विनय सहस्रबुद्धे

संपूर्ण कार्यकाल पंतप्रधान म्हणून यशस्वीपणे काम केलेले पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान म्हणून अटलजींचं वैशिष्टय़ तर निर्विवाद आहेच, पण काही समस्यांवर मात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला. राज्यसभेच्या निवडणुकीतला घोडेबाजार आणि खुली मत – विक्री यांना पायबंद घालून त्यांनी या निवडणुका पूर्णत: पारदर्शी केल्या. त्यांच्या राजकीय इच्छाशक्तीमुळेच मंत्रिमंडळाच्या सदस्य संख्येवर मर्यादा घालणारा आणि त्यातून पुन्हा एकदा स्वच्छ राजकारणाला चालना देणारा कायदा मंजूर होऊ शकला.

अटलजींना भेटण्याचे प्रसंग तसे विरळच. पण जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा ती भेट दीर्घकाळ स्मरणात राहाणारी ठरली. १९८० च्या जानेवारीत भारतीय जनता पार्टीच्या सपशेल पराभवानंतर अटलजी मुंबईत आले होते. मी तेव्हा ‘माणूस’ साप्ताहिकाचा प्रतिनिधी म्हणून काम करायचो. अटलजी सायनला वेदप्रकाश गोयलांकडे उतरायचे. विद्यार्थी परिषदेमुळे गोयलजींची चांगली ओळख होती. फोन केल्यावर मुलाखतीची वेळही मिळाली. नंतर चांगले तासभर अटलजी  माझ्यासारख्या एका नवजात स्तंभलेखकाशी बोलत होते. मोरारजी देसाईंच्या कार्यशैलीपासून ते जनता पार्टीतील संघ स्वयंसेवकांच्या कथित दुहेरी निष्ठेपर्यंत अनेक विषयांवर ते दिलखुलास बोलले. इतक्या दणदणीत पराभवानंतरच्या निराशेची पुसटशी छायाही मला त्यांच्या मनावर जाणवली नाही.

अटलजींना इतक्या जवळून भेटण्याची, पाहाण्याची माझी ती पहिलीच वेळ होती. मनावर दडपण होतं, पणद अगदी सहजपणे दिवाणावर स्वत:च्या बाजूलाच मला बसायला लावून अटलजींनी ताण हलका केला. ‘‘बोलिए महाराज!’’ असं म्हणून प्रश्न विचारायला सांगितले आणि सहज संवादात मुलाखत पार पडली. शेवटी पराभवाने खचलेल्या पक्ष कार्यकर्त्यांना तुमचा संदेश काय? असं विचारल्यावर हसत म्हणाले; ‘लिख लो!’ आणि नंतर त्या प्रसिद्ध चार ओळी सांगितल्या:-

क्या हार में क्या जीत में,

किंचित नहीं, भयभीत मैं,

कर्तव्य पथ पर जो मिले

यह भी सही; वह भी सही!

नंतर खूप वर्षांनी मी पक्षाच्या राष्ट्रीय  कार्यकारिणीचा सदस्य झाल्यानंतर ते एका भाषणात काही विनोदाने पण तरीही गांभीर्याने जे  म्हणाले होते ते ऐकल्यानंतर मला पुन्हा या अर्थ गर्भ ओळी आठवल्या होत्या. भाषणात ते म्हणाले होते: ‘‘परिश्रमों के बावजूद चुनाव में पार्टि क्यों हारती है यह कई बार समझ में नहीं आता. मगर जैसे हार का पराभव का विश्लेषण होना चाहिए, वैसे जीत का भी होना चाहिए.’’

तसं पाहिलं तर खरोखरच एका विशिष्ट टप्प्यावर ‘हार’ आणि ‘जीत’ यांच्या पलीकडे अटलजी निघून गेले होते. विचारशील आणि विवेकी वृत्तीच्या या नेत्याला प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्हीकडे समदृष्टीने पाहाण्याची असाधारण क्षमता होती. सुधीर नांदगावकर हे निस्सीम  अटल – प्रेमी! अटलजी आणि अडवाणी हे दोघेही हिंदी सिनेमांचे चाहते. वेळ आणि मूड जमून आल्यानंतर कोणता सिनेमा बघायचा? हे ठरविण्यापूर्वी  ते खंदे समीक्षक असलेल्या सुधीर नांदगावकरांना फोन करायचे. २००६ मध्ये नांदगावकरांनी संपादित केलेलं ‘‘राजनीती के उस पार’’ हे अटलजींच्या बिगर – राजकीय विषयांवरील भाषणांच्या संग्रहाचं पुस्तक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने प्रकाशित केलं. संसदेच्या बालयोगी सभागृहात एका दिमाखदार सोहोळ्यात तेव्हाचे उपराष्ट्रपती भैरोसिंग शेखावत यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं. आपल्या अगदी छोटय़ाशा भाषणात अटलजी म्हणाले ‘‘पुस्तक  का नाम राजनीति के उस पार है, मगर मंच पर जो भी बैठे है वह सब राजनीति के इस पार है! मगर इस पार हो या उस पार, राजनीति की मंझधार में सिद्धान्तहीन होकर बहकर नहीं जाना चाहिए!’’

