11 July 2020

News Flash

बर्लिनची भिंत आणि बदलले जग

जागतिक इतिहासाला वळण देणाऱ्या ज्या काही फार कमी घटना असतात त्यात बर्लिनभिंतीच्या पाडावाचा समावेश करता येईल.

(संग्रहित छायाचित्र)

संकल्प गुर्जर

बर्लिनभिंतीच्या पाडावानंतर जगभर आर्थिक प्रगतीचे वारे वाहू लागण्याच्या काळात रिओची वसुंधरा परिषद, जागतिक व्यापार संघटना अशा नव्या संस्थांचे जाळेही उभे राहात होते. ते आज कमकुवत झालेले आहे..

जागतिक इतिहासाला वळण देणाऱ्या ज्या काही फार कमी घटना असतात त्यात बर्लिनभिंतीच्या पाडावाचा समावेश करता येईल. ९ नोव्हेंबर १९८९ या दिवशी पूर्व बर्लिन आणि पश्चिम बर्लिन यांना विभागणारी ही भिंत पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली. या दिवशी जुने जग लयाला गेले आणि नव्या जगाची चाहूल लागली. त्यानंतरची २० वर्षे लोकशाहीच्या प्रसाराची, आर्थिक समृद्धीची, तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीची आणि मानवी स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावण्याची होती. बर्लिनच्या भिंतीचे पडणे हे मानवी प्रगतीच्या वाटचालीतले एक महत्त्वाचे पाऊल होते.

बर्लिनची भिंत हे अमेरिकाप्रणीत पश्चिम युरोपीय राष्ट्रे व सोव्हिएत साम्राज्यातील पूर्व युरोपीय देश यांच्यातील शीतयुद्धाचे सर्वात मोठे प्रतीक होते. दुसऱ्या महायुद्धानंतर पराभूत जर्मनीची व राजधानीच्या बर्लिन शहराची चार भागांत विभागणी करण्यात आली. बर्लिन शहर सोव्हिएत नियंत्रणाखालील प्रदेशात असूनही पश्चिम बर्लिनवर अमेरिका, ब्रिटन व फ्रान्स यांचे नियंत्रण होते. अमेरिकी प्रभावाखालील समृद्ध पश्चिम बर्लिन व मागासलेले पूर्व बर्लिन यांच्यातील फरक कोणालाही चटकन नजरेत भरावा इतका स्पष्ट होता. त्यामुळे पूर्व बर्लिनमधील नागरिक पश्चिम बर्लिनमध्ये मोठय़ा संख्येने स्थलांतर करत असत. ते थांबवण्यासाठी केलेले उपाय अपुरे पडत असल्याने १९६१ साली सोव्हिएत प्रभावाखाली असलेल्या पूर्व जर्मन सरकारने बर्लिनची भिंत उभारली होती.

बर्लिनची भिंत उभारण्यापूर्वी, १९४५ ते १९६१ या १६ वर्षांत साधारणत: ३५ लाख जर्मन नागरिक पूर्वेकडून पश्चिमेला गेले होते. यामध्ये पूर्व जर्मनीतील सुशिक्षितांचे प्रमाण फारच जास्त होते. हे स्थलांतर पूर्व जर्मन सरकारसाठी एक मोठीच डोकेदुखी ठरले होते. ते रोखण्यासाठी रातोरात ही भिंत उभारली गेली. या भिंतीमुळे स्थलांतराचे प्रमाण निश्चितच कमी झाले. मात्र या भिंतीमुळे अनेक कुटुंबांची ताटातूट झाली. तसेच पूर्व बर्लिनमधून पश्चिम बर्लिनमध्ये जाणे अतिशय अवघड बनले. पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्याचे प्रयत्न करताना अनेक नागरिक मारले गेले. ही भिंत हे कम्युनिस्ट राजवटी किती क्रूर असू शकतात याचे उत्तम उदाहरण होते. चार वर्षांपूर्वी आलेल्या ‘ब्रिज ऑफ स्पाइज’ या नितांतसुंदर चित्रपटात बर्लिनची भिंत व ती ओलांडण्यातील गुंतागुंत यांचे सुरेख चित्रण आले आहे.

या भिंतीमुळे जर्मनीची व बर्लिन शहराची मानसिक विभागणी व्हावी अशी अपेक्षा होती. त्यामुळेच बर्लिन शहराला विभागणारी ही भिंत हे खऱ्या अर्थाने सांस्कृतिक व राजकीय संघर्षांचे प्रतीक होते. भिंतीच्या एका बाजूला लोकशाही होती तर दुसरीकडे हुकूमशाही होती. एकीकडे स्वातंत्र्य होते तर दुसरीकडे गुलामगिरी होती. पश्चिम बर्लिन आर्थिकदृष्टय़ा समृद्ध होते तर पूर्व बर्लिनमध्ये टंचाई आणि आर्थिक नियंत्रणे यांनी कहर केला होता. शहराच्या एका भागात उदारमतवाद होता तर दुसरीकडे कम्युनिझम होता. त्यामुळेच १९८९ साली बर्लिनच्या भिंतीचे पडणे हे स्वातंत्र्य, लोकशाही, उदारमतवाद या मूल्यांचा विजय आहे असेच तेव्हा मानले गेले.

