18 October 2018

News Flash

परिपूर्ण वैद्य

ते जसे आयुर्वेदात म्हणजे त्यांच्या विषयात निष्णात होते तसंच त्यांना लेखनकलाही अवगत होती.

आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार हे जीवनध्येय मानून दादांनी केलेलं कार्य मला बघायला आणि अनुभवायलाही मिळालं. दादांनी आयुर्वेदाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम निश्चितपणे केलं. केवळ आयुर्वेदालाच नाही तर पंचकर्म असेल, आयुर्वेद औषधनिर्मिती असेल, वनौषधींची लागवड असेल, आयुर्वेदाचे प्रशिक्षणवर्ग असतील, आयुर्वेदाच्या प्रसारासाठी विविध पुस्तकांचे प्रकाशन असेल, या आणि अशा अनेक विषयांमध्ये दादा सातत्याने कार्य करत राहिले. त्यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९३२ रोजीचा पुण्यातला. त्यांचे वडील यशवंत हेही वैद्य होते आणि छोटय़ा स्वरूपात ते आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करत असत. दादांच्या संपूर्ण जीवनातला मुख्य गुण म्हणजे ते अखंडपणे दुसऱ्याला देत राहिले. हा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला होता. आजोबांची वृत्तीही अखंडपणे देण्याची होती आणि दादांवरही तोच संस्कार झाला.

दादांनी नोकरीसाठी सतराव्या वर्षी हवाई दलात प्रवेश केला आणि तेथील एकोणीस-वीस वर्षांची नोकरी संपवून १९६८ मध्ये ते पुण्यात परतले. पुण्यात परतल्यावर त्यांनी अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयात आयुर्वेद शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि तेथील चार वर्षांचा आयुर्वेदप्रवीण हा अभ्यासक्रम पूर्ण केला. शिक्षण सुरू असतानाच त्यांनी हरी परशुराम काष्ठौषधी आणि आयुर्वेद औषध विक्री केंद्र सुरू केलं. त्यानंतरचं त्यांचं सारं कार्य म्हणजे एकच माणूस किती वेगवेगळ्या क्षेत्रांत केवढी बहुमोल कामगिरी करू शकतो, याचा वास्तुपाठ ठरावा असंच आहे. वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्था (स्थापना १९७४), आयुर्वेद प्रचारक मासिकाचा प्रारंभ (१९७६), बीड जिल्ह्य़ात सर्वासाठी आरोग्य उपक्रमाचा प्रारंभ (१९८२), जनकल्याण रक्तपेढीची स्थापना (१९८३), नेत्रसेवा केंद्राचा प्रारंभ (१९८५), महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार उपक्रम (१९८६), पहिले विश्व वैद्य संमेलन (१९९२), महाराष्ट्र आयुर्वेदीय औषधी उत्पादक संघाची स्थापना (२००१) अशा दादांनी प्रारंभ केलेल्या किती तरी संस्थांचा आणि उपक्रमांचा उल्लेख करता येईल. या शिवाय बीड जिल्ह्य़ात डोमरी येथे त्यांनी सुरू केलेला प्रकल्प, तळेगाव येथे आपटे  महिला विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू केलेलं महिला सक्षमीकरणाचं काम, आयुर्वेद प्रसारासाठी महाराष्ट्रात आयोजित केलेली शेकडो प्रदर्शनं, ठाणे जिल्ह्य़ात मोखाडा तालुक्यात केलेला औषधी वनस्पती व वृक्षलागवडीचा उपक्रम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दीड एकरांमध्ये केलेले औषधी वनस्पती उद्यान, निराधार मुलांसाठी सुरू केलेलं आधार केंद्र.. दादांनी सुरू केलेल्या अशा समाजोपयोगी कामांची यादी खूप मोठी आहे.

अखंड कार्यात राहणं हे त्यांच्या जीवनाचं वैशिष्टय़ होतं. दिवसातले सोळा तास ते अत्यंत उत्साहानं काम करत असत. ते अष्टावधानी होते. मराठीबरोबरच इंग्रजी, हिंदूीवरही त्यांचं चांगलं प्रभुत्व होतं. आयुष्यभर ते अत्यंत साधेपणानेच राहिले. पांढरा सदरा आणि पांढरा पायजमा हाच त्यांचा वेश होता. ते जसे आयुर्वेदात म्हणजे त्यांच्या विषयात निष्णात होते तसंच त्यांना लेखनकलाही अवगत होती. ‘आयर्वेद प्रचारक’ हे मासिक आणि ‘हिंदू तन मन’ हे साप्ताहिक त्यांनी बावीस र्वष चालवलं. ‘हिंदू तन मन’ या साप्ताहिकात त्यांनी अकराशेहून अधिक अग्रलेख लिहिले. अग्रलेख लिहून देण्याचा वार बुधवार असे आणि दादांनी तो कधीही चुकवला नाही. ही दोन्ही प्रकाशनं दादा वैयक्तिक खर्चातून चालवत असत आणि हे अंक हजारो जणांपर्यंत नि:शुल्क पोहोचवत असत. याशिवाय त्यांनी लिहिलेल्या प्रासंगिक लेखांची संख्या तर हजारोंच्या घरात आहे. त्यांनी लिहिलेले ग्रंथ, पुस्तके आणि पुस्तिकांची संख्या दीडशेच्या वर आहे. या सर्व साहित्याचा प्रसार त्यांनी अगदी मन:पूर्वक केला.

