबंधित आहेतच, पण तरीही ‘होल’ म्हणजे केवळ ‘पार्ट’चा समुदाय नक्कीच नाही, त्यामुळेच आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान समोरासमोर ठेवून मांडणी करताना ‘पार्ट’ला ‘होल’ समजण्याची चूक वा ‘होल’ला ‘पार्ट’ पुरते घटवून ठेवण्याची चूक होण्याची शक्यता असते!’

खरे तर ‘इंटीग्रेशन ही काळाची गरज आहे’ असे एक टाळ्याखाऊ  भाषणी विधान आयुर्वेद क्षेत्रातले सारेच वापरतात, पण ‘त्या इंटीग्रेशनचं प्रारूप कसे असावे’ यावरची गंभीर चर्चा खचितच होताना दिसते. दुर्दैवाने आयुर्वेद पदवीधरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करू देणे हे कायद्याच्या अनुषंगाने असणारे इंटीग्रेशन यापलीकडे बहुतेक मंडळींची झेपच जात नाही. शास्त्रीय स्तरावर इंटीग्रेशन करण्याचे प्रयत्न केले गेले, पण त्यात उपरोक्त आकलनमर्यादांमुळे व अन्य बऱ्याच कारणांमुळे ते बऱ्याचदा फलदायी मांडणी करू शकले नाहीत; अर्थातच सन्माननीय अपवाद वगळता! ते काम आयुर्वेद कॉलेजात होण्यापेक्षा त्यासाठी लेखक म्हणतात त्याप्रमाणे विभिन्न विद्यापीठांत आंतरविद्याशाखीय केंद्रे उभारूनच शक्य आहे.

आयुर्वेदीय शास्त्राचे यथार्थ आकलन व आधुनिक शास्त्रासोबतची त्याची दर्जेदार मांडणी करताना ती नक्की काय उद्दिष्ट ठेवून आणि कुणासाठी केली जावी हा यातला कळीचा मुद्दा आहे. आजचा रिसर्च हा आयुर्वेदात शतकानुशतके वापरात असणाऱ्या वनस्पतीची, औषधांच्या कार्मूकत्वाची आधुनिक परिभाषेतील शोध व मांडामांड असा कन्फर्मेटरी स्वरूपाचा रिसर्च आहे. आयुर्वेदीय सिद्धांत वाऱ्यावर सोडून देऊन केवळ त्यातली औषधे उचलणे व त्यांची आधुनिक परिभाषेतली मांडणी करणे आजच्या व्यापारी युगात युगानुरूप असेलही, पण मग तसे केल्याने ते केवळ हर्बल मेडिसिन म्हणून उरते. अशा संशोधनामधून आयुर्वेदाचे उपबृहण किती होते या प्रश्नाचे उत्तर असमाधानकारकच मिळते!

अर्थात तसे असले तरी योग्य प्रकारे केल्यास, आयुर्वेदिक औषधींचा आधुनिक परिभाषेतली कार्मूकत्वाची पुढच्या बऱ्याच अनुसंधानासाठी पाया म्हणून उपयुक्त ठरणार आहेत हेही तितकेच खरे! ‘ज्यात कसलीही भर घालण्याची गरज नाही’ वा ‘ज्या शास्त्रात अनेक वर्षांत नवा विचार वा संशोधन झाले नाही ते शास्त्र जिवंत मानावे का?’ असे काही प्रश्नही त्या लेखात उपस्थित केले गेले होते. खरे तर शास्त्र/विज्ञान या शब्दाने केवळ भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हाच पाया असणारी उपशास्त्रे यांचे ग्रहण करणे ही निश्चितच अव्याप्ती आहे. शास्त्र म्हणजे ‘एखाद्या पदार्थाचे वा प्रक्रियेचे निरीक्षण, वर्णन, वर्गीकरण करत सुनियोजित प्रकारे शेवटी तथ्यांचे आकलन करण्याची प्रक्रिया’ होय. या अर्थाने पाहू गेल्यास आयुर्वेद हे शास्त्रच आहे असे नव्हे तर एक समृद्ध शास्त्र आहे. आयुर्वेदावर होणाऱ्या अशा आक्षेपांचे कारण खरे तर त्याच्या बहुरंगी आकृतिबंधात दडलेले आहे. गुढीपाडव्याच्या व कडुनिंबाच्या ‘रूढीच्या आकृतिबंधात’ आयुर्वेद आपल्या समोर येतो. बाळंतपणादरम्यानच्या आई व बाळाची काळजी घेणाऱ्या घराघरांतल्या परंपरांद्वारे तोच आयुर्वेद ‘परंपरा या आकृतिबंधात’ही समोर येतो व जग कितीही बदलले तरी ३ दोष, ७ धातू आणि त्रिफळा वगैरे तेच जुने औषधी योग वापरणारे व वैद्य व रुग्ण या व्यवहाराच्या आकृतिबंधातही आपल्या समोर येतो, पण आयुर्वेद एक शास्त्र अशा आकृतिबंधात तो समाजासमोर येत नाही.

