11 December 2017

News Flash

ती भेटच अखेरची ठरली..

२४ एप्रिल २०१२. दीनानाथ पुण्यतिथी सोहळा संध्याकाळी षण्मुखानंद थिएटरात होणार होता. बाळासाहेब ठाकरे त्या

सुधीर गाडगीळ | Updated: November 19, 2012 12:00 PM

२४ एप्रिल २०१२. दीनानाथ पुण्यतिथी सोहळा संध्याकाळी षण्मुखानंद थिएटरात होणार होता. बाळासाहेब ठाकरे त्या कार्यक्रमाला येणार होते. मी कार्यक्रमाकरिता मुंबईत आलेलो होतो. अचानक सकाळी बाळासाहेबांकडून फोन आला.  ‘मातोश्री’वर येऊन जा.  साधारण अकरा-सव्वाअकरा वाजता मी तिथे पोहोचलो. माझ्याबरोबर माझा मुलगाही होता. केतन. वरच्या मजल्यावर पोहोचलो.
पाच मिनिटांत ‘थापा’ त्यांना आतल्या खोलीतून घेऊन आला.  हॉलमधल्या त्यांच्या आसनावर ते बसले. समोर पाय ठेवायला टीपॉय आणून दिला गेला. डार्क मेहंदीवजा हिरवट कलरची सिल्कची पायघोळ कफनी त्यांनी घातली होती. ते स्थानापन्न झाले. क्षणभर डोळे मिटून बसले आणि क्षणभराने म्हणाले, ‘‘संध्याकाळी ‘लता’च्या कार्यक्रमाला आहेस ना, मला दीनानाथांवर बोलायचे. बरेच संदर्भ गोळा केलेत. बोलताना मला कदाचित धाप लागेल तर मी बोलायचा थांबलो की माझा पुढचा मुद्दा तू पुढे वाच. मी थांबायची खूण केली की थांब. तुला भाषणाच्या मुद्दय़ाची कॉपी देतो. एकदा  रिहर्सल करू. ऐनवेळी पंचाईत नको.’’
मी कागद हातात घेतले. दीनानाथांचं कर्तृत्व, त्यांच्या पल्लेदार ताना, त्यांची आर्थिक वाईट अवस्था, अडचणीच्या काळात जवळच्या माणसांनी सोडून जाणे, असे अनेक मुद्दे त्यांनी भाषणात घेतले होते. टप्प्याटप्प्यानं एकेक मुद्दा उलगडत गेला. आधी  बाळासाहेब, मग मी, मग पुन्हा बाळासाहेब असे भाषण वाचत गेलो. वाचून संपलं. संध्याकाळी हे लक्षात ठेव म्हणाले आणि मग अवांतर गप्पा सुरू  झाल्या.
मध्येच त्यांनी बाजूच्या छोटय़ा टेबलावरच्या फोनची बटणं दाबली. ‘लता, इथे मी आणि सुधीर संध्याकाळच्या भाषणाचीच तयारी करीत होतो. तिथे किती वाजता येऊ? साडेसात-आठ दरम्यान पोहोचतो.’ फोन ठेवून दिला.
मी म्हटलं, ‘साहेब, आज भगव्याऐवजी एकदम हिरवट रंगाचे कपडे कसे काय?’
‘‘मी रंगीन माणूस आहे. थोडा चेंज. कपडय़ाच्या रंगानुसार विचार बदललेले नाहीत. ते पक्के आहेत. ठाम आहेत बरे.’’  त्यांना दर पाच मिनिटांनी ‘कळलं’ या अर्थी ‘बरे’ म्हणण्याची सवय. पूर्ण मूडमध्ये होते. मिश्कील टिप्पणी चालू होती. मधेच माझ्या मुलाकडे बघून त्याची चौकशी केली. आज ‘शिववडा’ आहे. बघ कसा लागतो. वडय़ाची डिश मागवली. मुलगा केतन म्हणाला, मागे काही वर्षांपूर्वी मी आईबरोबर आलो होतो. निघताना तुम्ही आईला म्हणाला होतात की तूच त्या तबकातलं हळदकुंकू घेऊन लाव.
बरोब्बर. आमच्या ठाकरे घराण्याची रीतच आहे. सौभाग्यवतीला हळदकुंकू लावायची. माँसाहेब म्हणजे आमची मीना सगळे करायची. ती आता नाही म्हणून त्यांना त्यांच्या हातानं कुंकू लावून घ्यायला सांगितले.
