मराठी प्रकाशक परिषदेचे आठवे संमेलन कोल्हापूर येथे २९ व ३० एप्रिल १९९५ रोजी झाले. संत साहित्याचे अभ्यासक, व्याख्याते, निरुपणकार व प्रकाशक ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर संमेलनाचे अध्यक्ष होते. साळगावकर यांच्या अध्यक्षीय भाषणातील काही भाग..

मराठीत ग्रंथप्रकाशन या व्यवसायाला प्रतिष्ठा आहे. मराठी पुस्तकांची केवळ आंतरिक गुणवत्ताच नव्हे तर बर्हिरगाचीही गुणवत्ता अव्वल दर्जाची ठरावी म्हणून आपल्या व्यवसायातील आधीच्या पिढीने किती जागरूक प्रयत्न केले ते आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. ग्रंथप्रकाशन हा व्यवसाय मनाची मशागत करणारा आहे. हा केवळ पैसे कमाविण्याचा मार्ग नाही. इतर क्षेत्रांतील उत्पादक म्हणजे कपडा, साबण, औषधे, अन्नपदार्थ तयार करणाऱ्यांचा आपल्या ग्राहकांच्या बाह्य़ जीवनाशी म्हणजे देहाशी संबंध येतो. आपल्या व्यवसायाचा संबंध मनाशी आहे. मराठी वाचकांची मने अधिक उन्नत, अधिक सुसंस्कृत व्हावीत म्हणून आपण प्रत्नशील असतो.

आपण ग्रंथप्रकाशनातून लोकांच्या ज्ञानाची भूक भागवितो. ‘नही ज्ञानेन सदृशं पवित्रं इह विद्यते’ हे गीतेतील वचन ज्ञानाची थोरवी सांगणारे आहे. स्वामी विवेकानंदांनी ‘ग्रंथ हे राष्ट्राचे गुरू होत’ असे म्हटले आहे. आपण प्रकाशन हा व्यवसाय करीत असलो तरी त्यात धंद्यापेक्षा धर्माचा भाग अधिक आहे. आर्थिक यशाच्या मागे लागून व्यावसायिक नीतिमूल्यांचा पाठपुरावा करण्याचे कर्तव्य आपण विसरत चाललो आहोत का? हे आपले आपणच आत्मपरीक्षण करून ठरविले पाहिजे. आपल्या व्यवसायातील अनिष्ट प्रवृत्तींचा बीमोड करण्यासाठी आपण स्वत:च स्वत:ला शिस्त लावून घेतली पाहिजे. मराठीत प्रतिवर्षी दोन हजारांच्या आसपास पुस्तके प्रसिद्ध होतात. ह्य़ापैकी आठशे ते नऊशे पुस्तके ही धार्मिक पुस्तकांचे पुनर्मुद्रण अशा स्वरूपाची असतात. धार्मिक पुस्तकांचा खप अलीकडे बराच वाढला आहे आणि तो प्रतिवर्षी वाढतो आहे. महाराष्ट्राचे जे मानबिंदू आहेत अशा शिवछत्रपती, समर्थ, तुकाराम ह्य़ांच्या संबंधातील पुस्तके नेहमीच खपत असतात. उरलेली जी बाराशे पुस्तके आहेत त्यातही कादंबऱ्यांचे प्रमाण अधिक असते. प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तके हाती घेऊन त्यांची विक्री अधिकाधिक कशी होईल ते आपल्या संघटनेने पाहिले पाहिजे. एकदा ग्राहक वाढला, नवीन पुस्तके विकत घेण्याची आस्था आणि गरज निर्माण झाली की एकूण ग्रंथव्यवहाराला बरे दिवस येतील. ग्रंथव्यवहार हा धंद्यापेक्षा धर्माचा भाग अधिक असलेला व्यवहार आहे हे ध्यानी घेऊन आपण वागलो तर आपल्या प्रयत्नांना एक वेगळे अधिष्ठान लाभेल.

