|| रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ

एका भारतीय स्त्रीने भारतीय स्त्रियांसाठी उभारलेले पहिले सूतिकागृह नागपूरच्या सीताबर्डीत साकार झाले, त्यास २१ मे रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. यातून आकारास आलेल्या ‘मातृ सेवा संघा’ने रचनात्मक कार्याचा डोंगर उभारला आणि स्वातंत्र्य चळवळीलाही हातभार लावला. त्याचे हे स्मरण…

chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
our identity is hindu say rss chief mohan bhagwat
अभिमानाने म्हणा आपण हिंदू आहोत! सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे आवाहन
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…

सन १९२० ची गोष्ट. एक तरुण विधवा मराठी मुलगी डफरीन रुग्णालयात (नागपूर) परिचारिकेचे प्रशिक्षण घेत होती. त्या काळात असे प्रशिक्षण घेणाऱ्या भारतीय, त्यातही मराठी मुली क्वचितच दिसत असत. तीनपैकी एक बाई बाळंतपणात व जन्मलेली निम्मी अपत्ये पाच वर्षांच्या आत दगावण्याचा तो काळ. भारतातील ‘संस्थात्मक आरोग्य सेवा (इन्स्टिट्यूशनल हेल्थ सव्र्हिस)’ तेव्हा इंग्रज डॉक्टर-नर्सेसच्या नियंत्रणाखाली होती. अशा वेळी भारतीय बाईची प्रसूती रुग्णालयात होणे हा जणू तिच्यावर उपकारच असावा असा त्यांचा दृष्टिकोन होता. या मराठी परिचारिकेने एका अशक्त सूतिकेला बेडपॅन दिला, तेव्हा तिला गोऱ्या मेट्रनने- ‘ही सेवा फक्त गोऱ्या आणि ख्रिस्ती स्त्रियांसाठी आहे, इतर बायकांनी उठून संडासात जावे, हा नियम तुला माहीत नाही का?’ असे खडसावले. प्रशिक्षणाच्या काळात अशी बोलणी खाणे, आणि तेही गोऱ्या वरिष्ठाकडून, यात नवल ते काय? समाजात स्थान नसणाऱ्या विधवेने तर त्याची सवयच करून घ्यायला हवी. मात्र ही मुलगी- म्हणजे कमलाबाई होस्पेट – वेगळ्याच रसायनाची बनली होती. तिचे सारे कुटुंब गांधीविचारांनी भारावलेले होते. दक्षिण आफ्रिकेत पहिल्या वर्गाच्या डब्यातून अपमानास्पद रीतीने उतरवून दिल्यावर मोहनदासला जो साक्षात्कार झाला होता, तोच कमलाला त्या क्षणी झाला. जिथे कोणत्याही भारतीय महिलेला उत्तम आरोग्य सेवेबरोबर सन्मानाची वागणूक मिळेल, असे सूतिकागृह आपणच सुरू करावे, असा संकल्प तिने त्या क्षणी केला. त्या झपाटल्या क्षणापासून तिचे आयुष्य बदलले. वेणूताई नेने व सावित्रीबाई मटंगे या आपल्या मैत्रिणींना तिने या स्वप्नात सामील करून घेतले. नागपूरला माहेरी परतल्यावर दत्तात्रय व पुरुषोत्तम मोहनी या आपल्या भावांना तिने मनातील शल्य व स्वप्न बोलून दाखवले. हे ‘स्वराज्या’चे काम आहे हे मर्म त्यांना बरोबर समजले. ते समविचारी मित्रांबरोबर कामाला लागले आणि २१ मे १९२१ रोजी अक्षय्यतृतीयेच्या दिवशी पाच खाटा, पाच कांबळी एवढ्या सरंजामासह नागपूरच्या सीताबर्डीतील गोखलेंच्या वाड्यात एका भारतीय स्त्रीने भारतीय स्त्रियांसाठी उभारलेले पहिले सूतिकागृह साकार झाले. ही संस्था व तिच्या पारंब्यांतून विस्तारलेल्या वटवृक्षाला नंतर ‘मातृ सेवा संघ (मासेसं)’ असे नाव मिळाले. संस्थेची घटना जेव्हा लिहिली गेली, तेव्हा तिच्यातील पहिले वाक्य होते : ‘या संस्थेचे कार्य धर्म-जाती-पंथ-पक्षनिरपेक्ष राहील.’

