‘मेरे अंदर जिन है, उस को खुश करेगी, तो पैसो की बारिश होगी! अगर जिन को नाखुश करेगी, तो पूरा घर बरबाद होगा’, अशी भीती दाखवत आणि अचाट-अतक्र्य ‘शक्ती’ (जिन)च्या बतावण्या करीत अल्पवयीन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यास मागेपुढे न पाहणाऱ्या भोंदूबाबाची भयावह कहाणी नुकतीच डोंबिवलीसारख्या ‘सुसंस्कृत आणि सुशिक्षित’ म्हणविणाऱ्या शहरात उघडकीस आली आहे. एका विमा कंपनीत एजंटाचे काम करीत गेली १८ वर्षे दैवीशक्तीच्या नावाने बिनदिक्कतपणे जादूटोण्यासारख्याच भूलथापा देणाऱ्या भोंदू बाबाविषयीचा हा वृत्तान्त..

डोंबिवलीच्या गांधीनगरमधील वसंतविहार ही उच्च-मध्यमवर्गीयांची सोसायटी म्हणून ओळखली जाते. याच सोसायटीच्या एका इमारतीत विजय ठोंबरे राहतो. तो इथे गेल्या १५ ते २० वर्षांपासून वास्तव्यास आहे. जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण असलेला विजय एका विमा कंपनीत एजंट म्हणून काम करतो, तर त्याची पत्नी एका खासगी कंपनीत सिव्हिल ड्राफ्ट्समनचे काम करते. त्याला दोन मुले आहेत. त्यापैकी १७ वर्षीय मुलगी महाविद्यालयात, तर ११ वर्षीय मुलगा शाळेत शिकतो. असा त्याचा ‘हम दो हमारे दो’ असा परिवार. त्याला देवभक्तीचा नाद. त्याच्या घरातील देवदेवतांचे फोटो पाहिले की त्याचा अंदाज येतो. तो मूळचा कोकणातील मालवणचा. गावातील देवीची आपल्यावर कृपा झाली आहे आणि त्यातून दैवी शक्ती मिळाली आहे. या दैवी शक्तीमुळे आपल्याला सर्वाच्या मनातल्या व्यथा कळतात आणि त्या संकटातून त्याला बाहेर काढता येते. एवढय़ावर न थांबvv02ता तो भोंदूगिरीचा उद्योग चालवू लागला. ‘पैशांचा पाऊस पाडतो’ अशा चमत्काराच्या भूलथापा देऊ लागला.
या चौकोनी कुटुंबातील कर्त्यांच्या ‘भक्ती’चे रूपांतर ‘शक्ती’त कसे काय झाले, हा प्रश्न आहेच. पण त्याने काय ‘चमत्कार’ केले, त्याने सांगितलेली कहाणी ही ‘जबाब’ मानायची का, असा प्रश्न सध्या पोलिसांपुढे आहे.. पोलिसांनीच त्याला पकडण्यासाठी सापळा रचला असताना, आपण किमान २२ वेळा ‘पैशांचा पाऊस’ पाडल्याचा दावा त्याने स्वतच केला होता.
हा दावा खरा मानायचा, तर आज ४२ वर्षांचा असलेला विजय हा साधारण २४ वर्षांचा तरुण होता, लग्नानंतर बाप बनणार म्हणून खुशीत होता, तेव्हापासून त्याने कुमारिकांचा वापर करून पैशांचा पाऊस पाडण्याचा हा उद्योग सुरू केला, असा हिशेब लावता येतो.
जर इतकी वर्षे त्याची भोंदूगिरी पोलिसांना सुगावाही न लागता सुखेनैव सुरू होती, तर आताच पोलीस सापळा कसा काय लावू शकले? या प्रश्नाच्या उत्तराची कहाणी सध्या पूर्णत उलगडली आहे.
ही कहाणी सुरू होते सुमारे दोन वर्षांपूर्वीपासून आणि डोंबिवलीजवळच्या मुंब्रा भागातून.

