या वर्षीच्या राष्ट्रपती पदक विजेत्या ‘ फॅन्ड्री ‘ या मराठी चित्रपटात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी ग्रामीण महाराष्ट्राचे धगधगते समाजवास्तव अप्रतिमरीत्या चितारले आहे. नगरमधील दलित विद्यार्थ्यांच्या निर्घृण हत्येच्या पाश्र्वभूमीवर  ‘फॅन्ड्री ‘ तील जातीसंघर्षांचा वेध घेणारा हा लेख !
नागराज मंजुळे दिग्दíशत ‘फॅन्ड्री’ या चित्रपटाच्या कथेचा जीव अगदी इवलासा आहे. इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या पौगंडावस्थेतील मुलाला आपल्या वर्गातील मुलीविषयी वाटणारे प्रेम! या प्रेमकथेला चौकट लाभली आहे ती ग्रामीण, विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील एका खेडेगावाची. या विशिष्ट चौकटीमुळे ही प्रेमकथा आपली  शिक्षणव्यवस्था, पौगंडावस्थेतील मुलांचे भावविश्व व आपली रानटी समाजव्यवस्था यांबाबत काही मूलभूत प्रश्न उपस्थित करते.
‘फॅन्ड्री’ म्हणजे डुक्कर! ‘फॅन्ड्री’मधील जातीसंघर्ष हा कळीचा मुद्दा आहे. चित्रपटाचा कथानायक जांबुवंत ऊर्फ जब्या हा कैकाडी समाजाचा शाळकरी मुलगा आहे. लक्ष्मण माने यांच्या ‘उपरा’ या आत्मचरित्रातून मराठी साहित्याला कैकाडी समाजाची प्राथमिक ओळख झाली आहे. डुकरे पाळणे हा या समाजाचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय समजला जातो. आपल्या लोकशाहीच्या अवकाशात या समाजाला जे काही आत्मभान येत आहे, त्याचे मनोवेधक चित्रण ‘फॅन्ड्री’मध्ये करण्यात आले आहे. ‘फॅन्ड्री’मधील गावातील कर्ताधर्ता समाज हा पाटील मराठा आहे. उसाचे ५०० टन उत्पन्न घेणाऱ्या या पाटील सरपंचाच्या घरासमोरील खड्डय़ात पडलेले डुकराचे पिल्लू उचलण्यास शाळेत जाणारा आपला कथानायक नकार देतो. त्यामुळे, ‘तुझा मुलगा तुझ्यासारखा (आज्ञाधारक!) नाही’, हे तो संयत संतापाने कचरूला, जब्याच्या पित्याला ऐकवितो. जत्रेत देवाच्या पालखीला डुक्कर धडकल्यानंतर सारवासारव करण्यात व कचरूच्या मुलीच्या लग्नाआधी ‘फॅन्ड्री’चा बंदोबस्त करण्याची आज्ञा देण्यातही तोच आघाडीवर आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील पाटील मराठा हा कसा गावाच्या रहाटगाडग्याची काळजी वाहणारा म्हणजेच कालबाह्य़ जातीसंस्थेची रखवालदारी करणारा आहे, याचे वास्तव चित्रण नागराज मंजुळे यांनी केले आहे.
‘फॅन्ड्री’मधील न्हावी म्हणजे गावाच्या ‘हो’ला ‘हो’ म्हणणाऱ्या भूमिहीन ओबीसी जातींचा प्रतिनिधी आहे. न्हावी, लोहार, सुतार, कोष्टी अशा ओबीसी जातींचे पारंपरिक व्यवसाय आता पार उद्ध्वस्त झाले आहेत. हातात कसब आहे, पण भांडवल नाही, अशी त्यांची दुरवस्था आहे. आंबेडकरी चळवळीच्या रेटय़ामुळे या जातींसाठी असणारा ‘मंडल’ अहवाल केवळ एकाच शिफारशीपुरता (तोही सशर्त व अपूर्णरीत्या!) अमलात आणल्यामुळे या समाजाची जीवघेणी परवड चालली आहे. ओबीसी समाजात निर्माण झालेल्या बुद्धिजीवी वर्गानेही अपूर्ण ‘मंडल’ अहवालाचा वणवा आपल्या समाजात चेतविण्याची ऐतिहासिक भूमिका पार पाडलेली नाही. ओबीसी समाजाच्या तळागाळात ‘मंडल’ अहवाल व तद्नुषंगिक जातीसंस्थाविरोधी प्रबोधन अद्यापही न गेल्यामुळे ‘फॅन्ड्री’तील न्हाव्याला पूर्वास्पृश्य व भटके आदिवासी यांच्या विरोधात राहून गावातील टग्यांची मालिश करणे व अल्पवयीन ‘वेडय़ा’ कुलकर्णीकडून अपमान सहन करणे, यांशिवाय पर्याय राहिलेला नाही!