वैधव्याचा उत्सव

मोहनी कुटुंब काळाच्या फार पुढे होते. सुधारकी वातावरणात वाढलेल्या यमूला (कमलाचे माहेरचे नाव) सासर मिळाले ते सनातनी विचारांचे. तिथे तिचे खूप हाल झाले. तिच्या पतीच्या अकाली मृत्यूनंतर ती बातमी तिच्या माहेरी कळविण्याची तसदी न घेता सासरच्या मंडळींनी तिच्या मर्जीविरुद्ध तिचे केशवपन करण्याचा निर्णय घेतला. तिच्या माहेरी हे कळल्यावर भाऊ दत्तोपंत हे तिला आपल्या घरी घेऊन आले. स्वाभिमानी यमुनेने आपल्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी त्या काळात फारसा प्रचलित नसलेला परिचारिकेचा व्यवसाय निवडला. ‘वैधव्याने माझी मुक्ती केली. त्याविषयी खंत बाळगण्याऐवजी त्याचा उत्सव करायला हवा,’ असे सांगणारी ही अग्निशलाका! तिला आयुष्याचे ध्येय सापडले आणि त्याच्या पूर्तीसाठी ती सर्व शक्तीनिशी झटू लागली.

कमलाबाईंच्या व्यक्तित्वात बंडखोरपणाबरोबर चिकाटी, परिश्रम करण्याची तयारी, मूल्यनिष्ठा व मुख्य म्हणजे ‘योजकत्व’ हे गुण होते. सर्वांप्रति समभाव, श्रमप्रतिष्ठा आणि दीनदुबळ्यांबद्दलची कणव ही गांधीवादी मूल्ये त्यांनी संस्थेत रुजवली. परिचारिका व प्रसविका (सुईण) यांना त्या काळात समाजात प्रतिष्ठा नव्हती, ‘मासेसं’ने ती त्यांना मिळवून दिली. संस्थेच्या सुरुवातीपासून समाजातील सर्व जाती-वर्ग-धर्मांच्या स्त्रिया तिथे प्रसूतीसाठी येऊ लागल्या. प्रसूती शक्यतो नैसर्गिकरीत्या व्हावी, असे धोरण होते. कठीण प्रसूतीसाठी विनामूल्य मदत करणाऱ्या डॉक्टरांची व पूर्णवेळ कार्यकत्र्यांची एक मोठी फळी संस्थेने उभी केली. प्रसूतीचे शुल्क सुरुवातीच्या काळात पाच रुपये होते. ते न देऊ शकणाऱ्या किती तरी स्त्रिया तेथे प्रसूतीसाठी येत. त्यांच्यात व इतर स्त्रियांमध्ये कसलाही भेदभाव केला जात नसे. कमलाबाई स्वत: प्रसूतीत मदत करीत. त्याचबरोबर सूतिकेला स्वच्छ व पौष्टिक आहार मिळावा यासाठी आपल्या हाताने बनवलेला चांगल्या तुपातला शिरा नवमातेला खाऊ घालत. तिला न्हाऊ-माखू घालत. तिच्यावर मायेची पाखर घालत. वेळ पडल्यास तिचे कपडेही धूत. प्रसूतीसाठी आलेल्या स्त्रीला उत्तम आरोग्य सेवेबरोबर माहेरचे वातावरण मिळावे हा त्यांचा आग्रह होता.

कार्याची वैशिष्ट्ये

कमलाबाईंनी १९२७ साली परिचारिका/प्रसविका प्रशिक्षण सुरू केले. त्यात तयार झालेल्या कार्यकत्र्या महिलांनी वेगवेगळ्या गावी जाऊन संस्थेच्या शाखा सुरू केल्या, ज्या त्या-त्या कार्यकर्तीच्या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. स्थापनेनंतरच्या ३५ वर्षांत १९ नव्या शाखा तत्कालीन विदर्भ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश (व आजचे छत्तीसगढ) येथे सुरू झाल्या. बदलत्या काळाची पावले ओळखून कमलाबाईंनी समाजकार्य महाविद्यालय (१९५८), नंदनवन दुर्बलमनस्क मुलांची शाळा (१९६०), पंचवटी वृद्धाश्रम (१९६१), बालसंगोपन केंद्र (१९७५), कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र (१९८०) या संस्था सुरू केल्या. आधी इंदिराबाई नियोगी, कमलाताई जोशी, नंतर कुसुमताई व डॉ. वसंतराव वांकर अशा किती तरी समर्पणशील कार्यकर्त्यांनी त्यांचे कार्य पुढे चालवले, वृद्धिंगत केले. ‘मासेसं’ परिवारातील साऱ्या संस्था आजही दिमाखाने कार्यरत आहेत.