मुंब्रा येथील दत्तनगर परिसरात राहणाऱ्या जानकी हेंदोळे हिची विजयशी ओळख झाली. पती, एक मुलगा आणि मुलगी, असे तिचे कुटुंब. ती एका कॅटर्समध्ये वाढपिणीचे (वेट्रेस) तर पती इमारतींचे काम (कडियाकाम) करतो. जानकीही देवभक्तच, पण अश्रद्ध लोक जिला ‘अंधश्रद्धाळू’च ठरवतील अशी.. म्हणजे अंगात येणे, चमत्कार होणे यावर विश्वास ठेवणारी. जानकीची मोठी मुलगी सतत आजारी असायची. विजयच्या अंगात देवी येते, हे तिला कोठून तरी कळले. हाही उपाय करून पाहू, म्हणून जानकी आपल्या आजारी मुलीला विजयकडे घेऊन गेली होती. यातूनच तिची विजयसोबत ओळख वाढली.vv01एके दिवशी विजयने जानकीकडे, ‘मी पैशांचा पाऊस पाडतो,’ अशी बतावणी केली. कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातील जानकी त्याच्या बोलण्याने भारावून गेली. पैशांचा पाऊस झाला तर कसे श्रीमंत होऊ याची स्वप्ने ती रंगवू लागली. पण पैशांचा पाऊस पाडण्यासाठी त्याने काही अटी सांगितल्या. त्या मात्र फारच भयावह होत्या. पैशांचा पाऊस पाडायचा असेल तर त्या विधीकरिता कुमारिका लागेल. ‘माझी दैवी शक्ती सांगेल, त्याचप्रमाणे त्या कुमारिकेला करावे लागेल. ती त्याप्रमाणे वागली तर पैशांचा पाऊस पडेल’.. अशा बतावण्या त्याने केल्या. त्याच्या बोलण्यावर १०० टक्के विश्वास ठेवून जानकीने पैशाचा पाऊस पाडून घ्यायचे ठरवले आणि विधीसाठी कुमारिकेचा शोध घेऊ लागली. शोधाशोध सुरू असतानाच तिची नजर परिसरातील १५ वर्षीय पिंकीवर (बदललेले नाव) पडली.
 वडील, सावत्र आई, तीन सख्खी भावंडे आणि एक सावत्र भाऊ असे तिचे कुटुंब. तिचे वडील रिक्षाचालक असून यातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने तिचे फारसे शिक्षण झाले नाही. पण, वडिलांसोबत घरखर्च भागविण्यासाठी तीही काम करत असे. जानकीप्रमाणेच ‘पिंकी’देखील केटर्सकडे वाढपिणीचे काम करून ती वडिलांना काहीसा आधार देते. एकाच कॅटररकडे काम करीत असल्यामुळे जानकीशी या ‘पिंकी’ची ओळख झाली. तिच्या परिस्थितीचा फायदा घेऊन जानकीने विधीकरिता तिची निवड करायचे ठरविले. मग तिच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना गळ घातली. विधीमुळे एक कोटी रुपये इतका पैशांचा पाऊस पडणार असून त्यापैकी काही हिस्सा तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारेल, अशा योजना त्यांच्यापुढे ठेवून जानकीने अखेर तिच्या कुटुंबाची संमती मिळवली. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी कुमारिका तर मिळाली; पण त्या विधीकरिता पैसे खर्च करण्याची जानकीची ऐपत नव्हती. त्यामुळे या विधीकरिता पैसे खर्च करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू झाला.
पैशाच्या शोधाशोधीत जो काही वेळ गेला, तो महत्त्वाचा आहे. कारण याच काळात या प्रकरणाची माहिती ठाण्याचे सह पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्यापर्यंत पोहोचली.

सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या डोंबिवलीतील भोंदूबाबाचा प्रकार ऐकून पोलिसांनाही धक्काच बसला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लक्ष्मीनारायण यांनी ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटकडे तपास सुपूर्द केला. त्या विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. जानकी पैशांचा पाऊस पाडण्याकरिता कराव्या लागणाऱ्या विधीसाठी पैसे खर्च करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहे, vv04असे त्यांना समजले. नेमके हेच हेरून त्यांनी भोंदूबाबाचा जादूटोणा उघडकीस आणण्यासाठी सापळा रचला. ‘इंडियन जस्टिस मिशन’ या कुणाला फार माहीत नसलेल्या, पण लैंगिक शोषणाविरुद्ध काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या एक प्रतिनिधीला त्यांनी जानकीकडे पाठविले.
जानकीकडे पोहोचला, तो एक ‘गुजराती व्यापारी’.. धंद्यात खोट आल्यामुळे जेरीस आलेला हा व्यापारी जानकीला सांगू लागला, की मोठय़ा रकमेची आपल्याला गरज असल्यामुळे मी मदत शोधतो आहे. कुणी तरी तुमचे नाव सांगितले, त्यामुळे पैशांचा पाऊस पडण्याच्या विधीसाठी काही पैसे लावण्यास आपण तयार आहोत, असे त्याने जानकीला सांगितले. जानकी या सापळ्यात अडकली. पैशांचा पाऊस पाडण्याच्या विधीकरिता पैसै खर्च करणारा स्वत:हून पुढे आल्याने ती फारच खूश झाली. विधी करण्यासाठी साधारण एप्रिलच्या तिसऱ्या आठवडय़ापासून सलग आठ दिवस प्रयत्न सुरू होते. मे महिन्याच्या सुरुवातीला हा व्यापारी तिच्या संपर्कात आला.
जानकीची प्रतीक्षा अखेर ७ मे रोजीच्या गुरुवारी संपणार होती.. आणि पोलिसांचीही!

