सरकारी शाळांकडे पाठ फिरवून खासगी शाळांकडे आपला मोर्चा वळविण्याकडे जास्तीत जास्त पालकांचा ओढा आहे. यामुळे राज्यात अनेक शाळा किंवा तुकडय़ा बंद पडत असून शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. याच परिस्थितीत काही सरकारी शाळा नावीन्यपूर्ण प्रयोग करीत तग धरू पाहात आहेत. काही शाळांना यात अपयश येत आहे, तर काही शाळा यात यशस्वी होत आहेत. अशी एक यशस्वी शाळा म्हणजे भिवंडी तालुक्यातील वळ या गावातील जिल्हा परिषदेची शाळा.

खरे तर वळ जिल्हा परिषद शाळा गावकऱ्यांचीच म्हणावी लागले. शाळेला जिल्हा परिषदेची मान्यता आहे. शिक्षकही जिल्हा परिषदेचे आहेत. मात्र शाळेचे संपूर्ण व्यवस्थापन आणि काळजी गावकरीच घेत असतात. गावकऱ्यांच्या सहभागामुळेच ही शाळा आज गावातील तसेच आसपासच्या परिसरातील इंग्रजी शाळांच्या तोडीस तोड ठरू लागली आहे. अनेक इंग्रजी शाळांतील विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेऊ लागले आहेत. हा बदल म्हणजे शाळेतील शिक्षक, जिल्हा परिषद प्रशासन आणि गावकऱ्यांच्या प्रयत्नांचे यशच म्हणावे लागेल.

  • अध्यात्म, शिक्षण आणि आरोग्याचा मिलाफ

‘आपले गाव, आपली शाळा’ या सरकारी योजनेंतर्गत या गावात १९५० मध्ये या शाळेची स्थापना करण्यात आली. गावातील विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या सभागृहाच्या वरच्या बाजूस ही शाळा उभारण्यात आली आहे. शाळेच्या वर व्यायामशाळाही उभारण्यात आली आहे. अध्यात्म, शिक्षण आणि आरोग्य असा अनोखा मिलाफ या एकाच इमारतीमध्ये दिसून येतो. ही शाळा जिल्हा परिषदेची असली तरी इमारत गावाच्या मालकीची आहे. इमारतीच्या देखभाल, दुरुस्तीचा खर्चही ग्रामपंचायतीमार्फतच केला जातो. शाळेत पहिली ते आठवीचे वर्ग भरविले जात असून या वर्षी शाळेचा पट १६० इतका आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गावातील विद्यार्थ्यांबरोबरच भिवंडी परिसरातील गोदामांमध्ये काम करण्यासाठी येणाऱ्या कामगारांच्या मुलांनाही शिकविले जाते. अर्थात याच विद्यार्थ्यांची संख्या शाळेत जास्त आहे. यामुळे या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीपासून ते त्यांना चांगले शिक्षण देण्यापर्यंतचे आव्हान या शाळेतील शिक्षकांसमोर आहे. या आव्हानांवर मात करत उपलब्ध परिस्थितीत विद्यार्थीहित लक्षात घेऊन शिक्षक आणि गावकरी काम करत असल्याचे शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका संगीता पाटील सांगतात.

  • शाळेतील सुविधा आणि नावीन्य

गळके छत, दरुगधीने भरलेले स्वच्छतागृह, तुटलेल्या खिडक्या, खडू झिजला तरी एकही रेष न उमटणारे फळे अशी काहीशी अवस्था जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नित्याचीच. याला वळ जिल्हा परिषद शाळा अपवाद ठरते. या शाळेत स्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. या शाळेचे वैशिष्टय़ म्हणजे शाळेत वर्गातील भिंतींवर पांढरा फळा विराजमान झाला आहे. म्हणजेच शाळेत डिजिटल वर्ग सुरू करण्यात आला आहे. नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास उत्सुक असणारे शिक्षक आणि ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे ठाणे शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरील गोदामांनी व्यापलेल्या भिवंडी तालुक्यातील या शाळेने डिजिटल वर्गाद्वारे ई-लìनगच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. शाळेत डिजिटल वर्ग भरविण्याची कल्पना शाळेतील काही शिक्षकांनी ग्रामस्थांसमोर मांडली. त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी ग्रामपंचायतीस केले. शिक्षकांची ही कल्पना ग्रामस्थांनी आणि गावातील पदाधिकाऱ्यांनी उचलून धरली आणि शाळेने अक्षरश: कात टाकली. त्यामुळे महानगरांमधील तारांकित शाळांमधील शैक्षणिक सुविधा येथील विद्यार्थ्यांना मिळू लागल्या आहेत. शाळेतील एका वर्गात एलईडी प्रोजेक्टरमार्फत सर्व डिजिटल अभ्यासक्रम समोरील पांढऱ्या फळ्यावर पाहण्याची सोय आहे. प्रोजेक्टरमध्येच संगणक असून त्यात पहिली ते दहावीचा सर्व अभ्यासक्रम आहे. क्रमिक अभ्यासाबरोबरच प्रत्येक विषयासाठी आवश्यक पूरक संदर्भ माहितीही या प्रणालीत आहे. शाळेत वाय-फायपासून सर्व आवश्यक सुविधा गावकऱ्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.