‘फॅन्ड्री’मधील ब्राह्मण कुटुंबीय काय दर्शविते? गृहपाठ विचारण्यासाठी सहाध्यायी वेदांत कुलकर्णीच्या घरी गेलेल्या आपल्या कथानायकाकडे ब्राह्मण गृहस्थ तुच्छतेने कटाक्ष टाकतो. वेदांताची आईदेखील ‘कैकाडय़ाचा पोर’ असा आपल्या कथानायकाचा उल्लेख करते. अंगापेराने बारीक असलेला चष्मेबहाद्दर वेदांत ‘व्यवस्था’ आपल्या मालकीची असल्याच्या आविर्भावात आपल्या कथानायकाशी वागतो. गावातील देवळाचे पुजारीपण ब्राह्मणाकडे असून आपल्या कथानायकाच्या शोकांतिकेलासुद्धा देवळातील ब्राह्मण पुजाऱ्याने सांगितलेला अपशकुन कारणीभूत ठरला आहे. या अपशकुनाचे निराकरण करण्याची जबाबदारी पाटील मराठय़ाने उचललेली असल्याने खलनायक म्हणून हा ब्राह्मण कुठेही पुढे येत नाही!
ग्रामीण भागातील ब्राह्मणांच्या प्रभावाची झलक आणखी एका प्रसंगातून दिसते. शाळा सुटल्यानंतर ‘फॅन्ड्री’ला पकडण्याची गंमत पाहण्यासाठी जेव्हा सगळे हौसे नवसे गवसे जमा होतात तेव्हा आपल्या कथानायकाचा पाटील सहाध्यायी, ‘देवाच्या घोडय़ाचं चांगभलं’, अशी घोषणा देऊन कथानायकाला टोमणे मारतो. मात्र वयाने थोराड असून व मातृविटंबना करणारी दमबाजी करूनही त्याच्या घोषणेला सहकाऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. परंतु तीच घोषणा जेव्हा वेदांत कुलकर्णी देतो तेव्हा मात्र त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो. आपल्या समाजव्यवस्थेचे नियंत्रण आजही अंगािपडाने बारीक असलेल्या म्हणजेच अल्पसंख्य ब्राह्मण समाजाद्वारे होते आहे, हा चपलख संदेश या प्रसंगातून दिला जातो. त्यातील सहजता वाखाणण्याजोगी आहे.
‘फॅन्ड्री’मध्ये मातंग समाज अधिक ठसठशीतपणे दिसतो तो चंक्या या व्यक्तिरेखेमुळे. आपल्या पारंपरिक देवदेवतांसह अण्णा भाऊ साठेंचीही रोज पूजा-अर्चा करणाऱ्या चंक्याला जातवास्तव जाचते आहे. या सतानी जातीसंस्थेमुळेच आपली देखणी बायको आपल्यापासून दुरावली आहे, याची त्याला जाणीव आहे. पत्नी गमाविण्याच्या प्रसंगाचा त्याच्या मनावर एवढा दुष्परिणाम झाला आहे की, कॅरमच्या सोंगटय़ांतील ‘राणी’ मिळवितानादेखील त्याचा सराव असणारा हात थरथर कापतो. आंतरजातीय विवाह हाच उच्चजातीयांचा जातीय अहंगंड संपविण्याचा मार्ग आहे, हे त्याला अनुभवातून कळले आहे. चंक्या हा जब्याच्या अगोदरच्या पिढीतील बंडखोर आहे. आपल्यासारखे बंड करू शकेल असा सगळ्या गावात त्याला एकच माणूस दिसतो आहे, तो म्हणजे आपला कथानायक जब्या. उच्चजातीय सहाध्यायी शालू मिळविण्यासाठी जब्या काहीही करेल, याची त्याला खात्री आहे. म्हणून आपल्या कथानायकावर त्याचा जास्तच जीव आहे. एवढा की, त्याच्या मोडलेल्या सायकलीची भरपाईदेखील तो माफ करतो. अशा चंक्याच्या नादाला आपला मुलगा लागल्याचे गावगाडय़ात नमून राहणाऱ्या कचरूला अजिबात मंजूर नाही.
