‘गल्लत गफलत गहजब’ या राजीव साने यांच्या सदरातील ‘चेटकीण ठरवलेली अणुऊर्जा’ या लेखावर अणुऊर्जाविरोधी कार्यकर्ते व तारापूरच्या रहिवाशांवरील ‘हाय पॉवर’ या लघुपटासाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे दिग्दर्शक प्रदीप इंदुलकर यांनी ‘गैरप्रचाराचे अणू’ या पत्र-लेखाद्वारे आक्षेप घेतला होता. त्याचा हा अधिकारी व्यक्तीनेच केलेला प्रतिवाद..
‘गरप्रचाराचे अणू’ हा प्रदीप इंदुलकर यांचा २३ मेच्या लोकसत्तामधील लेख वाचनात आला. समाजात वैज्ञानिक अंधश्रद्धा आणि गरसमज निर्माण न होऊ देण्याचा आणि त्यासाठी लेख लिहिण्याचा त्यांचा हेतू हा निश्चितच गौरवास्पद आहे.  परंतु इंदुलकरांचा लेख वाचल्यानंतर असे लक्षात आले की त्यांचा हेतू स्तुत्य असला तरी त्यांनी लेखात जे काही मुद्दे मांडले आहेत आणि विधाने केली आहेत, त्यामुळे गरसमज होण्याची आणि चुकीची माहिती प्रसृत होण्याची शक्यता वाटली. म्हणूनच ही छोटीशी टिप्पणी.
नसíगक किरणोत्साराचा दाखला देताना त्यांनी (राजीव साने यांच्या मूळ लेखावर, तसेच सूचकपणे एनसीपीआयएलच्या पुस्तिकेवर) आक्षेप घेतला आहे की दिलेल्या वेगवेगळय़ा आकडय़ांचे (कोकणात ३०००, पुण्यात १२००.. वगरे) एकक काय? हा प्रश्न विचारण्याऐवजी त्यांनी त्या एककाची माहिती दिली असती तर त्यांचा हेतू साध्य होण्यासाठी मदतच झाली असती. असो, त्यांनी विचारलेल्या प्रश्नासंदर्भात मी इथे माहिती देतो म्हणजे मूळ हेतू साध्य होईल.
वेगवेगळय़ा ठिकाणी किरणोत्साराची मात्रा किती आहे याचे जे आकडे दिले जातात, त्या आकडय़ांचे एकक असते ग्रे प्रतितास. म्हणजेच ग्रे/तास. आता ग्रे म्हणजे काय? तर ग्रे हे किरणोत्सारामुळे एखाद्या वस्तूच्या किंवा शरीराच्या दर किलोग्राम वस्तुमानात किती ऊर्जा निक्षेपित केली त्याचे परिमाण आहे. ऊर्जा ही ‘जूल’ या एककात मोजतात. म्हणजेच ‘ग्रे’ ची व्याख्या खालीलप्रमाणे करता येईल.
१ ग्रे = १ जूल ऊर्जेचा १ किलोग्राम वस्तुमानात निक्षेप.
त्यामुळेच एखाद्या ठिकाणाची किरणोत्साराची मात्रा दाखविण्याची असेल तर ग्रे / तास अशी सांगावयास हवी. पण जर आपण ‘ग्रे’ च्या मापनात सांगू लागलो तर आपल्याला आकडय़ांच्या आधी दशम चिन्हानंतर खूप सारी शून्ये द्यावी लागतील म्हणूनच हे आकडे सर्वसाधारणपणे नॅनोग्रे / तास या एककात सांगितले जातात.
जेव्हा जेव्हा अणुशास्त्रज्ञ अणुभट्टीतून मिळणाऱ्या किरणोत्साराच्या मात्रेबाबत बोलतात आणि नैसर्गिक किरणोत्साराशी तुलना करतात, तेव्हा दरवेळी असेच सांगितले जाते की नैसर्गिक किरणोत्सार (इंदुलकरांनी इथे लक्षात घ्यायला हवं की ‘बॅकग्राऊंड रेडिएशन’ हे मुख्यत्वेकरून नसíगक कारणांमुळेच आहे, त्यामुळे त्याला नसíगक किरणोत्सार म्हटले तरी ते योग्यच आहे) हा ठिकठिकाणी वेगळा असतो आणि अणुभट्टीमुळे सर्वसामान्य माणसाला मिळणारी मात्रा तुलनेत अत्यंत कमी असते. अणुभट्टीमुळे नसíगक किरणोत्साराची मात्रा शून्य होते असे कोणीही आणि कुठेही म्हटल्याचे अथवा लिहिल्याचे माझ्या ऐकिवात अथवा पाहण्यात नाही. असो.