मग पुढे जुने गायक, माइक सिस्टीम नसताना त्या गायकांचा आवाज दूरवर पोहोचण्याची क्षमता, लताचं ग्रेटपण, दैवी कृपा अशा विविध विषयांवर आम्ही बोललो. जुन्या गायकांप्रमाणेच, जुन्य वक्त्यांच्या आठवणी निघाल्या. अत्रे, डांगे यांच्या उल्लेखानं संयुक्त महाराष्ट्र चळवळीकडे गप्पा वळल्या. भाषणासाठी जुनी पुस्तकं संदर्भादाखल कशी निवडली, प्रबोधनकारांकडे विषय विषयांवरच्या पुस्तकाचा साठा कसा होता. केवळ बोटाच्या खुणेने समोरच्या पुस्तकांच्या रांगेतले कुठले पुस्तक काय आहे, कोणत्या पानावर आवश्यक असलेला संदर्भ आहे ते प्रबोधनकार सांगत असत. वाचन, नाटक या सगळ्याची आवड प्रबोधनकारांमुळेच लागली, असेही सांगितले.
‘मातोश्री’ वरची ती शेवटचीच भेट ठरेल, असं सात-आठ महिन्यांपूर्वी वाटलेही नव्हते.
संध्याकाळी बरोब्बर आठ वाजता षण्मुखानंदवर आले. संध्याकाळी जास्तच फ्रेश होते. पांढरा शुभ्र पायजमा, त्यावर पांढरा गुरुशर्ट, खांद्यावर भगवी शाल, डोळ्यावर गॉगल-कम-चष्मा. व्हीआयपी रूममध्ये बसले. दीदी त्यांच्या स्वागताला गेल्या. मोठय़ा माणसांच्या गप्पात व्यत्यय नको म्हणून मी बाहेरच थांबलो.
काही क्षणांनी निरोप आला. साहेब बोलावतायत. मला पाहिल्यावर दीदींना म्हटले, भाषण तयार आहे. समारंभ सुरू झाला. माधुरी दीक्षित थोडी उशिरा येणार होती. मग मी, बाळासाहेब आणि दीदी तिघेच रूममध्ये होतो. भाषण वाचून दाखवणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंचावर पोहोचलो. शेजारी बसलेल्या माधुरीशी हसत हसत फिरकी घेत बोलत होते. त्यांचे भाषण सुरू झाले. श्वास लागेल तिथे मला खूण करीत. मी पुढचा भाग वाचे. वाचनाची ही परस्परांची देवाणघेवाण इतकी स्मूथ झाली की त्यांच्या बोलण्यातला माझा व्यत्यय ध्यानीही आला नाही. बाळासाहेबांच्या महत्त्वपूर्ण भाषणात मध्ये मध्ये माझे गद्य सूर सार्वजनिक व्यासपीठावरून मिरवण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्य.
त्यापूर्वी पाच महिने आधी मातोश्रीवरच साहेबांच्या आयुष्यातली राजकारणेतर गोष्टी टिपणारी एक ध्वनिमुद्रिका आम्ही रेकॉर्ड करायचे ठरवले. २२ नोव्हेंबर २०११ हा तो दिवस. ती त्यांची घेतलेली शेवटची दृक्श्राव्य मुलाखत. त्याच्या आधी २००९ च्या निवडणूक काळात राजकीय विशेषावरच्या पाठोपाठ तीन मुलाखती ‘शूट’ करून ठेवल्या होत्या. त्या आवडल्याने उद्धवजींनी कल्पना काढली की साहेब तुमच्याबरोबर खुलतात. तुम्ही बरोबर त्यांना जुन्या आठवणी देता. तर ते जसे बोलतील तसे सारेच आपण रेकॉर्ड करून ठेवू. आणि त्यातून २२ नोव्हेंबरची मैफल चित्रबद्ध करायचे ठरले. चित्रबद्ध केलेली ती शेवटची अनौपचारिक गप्पांची  मैफल. त्या चित्रणाला जेमतेम वर्ष होतेय आणि आज साहेब आपल्यात नाहीत. खरंच वाटत नाही. बेचैनी येते.
त्या दिवशी खरंच त्यांचा मूड लागला होता. भरभरून एक तास चौदा मिनिटे साहेब बोलत होते. न थकता. एकदाही टॉयलेटसाठीही न उठता. काय बोलले त्या दिवशी!