आपल्या कथानायकाचा वर्गमित्र व जातमित्र असणारा आणखी एक जीव म्हणजे बौद्ध पिराजी. त्याच्या दरवाजाच्या चौकटीवर लावलेल्या तथागत व डॉ. आंबेडकर यांच्या वीतभर प्रतिमांमुळे त्याची सामाजिक ओळख कळते. ‘रायटिंग्ज अ‍ॅन्ड  स्पीचेस’च्या पाचव्या खंडात डॉ. आंबेडकरांनी जातीसंस्था निर्मूलनाची जी व्यूहरचना सांगितली आहे त्यानुसार भटक्या विमुक्त जातीजमातींचे सर्वात नजीकचे ‘जातमित्र’ हे पूर्वास्पृश्य जाती दाखविल्या आहेत. आपल्या कथानायकाची चंक्या व पिराजीशी असणारी दोस्ती या व्यूहरचनेनुसारच आहे. मात्र त्यात अजूनही गावकुसाबाहेरील आदिवासी व गावकुसांतील शूद्र ओबीसी यांची भर पडायची आहे. बौद्ध पिराजीदेखील अभावग्रस्त आहे. परंतु याही वयात पोटापाण्यासाठी बर्फाच्या रंगीबेरंगी िपगोळ्या ‘पेप्सी’ म्हणून सायकलवरून विकण्याचे जीवनशिक्षण या सतानी व्यवस्थेत तो घेतो आहे. एकुलत्या एका पिसावरून पक्षी ओळखण्याची तीव्र निरीक्षणशक्तीही त्याला लाभली आहे. मात्र, बौद्ध असूनही काळ्या चिमणीच्या अंधश्रद्धेतून काहीही निष्पन्न होणार नाही, याचे ज्ञान त्याला नाही. याचे कारण काय असावे?
आजची आंबेडकरी चळवळ शहरी, विशेषत: राखीव जागांच्या साहाय्याने उभारलेल्या मध्यम वर्गाची बटीक झाली असून ग्रामीण वास्तवाशी तिची नाळ तुटली आहे, असे यांतून दिसून येते. देशाच्या अनेक शहरांत दरवर्षी भरणारी (अनेक!) ‘बामसेफ’ची ‘यशस्वी’ अधिवेशने, त्यांतील ‘क्रांतिकारी’ विषयांवर झालेली प्रदीर्घ चर्चासत्रे या सर्व गोष्टींचा दृश्य परिणाम जब्याच्या अकोळनेरसारख्या खेडय़ापाडय़ांत अजूनही का दिसत नाही? खरे पाहू जाता, आज या चळवळीला देश पातळीवर काम करणाऱ्या असामान्य नेतृत्वाची गरज आहे. अशा राष्ट्रीय नेतृत्वाअभावी निर्माण झालेल्या पोकळीत ‘फॅन्ड्री’तील बौद्ध पिराजी निर्माण झाला आहे!
‘फॅन्ड्री’मध्ये मुसलमान समाजाचा फक्त एकदाच उल्लेख आला आहे. गावातील जत्रेची वर्गणी ठरविताना ग्रामसभेत उपस्थित असणाऱ्या मुसलमानाला मागील वर्गणीच्या थकबाकीची शांत, आत्मविश्वासाने जाणीव करून दिली जाते. या वर्षी असे काही होणार नाही, या जाहीर शब्दावरच बठक पुढे सरकते. ग्रामीण भागांतील मुसलमान समाजाला ब्राह्मणी सांस्कृतिक वर्चस्वाखाली कसे दाबण्यात येत आहे, हे यांतून दिसून येते.
