काळा पैसा, दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद आणि बनावट चलन यांना आवर घालण्यासाठी ५०० व एक हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात येत असल्याचे पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबर रोजी जाहीर केले होते. पण जसजसे दिवस उलटत गेले तसे, हा हेतू साध्य होत नसल्याचे उघड होऊ लागले. आणि मग सरकारने निश्चलनीकरणामागचे हेतूच ‘बदलले’..

१) ८ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या आठ वाजता देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधानांनी ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याचे जाहीर केले. इंग्रजीमध्ये सुमारे २५  मिनिटे केलेल्या भाषणादरम्यान पंतप्रधानांनी या निर्णयाची गरज पटवून दिली.

२) काळय़ा पैशाशी लढा हा पंतप्रधानांच्या भाषणाचा मूळ गाभा होता. या भाषणादरम्यान त्यांच्या तोंडून काळा पैसा किंवा ‘ब्लॅक मनी’ हा शब्द १८ वेळा प्रकटला. तर, ‘फेक करन्सी’ किंवा ‘काउंटरफीट’ हे शब्द पाचवेळा उमटले.

३)काळय़ा पैशाशी चार हात करण्यासाठी पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयामुळे अर्थतज्ज्ञांकडून सावध प्रतिक्रिया उमटत असल्य़ा तरी, बहुसंख्य जनतेने या निर्णयाचे स्वागत करत समोर येणाऱ्या आव्हानाला तोंड देण्याची तयारी केली होती.

४)काळय़ा पैशाविरोधात रणशिंग फुंकून जपानच्या पूर्वनियोजित दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान मायदेशी परतेपर्यंत नोटाबंदी किंवा निश्चलनीकरणाचे विपरित परिणाम दिसू लागले होते.

५) नोटा बदलून घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहूनही हाती काहीही पडत नसल्याने हतबल झालेल्या जनतेतून  संतापाचा सूर उमटू लागला. त्यासोबतच निश्चलनीकरण जाहीर करताना सरकारने दिलेल्या कारणांतही बदल होत गेला.ह्ण

६) १३ ते २७ नोव्हेंबर दरम्यान पंतप्रधानांनी वेगवेगळय़ा व्यासपीठांवरून केलेल्या भाषणांत सहा वेळा निश्चलनीकरणाचा मुद्दा आला. ‘मन की बात’मध्येही हाच मुद्दा होता.

७) या भाषणांच्या विश्लेषणानुसार, निश्चलनीकरणासाठी पंतप्रधानांनी दिलेल्या कारणांमध्ये काळा पैसा हा मुद्दा ८ नोव्हेंबर रोजीच्या भाषणात ८० टक्के इतका होता. तो २७ नोव्हेंबरच्या भाषणात २७ टक्क्यांपर्यंत घसरल्याचे दिसून आले.

८) याउलट ८ नोव्हेंबरच्या भाषणात अजिबात उल्लेख नसलेला ‘कॅशलेस’ अर्थात रोकडरहीत अर्थव्यवस्थेचा मुद्दा २७ नोव्हेंबपर्यंत निश्चलनीकरणाचा मुख्य हेतू बनला. हा शब्द पंतप्रधानांच्या भाषणांत उत्तरोत्तर वाढत गेला.

९)सुरुवातीला निश्चलनीकरणाचा दुसरा महत्त्वाचा हेतू असलेला बनावट चलनाचा मुद्दा २७ नोव्हेंबरच्या भाषणात अजिबातच उमटला नाही. निश्चलनीकरणानंतर काळा पैसाधारकांची खर नाही, असे केंद्र सरकारकडून सुरुवातीला सांगण्यात येत होते. पण बँकांमध्ये मोठय़ा प्रमाणात बाद नोटा जमा झाल्याचे समोर येऊ लागताच हा काळा पैसा बँकिंग आणि देशाच्या आर्थिक व्यवस्थेत आणणे हाच नोटबंदीचा हेतू असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केले.

दावे

* .. दहशतवाद्यांना इतका पैसा मिळतो कुठून, याचा तुम्ही कधी विचार केलाय? सीमेपलीकडील शत्रू बनावट चलनाचा वापर करून त्यांच्या कारवाया पार पाडतात.. देशद्रोही आणि समाजविघातक घटकांनी साठवून ठेवलेल्या ५०० आणि हजारच्या नोटा आता केवळ कागदाचे तुकडे बनून राहणार आहेत..

* निश्चलनीकरणामुळे आपण असंख्य मैलाचे दगड पार केले आहेत. (वर्षांनुवर्षे) लपवून ठेवण्यात आलेला काळा पैसा मूळ अर्थव्यवस्थेत आणण्यात आला आहे. आजवर बँकिंग व्यवस्थेत कधीच न आलेले ३ लाख कोटी रुपये निश्चलनीकरणानंतर व्यवस्थेत समाविष्ट झाले..

* आज तीन वर्षांनंतर, मी माझ्या देशवासीयांना अभिमानाने सांगू इच्छितो की, आम्ही तब्बल १.२५ लाख कोटींचा काळा पैसा उघड केला आहे. यामधील दोषींवर कारवाई करण्यात येत आहे..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ आणि १५ ऑगस्ट २०१७ रोजी केलेल्या भाषणांतील विधाने

तथ्य

२,६२,०००

९ नोव्हेंबर २०१६ ते १४ जुलै २०१७ या कालावधीत सरकारी यंत्रणांनी जम्मू-काश्मीरमधून २ लाख ६२ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. विशेष म्हणजे, यामध्ये नव्या दोन हजार रुपयांच्या ९९ नोटा (१,९८,००० रुपये) होत्या, अशी माहिती लोकसभेत एका प्रश्नावरील उत्तरात देण्यात आली.

१५.२८ लाख कोटी

रिझव्‍‌र्ह बँकेच्या २०१६-१७च्या वार्षिक अहवालानुसार, बाद झालेल्या  १५.४४ लाख कोटी रुपयांपैकी १५.२८ लाख कोटी रुपयांच्या नोटा ३० जून २०१७ रोजी बँकांमध्ये जमा झाल्या. म्हणजेच रिझव्‍‌र्ह बँकेच्या नोंदीपैकी अवघा १ टक्का बाद नोटा बँकांमध्ये परत आल्या नाहीत.

१.३७  लाख कोटी

राज्यसभेत ११ एप्रिल २०१७ रोजी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरानुसार, फेब्रुवारी २०१७ पर्यंतच्या तीन वर्षांत १.३७ लाख कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न वा करचुकवेगिरी उघड करण्यात आली. याशिवाय सक्तवसुली संचालनालयाने ३९६ जागी छापे टाकत १४ हजार ९३३ कोटी रुपये जप्त केले.