निसर्गातही ‘आयोनायझिंग’ किरणोत्सार
त्या लेखातील पुढचा मुद्दा म्हणजे आयोनायिझग रेडिएशन म्हणजे आयनीकारक किरणोत्साराचा. इंदुलकर यांनी या प्रक्रियेचे अगदी छान वर्णन केले आहे, परंतु त्याचे पुढचे विधान धादांत चुकीचे आणि पूर्णपणे अशास्त्रीय आहे. इंदुलकर त्यांच्या लेखात म्हणतात की ‘आयोनायिझग किरणोत्सार फक्त अणुभट्टीत निर्माण होत असतो. नसíगक किरणोत्सारात ही क्षमता नसते’. हे त्यांचे विधान पूर्णपणे चुकीचे आहे. खरी परिस्थिती मोठी गमतीदार आहे. खरे तर माणसाच्या आजूबाजूला सर्वत्र, एवढेच काय, तर त्याच्या स्वतच्या शरीरातही किरणोत्सार असतो आणि त्यात आयोनायिझग किरणोत्साराचाही समावेश आहे.
आपण ही संकल्पना थोडी विस्ताराने समजावून घेऊ या. किरणोत्सार किंवा प्रारणे ही मूलत इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, म्हणजेच विद्युत चुंबकीय प्रारणे आहेत. यामध्ये वेगवेगळया प्रारणांचा म्हणजे उष्णता लहरी, रेडिओ लहरी, अवरक्त (इन्फ्रारेड) प्रकाश, दृश्यमान प्रकाश, अतिनील किरणे, (अल्ट्राव्हायोलेट लाइट), क्ष किरणे, गॅमा किरणे इत्यादींचा समावेश होतो.
यापकी उष्णता लहरी, रेडिओ लहरी, अवरक्त किरण, दृश्यमान प्रकाश आणि अतिनील किरणांचा काही भाग यांची कंप्रता कमी असल्याने त्यांच्यात कमी ऊर्जा असते. यांच्यामुळे आयनीभवन होत नाही. परंतु उच्च कंप्रतेची अतिनील किरणे, क्ष किरणे आणि गॅमा किरणे यांची कंप्रताच उच्च असल्यामुळे त्यांच्यात उच्च प्रमाणात ऊर्जा असते व त्यामुळे आयनीभवन होऊ शकते.
हे  झाले प्रारणांच्या प्रकारासंबंधात. आता आपण निसर्गात, नसíगकरीत्या ‘आयोनायिझग रेडिएशन’ कशामुळे आहे त्याची माहिती घेऊ या. संपूर्ण पृथ्वीभर युरेनियम, थोरियम आणि रेडियम यांच्या किरणोत्सारी समस्थानिकांची संयुगे पसरलेली आहेत. घरात, दारात, जमिनीखाली, जमिनीवर, बंद खोलीत आपण कोठेही असलो तरी यांच्यामुळे आपल्यावर सतत किरणोत्साराचा मारा होत असतो. एवढेच नाही तर या किरणोत्सारातून त्यांची जी कन्या उत्पादने (डॉटर प्रॉडक्टस्) तयार होतात तीही किरणोत्सारी असल्याने त्यापासूनही आयोनायिझग रेडिएशन मिळतात. उदा. रेडॉन वायू हा जमिनीतून बाहेर येऊन वातावरणात मिसळतो आणि आपल्याला किरणोत्साराची मात्रा देतो.