याला बरीच सामाजिक (व हल्ली राजकीयही) कारणे आहेत; पण आयुर्वेद शास्त्र या आकृतिबंधात समाजासमोर आला पाहिजे. केरळातील अमृता विश्वविद्यालयाच्या आयुर्वेद संशोधन विभागाचे संचालक डॉ. राम मनोहर यांनी आपल्या एका शोधनिबंधाची सुरुवात आयुर्वेदाचे प्रारूप एक बिलिफ सिस्टीमचे आहे की सायन्सचे, असा एक प्रश्न उपस्थित करत केली आहे. त्या सुंदर शोधनिबंधात आयुर्वेद दोन्ही प्रारूपांत कसा बसतो याचे आकलन मांडून मग ते दैनंदिन चिकित्सा/अध्यापन व्यवहारासाठी बिलिफ सिस्टीम आणि पदव्युत्तर शिक्षण, संशोधन व मोठय़ा आजारांची चिकित्सा करणाऱ्या उच्चस्तरीय विज्ञानासाठी सायन्स हे प्रारूप अशी मांडणी ते करतात. हत्ती आणि सात आंधळ्यांच्या गोष्टीप्रमाणेच कुणाला आयुर्वेदात रूढी, परंपरा, शास्त्र, दर्जेदार साहित्य, वादकौशल, औषधांचा खजिना, शाश्वत शास्त्रमांडणी यातले काही दिसते, तर नकारात्मक दृष्टीने पाहणाऱ्यांना तर अजून काही!

तेव्हा विच्छेदक  दृष्टी ठेवत आत्मा, पुण्य, कर्म अशांचा विचार करणाऱ्या या आयुर्वेदाला शास्त्रीय कसे म्हणायचे, असा प्रश्नही विचारता येईल किंवा मग त्याऐवजी, आपल्याकडे ‘आयुर्वेद’ नावाचा ‘मिथके’ ते ‘अध्यात्म’ ते ‘शास्त्र’ ते ‘दैनंदिन जगण्यातील रूढी/परंपरा’ ते ‘तब्बल ५००० वर्षे नुसते पुस्तकात नव्हे तर व्यवहारात वैद्यकशास्त्र’ ते ‘प्रतिबंधात्मक आरोग्यशास्त्र’ असा मोठा स्वत:च एक आंतरशाखीय कॅनव्हास आहे हे समजून घेता येईल व याचा अभिमानही बाळगता येईल! हा अभिमान असणे गरजेचेच आणि तो अभिमान डोळस असणेदेखील तितकेच गरजेचे! आजचे केवलाभिमानवादी उजवे आणि एतद्देशीय परंपरांमधले केवळ वावगेच पडद्यावर आणणारे डावे यांच्या सावळ्या गोंधळात आयुर्वेदाला शास्त्र म्हणून जपणे व पुढे नेणे आपल्या सर्वाचीच जबाबदारी राहणार आहे..