‘‘ मी मूळ पुण्याचा. तूही पुण्याचा. म्हणून आपलं टय़ुनिंग जमतं. मी फार पूर्वी काय काय छंद जोपासलेत त्याबद्दल काही विचार. सांगतो. मी रंगीबेरंगी पक्षी पाळायचो. कुत्रे पाळण्याचा शौक होता. एक घुबडसुद्धा पाळले होते. त्याला अंडी नाहीत. झुरळं मिळेनात. अन्नाअभावी मेले ते घुबड. तेजसमध्ये तो छंद उतरलाय.  (मध्येच रश्मीताई आल्या. त्या, उद्धवजी, नातू असा ग्रुप फोटो शूट केला). अरे या पुणेकराचासुद्धा फोटो काढ. मला दे. याचंच कार्टून काढतो. लोकांचे अफाट प्रेम लाभले. ते का, उत्तर नाही.  ठाकरे घराण्यातल्या महापुरुषांचे आशीर्वाद. माणसे एवढे प्रेम का करतात, ते त्या कुलदेवतेलाच माहीत.
माझ्यावर दादांचा (प्रबोधनकार) खूप प्रभाव आहे. ते सांगत की मनात येईल ते वाट्टेल ते बोल. पण गप्पा मारल्यासारखे बोल. अवघड शब्द नकोत. मला कोण वक्ते आवडत ते सांग.. श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे, जॉर्ज (फर्नाडिस), जॉर्ज तर दोस्तच.
शरद पवारही खूप पूर्वीपासून दोस्त. शरद आणि तो कोण गुजराथी नेता.. अरुण मेहता. दोघे शिवाजी पार्कच्या कट्टय़ावर येत. तो आणि प्रतिभा दहा-पंधरा दिवसांचे बाळ असलेल्या सुप्रियाला घेऊन माझ्याकडे आले होते. दोघे मासे-मटण मस्तपैकी खाऊन पुण्याला गेले.’’
‘साहेब, तुम्हाला मिश्कील बोलणे सुचते कसे? व्यंगचित्रकलेची देन?’ मी मध्येच विचारले. तसे म्हणाले, ‘माझे सतत निरीक्षण असते. खूप फिरलोय. सारा महाराष्ट्र फिरलोय. त्यातून समाज कळतो. एखाद्याची बोलण्याची ढब लक्षात राहते. मग त्यातून बोलता बोलता त्या व्यक्तीचा विषय निघाला की त्याची नक्कलही केली जाते. कुणाच्या संदर्भात चीड आली तर शिवीदेखील आपोआप तोंडी येते. दादांची नाटक कंपनी होती. माइकशिवाय बोलणे ऐकले गेले पाहिजे, हे तिकडचे संस्कार.’
‘पु.लं. छान बोलायचा. माझ्या गाडीत सतत त्याची व्यक्तिचित्रं ऐकत राहतो. कोण तो नारायण वगैरे. ‘म्हैस’ ऐकताना मजा येते.’ वेगवेगळे विषय बोलण्याच्या ओघात निघत गेले.
दादा तुरुंगात असताना आईकडे पैसे नाहीत म्हणून शाळा सुटली. आईच्या औषधालाही पैसे नव्हते. याची खंत मला कायम वाटत आलीय.
दादा सिनेमाच्या क्षेत्रातही होते. दुर्गा खोटे, वनमाला भेटत असत.
चित्रकला हा आवडीचा प्रांत होता. एस.एम.पंडित आणि दीनानाथ दलाल यांचं मिश्रण म्हणजे मुळगावकर. मी एस.एम. पंडितांबरोबर पहिली नोकरी केली. फक्त सत्तर रुपये पगार होता. तो पुढे २५० झाला. पण पुरे पडत नसे. चैन म्हणजे इराण्याकडे जाऊन चहा पिणे..  कॅपिटॉलसमोर (व्ही.टी.परिसर)! मी, दि.वि. गोखले, गोविंदराव तळवलकर तिथे गप्पा मारायचो. मजा यायची. दादांनी एकदा घरी बुलबुलतरंग आणला आणि श्रीकांत ठाकरे संगीतकार होणार असे ते म्हणत.
एक सांगतो. बोलताना भीती कधीच कुणाची वाटली नाही.
या अनौपचारिक मैफलीतल्या दुर्मिळ आठवणी जागवताना साहेब एकच सांगतो, सामान्यांच्या मनातले नेमके आणि तेही त्यांच्या बोलीत तुम्ही गप्पा मारल्यासारखे बोलायचात आणि शेवटी म्हणालात तसे कुणाचाही मुलाहिजा न ठेवता मनात असेल ते निर्भीडपणे बोलत आलात. म्हणून तर तुम्ही आमच्या साऱ्यांच्या मनात रुजलेले आहात.
तुम्ही आमच्या मनातून पुसले जाणे शक्यच नाही.

