28 May 2020

News Flash

वैदर्भीय मतदारांचा भाजपला जोरदार धक्का

नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह; नितीन गडकरी यांना डावलणे भोवले

नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह; नितीन गडकरी यांना डावलणे भोवले

देवेंद्र गावंडे

गेल्या वेळी भाजपच्या पारडय़ात भरभरून मतांचे दान टाकणाऱ्या वैदर्भीय मतदारांनी या वेळी मात्र भाजपला जोरदार झटका दिला आहे. मतदारांचा हा कौल भाजपच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उभा करणारा आहे. मोठा जनाधार असलेल्या नितीन गडकरींना बाजूला सारणे, तेली तसेच ओबीसी समाजाची नाराजी भाजपला भोवल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. काँग्रेसला विदर्भात कमी जागा मिळाल्या असल्या तरी या पक्षाच्या मतांमध्ये भरघोस वाढ झाली आहे. काँग्रेसने ही निवडणूक थोडी गांभीर्याने घेतली असती तर चित्र आणखी वेगळे दिसले असते.

राज्यातील सत्ता स्थापनेचा मार्ग विदर्भातून जातो ही उक्ती सार्थ ठरवत भाजपने गेल्या वेळी विदर्भातून ६२ पैकी ४४ जागा स्वतंत्रपणे लढून जिंकल्या होत्या. या वेळी युती पन्नासचा आकडा गाठेल, असा दावा भाजपकडून सातत्याने केला जात होता. जनतेने तो फोल ठरवला आहे. भाजपला येथे निम्म्या जागासुद्धा जिंकता आल्या नाहीत. नागपूर जिल्हा हा भाजपचा गड म्हणून ओळखला जातो. या वेळी काँग्रेसने या गडालाच सुरुंग लावला आहे. शहरातील दोन जागा काँग्रेसने हिसकावल्या, तर नागपूर ग्रामीणमध्ये भाजपची पार वाताहत झाली. खुद्द मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघात गेल्या वेळचे मताधिक्य राखता आले नाही. ग्रामीणचे नेतृत्व करणारे चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारणे भाजपला चांगलेच महागात पडले. भंडारा-गोंदियाची जबाबदारी नागपूरच्या परिणय फुकेंकडे देणे ही घोडचूक होती, हे तेथील निकालातून दिसून आले. गडचिरोलीत भाजपने बऱ्यापैकी यश मिळवले पण सुधीर मुनगंटीवारांच्या चंद्रपुरात भाजपला मोठा फटका बसला. गेली अनेक वर्षे काँग्रेसचा गड असलेल्या यवतमाळात भाजपने गेल्या वेळी निर्भेळ यश मिळवले होते. या वेळी काँग्रेसने तेथे पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले आहे. राज्यमंत्री मदन येरावार यांचा निसटता विजय झाला आहे. वध्र्यात गेल्या वेळचेच उमेदवार रिंगणात होते. तेथे काँग्रेसची कामगिरी ढेपाळली. अमरावतीत या वेळी काँग्रेसने अधिक जागा जिंकत युतीला धक्का दिला आहे. प्रहारचे बच्चू कडू यांनी मेळघाटमध्ये पक्षाला विजय मिळवून देत प्रहार संघटनेला बळकटी दिली. गेल्या पाच वर्षांत भाजपने विदर्भात विकास कामे करताना वऱ्हाडाकडे कमालीचे दुर्लक्ष केले. त्याचा फटका अमरावतीत बसला, पण अकोला, बुलढाणा, वाशीम या जिल्ह्य़ात मात्र भाजपने या वेळीसुद्धा चांगले यश मिळवले. विकासकामे व निवडणुकीतील विजय याचा फारसा संबंध नसतो, हे पश्चिम वऱ्हाडातील या यशाने दाखवून दिले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत विदर्भात काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली होती, पण पक्षांच्या मतांमध्ये प्रचंड वाढ झाली होती. हा धोका भाजपला ओळखता आला नाही. त्याचा फटका आता बसला आहे. या वेळीसुद्धा काँग्रेसने जागा कमी जिंकल्या, पण पक्षाच्या मतांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. नागपूर शहरात भाजपला काही ठिकाणी काठावर विजय मिळाला तो यामुळेच. दलित व बहुजन मतदार हा काँग्रेसचा विदर्भातील आधार होता. गेली दहा वर्षे पक्षापासून दुरावलेला हा मतदार या वेळी काँग्रेसकडे वळल्याचे निकालातून दिसून आले. लोकसभेच्या वेळी वंचितने काँग्रेसचे समीकरण बिघडवले होते. वंचित भाजपची ‘बी टीम’ आहे, असा प्रचार नंतर जोरदारपणे सुरू झाला. त्यामुळे या वेळी वंचितची जादू विदर्भात चालली नाही व भाजपच्या जागा कमी झाल्या. विदर्भात नितीन गडकरींना मानणारा मोठा वर्ग आहे. विदर्भातील भाजपवर त्यांचाच प्रभाव आहे. या वेळी गडकरींना दुय्यम स्थान दिले जात असल्याचे अनेकांच्या लक्षात आले. गडकरी समर्थक अशी ओळख असलेल्या बावनकुळेंना उमेदवारी नाकारण्याच्या घटनेकडेसुद्धा याच दृष्टिकोनातून बघितले गेले. त्याचा फटका भाजपला बसला. गडकरींनी विदर्भात भरपूर सभा घेतल्या, पण निवडणुकीची सूत्रे त्यांच्या हाती नव्हती. जनाधार यात्रेत ते नव्हते. मुख्यमंत्री फडणवीस हेच भाजपचा एकमेव चेहरा होते. मराठा आरक्षणामुळे ओबीसी व खुल्या प्रवर्गावर अन्याय झाल्याची भावना विदर्भात होती. त्यामुळे भाजपचा परंपरागत मतदार या वेळी मतदानासाठी बाहेर पडला नाही. संघपुरस्कृत ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ हे आंदोलनसुद्धा भाजपसमोर अडचण निर्माण करणारे ठरले. दुसरीकडे मतदानासाठी नेहमी बाहेर पडणारा गरीब वर्ग काँग्रेसकडे गेल्याचे दिसून आले. विदर्भातील ग्रामीण भागात सरकारविरुद्ध रोष होता. लोकसभेच्या वेळी राष्ट्रभक्तीच्या फुग्याने तो थोपवून धरला. या वेळी मात्र ३७०ची मात्रा चालली नाही व हा वर्ग विरोधकांकडे वळता झाला. विदर्भाकडे सर्वाधिक लक्ष देऊन तसेच विकासकामांचा झंझावात निर्माण करूनसुद्धा भाजपला मोठा फटका या निकालाने दिला आहे.

