मानवी हक्क संरक्षणाचे कारण पुढे करत जगात कुठेही नाक खुपसण्यास सदोदित तयार असलेले दोन देश म्हणजे अमेरिका आणि इंग्लंड. जगाच्या उलाढाली करताना स्वतच्या पायाखाली काय जळतंय याची दखल घ्यायला मात्र या दोन्ही देशांना वेळ नसतो. हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे, आणि आताही तसंच होते आहे. या दोन्ही देशांमध्ये अलीकडे वर्णद्वेषाच्या अशा काही घटना घडल्या आहेत की ज्यामुळे तेथील जनमत पेटून उठले आणि त्यानंतर मग संबंधित सरकारांना जाग आली..

सर्वशक्तिमान अमेरिकेच्या सर्वोच्च पदावर आरूढ होताना कृष्णवर्णीय बराक हुसेन ओबामा यांनी ‘येस, वुई कॅन’चा नारा देत अमेरिकन समाजात बदलाचे वारे घुमवण्याचे संकेत दिले होते. अमेरिकेच्या २८० वर्षांच्या इतिहासात प्रथमच कृष्णवर्णीय अध्यक्ष ‘व्हाइट हाऊस’मध्ये स्थानापन्न झाला. ही जागतिक बदलाचीच नांदी होती. ओबामांच्या निवडीमुळे अमेरिकेतीलच नव्हे, तर गोऱ्यांचे साम्राज्य असलेल्या देशांमधील वर्णसंघर्ष, कृष्णवर्णीयावरील अत्याचार कमी होईल, अशी आशा होती. मात्र ही आशा फोल ठरली आहे.
न्यूयॉर्क शहरातील शिक्षण विभागाच्या इमातीसमोर काही दिवसांपूर्वी संतप्त शिक्षक व पालकांनी जोरदार निदर्शने केली. निमित्त होते, ‘पॅन अमेरिकन इंटरनॅशन हायस्कूल’मधील मुख्याध्यापक मिनव्‍‌र्हा झँका यांनी केलेल्या वर्णद्वेषी टिपण्णीचे. शाळेतील कृष्णवर्णीय शिक्षकांना झँका हीन वागणूक देत. त्यांना ‘गोरिला’ असे संबोधून त्यांच्या ‘मोठय़ा ओठांची’ आणि  ‘कुरळय़ा केसांची’ सातत्याने टिंगल उडवत. त्यांच्या या अमानवी वागणुकीला कंटाळून काही शिक्षकांनी राजीनामा दिला. तर दोन शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली. या वादामुळे संघर्ष पेटल्याने शिक्षण विभागाने याची दखल घेतली. मात्र, या उद्दाम मुख्याध्यापकावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
दुसरी व्यथा आहे, डॉ. फ्रान्सिस क्रेस वेल्सिंग या महिला डॉक्टरची. वॉशिंग्टन डीसीमध्ये मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या वेल्सिंग यांच्यावर नुकताच ज्यू धर्मियांच्या एका समूहाने हल्ला केला. डॉ. वेल्सिंग या गेल्या ५० वर्षांपासून ‘गौरसाम्राज्य आणि वर्णद्वेष’ या विषयावर अभ्यास करत आहेत. या विषयावर त्यांनी अनेक नियतकालिकांमध्ये लेख लिहिले आहेत, अनेक ठिकाणी याच विषयांवर व्यख्यानेही दिली आहेत. त्यांनी हे काम बंद करावे, म्हणून त्यांच्यावर हा हल्ला झाला.
जगाला लोकशाहीची देणगी देणाऱ्या इंग्लंडमध्येही परिस्थिती फारशी वेगळी नाही. गौरवर्णीयांच्या त्रासाला कंटाळून लंडनजवळील एका उपनगरातील रेस्टॉरंटची मालकीण असलेल्याा मार्था-रेनी कोलेह या कृष्णवर्णीय महिलेने, ‘मी कृष्णवर्णीय असून, आयुष्यभर कृष्णवर्णीयच राहणार आहे. तुम्ही कृष्णवर्णीयांचा द्वेष करत असाल, तर या रेस्टॉरंटमध्ये येऊ नका’, अशी पाटीच रेस्टॉरंटच्या दारावर लावली. कोलेह यांना नेहमीच वर्णद्वेषाला सामोरे जावे लागत असल्याचे या पाटीवरूनच दिसून येते.
मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी अमेरिका व इंग्लंड हे देश सर्व जगावर लक्ष ठेवत असतात. मात्र त्यांच्याच देशांत वर्णद्वेष पराकोटीचा होता आणि आहे, याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. अमेरिकेत २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केवळ आफ्रिकेतीलच नव्हे, तर आशिया खंडातील नागरिकांनाही या देशात वर्णद्वेषाला सामोरे जावे लागत आहे. तिथे शिकणाऱ्या भारतीय व आशियाई विद्यार्थ्यांवर वारंवार हल्ले होत असून, अनेकांना प्राणही गमवावे लागले. मार्टिन ल्यूथर किंग आणि नेल्सन मंडेला यांना आपला आदर्श मानणाऱ्या ओबामांनी दहशतवाद्यांचा बिमोड करण्यात यथ मिळवले, मात्र मानवी हक्कांची पायमल्ली करणारा वर्णद्वेष रोखण्यात ते अपयशीच ठरले.