भावनांच्या हिंदूळ्यात अनावर झालेल्या सभेला आवरताना अनेक घोषणा आणि आवाहनं जे साध्य करू शकत नाहीत ते एक छोटी, मिश्कील कृती करून दाखवते. शिवसेना- भाजप युतीच्या शिवाजी पार्कवरील एका जाहीर सभेत बाळासाहेब भाषणासाठी उठून उभे राहताच शिवसैनिकांनी घोषणांचा जो गजर सुरू केला तो थांबेचना! अखेर बाळासाहेबांनी ‘यष्टीची वाट पाहात बसलेल्या’ खेडुताची ही पोझ घेऊन व्यासपीठावरच बसकण मारली. ‘चालू द्या तुमचं घोषणा देणं. आणि फटाके वाजवणं. तंवर मी बसतो इथं’ या त्यांच्या आवेशाने सभा क्षणात स्तब्ध झालीच, पण व्यासपीठावरील मान्यवरांनाही हसू आवरता आले नाही.

शिवसेना हे एक मोठे मध्यमवर्गीय कुटुंबच होते. एका दौऱ्यात मुक्कामाच्या ठिकाणी सुधीरभाऊ जोशींनी आंघोळीसाठी बाथरूम, गरम पाणी असले चोचले न पुरवता थेट बागेला पाणी द्यायच्या नळाखालीच बसकण मारली. बाळासाहेबांनी मग तिथेच त्यांच्याशी गप्पांना सुरुवात केली. बाळासाहेबांनी केलेली काहीतरी शाब्दिक कोटी सुधीरभाऊंना मनसोक्त हसवून गेली.

एक वाणीने मराठीजनांना मंत्रमुग्ध करणारा, दुसरा शब्दांनी प्रभुत्व गाजविणारा! आपापल्या क्षेत्रातील दोघांचेही कर्तृत्व थोरच! एका कार्यक्रमात बाळासाहेब -मीनाताई आणि पु. लं.- सुनीताबाई..युतीचे सरकार असताना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सुरू करण्यात आला. पहिला पुरस्कार महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांना देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना पुलंनी सरकारवरच टीका केली. त्यामुळे बाळासाहेब चिडले व त्यांनी पुलंवर टीका केली. पण पुलंसह बाळासाहेबांचे जुने संबंध होते. त्यामुळे एकेदिवशी बाळासाहेबांनी थेट पुण्यात जाऊन पुलंची भेट घेतली आणि प्रेम कायम असल्याची प्रचीती दिली.

First Published on November 19, 2012 12:00 pm

Web Title: balasaheb thackeray last meeting with me