जमिनीवर किरणोत्सार आहे म्हणून आपण वातावरणात गेलो तरी किरणोत्सार चुकत नाही. संपूर्ण वातावरणामध्ये वैश्विक किरणांमुळे (कॉस्मिक रेज) किरणोत्सार कायम भरून राहिलेला असतो. कणांच्या स्वरूपातील वैश्विक किरण हे सूर्यापासून आणि विश्वातील इतर स्रोतांपासून पृथ्वीवर सतत मारा करीत असतात. या किरणांच्या वातावरणाशी होणाऱ्या प्रक्रियेमुळे पृथ्वीभर बीटा आणि गॅमा किरणांचा कायम वर्षांव चालू असतो.
म्हणजेच जमीन, हवा, पाणी आणि अन्न इ. सर्वामध्ये हा आयोनायिझग किरणोत्सार नैसर्गिकरीत्या असतो. हेच अन्न व पाणी आपण पोटात घेतो आणि तेथून ही पोटॅशियम, कार्बन यांची किरणोत्सारी समस्थानिके आपल्या शरीरभर पसरतात. त्यामुळे नुसता बाहेरच नाही तर आपल्या शरीरात, वनस्पतींमध्ये, प्राण्यांमध्ये सर्वत्र किरणोत्सार असतो.
विधाने अवैज्ञानिक असल्यास दुरुस्ती
गेली कोटय़वधी वष्रे हा नसíगक किरणोत्सार, आयोनायिझग किरणोत्सारासह अस्तित्वात आहे आणि पुढेही असाच राहणार आहे. माझ्या मते, एवढय़ा विवेचनानंतर नैसर्गिक किरणोत्साराबाबतची वाचकांचीही भ्रांती दूर झाली असेल आणि अणुशास्त्रज्ञ कोणतेही खोटे विधान करीत नव्हते  किंवा कोणतीही गोष्ट लपवीत नव्हते हे स्पष्ट झाले असेल.
यापुढचे इंदुलकरांचे एक सरसकट आणि बेजबाबदार विधान म्हणजे ‘‘एनपीसीआयएल’ने तयार केलेल्या पुस्तिका या बेजबाबदार अवैज्ञानिक विधानांनी भरलेल्या आहेत’. इंदुलकरांनी हे विधान कशाच्या आधारे केले हे तेच जाणोत. एनपीसीआयएल ही एक जबाबदार केंद्र सरकारी आस्थापना आहे आणे त्यांनी तयार केलेल्या पुस्तिकांमध्ये शास्त्रीय माहिती सर्वसामान्यांच्या भाषेत मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यात कोठे एखादी चूक असेल तर इंदुलकरांनी ती जरूर सांगावी आणि एनपीसीआयएल ती तात्काळ दुरुस्त करेल याची ग्वाही मी त्यांना देतो. परंतु अशी सरसकट विधाने करून कुणीही स्वतची विश्वासार्हता कमी करू नये अशी एक नम्र विनंती आहे.
अपघातांतून धडे घेऊन सुधारणा
यापुढचा मुद्दा म्हणजे अणु-अपघातांचा. आजकाल अणुऊर्जेच्या संदर्भात कोणतीही चर्चा असली की त्यात प्रथितयश, आंतरराष्ट्रीय मानमान्यता असलेल्या, संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचलेल्या अणुशास्त्रज्ञांची टवाळकी करण्याची एक फॅशन रूढ झाली आहे. असो. ते बाजूला ठेवून आपण इंदुलकरांच्या विविध विधानांचा परामर्श घेऊ या. अणुभट्टय़ांमध्ये आजतागायत जे अपघात झाले आहेत ते संपूर्ण जगाला, संपूर्ण विस्ताराने ज्ञात आहेत. किंबहुना जगातल्या कोणत्याही सर्वसाधारण भीषण अपघाताची जी काही माहिती जगापुढे येते त्याच्या तुलनेत अणु-अपघातासंबंधात शेकडो पट अधिक माहिती, संपूर्ण विस्ताराने आणि कारणमीमांसेसह, जगापुढे मांडली जाते. त्यापासून कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत, त्या सर्व सुधारणा जगभराच्या अणुभट्टय़ांमध्ये केल्या जातात हे एक सत्य आहे. जगभरातला हवाई अथवा अंतराळ प्रवासवगळता इतर कोणत्याही क्षेत्रात इतकी काटेकोर पद्धत आढळून येत नाही.
