भाजपचे खासदार नाना पटोले यांनी पक्षनेतृत्वावर टीका करून एकप्रकारे बंडाळीच केली असली, तरी पक्षातर्फे सध्या त्यांना सामंजस्याने शांत करण्यावर भर राहील. असे का व्हावे?  

गेल्या तीन वर्षांपासून सत्तेचा केंद्रबिंदू ज्या दोघांभोवती स्थिरावला आहे, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यपद्धतीविषयीच्या नव्यानव्या आख्यायिका रोज ऐकायला मिळतात. या दोघांचे वागणे हुकूमशहासारखे असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. त्याला दुजोरा देणारे वक्तव्य विरोधकांनी नाही तर सत्तापक्षाचे खासदार असलेले नाना पटोले यांनी करून एकच खळबळ उडवून दिली आहे. भंडारा-गोंदियाचे प्रतिनिधित्व करणारे पटोले तसेही गेल्या तीन वर्षांपासून अस्वस्थ आहेत. त्यांच्या या विरोधी सुरामागे पक्षपातळीवर होत असलेली अवहेलना व राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत असलेल्या कट्टर दुश्मनीची गडद किनार आहे. बंडाचा झेंडा उभा करण्यामागे पटोले यांचे राजकारण काय, हे पाहण्याजोगे आहे.

विदर्भात मोठय़ा संख्येने असलेल्या ओबीसींचे तगडे नेते अशी ओळख असलेले पटोले २००८ पर्यंत काँग्रेसमध्ये होते. या पक्षात असतानासुद्धा त्यांचे राज्य पातळीवरील नेत्यांशी मतभेद होत असत. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांचे कट्टर समर्थक असलेले अकोल्याचे सुधाकर गणगणे यांचा विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला. त्या वेळी काँग्रेस आमदारांची मते फुटली होती. पटोले यांनीसुद्धा गणगणेंना ऐनवेळी दगा दिला अशी चर्चा तेव्हा रंगली होती. यावरून विलासराव त्यांच्यावर कमालीचे नाराज झाले होते. हे राजकीय वातावरण लक्षात घेऊन पटोले यांनी तात्काळ भाजपची वाट धरली. भाजपला विदर्भात ओबीसी चेहरा हवाच होता. ती कमतरता पटोलेंच्या येण्याने भरून निघाली. त्यांना थेट प्रदेश सरचिटणीस करण्यात आले. पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवत पटोलेंनी नंतर झालेल्या भंडारा व गोंदिया जि. प. निवडणुकीत पक्षाला एकहाती विजय मिळवून दिला. या विजयामुळे आता प्रदेश पातळीवर पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल, ही पटोलेंची अपेक्षा फोल ठरली. त्यांना पक्षात पद्धतशीरपणे बाजूला सारणे सुरू झाले. लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यावर ती लढण्यास पटोले फारसे इच्छुक नव्हते. मात्र, गडकरींनी त्यांना तयार केले. ही निवडणूक ते मोठय़ा फरकाने जिंकले. आता केंद्रात संधी मिळेल, ही त्यांची अपेक्षा लवकरच फोल ठरली. भाजपमध्ये कितीही काम केले तरी वरची पायरी गाठण्यासाठी संघाचे पाठबळ लागते. पटोले नेमके तिथे कमी पडले.

