देशात तंबाखू खाणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. तंबाखू आणि तत्सम पदार्थाच्या सेवनामुळे कर्करोग (कॅन्सर) सारख्या आजाराने त्रस्त असलेल्यांची संख्याही मोठय़ा प्रमाणात आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी तंबाखूच्या उत्पादनावर बंदी आणण्याची आवश्यकता आहे. लोकांमध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी आणि तंबाखू, गुटखा आदींच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देण्यासाठी देशपातळीवर एक व्यापक मोहीम राबविण्यात आली आहे. यामध्ये तंबाखू, गुटखा आदींच्या सेवनामुळे कॅन्सरसारखा आजार झालेल्या व्यक्तींनी सहभाग घेतला होता. या मोहिमेला देशातील डॉक्टर आणि विविध कॅन्सर सेंटर्सनी सहकार्य केले आहे.
टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे सहायक प्राध्यापक डॉ. पंकज चतुर्वेदी यांना ‘ग्लोबल कॅन्सर अॅम्बेसिडर’ म्हणून संयुक्त राष्ट्रात भारतातर्फे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेने २०४०पर्यंत तंबाखूसेवन करणाऱ्यांची संख्या पाच टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे डॉ. चतुर्वेदी यांनी सांगितले. देशात तोंडाचा कॅन्सर झालेल्यांची संख्या ७५ ते ८० हजापर्यंत आहे. यात केवळ तंबाखू आणि गुटख्याच्या सेवनामुळे तोंडाचा कॅन्सर झालेल्यांचे प्रमाण ९० टक्के आहे. ग्लोबल ऑडिट टोबॅकोच्या ऑक्टोबर २०१०च्या सर्वेक्षणानुसार भारतातील एक तृतीयांश लोक तंबाखूच्या आहारी गेले असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यात लहान मुले आणि तरुण वर्ग मोठय़ा प्रमाणात याचे सेवन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.