‘फॅन्ड्री’मधील संक्रमण काळातील व्यवसायांतराचे चित्रण दिग्दर्शकाच्या प्रगल्भतेचा पुरावा आहे. आपल्या कथानायकाचे आजोबा टोपल्या विणतात. टोपल्या विणणे हा मातंग समाजाचा पारंपरिक व्यवसाय समजला जातो. याच समाजाचा हलगी वाजविण्याचा व्यवसाय, शालूवरील प्रेमापोटी का असेना, पण छंद म्हणून आपला कथानायक स्वीकारतो आहे. या व्यवसायांतराचा खरा अर्थ असा की, भटके विमुक्त, आदिवासी हे समाजघटक गावगाडय़ात सामावले जाण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. परंतु देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात कृषी-आधारित ग्रामीण अर्थव्यवस्थेचा वाटा घटत असल्याचे देशाचा आíथक अहवाल सांगतो. ‘फॅन्ड्री’मधील ५०० टन ऊस विकणारा पाटील मराठा हा शेतकरी समाजाचे एक टोक आहे. दुसरे टोक हे अल्पभूधारक शेतकरी-शेतमजुरांनी व्यापले आहे. नव्या २१व्या शतकाची देणगी असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या याच वर्गातून घडत आहेत आणि मोक्याच्या ठिकाणी पाटील मराठा असूनही त्या थांबलेल्या नाहीत! वर्गीय हितसंबंधांत मश्गूल झालेल्या पाटील-मराठय़ांना जिथे स्वजातीय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविता येत नाहीत तिथे ते कैकाडी-वडारी, मातंग-चर्मकार, ओबीसींना काय न्याय देणार? त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत पूर्वास्पृश्य, भूमिहीन ओबीसी, अल्पभूधारक व भटके विमुक्त आदिवासी हा सुमारे ६० ते ७० टक्के समाज कसा काय सामावला जाईल?  मागील सुमारे दशकभरापासून मराठा सेवा संघाच्या कामकाजाचा बोलबाला होऊनही ‘फॅन्ड्री’मधील पाटील मराठा समाज ब्राह्मणवादी भूमिका का घेतो आहे, याचेही विश्लेषण होणे गरजेचे आहे. समस्त मराठी भाषिक समाजात सरमिसळ होऊन राहणे अधिक फायद्याचे आहे की केवळ मराठा म्हणून आपल्या अस्तित्वासाठीच झगडत राहाणे अधिक महत्त्वाचे, याचा निर्णय या समाजाच्या धुरिणांना आज ना उद्या घ्यावाच लागणार आहे. अन्यथा बदलता काळ जिथे अखिल भारतीय स्तरावरील ब्राह्मणांना जुमानेनासा झाला आहे तिथे केवळ महाराष्ट्रापुरते थोडेफार वर्चस्व असलेल्या मराठा समाजाला तो फार जुमानेल, अशी परिस्थिती नाही!  
‘फॅन्ड्री’मधील पश्चिम महाराष्ट्राच्या क्षेत्रात महात्मा फुले यांच्या ‘सत्यशोधक’ चळवळीचा सखोल परिणाम झाला होता. अहमदनगरसारख्या दुष्काळी भागात तर अगदी १९७० पर्यंत कॉ. माधवराव गायकवाडांसारख्या कम्युनिस्ट नेत्याचे वजन होते. असे असूनही आज अकोळनेरमध्ये जब्याच्या भावविश्वाची राखरांगोळी का होते आहे? हे अपयश एकटय़ा जब्याचे आहे की महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कार्ल मार्क्‍स अशा सर्वच महापुरुषांना मानणाऱ्या सर्वच परिवर्तनवादी चळ्वळींचे आहे? आज प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करून अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याची निकड निर्माण झाली आहे. अन्यथा ‘फॅन्ड्री’मधील जब्या, नितीन आगे वा तत्सम रूप घेऊन आणखी कठीण प्रश्न विचारीत आपल्यावर दगड उगारीत राहील!

Kolhapur A Y Patil
कोल्हापूर राष्ट्रवादीतील वाद उफाळला; हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांनी माझे राजकारण संपवण्याचे काम केले – ए. वाय. पाटील कडाडले
mahavikas aghadi prakash ambedkar marathi news, prakash ambedkar latest marathi news, prakash ambedkar mahavikas aghadi marathi news
वंचितबरोबर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीचे नेते साशंक
loksatta analysis cm eknath shinde campaign towards hindutva issue for lok sabha election
विश्लेषण : विकासाला हिंदुत्वाची जोड… ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘मोदी’ पॅटर्न?
Uddhav Thackeray
“कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात आणि शेतकरी कोमात, असा अर्थसंकल्प सादर”, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका