लालकृष्ण अडवाणी, भाजप नेते

मी दोन आठवडे राजस्थानच्या प्रवासात अटलजींसोबत होतो. त्यांची व्याख्याने ऐकून इतका प्रभावित झालो, की मी या पक्षात आलोय, मला या पक्षात स्थान दिले गेले आहे, पण हा पक्ष मी चालवू शकेन की नाही, अशा न्यूनगंडाने मला पछाडले. कोणतीही गंभीर गोष्ट सहजपणे समाजाला समजावण्याची जी क्षमता अटलजींकडे आणि पक्षाच्या अन्य नेत्यांकडे आहे, ती माझ्याकडे नाही. मी तर एका इंग्रजी शाळेत शिकलेला. हिंदी तर लिहायला-वाचायलाही येत नव्हतं. अटलजींच्या त्या पहिल्याच भेटीत आणि त्यांच्यासोबतच्या पहिल्याच प्रवासात माझ्या मनात असा काही न्यूनगंड निर्माण झाला, की या पक्षात नेतेपद मिळवण्याची माझी क्षमताच नाही असे मला वाटू लागले होते. या पक्षात हिमालयाच्या उंचीचे नेते आहेत, त्यांच्यापुढे माझा काय निभाव लागणार, असेच मला वाटू लागले. या नेत्यांचा आपल्याविषयी काही तरी गरसमज झाला आहे, असे मला वाटू लागले होते. संसदेत अटलजींचे एकच भाषण ऐकल्यानंतर पंडित नेहरूही प्रभावित झाले होते. या नेत्याकडे देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे, अशी भविष्यवाणीही त्यांनी वर्तवली होती. पण, मी मोकळेपणाने कबूल करतो, की अटलजींच्या अनोख्या संवादशैलीमुळे माझ्या मनात गंड निर्माण झाला होता.

दिल्ली महापालिकेच्या एका पोटनिवडणुकीतील हा किस्सा. या निवडणुकीसाठी आम्ही दोघेही मेहनत घेत होतो. तेव्हा पक्षाचे कार्यालय अजमेरी गेटमध्ये नव्हते. या पोटनिवडणुकीत आमचा पराभव झाला. आम्हा दोघांनाही खूप वाईट वाटले. ते साहजिकच होते. अटलजी म्हणाले, चला, एखादा चित्रपट पाहू या. दुख थोडं हलकं करू या.. आणि आम्ही पहाडगंजमधील एका चित्रपटगृहात गेलो. चित्रपट कोणता आहे, तेही पाहिलं नाही. आत गेलो, राज कपूर आणि माला सिन्हा यांचा ‘फिर सुबह होगी’ चित्रपट सुरू होता. चांगला होता. त्यानंतर काही दिवसांनंतर गांधीनगरमध्ये, माझ्या मतदारसंघात आमच्या पक्षाची बैठक होती. त्याआधी गांधीनगरची निवडणूक मी जिंकलो होतो. म्हणून त्या बठकीत मी म्हणालो, काही दिवसांपूर्वीच आम्ही ‘फिर सुबह होगी’ पाहिला होता. आज मी अटलजींना सांगू शकतो, की ती सकाळ आज उजाडली आहे.

मी १९९५मध्ये वाजपेयींचे नाव जेव्हा पंतप्रधानपदासाठी जाहीर केले तेव्हा त्यांच्या नावावर एकमुखी शिक्कामोर्तब होणारच होते, याविषयी माझ्या मनात शंका नव्हती. मी मुंबईच्या शिवाजी पार्कवर पंतप्रधानपदासाठी अटलजींच्या नावाची घोषणा केली आणि ते क्षणभर अवाक झाले. ‘अडवाणीजी, तुम्ही हे काय केलेत’, असे त्यांनी मला आश्चर्याने विचारले.. ‘तुम्ही माझ्याशी न बोलताच माझे नाव जाहीर करून टाकलेत?’.. त्यावर मी म्हणालो, ‘मी तुमचे नाव तर आता जाहीर करून टाकलेच आहे, अध्यक्ष या नात्याने तो माझा अधिकार आहे, आणि जनतेनेही तुमच्या नेतृत्वाचा स्वीकार केला आहे.’

एवढय़ा यशानंतरही अटलजींच्या व्यक्तिमत्त्वातील सौजन्य आणि विनय जराही विचलित झाला नव्हता. अटलजी ही एक संस्कृती आहे, त्यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वात असे काही श्रेष्ठत्व आहे, की ज्यामुळे ते सर्वानाच हवेहवेसे वाटतात. कधी कधी लोक म्हणत, की अटलजी उदारमतवादी आहेत आणि अडवाणी कट्टरवादी आहेत. याबाबत अटलजी कधी कधी गमतीने माझ्याशी चर्चाही करीत. तेव्हा मी म्हणायचो, ‘हे तर चांगलेच आहे!’

गुजरातमध्ये २००२ मध्ये जेव्हा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला, तेव्हा अटलजी म्हणाले, ‘या प्रसंगाच्या अनुषंगाने नरेंद्र मोदींनी राजीनामा दिला तर चांगलेच आहे.’ पण, तेव्हा मी त्यांच्या या मताशी सहमत नव्हतो. मोदींनी किमान राजीनामा देण्याची तयारी तरी दाखविली पाहिजे, असे अटलजींचे मत होते. मी त्यांना विश्वासाने म्हणालो, ‘ठीक आहे, तसे मी त्यांच्याशी बोलून बघतो. आपण सांगितल्यावर ते राजीनामा देण्याची तयारी दर्शवतील. पण, त्यांनी राजीनामा देऊ नये, असे मला वाटते.’ नंतर मी नरेंद्र मोदींशी जेव्हा याविषयी चर्चा करण्यासाठी भेटलो, तेव्हा मी काही बोलण्याआधीच मोदी म्हणाले, ‘ही परिस्थिती मी काहीशी कठोरपणानेच हाताळली, असे काही लोकांना वाटत असेल, तर राजीनामा देण्याची माझी तयारी आहे.’ पण सर्वानीच त्याला विरोध केला. मोदींनी पदावर राहिलेच पाहिजे, असे सर्वाचेच आग्रही मत होते. पण याबाबत काही कटुता, मतभेद वगरे होते, असे कुणाला वाटत असेल तर ते खरे नाही.

सर्वात आनंदाची गोष्ट अशी होती, की अनेक मुद्दय़ांवर आमची मते किंवा दृष्टिकोन वेगवेगळे असतानाही, आम्ही एकदिलाने, एकत्र काम केले. अटलजी पंतप्रधान झाले, तेव्हा किती तरी जण त्यांना भेटत असत. अटलजी त्यांना माझ्याकडे पाठवत, ‘अडवाणीजींशी बोला, त्यांना सांगा,’ असे सांगत. अटलजींनी विश्वास असा जपला होता.