* काँग्रेसने नागपूर या भाजपच्या गडालाच सुरुंग लावला, शहरातील दोन जागा काँग्रेसने हिसकावल्या, तर नागपूर ग्रामीणमध्ये भाजपची पार वाताहत

* ग्रामीणचे नेतृत्व करणारे चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारणे भाजपला चांगलेच महागात

* भंडारा-गोंदियाची जबाबदारी नागपूरच्या परिणय फुकेंकडे देणे ही घोडचूक होती, हे निकालातून स्पष्ट

* अनेक वर्षे काँग्रेसचा गड असलेल्या यवतमाळात भाजपने गेल्या वेळी निर्भेळ यश मिळवले होते. या वेळी काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित

* गडचिरोलीत भाजपने बऱ्यापैकी यश मिळवले, पण  मुनगंटीवारांच्या चंद्रपुरात भाजपला मोठा फटका

* वध्र्यात गेल्या वेळचेच उमेदवार रिंगणात असल्याने काँग्रेसची कामगिरी ढेपाळली

* अमरावतीत या वेळी काँग्रेसचा अधिक जागा जिंकत युतीला धक्का

* दलित व बहुजन मतदार हा काँग्रेसचा विदर्भातील आधार होता. गेली दहा वर्षे पक्षापासून दुरावलेला हा मतदार या वेळी काँग्रेसकडे वळला

विदर्भाने आयाराम -गयारामांना नाकारले

विदर्भातील जनतेने यावेळी आयाराम-गयारामांना सुद्धा नाकारले. गोंदियाचे काँग्रेसचे आमदार गोपाल अग्रवाल अगदी शेवटच्या क्षणी भाजपमध्ये गेले. त्यांचा पराभव भाजपच्या जिल्हाध्यक्षाने बंडखोरी करून केला. राष्ट्रवादीचे वध्र्यातील नेते सुरेश देशमुख यांचे चिरंजीव समीर शिवसेनेकडून देवळीत लढले. त्यांचाही पराभव झाला. राष्ट्रवादीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार ऐनवेळी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरून शिवसेनेत दाखल झाले. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरीत त्यांचा पराभव केला. गेल्यावेळी ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये गेलेले वरोराचे संजय देवतळे यावेळी मुख्यमंत्र्यांच्याच सांगण्यावरून शिवसेनेत गेले. काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी व काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा यांनी देवतळेंचा भद्रावती-वरोरा मतदारसंघात पराभव केला.