जिच्यात लाभार्थींसमवेत कार्यकत्र्या व पदाधिकारीही स्त्रियाच असतील (पुरुष फक्त मदतीला), अशी पूर्णार्थाने स्त्रियांची संस्था उभारणे, त्यासाठी समाजातील विविध घटकांची मदत घेणे, एकल स्त्रियांचे मोठे जाळे विणून प्रत्येकीचा पिंड व क्षमता यांनुसार तिला संस्थेत काम देऊन जीविका व उपजीविका यांची सांगड घालणे, आपत्तीत त्यांच्यामागे भक्कमपणे उभे राहणे ही सर्व कामे एका स्त्रीने शंभर वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रात करून दाखवली.

नवसमाजरचनेची सर्जनशीलता

गांधीजींच्या रचनात्मक कार्याचा हा उत्तम नमुना होता. रचनात्मक कार्य म्हणजे केवळ भूतदयात्मक काम नव्हे. त्यात नवसमाजरचनेची सर्जनशीलता असते. त्याचे नाते समाजातील अंतिम जनाशी जुळलेले असते. संघर्षाकडे ते पाठ फिरवत नाही. कमलाबाईंनी स्वातंत्र्य चळवळीचे अनेक कार्यकर्ते व भूमिगत नेते यांना आपल्या सूतिकागृहात आश्रय दिला व त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्यास मदत केली. तुरुंगात गेलेल्या कार्यकत्र्यांच्या कुटुंबीयांनाही आधार दिला. काँग्रेसच नव्हे, तर समाजवादी, फॉरवर्ड ब्लॉक, हिंदुस्तानी लाल सेना आणि युवक या सर्व गटांच्या नेत्या-कार्यकत्र्यांना कमलाबाई व ‘मासेसं’ यांचा भक्कम आधार होता. रात्रीबेरात्री संस्थेत अनोळखी कार्यकर्ते येत. त्यांचे सामान लपविणे, त्यांच्या खाण्या-प्रवासाची व्यवस्था करणे ही त्या काळात संस्थेत नित्याची बाब होती. एकदा तर कमलाबाईंनी एका कार्यकत्र्याला स्त्रीवेश घालून सूतिकेच्या खाटेवर निजवून पोलिसांच्या तावडीतून सोडवले होते! संस्थेने कुंदनलाल गुप्त व बाबूराव हरकरे या स्वातंत्र्यसैनिकांचा त्यांच्या वृद्धापकाळात अखेरपर्यंत सांभाळ केला.

शंभर वर्षांत काळाबरोबर मूल्येही बदलली. त्याची चुणूक नागपूरकरांना गेल्याच आठवड्यात मिळाली. संस्थेच्या शतक महोत्सवाच्या निमित्ताने काही हितसंबंधीयांकडून- ‘‘मासेसं’ची स्थापना कमलाबाईंनी नव्हे, तर हिंदुत्वाचे अग्रणी असणाऱ्या कोणा डॉक्टर परांजपे यांनी केली व त्यात त्यांना ‘पहिली हिंदू परिचारिका’ कमलाबाईंनी साह््य केले,’ असा धडधडीत खोटा प्रचार करण्यात आला. सुरुवातीच्या काळात ज्या अनेक डॉक्टरांनी कमलाबाईंना मदत केली, त्यांतील हे एक. याहून अधिक काहीच नाही. संस्थेचा लिखित इतिहास व कमलाबाईंना जाणणाऱ्या अनेक व्यक्ती आज अस्तित्वात असतानाही सत्याचा अपलाप करण्याची हिंमत काहींना होते, हे त्यांच्या ‘स्व’धर्माच्या अनुरूपच आहे. मात्र संस्थेचा देदीप्यमान वारसा पुसला जाऊ नये व तिच्या पुढच्या वाटचालीत कमलाबाईंनी रुजविलेल्या मूलभूत तत्त्वांना मुरड घातली जाऊ नये, यासाठी आता समाजानेच दक्षता घ्यायला हवी. ‘पोस्ट-ट्रुथ’च्या काळात सत्य जपणे याहून मोठे रचनात्मक कार्य ते कुठले?

(लेखक समाज-विज्ञान यांच्या आंतरसंबंधांचे अभ्यासक व कार्यकर्ते आहेत.)

ravindrarp@gmail.com