त्या गुरुवारी विजयच्या घरात कुणीच नव्हते. पत्नी आणि मुलगी घराबाहेर गेली होती. तर मुलगा सुट्टीनिमित्ताने गावी गेला आहे. हीच संधी साधत विजयने घरामध्येच हा विधी करायचे ठरविले. ठरल्याप्रमाणे जानकी सर्वाना घेऊन आली. त्यापाठोपाठ पोलिसांनीही त्यांच्या घराच्या परिसरात सापळा रचला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक कमालउद्दीन शेख, राजीव मोरे, महिला पोलीस कर्मचारी आशा हरड, नम्रता देसाई आणि कौसर मुल्ला आदींचे पथक घराबाहेर दबा धरून बसले होते. अर्थात अशा प्रकारे, की वसंतविहार सोसायटीतल्या लोकांनाही एवढी माणसे कशाला आली, याची शंका आली नाही.
याच सोसायटीमधल्या स्वतच्या घरात, पिंकीला बंद खोलीत नेऊन विजयने तिच्याकडे विधीच्या नावाखाली लैंगिक सुखाची मागणी केली. मात्र पिंकीने त्यास नकार दिला. त्यामुळे त्याने ‘मेरे अंदर जिन है, उस को खुश करेगी, तो पैसों की बारिश होगी! अगर जिन को नाखुश करेगी, तो पूरा घर बरबाद होगा’, अशी भीती दाखवली. आतापर्यंत २३ कुमारिकांसोबत असा विधी केला असून त्यांच्या घरात भरभराट झाल्याची बढाईही विजयने तिच्यासमोर मारली. दैवी शक्तीच्या बतावणीपेक्षा त्याच्या धमक्यांमुळेच ती विधीसाठी तयार झाली. पण, या विधीला सुरुवात होण्याआधीच बाहेर उभ्या असलेल्या पथकाने घरात प्रवेश केला आणि पिंकीची त्याच्या तावडीतून सुटका केली.

‘पिंकी’ आता बाल अभीक्षणगृहात आहे. विजय आणि जानकीला पोलिसांनी अटक केली आहेच, पण ‘पिंकी’चे वडील, सावत्र आई, आजी या साऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हा गुन्हा केवळ बाललैंगिक शोषणापुरता मर्यादित नाही. बाललैंगिक शोषण रोखण्यासाठीच्या (प्रिव्हेन्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस अ‍ॅक्ट किंवा ‘पॉक्सो’) कायदय़ातील तरतुदी आणि संभोगासाठी अपहरण केल्याबद्दलचे फौजदारी कायद्यातील कलम ३६६  अन्वये विजय ठोंबरेवर गुन्हा दाखल आहेच, पण जादूटोणाविरोधी कायद्यातील कलमेही त्याच्यावर लावण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
उद्या काय होणार, हे शब्दश अधिक महत्त्वाचे आहे.
कारण उद्या, १८ मेच्या सोमवारी, ‘पैशांच्या पावसा’साठी एका १५ वर्षांच्या मुलीचे आयुष्यच उद्ध्वस्त करायला निघालेल्या दोघा आरोपींना आणि त्या मुलीच्या नातेवाईकांना मिळालेल्या पोलीस कोठडीची मुदत संपते. कायद्याच्या दरबारात या प्रकरणाला किती गती मिळणार, हे ठरवणारा निर्णय उद्या होणार आहे.
न्याययंत्रणा आणि पोलीस, त्यांचे काम त्यांच्या पद्धतीने करतीलच. पण आपल्या राज्यातील लोक डोळसपणेच श्रद्धा ठेवत असल्यावरचा जो काही विश्वास महाराष्ट्रीयांना आहे, त्याला हादरा कोठूनही बसू शकतो, एवढे या प्रकरणाने दाखवून दिले आहे.
-नीलेश पानमंद