भंडारा व गोंदिया जिल्ह्य़ात पटोलेंचे राजकारण यशस्वी झाले ते प्रफुल्ल पटेलांना तीव्र विरोध केल्यामुळे! या दोन्ही जिल्ह्य़ांत ओबीसींचे वर्चस्व असताना अल्पसंख्याक नेता कसा काय राज्य करू शकतो, अशी जाहीर भूमिका पटोलेंनी वारंवार घेतली व ओबीसीचा मोठा वर्ग स्वत:च्या मागे उभा केला. काँग्रेसमध्ये असतानासुद्धा पटेलांशी त्यांचे अजिबात जमले नाही. त्यामुळे राज्यात सत्तेत असूनसुद्धा या दोन जिल्ह्य़ांत काँग्रेस व राष्ट्रवादीत कुरघोडीचे राजकारण सुरू राहिले. पटोलेंच्या भाजप प्रवेशाला ही पाश्र्वभूमीसुद्धा काही अंशी कारणीभूत होती. विक्रमी मताधिक्यांनी भाजपचे खासदार झाल्यावर या दोन जिल्ह्य़ांत आपल्या मनाप्रमाणे राजकारण करता येईल, अशी अपेक्षा पटोले ठेवून होते. विधानसभा निवडणुकीत त्याला सुरुंग लागला. भाजपने पटोलेंचे फार ऐकले नाही. त्यामुळे निवडून आलेल्या आमदारांनी व सध्या मंत्री असलेल्या राजकुमार बडोलेंनी पटोलेंना बाजूला सारणे सुरू केले. त्याचा फटका दोन वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला बसला व पराभव स्वीकारावा लागला. त्याचेही खापर पटोलेंवर फोडले गेले. ही सल ते नंतर  बोलून दाखवत राहिले. राष्ट्रीय तसेच राज्यपातळीवर आपली दखल घेतली जात नाही व जिल्हास्तरावरही कुणी विचारत नाही, अशी स्थिती झालेल्या पटोलेंनी मग पक्षविरोधी भूमिका घ्यायला सुरुवात केली. मध्यंतरी त्यांनी संघाच्या विरोधातसुद्धा विधाने केली होती. पटोलेंच्या अस्वस्थतेत आणखी भर पडली ती प्रफुल्ल पटेल व एकूणच राष्ट्रवादीने भाजपशी जवळीक साधण्याची भूमिका घेतल्यामुळे. नुकत्याच झालेल्या गुजरातमधील राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या एका आमदाराचे मत प्रफुल्ल पटेलांनी अमित शहांना द्यायला लावले. हा घटनाक्रम पडद्याआड जायच्या आधीच केंद्राच्या सत्तेत राष्ट्रवादी सहभागी होणार, अशा बातम्या झळकू लागल्या. या सर्व घडामोडी बघून त्यांनी थेट बंडाचा झेंडा उभारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भविष्यात प्रफुल्ल पटेल भाजपमध्ये गेले तर आपले कसे, हा प्रश्न नानांना छळतो आहे. निवडणुकीच्या ऐन तोंडावर अशी काही घडामोड झाली तर फजिती होईल या भीतीपोटीच आता पटोलेंनी हा मार्ग स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे.

पटोलेंना आता लोकसभेची निवडणूक लढवायची नाही. तसे त्यांनी अनेकदा बोलून दाखवले आहे. साकोली मतदारसंघातून विधानसभेसाठी उभे राहण्याचे त्यांच्या मनात आहे व तशी तयारीही त्यांनी सुरू केली आहे. या मतदारसंघावर पटोलेंचा प्रभाव निश्चित आहे. आता ही निवडणूक भाजपकडून लढायची की काँग्रेसकडून या संभ्रमावस्थेत सध्या ते आहेत. पटोले नाराज आहेत, याची कल्पना भाजपच्या वर्तुळात आधीपासून आहे. मध्यंतरी नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढली होती. मात्र, प्रफुल्ल पटेलांच्या वरिष्ठ पातळीवरून चालणाऱ्या राजकारणाचे फासे कधी व कसे पडतील या प्रश्नाचे उत्तर गडकरी व फडणवीस पटोलेंना आज तरी देऊ शकत नाही. त्यामुळे आता त्यांनी जनतेला सोबत घेण्यासाठी ओबीसींचे प्रश्न, धान उत्पादकांचे प्रश्न, शेतकऱ्यांची कर्जमाफी अशा जुन्याच मागण्यांचा राग आळवायला सुरुवात केली आहे. सध्या सत्तारूढ पक्षात असल्याने, ‘नाना, तुम्ही आधी घेतलेल्या भूमिकेचे काय?’ असा प्रश्न त्यांना लोक विचारू लागले होते. किमान या निमित्ताने का होईना, पण पटोलेंनी चुप्पी तोडत लोकांच्या भावनांना हात घालायला पुन्हा सुरुवात केली आहे. भंडारा, गोंदियात प्रफुल्ल पटेलांना कडवी झुंज केवळ नानाच देऊ शकतात, याची जाणीव भाजप नेत्यांना आहे. त्यामुळे त्यांच्या या बंडाच्या भूमिकेवर सध्या तरी या नेत्यांनी मौन पाळणेच पसंत केले आहे.