घरी आलेल्या कोणालाही दादांनी कधी विन्मुख पाठवलं नाही. मग तो रुग्ण असो किंवा अन्य कामासाठी आलेली कोणी असो. सदैव देत राहा याच वृत्तीनं ते जगले. आपल्याकडे जे काही आहे ते समोरच्याला कसं देता येईल आणि समोरच्या माणसाला आपण कसे उपयोगी ठरू  शकू एवढा एकमेव विचार त्यांच्या मनात असे. कित्येक संस्थांना, कित्येक छोटय़ा-मोठय़ा सामाजिक कामांना त्यांनी उदारपणे आणि अगदी सढळ हस्ते मदत केली आणि या मदतीचं हे विशेष की, ती कुणालाही कळू दिली नाही. या मदतीचा त्यांनी कधीही गाजावाजा केला नाही. लाखो रुपये खर्च करून उभ्या केलेल्या वास्तूही त्यांनी अशाच निरपेक्ष वृत्तीनं सामाजिक संस्थांना दिल्या आहेत. आयुर्वेदाच्या प्रचार, प्रसाराचा ध्यास घेऊन ते अखंडपणे चालत राहिले.

समाजातील उपेक्षित, अनाथ, दुर्बल अशांविषयी दादांना विलक्षण तळमळ होती. त्यातूनच त्यांनी किती तरी र्वष अत्यल्प दरात श्रमाची पिठलं भाकरी ही योजना राबवली. आमच्या औषध कारखान्यात येणाऱ्या कामगारांचे विशेषत: महिलांचे डबे बघून त्यांनी कारखान्यातर्फेच सर्वाना दुपारचं जेवण आणि दोन वेळा चहा देण्याचा निश्चय केला आणि गेली पंचेचाळीस र्वष हे काम एखाद्या व्रतासारखं त्यांनी अखंडपणे सुरू ठेवलं. सर्वासाठी सुग्रास भोजन करायचं, सर्वाना गरम गरम भोजन रोज आग्रहानं वाढायचं, सर्वाची काळजी घ्यायची हा त्यांचा मोठा गुण होता. सर्वाचं जेवण झाल्यावर दादा स्वत: दुपारी तेच जेवण घेत असत. आलेल्या प्रत्येकाला ते जेवणाचा आग्रह करत. त्यांनी जेवल्याशिवाय कोणाला जाऊ दिलं असं कधीच झालं नाही. ते स्पष्टवक्ते होते तसंच मनानं अत्यंत प्रेमळही होते. जून ते मार्च या कालावधीत आठवडय़ातून तीन दिवस नि:शुल्क आयुर्वेद परिचय वर्ग हा उपक्रम त्यांनी सलग चाळीस र्वष चालवला. आयुर्वेद सर्वासाठी हा विचार त्यांनी या वर्गाच्या माध्यमातून कृतिरूप केला. हजारो जणांना या विषयाची ओळख करून दिली. स्वत: निवडलेल्या क्षेत्रात फार मोठं काम त्यांनी स्वकर्तृत्वातून उभं केलं. दादांचं वर्णन करायचं झाल्यास परिपूर्ण वैद्य असं करता येईल. वयाची पर्वा न करता दादांनी कित्येक र्वष शब्दश: अपरिमित कष्ट केले आणि श्रमात कधीही कमीपणा मानला नाही.

दादांचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांचं कार्य शब्दबद्ध करणं हे खरोखर अवघड काम आहे. चार दशकं ते समाजसेवा करत राहिले. ते उत्तम योजक होते. अनेकांशी परिचय करून घ्यायचा आणि प्रत्येकातील काही ना काही गुण घ्यायचा अशा पद्धतीनं ते काम करत राहिले. आयुर्वेद वैद्यांचे तर ते पालकच होते. त्यांनी घालून दिलेल्या वाटेवर अथकपणे चालत राहणं, हाच संदेश त्यांच्या जीवनातून घ्यायचा आहे.

First Published on December 31, 2017 1:46 am

Web Title: ayurvedic doctor parshuram yashwant khadiwale