उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्य़ात जोशी मठ येथे हिमनदी फुटल्याने जलविद्युत प्रकल्प वाहून जाऊन मोठय़ा प्रमाणात जीवितहानी झाली. ऋषी गंगा ऊर्जा प्रकल्पात काम करणारे मजूर यात मृत्युमुखी पडले. हा जलविद्युत प्रकल्प हिमकडा कोसळल्याने वाहून गेल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. हिमालयासारख्या अतिशय नाजूक आणि संवेदनशील भागातील दुर्घटनांमागील कारणमीमांसा.

दुर्घटनेचे कारण काय?

ही दुर्घटना हिमनदीचा कडा कोसळल्याने झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष वैज्ञानिकांनी काढला आहे. हिमनदीतील तलावांमधील बर्फ तुटून उतारावरून खाली घसरत आले असावे असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. रौंथी हिमनदीच्या जवळ असलेल्या एका हिमतलावाचा कडा कोसळून पूर आला. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ६०६३ मीटर उंचीवर आहे. रौंथी हिमनदी ही रौंथी व मृगधनी येथून सुरू होते. ज्या खडकांच्या आधाराने मोठय़ा प्रमाणात हिमाचा थर बराच काळ साठला होता, ते खडक कमकुवत झाले होते. हळूहळू हा हिमाचा थरही ढिला होत गेला. त्यातून एक खडकांमध्ये कमकुवत क्षेत्र निर्माण होऊन सगळा हिमनदीसदृश हिमकडाच कोसळला व त्यामुळे  दुर्घटना कालावधीत एका छोटय़ा धरणाइतके पाणी वाहत आले. हिमनद्यांमुळे ऋषीगंगा नदीला पाणी येते व नंतर ते धौलीगंगा नदीला मिळते. त्यामुळे तेथे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हिमकडा कमकुवत होण्याची कारणे?

हिमकडा कोसळण्यामागे अनेक कारणे असतात. त्यात धूप होणे, पाण्याचा दाब वाढत जाणे, हिमस्खलन, भूकंप, जागतिक हवामान बदल, जमिनीखालील हालचाली अशा अनेक घटकांचा समावेश असतो. हिवाळ्यात सहसा हिमस्खलन होत नाही, मात्र सध्या होत असलेल्या जागतिक तापमानवाढीचा हा परिणाम असावा, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. हवामान बदल संचालनालय, केंद्रीय जल आयोग आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरद्वारे २०११-१५ दरम्यान करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्र खोऱ्यांमध्ये अनुक्रमे ३५२, २८३ व १,३९३ हिमतलाव तसेच जलसाठे आहेत.

उपाययोजना काय?

* हिमालय क्षेत्रातील संभाव्य धोकादायक तलाव क्षेत्र हे निरीक्षण, भूतकाळातील घटनांच्या नोंदी, तलाव वा धरणाची आणि भौगोलिक भू-तंत्रज्ञानाची वैशिष्टय़े आदींवरून ओळखता येऊ शकतात. हानी होणाऱ्या तलावांची ओळख पटविण्याचे काम गेल्या काही वर्षांमध्ये केले गेले आहे.

* राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणानुसार (एनडीएमए) पावसाळ्यांत नवीन तलावनिर्मितीसह, अस्तित्वात असलेल्या तलावांमध्ये होणारे बदल शोधण्यासाठी सिंथेटिक – अ‍ॅपर्चर रडार प्रतिमेचा वापर करण्याची शिफारस केली आहे. तसेच अशा स्वरूपाच्या घटनांच्या धोक्याची सूचना आधीच देणारे आणि त्याची तीव्रता कमी करणारे तंत्रज्ञान संपूर्ण हिमालयात वापरले जाणे आवश्यक आहे.

* हिमालयासारख्या अस्थिर भू-रचना असलेल्या, पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील भागात जलविद्युत प्रकल्प, दळणवळण व्यवस्थेसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवताना सर्वसमावेशक अभ्यास करणे गरजेचे आहे. संवेदनशील क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा, बांधकाम आणि उत्खननाची विस्तृत चौकट उभारण्याची गरज राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने व्यक्त केली आहे.

* उत्तराखंडमध्ये धार्मिक पर्यटनाला उत्तेजन देताना मोठय़ा प्रमाणात झालेल्या बांधकामांमुळे अशा घटनांमध्ये मनुष्यहानी वाढवत आहेतच शिवाय पर्यावरणावरही मोठा परिणाम घडवून आणत आहेत. अशा बांधकामांना आळा घालणे आवश्यक आहे. ग्लेशियल लेक आऊटबर्स्ट फ्लड्स (जीएलओएफ) प्रवण भागामध्ये बांधकाम आणि विकासावर नियंत्रण ठेवणे हे जोखीम कमी करण्याचे कार्यक्षम साधन आहे.

* इतर देशांच्या तुलनेत भारतात उत्खनन, बांधकामासाठी याविषयीची एकसारखी संहिता नाहीत. अशी नियमावली विकासित करणे आवश्यक आहे.

* तसेच जलप्रवाह क्षेत्रात पायाभूत सुविधा व बांधकाम करण्यापूर्वी आणि त्यानंतरही देखरेखीची प्रणाली असावी.