28 May 2020

News Flash

विकासासाठी सकारात्मक कौल

निवडणुकीत जिंकणे महत्त्वाचे असते आणि भाजप-शिवसेना महायुतीने विजय मिळवला आहे.

माधव भांडारी (प्रदेश मुख्य प्रवक्ते, भाजप)

माधव भांडारी (प्रदेश मुख्य प्रवक्ते, भाजप)

विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला पूर्ण बहुमत देऊन राष्ट्रवादाच्या मुद्दय़ावरही शिक्कामोर्तब केले आहे..

भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीला विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळाले. हे विकासासाठीचे सकारात्मक मत आहे. भाजप-शिवसेना- रिपाइं- रासप- शिवसंग्राम- रयत क्रांती संघटना महायुती एकजुटीने निवडणुकीला सामोरी गेली. भाजप व अन्य मित्रपक्ष मिळून १६४, तर शिवसेना १२४ जागांवर लढले. भाजपच्या चिन्हावर १६४ उमेदवार रिंगणात होते आणि त्यापैकी शंभरपेक्षा जास्त उमेदवार विजयी होत आहेत. म्हणजे सुमारे ६० टक्के उमेदवार विजयी झाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २६० जागी आपल्या कमळ चिन्हावर उमेदवार उभे केले होते आणि त्यांपैकी १२२ उमेदवार – म्हणजे ४७ टक्के उमेदवार विजयी झाले होते. गेल्या पाच वर्षांत भाजपला राज्यात सातत्याने लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत यश मिळाले होते. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून विजयाची मोठी अपेक्षा होती. त्यानुसार ६० टक्के जागा जिंकून भाजपने आपली वाढलेली राजकीय ताकद सिद्ध केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने हे यश मिळवले. २०१४ च्या निवडणुकीत भाजप व शिवसेना विरोधात लढले होते. या निवडणुकीत दोन्ही पक्ष मित्रपक्षांसह महायुतीने निवडणुकीला सामोरे गेले. त्यामुळे या निवडणूक निकालाच्या आकडेवारीचा अर्थ लावताना महायुतीचा एकत्रित विचार करायला हवा. त्यादृष्टीने पाहता महायुतीला स्पष्ट बहुमत ही महत्त्वाची उपलब्धी आहे. तसेच मतांचा विचार केला तरी भाजप-शिवसेना महायुतीला मिळालेली मते महत्त्वाची आहेत.

निवडणुकीत जिंकणे महत्त्वाचे असते आणि भाजप-शिवसेना महायुतीने विजय मिळवला आहे. परंतु यासोबत जनमताच्या कौलाचा विकासाच्या दृष्टीने विचार करायला हवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत भाजप- शिवसेना महायुतीने एक निष्कलंक आणि गतिमान सरकार दिले. वर्षांनुवर्षे रेंगाळत पडलेले अनेक प्रश्न सोडविले. महाराष्ट्रात पाच वर्षांपूर्वी असलेली मरगळ आणि निराशा हटवली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या अपयशामुळे महाराष्ट्राला अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागत होते. त्यापैकी काही प्रश्न महायुती सरकारने सोडविले. उरलेले प्रश्नही हेच सरकार सोडवू शकते, असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला. परिणामी जनतेने महायुतीला बहुमत देऊन पुन्हा सरकार चालविण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळेच हे विकासासाठीचे सकारात्मक मत आहे. विकास हा राजकारणाचा केंद्रबिंदू असावा अशी चर्चा होत असे; पण आधीच्या सत्ताधारी पक्षांनी तसा प्रयत्न केला नाही. भाजप-शिवसेना युतीने मात्र विकास हाच केंद्रबिंदू ठेवून काम केले. समाजातील गोरगरीब व वंचित घटकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या पाठिंब्याने महाराष्ट्रातील महायुती सरकारने गेल्या पाच वर्षांत गरीब कल्याणाचा अजेंडा प्रभावीपणे राबवला.

राष्ट्रवादाचा विचार हा भाजपचा प्राण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी हिमतीने घटनेचे कलम-३७० रद्द केले आणि जम्मू-काश्मीरला सर्वार्थाने देशाचा अविभाज्य घटक बनवले. राष्ट्रवादी विचारांसाठी ही फार महत्त्वाची घटना होती. या विधानसभा निवडणुकीत भाजपने हा मुद्दा जोरकसपणे मांडला. भाजपसाठी केवळ भौतिक विकास करणे पुरेसे नाही, तर राष्ट्रवाद आणि विकास हाच योग्य मार्ग आहे. निवडणुकीत जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला पूर्ण बहुमत देऊन राष्ट्रवादाच्या मुद्दय़ावरही शिक्कामोर्तब केले आहे.

पाच वर्षे विकासाभिमुख सरकार चालविल्यानंतर पुन्हा पाच वर्षे राज्याचे नेतृत्व करण्याची संधी जनतेने महायुतीला दिली आहे. आगामी पाच वर्षांत गरीब कल्याणाचा अजेंडा आणखी प्रभावीपणे राबविणे आणि पुन्हा एकदा विकासाचेच राजकारण करण्यावर भाजपचा भर असेल. समाजातील गोरगरीब-वंचित-शोषित अशा सर्व घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्राला वैभवाच्या शिखरावर नेण्याचे भाजप-शिवसेना महायुतीचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शेतकऱ्यांना सुखी करण्याचा महायुतीचा निर्धार आहे. या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत देऊन जनतेने विकासाच्या अजेंडय़ाला मान्यता दिली आहे. जनतेच्या आशीर्वादाने आमचे सरकार पुढे वाटचाल करत राहील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2019 1:44 am

Web Title: bjp madhav bhandari review maharashtra election result 2019 zws 70
Next Stories
1 ‘दक्षिण-पश्चिम’चे सम्राट मुख्यमंत्रीच
2 आर्थिक राजधानीत युतीचीच दिवाळी
3 सेनेच्या भांडणात काँग्रेसचा लाभ
Just Now!
X