मुख्यमंत्र्यांचे मताधिक्य घटले

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजय मिळवला आहे. मात्र, मुख्यमंत्री म्हणून वलय असतानाही २०१४ च्या तुलनेत त्यांचे मताधिक्य आठ हजारांहून अधिक मतांनी कमी झाले आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वात ही निवडणूक भाजपने लढवली.  राज्यभर त्यांनी ‘महाजनादेश यात्रा’ काढली आणि ‘पुन्हा आणूया आपले सरकार’ अशी घोषणा दिली. मात्र, त्यांनाच  मतदारांनी गेल्या वेळपेक्षा कमी मते मिळाली आहेत. त्यांना  ४९ हजार ४८२ हजारांची आघाडी असून एकूण १,०८,२५६ मते (२७ व्या फेरी अखेर) मिळाली. तर काँग्रेसचे डॉ. आशीष देशमुख यांनी ५८ हजार ७७४ हजार मते घेतली. फडणवीस यांना २०१४ मध्ये ५८ हजार ९४२ मतांची आघाडी होती. त्यांनी भौतिक विकास आणि राष्ट्रभक्तीच्या मुद्यांवर भर दिला. त्यापूर्वी त्यांनी विधानसभेतच मी पुन्हा येईन, असे गर्जना केली होती. पण, त्यांच्या मतदारसंघात कमी मतदान झाले. निकालानंतर त्यांचे मताधिक्यही कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्रीपदावर नसताना त्यांना ५८ हजार ९४२ मते मिळाली होती. पण मुख्यमंत्री म्हणून निवडणूक लढवताना त्यांना ४९ हजार ४८२ मते मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पवारांची जादू विदर्भातही

झंझावती प्रचारामुळे या निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा करिष्मा विदर्भातही दिसून आला. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी विदर्भात दुय्यम भूमिकेत वावरत आला आहे. यावेळीसुद्धा या पक्षाने विदर्भात केवळ १२ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ६ जागा जिंकल्या. गेल्यावेळी या पक्षाला केवळ १ जागा मिळाली होती. ऐन प्रचाराच्या काळात सरकारने राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याविरुद्ध ईडीचे शुक्लकाष्ठ लावले. त्याला तोंड देत पटेलांनी भंडारा व गोंदिया या त्यांच्या गृह जिल्ह्य़ात उल्लेखनीय यश मिळवले. त्या तुलनेत भाजपसोबत रिंगणात उतरलेल्या शिवसेनेला मात्र गेल्यावेळेएवढय़ाच ४ जागा यावेळी जिंकता आल्या. शरद पवारांनी भाजप-शिवसेनेशी एकहाती टक्कर घेत महाराष्ट्रात अनेक सभा घेतल्या. त्यांची भरपावसात झालेली सभा तर चर्चेचा विषया झाला होता.

नाना पटोले अखेर विधानसभेत!

२०१४ ला भाजपच्या उमेदवारीवर खासदार झाल्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीच पंगा घेत पक्षाचा त्याग करत काँग्रेसमध्ये सामील झालेले नाना पटोले  विधानसभेत पोहचले. त्यांनी साकोलीत मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी व राज्यमंत्री परिणय फुके यांचा निसटत्या फरकाने पराभव केला. पटोले यांनी शेतकरी तसेच ओबीसींच्या मुद्यावर भाजपचा त्याग केला होता. नंतर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात त्यांनी आघाडीचे मधुकर कुकडे यांना निवडून आणले होते. काँग्रेसने त्यांच्या या भूमिकेची दखल घेत त्यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नागपुरातून उमेदवारी दिली होती. येथे त्यांचा नितीन गडकरी यांनी पराभव केला. त्यानंतर नाना पुन्हा भंडारा जिल्ह्य़ाच्या राजकारणात सक्रिय झाले. त्यांना पराभूत करण्यासाठी भाजपने जंगजंग पछाडले. त्यासाठी खास मोदींची सभा साकोलीत आयोजित करण्यात आली होती. तरीही नाना पुरून उरले.

बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे निलंबित

नागपूर : बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्यासह राज्यात बसपाला एकाही जागेवर यश मिळविता आले नाही. त्यामुळे साखरे यांना निवडणुकीचे निकाल जाहीर होताच पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, साखरे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नागपुरात एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बहुजन समाज पक्षाने राज्यात २८८ मतदार संघात उमेदवार उभे केले होते. परंतु पक्षाला एकाही जागेवर यश मिळविता आले नाही. सुरेश साखरे यांच्यावर राज्याची जबाबदारी असताना त्यांनी उत्तर नागपुरातून निवडणूक लढविली. त्यांना २३ हजार ३३३ मते घेत तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. बसपाला विदर्भासह राज्यात कुठल्याच मतदार संघात यश मिळाले नसल्याने निवडणुकीचे निकाल लागण्याच्या आधी पक्षाचे प्रदेश प्रभारी आणि राज्यसभा खासदार अशोक सिद्धार्थ यांनी साखर यांना निलंबित केले. तसे पत्र त्यांना पाठविले. दरम्यान, साखरे यांना पराभवाचा धक्का सहन न झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांना दुर्गावती नगरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2019 4:35 am

Web Title: bjp suffers major setback in vidarbha maharashtra election result 2019 zws 70
Next Stories
1 महाराष्ट्राच्या राजकारणाचं व्याकरण बदलवणारी निवडणूक
2 ठाण्यात शिंदेशाहीला धक्का
3 तीन मंत्री हरले, पण मराठवाडय़ाने महायुतीला तारले
Just Now!
X