खरे तर १९८९ हे वर्ष सुरू होतानाच युरोपात बदलत्या राजकीय वाऱ्यांची चाहूल लागली होती. सोव्हिएत रशियामध्ये मिखाईल गोर्बाचेव यांनी १९८५ नंतर खुलेपणा आणि पुनर्रचनेचे युग आणले होते. याच सुमारास पूर्व युरोपीय देशांवरील सोव्हिएत नियंत्रण सल होऊ लागले होते व लोक कम्युनिस्ट राजवटींच्या विरोधी आवाज उठवायला लागले होते. याच वर्षी चिनी तरुणांनी लोकशाही हक्कांसाठी बीजिंग शहरात ठाण मांडले होते. दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदी राजवटीच्या अंताची प्रक्रियाही १९८९ मध्येच सुरू झाली. त्यामुळे १९८९ हे वर्ष त्या अर्थाने पाहता बदलांचे वर्ष होते व बर्लिनच्या भिंतीचे पडणे ही, जग किती आणि कसे बदलत आहे याची जाणीव करून देणारी घटना होती. याच काळात अमेरिका व युरोपच्या पुढाकाराने ‘नव्या’ जगाचे व्यवस्थापन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या संस्था जन्माला आल्या. तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात नवी मूल्यव्यवस्थाही याच काळात रूढ व्हायला सुरुवात झाली.

वातावरण बदलाचा प्रश्न महत्त्वाचा असून तो सोडवण्यासाठी साऱ्या जगाने प्रयत्न करायला हवेत ही जाणीव करून देणारी रिओ परिषद १९९२ साली ब्राझीलमध्ये भरली. मुक्त व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी १९९५ साली जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ) जन्माला आली. १९९९ साली मानवतेविरुद्ध गुन्हा करणाऱ्या, आपल्याच नागरिकांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट तयार झाले. तसेच १९८९ नंतर क्रमाने युरोपीयन युनियन, आसियान, संयुक्त राष्ट्रे या संघटनांचे महत्त्वही वाढत गेले होते. या नव्या संस्थात्मक जाळ्यामुळे आपल्याला माहीत असलेल्या जगाचा चेहरामोहराच बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली. याच काळात वातावरण बदल, स्त्रियांचे प्रश्न, मानवी हक्क, विकासाचे प्रश्न, प्रादेशिक सहकार्य असे ‘सॉफ्ट’ पण समाजकेंद्री मुद्दे आंतरराष्ट्रीय राजकारणात अग्रभागी आले.

१९८९ ते २००८ हा काळ आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक प्रगतीचा होता. १९८९ नंतरच्या नव्या जगात मानवी स्वातंत्र्याच्या कक्षा अधिकाधिक प्रमाणात रुंदावत गेल्या. तसेच उदारीकरण व जागतिकीकरण यांचा अतिशय वेगाने प्रसार झाला. भारतानेही आपली अर्थव्यवस्था खुली करायला सुरुवात केली. या नव्या जगात, मुक्त व्यापार व उदारीकरणाचा सर्वाधिक फायदा भारत व चीन या दोन देशांना झाला. या दोनच देशांत मिळून कोटय़वधी लोक दारिद्रय़रेषेच्या वर उचलले गेले. या देशांच्या इतिहासात इतका वेगवान प्रगतीचा काळ यापूर्वी कधीही आला नव्हता.

बर्लिनची भिंत पडल्यानंतरचे जग एका बाजूला अधिकाधिक मुक्त होत होते तर दुसरीकडे समृद्धीचे वारेही वेगाने वाहत होते. स्वत:मध्ये क्षमता असतील तर नक्कीच प्रगती होऊ शकते असा आशावाद वातावरणात होता. त्यामुळेच आता कम्युनिझमचा अंत झालेला आहे व लोकशाही उदारमतवादाला कोणतेही आव्हान शिल्लक राहिलेले नाही अशी भावना मूळ धरू लागली होती. त्यामुळेच या काळात फ्रान्सिस फुकुयामाचे ‘द एन्ड ऑफ हिस्टरी अँड लास्ट मॅन’सारखे पुस्तक येऊ शकले. या आशावादी काळाचे सर्वात मोठे प्रतीक म्हणजे अमेरिकेत बराक ओबामा यांचे सत्तेत येणे. १९८९ साली सुरू झालेली उदारीकरणाची प्रक्रिया २००८ साली सर्वोच्च शिखरावर होती.