पटोलेंच्या विधानांनी खळबळ उडाल्यानंतर दोन दिवसांनी नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर आले. या दोघांनीही पटोलेंच्या विधानावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आता खुद्द पटोले यांनी या वक्तव्यानंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा दूरध्वनी आला होता, अशी कबुली देत माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, अशी सारवासारव सुरू केली असली तरी बाण भात्यातून निघून गेल्याची जाणीव त्यांना स्वत:लाही झालेली आहे. भाजपकडे राज्यात ओबीसी नेतृत्वाची वानवा आहे. ही परिस्थिती पक्षात सर्वाना ठाऊक असूनसुद्धा आपल्याला अडगळीत का टाकले जात आहे, हा प्रश्न सध्या पटोलेंना छळतो आहे. त्यामुळेच ते पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी वारंवार अशी वक्तव्ये करून चर्चेत येत असतात. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावरून सध्या पक्षाने मौन पाळले असताना पटोलेंनी एक वर्षांपूर्वी लोकसभेत या विषयावर अशासकीय विधेयक मांडून खळबळ उडवून दिली. तेव्हाही त्यांना नेत्यांनी कसेबसे शांत केले होते. ‘मी मोदी व शहांच्या विरोधात नाही, पण शेतकऱ्यांचे प्रश्न मात्र मांडतच राहणार. कारण माझी जात, धर्म शेतकरी आहे,’ असा नवा सूर त्यांनी आता आळवला आहे. एकीकडे पक्षाच्या विरोधात नाही, असे म्हणायचे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होते आहे, असे म्हणून स्वपक्षाचीच कोंडी करायची, अशी चाल आता पटोले खेळू लागले आहेत. भविष्यात नवा घरोबा करायचा झालाच तर शेतकऱ्यांच्या मुद्दय़ावर बोललो म्हणून मला ही भूमिका घ्यावी लागली, असे सांगायला पटोले मोकळे राहणार यात शंका नाही. गेल्या तीन वर्षांत मोदी व शहांच्या कार्यशैलीविषयी पक्षात कुजबुज बरीच झाली, पण उघडपणे कुणी बोलत नव्हते. ही कोंडी पटोलेंनी फोडली आहे. त्यामुळे भाजप वर्तुळात सध्या बरीच अस्वस्थता आहे. किमान भाजपसाठी तरी भंडारा-गोंदिया आणि बंडखोरी हे समीकरण नवे नाही याचेही स्मरण या निमित्ताने करणे गरजेचे आहे. या दोन जिल्ह्य़ांचे नेतृत्व करणारे प्रा. महादेव शिवणकर हे एकेकाळी भाजपमधील शक्तिशाली नेते होते. गडकरी की मुंडे या वादात त्यांनी मुंडेंच्या पारडय़ात वजन टाकले आणि विदर्भात त्यांच्या खच्चीकरणाचे प्रयत्न सुरू झाले. यामुळे अस्वस्थ झालेल्या शिवणकरांनी मग बहुजनवादाचा जाहीर पुरस्कार करणे सुरू केले. पक्षनेत्यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली. मात्र तोवर जनतेने त्यांची साथ सोडली होती. त्यामुळे त्यांचा विरोध तग धरू शकला नाही. आता राजकारणाबाहेर फेकले गेलेल्या शिवणकरांचा मुलगा प्रफुल्ल पटेलांचा कार्यकर्ता आहे. हा इतिहास पटोलेंना चांगलाच ठाऊक आहे. त्यामुळे त्यांनी विरोधी सूर लावतानाच जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवण्याची स्मार्ट खेळी खेळली आहे. त्यांच्या भवितव्याचा फैसला काहीही होवो, पण आज तरी त्यांना शांत करण्यासाठी पक्षपातळीवर जोमाने प्रयत्न सुरू झाले आहेत. कारण दिल्लीच्या वर्तुळात ते गडकरींचे समर्थक म्हणून ओळखले जातात. पटोले असेच बोलत राहिले तर गडकरीच अडचणीत येतील याची जाणीव पक्षनेत्यांना असल्याने पटोलेंवर कारवाई करण्याऐवजी त्यांना शांत करण्याचे प्रयत्न म्हणूनच सुरू झाले आहेत.