‘केवळ शाळा नव्हे तर जीवनविषयक दृष्टिकोन देणारे गुरुकुल’ हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून १९९० या वर्षी अविनाश आचार्य, भरतदादा अमळकर यांनी जळगावमध्ये सावखेडा गावात शाळा सुरू केली. शाळा सुरू झाली तेव्हा विद्यार्थी संख्या होती अवघी सात. आज ‘विवेकानंद प्रतिष्ठान’अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या ‘श्रीमती बनुताई गोपाळराव शानभाग विद्यालया’त १५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

समाजातील वेगवेगळ्या प्रश्नांचे, समस्यांचा विचार करून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच जीवन संस्कार देण्याच्या उद्देशाने शाळेला सुरुवात झाली. भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक बा. ग. शानबाग यांच्या पत्नी तेव्हा शिक्षण विस्तार अधिकारी होत्या. या दाम्पत्याने १० एकर जागा शाळेला दिली आणि जळगाव शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर गिरणा नदीच्या काठावर निसर्गरम्य वातावरणात सावखेडा गावात ही शाळा आकार घेऊ लागली. आज शाळेत पहिली ते बारावीपर्यंतच्या वर्गात सुमारे १५०० विद्यार्थी शिकत आहेत. शाळेचे वेगळेपण वर्गाच्या नावांनीच सुरू होते. वर्गाना नेहमीप्रमाणे ‘अ, ब, क, ड’ अशी नावे न देता संत महापुरुष, रामायण, महाभारतातील पात्रांची नावे देण्यात आली आहे.

Lynn Red Bank
व्यक्तिवेध: लिन रेड बँक
scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

स्मार्ट क्लास आणि प्रात्यक्षिके

‘डिजिटल लर्निग उपक्रमा’त स्मार्ट क्लास रूम तयार केले आहेत. फळा, खडूऐवजी डिजिटल बोर्ड, प्रोजेक्टर, संगणक अशा अत्याधुनिक साधनाचा वापर केला जातो. पॉवरपॉइंट सादरीकरण, विज्ञानविषयक प्रयोगांचे व्हिडीओ दाखवून दृक्श्राव्य माध्यमातून विषय विद्यार्थ्यांच्या मनावर ठसविला जातो. सर्व वर्गखोल्या संगणक प्रणालीने जोडण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना कृतीआधारे शिकता यावे यासाठी दीड ते दोन लाखांपेक्षा जास्त प्रात्यक्षिके शिक्षकांनी तयार केले आहेत. ते अद्ययावत करण्याचे काम सतत शिक्षक करत असतात.

महानाटय़ांची निर्मिती

‘रंगतरंग’ या उपक्रमात सहाशे ते आठशे मुलांचा सहभाग असलेले महानाटय़ तयार केले जाते. आतापर्यंत ‘गीतरामायण’, ‘दुर्गा झाली गौरी’, ‘अठराशे सत्तावन्न’चा उठाव, बारा बलुतेदार, काव्यकुसुमांजली या विषयावर महानाटय़े तयार करण्यात आली आहेत. या उपक्रमात विद्यार्थ्यांचा १०० टक्के सहभाग असतो. आयोजनापासून अभिनयापासूनची सर्व जबाबदारी विद्यार्थीच पार पाडतात. शाळेतून डॉक्टर-इंजिनीअर्सबरोबरच कलावंतही घडावेत, हा या उपक्रमामागील हेतू आहे.

वृक्षराजींनी नटलेला परिसर

शाळेचा परिसर इतका निसर्गरम्य आहे की पक्षी निरीक्षणाकरिता विद्यार्थ्यांना दूरवरच्या जंगलाचा रस्ता धरावा लागत नाही. शाळेच्या चारही बाजूंनी मोठय़ा संख्येने वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. शाळा परिसरातील वृक्षलागवडीपासून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी विद्यार्थ्यांवरच असते. उन्हाळ्यात उन्हाची कितीही तीव्रता असली तरी शाळेच्या परिसरात त्यापेक्षा २ अंश सेल्सियस तापमान कमी असते, इतका शाळेचा परिसर वृक्षराजींनी आल्हाददायक झाला आहे. या शाळेला ‘ग्रीन स्कूल’ हा पुरस्कार मिळाला आहे. चार िभतींच्या बाहेरच्या जगाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने परिसरात औषधी वनस्पती उद्यान (हर्बल गार्डन) ‘हरित सेना’ योजनेतून विकसित करण्यात आले आहे. त्यात हिरडा, बेहडा, दारूहळद, मुसळी अशा औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. या बागेचे संगोपनही विद्यार्थीच करीत असतात.

फिरती प्रयोग शाळा

या उपक्रमांतर्गत अनेक मॉडेल्स व विज्ञान पेटय़ा तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक वर्गात त्यांचे प्रात्यक्षिक दाखविले जाते. शाळेत व्हर्चुअल क्लासरूमदेखील आहे. शाळेतील शिक्षकासाठी दर महिन्याला प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. त्यात शिक्षकांनाही प्रकल्प तयार करण्यास सांगितले जाते. शाळेच्या प्रत्येक विभागाचे संगणकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे ‘पेपरलेस’ कार्यालयच नव्हे तर वर्गही अनोखी संकल्पना शाळेत राबविली जाते. शाळेच्या आवारात चोवीस तास इंटरनेट सुविधा आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून अभियांत्रिकी, वैद्यकीय यांसह इतर क्षेत्रांत काम करणाऱ्या पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलविण्यात येते. वर्षांतून दोन वेळा पालक सभेचे आयोजन केले जाते. मुलांच्या अभिव्यक्तीसाठी ‘अविष्कार’ या पुस्तिकेचे प्रकाशन केले जाते. त्यात विद्यार्थ्यांच्या कथा, कविता, चारोळ्या प्रकाशित केल्या जातात. या पुस्तिकेचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ विद्यार्थ्यांनी वर्षभरात काढलेल्या चित्रातून निवडण्यात येते. उत्कृष्ट चित्राची निवड करून ते जसेच्या तसे छापण्यात येते. विद्यार्थी काव्यसंमेलन, वक्तृत्व अशा स्पर्धाचे आयोजन करण्यात येते.

छंद वर्ग : आठवडय़ातून दोन दिवस शाळेत छंद वर्ग घेतले जातात. विद्यार्थ्यांच्या त्यांच्या आवडीनुसार छंद वर्गाना बसता येते. त्यात कला, संगीत, नृत्य, १३ प्रकारचे पारंपरिक खेळ, पक्षी निरीक्षण, अभिनय, वक्तृत्व, नेतृत्व हे विषय असतात. प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञमंडळी येऊन मार्गदर्शन करतात. त्यात काही पालक व माजी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

भाषा समृद्धीसाठी : विद्यार्थ्यांचे मराठीबरोबर इंग्रजी, हिंदूी या भाषांवरही प्रभुत्व यावे यासाठी आठवडय़ातून तीन दिवस इंग्लिश, िहदी, मराठी या भाषांचे म्हणून ठरवून देण्यात आले आहेत. त्यात प्रार्थनेपासून दिवसातील सर्व तासिकांना त्याच भाषेत बोलण्याचा शिरस्ता विद्यार्थी-शिक्षक पाळतात. इंग्रजी हा विषय प्रथम भाषा व तृतीय भाषा अशा दोन्ही प्रकारांत शिकवला जातो. त्याचबरोबर सेमी इंग्लिशचा पर्यायही विद्यार्थ्यांना निवडता येतो.

 

– मुकेश पवार

 – रेश्मा शिवडेकर
reshma.murkar@expressindia.com