त्या सर्वोच्च शिखरावरून हे जग फार वेगाने खाली आले. २००८ च्या आर्थिक संकटामुळे १९८९ नंतर बदललेले जग पुन्हा एकदा बदलायला सुरुवात झाली. १९८९ नंतरच्या बदलांमुळे जग पुढे गेले होते. २००८ नंतरच्या बदलांमुळे जग मागे जायला सुरुवात झाली. संकुचितपणा, आक्रमक राष्ट्रवाद, वांशिक भेदाभेद, मुक्त व्यापाराला विरोध अशी स्वातंत्र्य व समृद्धीला अटकाव करणारी मूल्ये परत आली. इस्लामिक दहशतवाद व कम्युनिस्ट चीन ही दोन प्रमुख आव्हाने पाश्चात्त्य जगासमोर उभी ठाकली होतीच. २००८ च्या आर्थिक संकटामुळे त्याची दाहकता अधिक प्रकर्षांने जाणवायला लागली. भारतातही आक्रमक राष्ट्रवाद, धार्मिक विद्वेष व संकुचितपणा यांचा वापर करणारे लोकानुनयी राजकारण बळ धरू लागले. २०१० नंतरच्या जगात जपान, चीन, फिलिपाइन्स, टर्की आणि भारत अशा देशांत लोकानुनयी, उदारमतवादी लोकशाहीला आव्हान निर्माण करणारे, सत्तेचे केंद्रीकरण करणारे एककल्ली सत्ताधीश तयार झाले.

२००८ नंतर जग किती आमूलाग्र बदलले आहे याची खऱ्या अर्थाने प्रचीती आली २०१६ मध्ये. त्या वर्षी अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प निवडून आले. तसेच ब्रिटनने युरोपीयन युनियनमधून बाहेर पडायला हवे की नको यासाठी (‘ब्रेग्झिट’साठी) घेतलेल्या सार्वमतात युरोपीयन युनियनच्या विरोधात मत गेले. डोनाल्ड ट्रम्प आणि ‘ब्रेग्झिट’ या दोन्हीमध्ये बरीच साम्यस्थळे आहेत. मेक्सिको आणि लॅटिन अमेरिकेतून आलेल्या स्थलांतरितांमुळे अमेरिकेतील लोकांच्या नोकऱ्या जातात व त्यामुळे हे स्थलांतर रोखण्यासाठी मेक्सिकोच्या सीमेवर अमेरिकेने भिंत बांधायला हवी असे ट्रम्प यांना वाटते. तर युरोपियन युनियनमुळे ब्रिटनच्या सार्वभौमत्वावर मर्यादा येतात. त्यामुळे ब्रिटनने युरोपियन गटात राहू नये असे ‘ब्रेग्झिट’च्या समर्थकांना वाटते. म्हणजे अमेरिकेत प्रत्यक्ष भिंत बांधायला हवी यावर राजकारण चालू आहे तर ब्रिटनने धोरणात्मक कुंपणे घालून युरोपला आपल्यापासून लांब ठेवावे असे वारे ब्रिटनमध्ये वाहू लागले आहेत.

म्हणजे बर्लिनची भिंत पडणे ते नव्या भिंती बांधणे असा प्रवास गेल्या ३० वर्षांत आपण केला आहे. बर्लिनची भिंत बांधल्यानंतर २८ वर्षांतच कोसळली. मात्र सध्याच्या जगात ज्या नवनव्या मानसिक, वैचारिक, आर्थिक भिंती बांधल्या जात आहेत त्या कधी कोसळतील? बर्लिनची भिंत बांधल्यानंतरही ती ओलांडून पश्चिम जर्मनीत जाणाऱ्या जर्मन नागरिकांचा उत्साह काही कमी झाला नाही. एका तीव्र ओढीमुळे ते बंधने झुगारून देऊन जातच राहिले. बर्लिनच्या नागरिकांचे हे ‘स्पिरिट’ इतके प्रखर होते की, १९६३ साली अमेरिकी अध्यक्ष जॉन केनेडी यांनी पश्चिम बर्लिनमध्ये सभा घेऊन ‘मीसुद्धा बर्लिनचा रहिवासी आहे’ अशी भूमिका घेतली होती. त्यांचे ते भाषण त्या वेळी खूपच गाजले होते. सध्याच्या जगात मुख्य प्रवाहातल्या व्यक्ती अशी खंबीर भूमिका घेतील का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा भिंती बांधल्याने सर्वाचेच नुकसान होते हा बर्लिनच्या भिंतीचा धडा आपण कधी शिकणार?

लेखक आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहेत.

ईमेल : sankalp.gurjar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2019 12:05 am

Web Title: berlin wall and the changed world abn 97
Next Stories
1 ‘आशियाई तपकिरी ढग’ आणि आपण
2 विश्वाचे वृत्तरंग : सावध ऐका, पुढल्या हाका!
3 निवाडा कोणत्या परिस्थितीत घडला?
Just Now!
X