दिगंबर शिंदे

ऊस, पानमळे, मका, सोयाबीन या पिकांना त्रास देणाऱ्या हुमणी भुंग्यांनी आता आपला मोर्चा द्राक्ष पिकाकडे वळवला आहे. द्राक्षाचे आगर समजल्या जाणाऱ्या तासगावातील द्राक्ष शेती सध्या या नव्या संकटामुळे अडचणीत आली आहे.

वातावरणातील बदल, सगळा एप्रिल, मे महिना वळवाविना गेला असताना ऐन पश्चिमेकडील वाऱ्यापासून नेहमी येणाऱ्या पावसाची प्रतीक्षा असताना विजेच्या गडगडाटासह होत असलेला वळवासारखा पण वळिवाचा हंगाम सोडून पडणाऱ्या पावसामुळे द्राक्षाचे आगर समजल्या जाणाऱ्या तासगावातील द्राक्ष शेतीला यंदाच्या हंगामात भुंग्यांनी घेरले आहे. रात्रीच्या वेळी द्राक्ष वेलीवर शेकडोच्या संख्येने येणारी भुंग्याची धाड वेलीवरील हिरव्या पानावर ताव मारत असल्याने यंदाचा हंगाम संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

हुमणीची पुढील अवस्था म्हणजे भुंगेरे असे सर्वसाधारण समज आहे. ऊस, पानमळे, मका, सोयाबीन या पिकांना हुमणीबरोबरच भुंग्याचाही त्रास होतो. हुमणी जमिनीत राहून कोवळ्या पिकांच्या मुळ्या खात असल्याने वरून हिरवेगार दिसणारे ऊस पीक पिवळे पडून वाळून जाते. तीच अवस्था मका आणि सोयाबीनची. यंदा मात्र या भुंग्यांनी द्राक्ष वेलीवर हल्ला चढविला असून तासगाव तालुक्यातील काही गावातील द्राक्ष बागांची पाने कुरतडल्याने द्राक्ष वेली वाळल्या नसल्या तरी तयार काडीवरील पानेच गेल्याने काडीत द्राक्ष घडाची गर्भधारणा होण्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी धास्तावला आहे.

गेल्या हंगामातील द्राक्ष पीक गेल्यानंतर मार्च-एप्रिलमध्ये बागांची नवीन फुटव्यासाठी खरड छाटणी घेण्यात आली. वेलीवर असलेले फळानंतरचे फुटवे काढून नवीन फुटवे येण्याची संधी यामुळे वेलीला मिळते. या छाटणीनंतर एक महिन्यात वेलीवर आलेल्या नवीन फुटव्यापासून काडी तयार करून घेण्याचे काम केले जाते. काडी गव्हाळ रंगाची झाली की पानेही जून होतात. या जुनाट पानापासून मे महिन्यात असलेल्या प्रखर सूर्यकिरणाचा वापर करून द्राक्ष वेल अन्न  तयार करण्याचे काम करीत असतात. या वेळी पाण्याची उपलब्धता पुरेशी नसली, तरी या भागातील शेतकरी प्रसंगी टँकरने पाणी आणून द्राक्ष वेल जगविण्याचा प्रयत्न करीत असतात.

नेमक्या याचवेळी यंदा रात्रीच्या अंधारात भुंग्याचे आक्रमण वेलीवर झाले आहे. रात्रीच्या वेळी एकेका वेलीवर शेकडय़ांनी भुंगे हल्ला चढवत वेलीवरील हिरव्या पानावर ताव मारत आहेत. एका रात्रीत वेली बोडक्या होत आहेत. वेलीवर पानेच नसल्याने अन्न निर्मिती करण्याची वेलींची प्रक्रियाच धोक्यात आली आहे. यामुळे नवीन काडीमध्ये पानाआड तयार होणारे गर्भार डोळेही अभावानेच तयार होणार असून याचा परिणाम ऑक्टोबरमध्ये घेतल्या जाणाऱ्या फळ छाटणीवेळी दिसणार आहे. परिणामी द्राक्ष बागा वांझ जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

तासगाव तालुक्यातील राजापूर, बोरगाव, कवठेएकंद, नागाव कवठे या गावातध्ये या किडीचा मोठा प्रादुर्भाव यंदाच्या हंगामात दिसून आला आहे. तसेच  तालुक्यातील अन्य गावांतील काही भागातील द्राक्षबागांवर भुंग्यानी मोठा हल्ला केला आहे. रात्रीच्या वेळी या किडीचा फैलाव होत आहे. शेकडो एकर द्राक्षबागा किडीच्या प्रादुर्भावाने बाधित झाल्या आहेत. यामुळे शेतकरी मात्र धास्तावला आहे. वातावरणातील चढ-उतार व उष्ण, दमट तापमानामुळे अशा किडीचा फैलाव होताना दिसत आहे.

वळीव पावसाची सुरुवात झाली, की जमिनीतील हुमणीचा प्रादुर्भाव वाढू लागतो. हा गेल्या आठ-दहा वर्षांतील ऊस शेती करणाऱ्यांचा अनुभव आहे. हुमणीची अवस्था, अंडी, अळी, हुमणी आणि भुंगेरा अशी असते. या दिवसांत प्रामुख्याने या किडीचा प्रादुर्भाव लिंब, बाभळ आणि बोर झाडावर होत असल्याचे आढळून येते. मात्र या वर्षी द्राक्षवेलीच्या पानांवरही अशा पाने कुरतडणाऱ्या किडीने हला केला आहे. रात्री नऊ वाजल्यानंतर मोठय़ा संख्येने भुंगे द्राक्षबागेवर हल्ला चढवतात व बागेच्या काडीची पाने खाऊन फस्त करत आहेत. पाने खाल्ल्यामुळे द्राक्ष वेल रिकामी होत आहेत. तालुक्यातील राजापूर, बोरगाव, ढवळी, मणेराजुरी, तुरची, निंबळक, आळते, चिखलगोठण, विसापूर, येळावी या गावांत याचा प्रादुर्भाव आहे.

शेतकऱ्यांची तक्रार येताच जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांच्यासह विटा येथील उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, कीटक शास्त्रज्ञ दिलीप कंटमाळे, तालुका कृषी अधिकारी एस. बी. पटकुरे आदींनी काही ठिकाणी भेटी देऊन द्राक्ष वेलींची पाहणीही केली. रात्रीच्या वेळी द्राक्ष पिकावर हल्ला करणाऱ्या या कीटकाचे नाव चाप्टर बिटल असे असल्याचे त्यांनी सांगितले. या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करण्याऐवजी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली.

हे भुंगे प्रकाशाकडे आकर्षति होत असल्याने प्रकाश सापळे हेच या किडीचा नियंत्रण मिळविण्याचा जालीम उपाय आहे. प्रकाश सापळे लावले तर त्याकडे हे भुंगे आकर्षति होतात. त्याचवेळी प्रकाश सापळ्याजवळ डिझेल मिश्रित पाणी उथळ पाटीमध्ये ठेवले तर प्रकाश सापळ्याकडे आलेले कीटक या पाण्यात पडून मृत्युमुखी पडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या प्रकाश सापळ्याचा वापर करणे हितावह आहे.

– बसवराज मास्तोळी, कृषी अधीक्षक, सांगली.

digambar.shinde@expressindia.com