इंदुलकरांनी दिलेले डॉ. काकोडकरांचे अणुभट्टी स्फोटाचे विधान कोणत्या संदर्भात आणि कोणत्या संदर्भातून घेतले आहे याची माहिती लेखात उपलब्ध नाही. परंतु आजच्या, ज्याला ‘जनरेशन थ्री प्लस’ अणुभट्टय़ा म्हटले जाते त्याची संरचना, आरेखन  हेच ध्येय डोळय़ापुढे ठेवून केलेले असते. त्यात वापरलेल्या स्वयंचलित सुरक्षा यंत्रणा, त्यामध्ये वापरली गेलेली अतिरिक्तता, विविधता आणि सुरक्षित अपयशाच्या संकल्पना कोणत्याही परिस्थितीत अणुभट्टीत अपघात घडू नये याची पुरेपूर काळजी घेतात. त्याचबरोबर आता या अणुभट्टय़ांमध्ये पॅसिव्ह (निष्क्रिय- कोणत्याही क्रियाशील तत्त्वाची गरज न भासणाऱ्या) सुरक्षा यंत्रणाचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जात आहे. या यंत्रणांच्या कार्यामध्ये, कोणत्याही मानवी कृतीची, कोणत्याही बाह्य़ शक्तीस्रोताची आवश्यकता नसते. योग्य त्या क्षणी, संपूर्णपणे नसíगक (गुरुत्वाकर्षणासारख्या) तत्त्वांवर चालणाऱ्या या यंत्रणा कार्यान्वित होऊन अणुभट्टीला सुरक्षित ठेवतात. फुकुशिमाच्या अपघातानंतर जगभराच्या अणुभट्टय़ांमध्ये सुधारणा करून अशा पॅसिव्ह सुरक्षा यंत्रणांचा अंतर्भाव करण्याचे काम सुरू आहे आणि बऱ्याच ठिकाणी ते पूर्णही झालेले आहे. त्यामुळे डॉ. काकोडकरांचे अणुभट्टीच्या स्फोटातील विधान हे शास्त्रीय तत्त्वांवर आधारलेले आहे यात शंकाच नाही.
या पुढचा मुद्दा म्हणजे अपघात आणि इमर्जन्सी रिस्पॉन्स यंत्रणेचा.  इंदुलकरांच्या मते अपघातात किती माणसे मेली हे अपघाताच्या तीव्रतेचे मापक नव्हे. हे विधान खरोखरीच इंदुलकरांचे धारिष्टय़ दाखवते. जगभरामध्ये कोणत्याही अपघाताची तीव्रता अथवा गंभीरता ही त्यात किती माणसे दगावली यावरूनच ठरते. औद्योगिक अपघातांमध्ये ही अपघाताची तीव्रता किती ‘मनुष्यतास’ (मॅनअवर्स) हानी झाली यावरून ठरवतात. यामध्येही मृत्यूमुळे होणारी हानी सर्वाधिक असल्याने अशा अपघाताची तीव्रता सर्वात जास्त असते. यासाठी हवे तर इंदुलकरांनी आंतरराष्ट्रीय मानक कर 3786 पाहावे. त्यामुळे इंदुलकरांनी काहीही म्हटले तरी अपघाताची तीव्रता अपघातातील मृत्युसंख्येवरून ठरवली जाते हे सत्य अबाधित राहते.
असे हकनाक मृत्यू आणि हानी टाळण्याकरिताच इमर्जन्सी रिस्पॉन्स यंत्रणा कार्यरत केली जाऊन फुकुशिमामध्ये आसपासच्या परिसरातील जनतेचे विस्थापन करण्यात आले. याचाच अर्थ, व्यवस्थापनाने आणि जपानी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करून अनर्थ टाळला आणि इंदुलकर या सर्वाची बोळवण ‘त्यावेळी मरायला तिथे कुणी शिल्लकच नव्हते’ अशी करतात ही एक मोठीच विसंगती आहे.  
लेखक ‘न्यूक्लियर पॉवर कॉपरेरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ (एनसीपीआयएल)चे कार्यकारी संचालक  आहेत.