ग्रंथ व्यवसायाचा संस्कृतीशी तसेच राष्ट्राच्या प्रगतीशी घनिष्ठ संबंध आहे. वैचरिक संपन्नता वाढविण्याबरोबरच मनाला सुसंस्कृत करणे, अधिक उन्नत करणे हे वाङ्मयाचे अंतिम प्रयोजन असते. विचारांची देवाणघेवाण होऊन नव्या वाचकाला विविध मतप्रणालींचा परिचय करून देणे तसेच संस्कृतीच्या अंगोपांगांची माहिती देऊन त्याला आत्मिक आनंदाचा अनुभव घेण्यास समर्थ करणे हे साहित्याचे प्रमुख कार्य आहे. माणसे नुसती संपन्न झाली की त्यांच्या मनाचा ओढा हा चैनबाजी, व्यसनाधीनता अशा हिणकस गोष्टींकडे वळू लागतो. पाण्याचा स्वभाव जसा खालच्या दिशेने वाहणारा आहे तसेच माणसाचे मन अध:पतनाच्या दिशेने झेपावत असते. त्याचे उन्नयन करणे, त्याला वरच्या पातळीवर नेणे हे साहित्याचे काम आहे.

ग्राहकाला सवलतीची किंमत म्हणून आपण जी देतो तिचेही स्वरूप निश्चित होणे जरुरीचे आहे. पुस्तकाच्या किमती कोणी किती ठेवाव्यात ह्य़ावर महाराष्ट्रात काही बंधन नाही. माझ्या माहितीप्रमाणे असे बंधन गुजराती भाषेत आहे. मराठीतही प्रत्येक पृष्ठामागे किंवा फॉर्ममागे पुस्तकांची किंमत किती असावी ह्य़ाबद्दल एक ढोबळ संकेत पाळला जावा, सध्या दुर्दैवाने तो तसा नाही. असे संकेत रूढ झाले तरी पुस्तकावर आगाऊ नोंदणीसाठी जी मनमानी सवलत दिली जाते त्यावर आपोआपच अंकुश येईल. असा अंकुश असणे परिणामी सर्वाच्याच हिताचे आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. पुस्तके अधिकाधिक खपावीत म्हणून प्रयत्न करताना केवळ सवलतींवर भर देऊन चालणार नाही. त्यासाठी वेगवेगळी प्रचारमाध्यमे धुंडाळावी लागतील.

आपण प्रकाशित करत असलेल्या पुस्तकाबद्दल जाणकारांचे काय मत आहे, त्या पुस्तकाचे वैशिष्टय़ काय? हे सर्व आपल्या संभाव्य ग्राहकास आपण कळवू शकलो पाहिजे. त्यांच्याशी संपर्क साधला गेला पाहिजे.

आपला ग्राहक वर्ग वाढविणे ही गोष्ट तशी सोपी नाही. तो मार्ग खडतर आहे. परिश्रमाचा आहे, पण तरीही शक्य आहे. यशाचा ‘शॉर्ट कट’ सोपा असला तरी तो अल्पजीवी असतो. आपणास शाश्वत यश मिळवायचे असेल, आपल्या व्यवसायाला चिरकाल स्थैर्य आणि सुबत्ता प्राप्त व्हावी अशी मनापासूनची इच्छा असेल तर काही काळ आपण जोरदार प्रयत्न करणे हे

आवश्यक आहे. हे कसे करता येईल त्याचा विचार सर्वानी अगोदरपासून करावा.

(जनशक्ती वाचक चळवळ यांनी प्रकाशित केलेल्या ‘मराठी प्रकाशक संमेलन अध्यक्षीय भाषणे-संपादक श्याम देशपांडे’ या पुस्तकावरून साभार)

प्रायोजक : ‘लोकसत्ता’ आयोजित आणि ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत व पॉवर्ड बाय ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘द विश्वेश्वर को-ऑ. बँक लिमिटेड’ पुणे, ‘आयसीडी’ औरंगाबाद (इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट), ‘एमआयटी’ औरंगाबाद.