‘रंग माझा वेगळा’ या प्रकारचं आपलं वेगळेपण, आपली वैशिष्टय़पूर्णता  अटलजींनी नित्य कायम राखली. २००६ मध्येच; विकलांग होऊन अंथरुणाला खिळण्याआधी एकदा दिल्लीतल्या इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये कुठल्याशा कार्यक्रमाला ते आले होते. कुणा पत्रकाराने  प्रश्न विचारला की तुम्ही राजकारणातून निवृत्त होणार आहात असं ऐकतोय? चालता – चालता क्षणभर थांबून त्या पत्रकाराकडे पाहात अटलजी म्हणाले: ‘‘मी आणि निवृत्त? मग त्या निवृत्तीचं काय होणार?’’ आणि मग हसत हसत निघून गेले.

ही प्रवृत्तीपरता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होती. त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडींबद्दल त्यांची मानसकन्या आणि तिचे पती अनेकदा बोलायचे. काव्य – शास्त्र – विनोदाची त्यांची  आवड तर सर्व परिचित होती. कलकत्त्याच्या बडा बाजार कुमारसभा ग्रंथालयाच्या सभागृहात त्यांनी नव्वदच्या दशकाच्या पूर्वार्धात अगदी समरसून आपल्या निवडक कविता सादर केल्या होत्या, त्या  यू – टय़ूबवर ऐकणं म्हणजे निखळ आनंद! विनय आपटे त्यांच्या भाषणांचे व्हिडिओ पाहताना हमखास म्हणायचा ‘‘अभिनेताय रे  हा अभिनेता! कसली आवाजाची फेक, किती ते चढ उतार, किती बोलका चेहरा..’’ उगाच नाही पद्मजा फेणाणी आपल्या काव्य गायनात अटलजींची नक्कल करतात तेव्हा हशा आणि टाळ्यांची जणू बरसातच होते!

‘माणूस’ म्हणून नेहमी जमिनीवर पाय ठेवून वावरणारी आणि मनुष्यजीवनाच्या विविध दालनांमधून रसिकतेने लीलया संचार करणारी माणसं सहसा राजकारणाच्या वाटेला जात नाहीत आणि गेलीच तर यशस्वी होत नाहीत. अटलजी हा एक सन्माननीय अपवाद! जनसंघ आणि भाजपचे अध्यक्ष, परराष्ट्रमंत्री, संसद – सदस्य, विरोधी पक्षनेते आणि शेवटी पंतप्रधान म्हणूनही त्यांनी यशस्वीपणे जबाबदाऱ्या सांभाळल्या. संघटना आणि सरकार दोन्ही आघाडय़ांवर त्यांच्या नेतृत्वाची छाप उमटली. व्यावहारिक  राजकारणाची दडपणं पेलतानाही त्यांनी सैद्धान्तिक भूमिकेचं विस्मरण होऊ दिलं नाही!

परराष्ट्रमंत्री या नात्याने त्यांनी भारत – इस्रायल संबंधांची मुहूर्तमेढ रोवली. अलिप्ततावादाचं महत्त्व आणि मर्यादा हे दोन्ही ओळखणारे ते बहुदा पहिले परराष्ट्रमंत्री. हीच विचारांची स्पष्टता पुढे पंतप्रधान झाल्यावर त्यांनी पोखरणची अणुचाचणी घडवून आणतानाही दाखविली. सरकार स्थापन होऊन दोन महिने पूर्ण होण्याच्या आतच त्यांनी शत – प्रतिशत  गोपनीयता राखून एवढा मोठा निर्णय अमलात आणला आणि नंतर अमेरिकेच्या र्निबधांना न जुमानता इतर आघाडय़ांवरही ते लढले.

