News Flash

तरुण तेजांकितांचा सन्मान सोहळा

प्रसिद्धीची अपेक्षा न करता आपापल्या क्षेत्रात अथकपणे आणि सचोटीने कार्यरत असलेल्या तरुणांच्या कार्याची खरी ओळख समाजाला करून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कारां’चे

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना त्यांचे व्यक्तिचित्र भेट देताना ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर.

प्रसिद्धीची अपेक्षा न करता आपापल्या क्षेत्रात अथकपणे आणि सचोटीने कार्यरत असलेल्या तरुणांच्या कार्याची खरी ओळख समाजाला करून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कारां’चे तिसरे पर्व नुकतेच पार पडले. विज्ञान-तंत्रज्ञान, नवउद्योजक, सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे, कला-मनोरंजनविश्वात आपल्या सर्जनशीलतेने वेगळेपण सिद्ध करणाऱ्या २० तरुण तेजांकितांची निवड करून त्यांना माहिती आणि प्रसारण खात्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन या वेळी सन्मानित करण्यात आले.

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, गावच्या सरपंच पदापर्यंत पोहोचलेल्या ताई पवार, संशोधिका डॉ. रुपाली सुरासे-कुहिरे, नवउद्यमी रितू मल्होत्रा, समीर धामणगावकर, गे ब्रँड अम्बॅसिडर नक्षत्र बागवे, बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी, नेमबाज तेजस्विनी सावंत, ‘पाणवठा’ संस्थेचे गणराज जैन, ‘स्नेहालय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल गावडे, नवउद्यमी नीरज बोराटे, पराग पाटील, तरुण संंशोधक डॉ. तुषार जावरे, उद्योजक शेतकरी श्रीपाद जगताप, चित्रकार पराग बोरसे, बांबूपासून वस्तुनिर्मिती करणाऱ्या मीनाक्षी वाळके, अभिनेत्री, दिग्दर्शिका रसिका आगाशे, लेखक प्राजक्त देशमुख आणि क्षितिज पटवर्धन आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव अशा वीस तरुणांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले यांचे खुमासदार सूत्रसंचालन, सावनी वझेचा छोटेखानी एकपात्री विनोदी कार्यक्रम, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेली उपस्थिती आणि त्यांच्याकडून पुरस्कार स्वीकारणाऱ्या या तरुण तेजांकितांच्या चेहऱ्यावरील आनंदाने हा सोहळा खऱ्या अर्थाने संस्मरणीय केला.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) पहिल्यापासूनच ‘लोकसत्ता’च्या बऱ्याच उपक्रमांत सहभागी होत आले आहे. अशा पुरस्काराच्या माध्यमातून तरुणांचे कार्य जगासमोर येते, तसेच त्यांच्या पुढील वाटचालीला प्रेरणा मिळते. त्यामुळे हे काम असेच सुरू राहायला हवे, आम्ही ‘लोकसत्ता’सोबत आहोत.

– डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

सारस्वत बँकेतर्फे सर्व विजेत्यांचे अभिनंदन. ‘लोकसत्ता’चा ‘तरुण तेजांकित’ उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. अशा उपक्रमांना सरस्वत बँक कायमच पाठिंबा देत आली आहे. देशासाठी अनमोल कामगिरी करणाऱ्या या तरुणांना गौरवणे, ही आमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बाब आहे.

– अभिजित प्रभू, सारस्वत बँक

हजारो शिंपले उघडल्यावर एक मोती सापडतो आणि असे मोती शोधण्याचे काम ‘लोकसत्ता’ सातत्याने करत आहे. या सोहळ्यात सहभागी होऊन आम्हालाही समाधान मिळाले. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाला आणि विजेत्या तरुणांना आमच्या खूप खूप शुभेच्छा.

– उषा काकडे, ग्रॅव्हिटस फाऊंडेशन्स

‘कानाकोपऱ्यातून हिरे शोधून काढून त्यांना सन्मानित करण्याचे काम ‘लोकसत्ता’ करते. अशा उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी एम.के. घारे ज्वेलर्स कायमच सोबत आहे.

– शुभा घारे, एम.के. घारे ज्वेलर्स

करोनामुळे आभासी व्यासपीठावर वावरण्याची सवय झालेली असताना वर्षभरानंतर थेट व्यासपीठावर, तेही ‘लोकसत्ता’सारख्या माध्यमात मला सादरीकरणाची संधी मिळाली याचा खूप आनंद झाला. करोनाकाळातील घडामोडींवर सादरीकरण करताना उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘तरुण तेजांकित’ ठरलेल्या या विजेत्यांपुढे सादरीकरणासाठी उभे राहताना काहीसे दडपण होते, पण रंगत गेलेल्या विषयाने अधिकच मजा आली.

– सावनी वझे, एकपात्री विनोदवीर

‘नावीन्यपूर्ण विचारांतून देशाला नवी दिशा देणाऱ्या तरुणांचा सन्मान करणारा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ हा उपक्रम कौतुकास्पद आहे. अशा बुद्धिमान तरुणांना व्यासपीठ देऊन त्यांचा गौरव करणे हे प्रेरणादायी आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ‘लोकसत्ता’ हे काम करते आहे ही आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा स्तुत्य उपक्रमात सहभागी होत असल्याने आम्हाला अभिमान आहे, कारण देश अशाच वेगळ्या वाटा निवडणाऱ्या तरुणांच्या विचारांवर चालत असतो.

– अशोक शिनगारे, सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)

सहप्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बॅँक लि., वल्र्ड वेब सोल्युशन्स, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सिडको

पॉवर्ड बाय : एम. के. घारे ज्वेलर्स

नॉलेज पार्टनर : प्राईसवॉटरहाऊसकुपर्स

टेलिव्हिजन पार्टनर : एबीपी माझा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 12:17 am

Web Title: ceremony in honor of tarun tejankitas abn 97
Next Stories
1 ‘निवड चुकण्या’चे भोग!
2 अर्थव्यवस्थेची कुंठितावस्था कायमची?
3 शिक्षणाला ‘अर्थ’ किती?
Just Now!
X