गावकऱ्यांच्या पुढाकाराने शाळेत दोन वर्षांपूर्वीच रंगरंगोटीचे काम करण्यात आले असून अनेक अर्थपूर्ण चित्रांनी आणि सुविचारांनी शाळेच्या भिंती बोलक्या करण्यात आल्या आहेत. वर्गात इंग्रजी शब्दांचे अर्थ चित्राच्या साह्य़ाने समजावून सांगण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शब्द लक्षात ठेवणे सोपे होते. डिजिटल वर्गाच्या भिंतींवर संगणकाचा इतिहास रंगविण्यात आला आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना संगणकाचा शोध कसा लागला ते आत्तापर्यंतचा तपशील सतत समोर राहील. यामुळे या शाळेचे अगदी देखण्या ज्ञानमंदिरात रूपांतर झाले आहे. गावकऱ्यांच्या आणि शिक्षकांच्या या प्रयत्नांमुळे १०० ते १२० इतकी पटसंख्या असलेल्या शाळेची पटसंख्या वाढून १६०पर्यंत पोहोचली आहे.

  • विद्यार्थ्यांना एटीएम कार्ड

पुस्तकातील उतारा वाचून दाखवून विद्यार्थ्यांना आíथक साक्षरता म्हणजे काय हे सांगण्यापेक्षा त्यांना थेट आíथक घडामोडींमध्ये सहभागी करून घेऊन आíथक साक्षरतेचे धडे गिरवण्याची संकल्पना शाळेतील शिक्षकांच्या मनात आली आणि त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे बँक खाते सुरू केले. गावाच्या जवळच असलेल्या कॉर्पोरेशन बँकेत ही खाती सुरू करण्यात आली असून तेथील व्यवस्थापकांचे याला विशेष सहकार्य मिळाले. ही सर्व मुले कष्टकरी वर्गातील असल्यामुळे त्यांचे पालक अनेकदा डबा न देता मुलांना खाऊसाठी १० ते २० रुपये देत होते. यातील काही पसे विद्यार्थ्यांना साठवण्यास सांगितले आणि त्या साठलेल्या पशांतून विद्यार्थ्यांची बँक खाती सुरू करण्यात आली. यासाठी पालकांचे समुपदेशन करण्यापासून ते लागणारी कागदपत्रे गोळा करण्याचे कामही शाळेतील शिक्षकांनी उत्साहाने केले. काही विद्यार्थ्यांना त्यांच्या खात्याचे एटीएम कार्डही देण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना बँकेचे व्यवहार शिकण्याची चांगली संधी मिळाली आहे.

  • पहिल्या मजल्यावर उद्यान

शाळा पहिल्या माळावर असल्यामुळे शाळेला परसबाग असा प्रकार नव्हता. ही गोष्ट शाळेतील शिक्षकांना कुठे तरी खटकत होती. यामुळेच गावकरी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शिक्षकांनी कुडय़ांमध्ये विविध प्रकारची झाडे लावून छानशी परसबाग तयार केली आहे. या बागेत आता विविध प्रकारची फळ आणि फुलझाडे आहेत.

  • गावकऱ्यांचा सहभाग

ही शाळा ग्रामस्थांनीच उभारल्यामुळे शाळेच्या प्रत्येक उपक्रमात गावकऱ्यांचा मोठा सहभाग असतो. गावात अनेक सधन कुटुंबे आहेत. यामुळे ही कुटुंबे शाळेला सढळ हस्ते मदत करत असतात. गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या वाढदिवसादिवशी शाळेत शालोपयोगी वस्तूंचे वाटप केले जाते. शाळेत मुलींचा आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा गणवेश सरकारकडून मिळतो. यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे दायित्व गावकऱ्यांनी घेतले आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांना गणवेशासोबतच वह्य़ा, पुस्तके, पेन्सिल, पट्टी, खोडरबर आदी साहित्याचे वाटप गावकरी करतात. काही जणांनी ग्रंथालयासाठी पुस्तकेही भेट दिली आहेत. यामुळेच शाळेत ५००हून अधिक पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालयही आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ग्रामपंचायतीतर्फे दरवर्षी १५ ऑगस्टला बक्षीस समारंभाचे आयोजन केले जाते. याचबरोबर शाळेला कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये यासाठी गावकरी सदैव सज्ज असल्याचेही पाटील यांनी नमूद केले. शाळेला स्वत:ची इमारत नसल्यामुळे स्वत:चे मदान असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण गावातील मदान शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवण्यात आले आहे. यामुळेच शाळेचा मुलींचा व मुलांच्या कबड्डीचा संघ जिल्हा पातळीपर्यंत यश मिळवू शकला आहे.

  • शिक्षक व शैक्षणिक गुणवत्ता

शाळेतील सोयी-सुविधांबरोबरच शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठीही शिक्षक प्रयत्नशील असल्याचे संगीता पाटील सांगतात. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक कष्टकरी वर्गातील असून ते कमी शिकलेले असतात. यामुळेच त्यांना घरचा अभ्यास देऊन फारसा उपयोग होत नाही. मग शाळेतच त्यांच्याकडून जास्तीचा अभ्यास करून घेतला जातो. जर कुणी एखाद्या दिवशी शाळेत आले नाही तर दुसऱ्या दिवशी मधल्या सुट्टीत त्याचा विशेष अभ्यास घेतला जातो, असेही पाटील यांनी नमूद केले. गेल्या शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेलाही बसविण्यात आले होते. यात दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही मिळाली. शाळेत आनंददायी शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात येत असून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगले शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पाटील सांगतात. गावकरी आणि शिक्षकांच्या सहकार्याने उभे झालेले हे ज्ञानमंदिर म्हणजे उत्तम शिक्षणामुळे आजही मराठी तेही सरकारी शाळांमध्ये विद्यार्थिसंख्या वाढू शकते याचे जिवंत उदाहरण आहे. असाच आदर्श बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या शाळांनी घेतला तर नक्कीच मराठी शाळांचे भवितव्य उज्ज्वल आहे.

 

– नीरज पंडित

– संकलन – रेश्मा शिवडेकर
reshma.murkar@expressindia.com