अटलजी वृत्तीनं लोकतांत्रिक होते आणि लोकशाहीबद्दल त्यांची काही ठाम मतंही होती. पक्षाच्या बैठकींमधून अटलजींचं म्हणणं हा ‘अंतिम शब्द’ असायचा. पण खुद्द अटलजी, ‘पंचों की राय’ मानायचे. पंतप्रधान म्हणून अटलजींच्या कारकीर्दीचं मूल्यमापन करतांना जमेच्या बाजूला अनेक भरभक्कम मुद्दे आहेत हे कोणालाही नाकारता येणार नाही. संपूर्ण कार्यकाल पंतप्रधान म्हणून यशस्वीपणे काम केलेले पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान म्हणून त्यांचं वैशिष्टय़ तर निर्विवाद आहेच, पण वीस – पंचवीस पक्षांची मोट बांधून आणि त्यातही ममता, समता, जयललिता यांच्या सहयोगाने टिकाऊ सरकार चालविणं ही त्यांच्या कौशल्याची कसोटी होती. पण महत्त्वाचे ग्रासून टाकणाऱ्या काही समस्यांवर मात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. राज्यसभेच्या निवडणुकीतला  घोडेबाजार  आणि खुली मत – विक्री यांना पायबंद घालून एकप्रकारे पक्ष व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी त्यांनी या निवडणुका पूर्णत: पारदर्शी केल्या. त्यांच्या राजकीय इच्छाशक्तीमुळेच मंत्रिमंडळाच्या सदस्य – संख्येवर मर्यादा घालणारा आणि त्यातून पुन्हा एकदा स्वच्छ राजकारणाला चालना देणारा कायदा मंजूर होऊ शकला. १९९६  मध्ये आकाशवाणीच्या देशराज चौधरी स्मारक व्याख्यानात बोलतांना अटलजींनी अनेकविध लोकतांत्रिक सुधारणांचा पुरस्कार केला होता. भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीच्या समीक्षेसाठी  त्यांनी एम. एन. वेंकटचलैया समिती नेमून खूप महत्त्वाचे विषय जनचर्चेत आणले. ‘‘आघाडी – धर्म’’ हा शब्द त्यांनीच रुजवला. त्यांच्या कौशल्यपूर्ण हाताळणीमुळेच त्यांच्या कारकीर्दीत झारखंड, छत्तीसगड आणि उत्तराखंडासारखी तीन छोटी राज्ये  कोणतेही मोठे वादंग न माजता, हिंसेचा उद्रेक उफाळू न देता अस्तित्वात येऊ शकली हेही लक्षात ठेवायला हवे.

अटलजींचे सामाजिक भानही अतिशय तल्लख होते. भाजपचे पहिले अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी एका भीषण दलित हत्याकांडाच्या विरोधात आपला आक्रोश व्यक्त करण्यासाठी एक पदयात्रा काढली होती. अनुसूचित जाती – जमातींच्या समाजबांधवांना कोणाच्या मेहेरबानीची नव्हे तर न्यायाची गरज आहे हे जाणून त्यांनी समाज – कल्याण मंत्रालयाला अतिशय अर्थवाही असे ‘सामाजिक – न्याय मंत्रालय असे नाव दिले. भाजपच्या, वांद्रे रेक्लेमेशन परिसरात झालेल्या स्थापना – अधिवेशन स्थळालाही नाव होते ते ‘समता नगर’, हे!

१३ एप्रिल १९९१ या दिवशी समता – परिषदेच्या  व्यासपीठावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात त्यांनी डॉ. बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहताना खूप महत्त्वाच्या मुद्दय़ांची चर्चा केली होती. संविधानात तरतूद असलेल्या वयस्क मताधिकाराच्या अधिकारा मागची दृष्टी स्पष्ट करतांना अटलजी म्हणाले होते, ‘‘भिन्न प्रकृती, प्राकृतिक विषमता, बौद्धिक क्षेत्रातील असमानता, आर्थिकदृष्टय़ा कोणी धनवान आणि कोणी निर्धन, असं असूनही सर्वाना सारखाच मताधिकार का? तर सर्वामध्ये   वसणारा आत्मा एकच आहे. त्यादृष्टीने लोकशाहीचा आत्माही आध्यात्मिकच आहे!’’

अटलजी म्हणजे हे एवढे सारे आहे; होते! एखाद्याच्या निधनानंतर देशाची आणि समाजाची ‘अपूरणीय क्षति’ झाल्याचं सांगितलं जातं. पण अटलजींच्या बाबतीत ते अक्षरश: खरं आहे. संघर्ष आणि समन्वय या दोन्हीचा यशस्वी मेळ घालणाऱ्या या असाधारण नेत्यांना  एका कवितेत जे म्हटले ते सर्वासाठीचे पाथेय आहे..

‘‘आदमी को चाहिए कि वह जुझे,

परिस्थितियोंसे लडे

एक स्वप्न टूटे  तो दुसरा गढे!’’

(लेखक भाजपचे  राज्यसभा सदस्य आहेत.)

vinays57@gmail.com