पूर्वी ठाण्यात आणि आता नव्याने स्थापन झालेल्या पालघर जिल्ह्य़ात असणारे जव्हार आणि मोखाडा हे तालुके किलो मीटरच्या हिशेबात फारसे दूर नाहीत. मुंबईपासून फार फार तर शंभर- सव्वाशे किलो मीटरवर असलेला हा भाग. विकास योजनांपासून कित्येक योजने दूर. तेथे रस्तेच नाहीत धड. तर विकास येणार तरी कोणत्या मार्गाने. तेथे वीज नाही. आरोग्य सुविधा नाहीत. पावसाळ्यात पूर आणि उन्हाळ्यात पाणीटंचाई. जीवन मानले जाणारे पाणी जणू तेथील लोकांची सत्वपरीक्षा पाहते, जगणे मुश्कील करते. पावसाळ्यात नद्या दुथडी भरून वाहू लागल्या की या भागातील अनेक पाडय़ांचा बाह्य़ जगाशी असलेला संपर्कच तुटतो. कारण पूल नाहीत. त्यामुळे या भागात फिरताना मध्ययुगीन काळातील समाज ‘हेरिटेज’ म्हणून जपून ठेवलाय की काय अशी शंका येते.
जव्हारपासून तीस-पस्तीस किलो मिटर अंतरावर डोंगर-दऱ्यांमध्ये एखाद्या निसर्ग चित्रातील असाव्यात अशा पद्धतीने आदिवासी समाजाच्या या वस्त्या साऱ्या विषमतेशी सामना करीत जिवंत राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.
त्यातलाच एक हेदोली पाडा. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या वस्तीत जेमतेम २० ते २५ घरे आहेत. शेती हा एकमेव आणि फक्त पोट भरण्याचा उद्योग. उत्पन्न शून्य. कारण अजूनही पावसाळ्यात पारंपरिक पद्धतीने भात आणि नागली पिकविण्यापलीकडे ते काहीच करू शकत नाहीत. कारण पिकविलेले वर्षभर पोट भरण्यासाठीही पुरत नाही. त्यामुळे दिवाळी झाली की वस्तीमधील कर्ती मंडळी रोजगारासाठी स्थलांतर करतात. मिळेल तिथे मजुरी करतात. या स्थलांतराला ते ‘जगायला जातो’ असेच म्हणतात. कुणी आजारी पडलाच तर त्याला झोळीत टाकून रुग्णालयात न्यावे लागते. ते एक दोघांचे काम नसते. त्यासाठी वस्तीवरील घरटी एक माणूस लागतो. खांदेपालट करत कित्येक मैल अंतर कापून रुग्णाला रुग्णालयापर्यंत आणावे लागते. पाडय़ावरील एकमेव शाळा पटसंख्येअभावी सध्या बंद आहे. भारत देश स्वतंत्र झाला. अत्याधुनिक सुविधा आल्या. चौपदरी, सहापदरी रस्ते झाले. या दुर्गम वस्त्या मात्र आहे तशाच राहिल्या..
काहीच विशेष न घडणाऱ्या या पाडय़ांवर गेल्या जानेवारी महिन्यापासून मात्र थोडी हालचाल सुरू झाली. जव्हारस्थित प्रगती प्रतिष्ठान आणि पुण्यातील ग्रामऊर्जा प्रा. लि.ने युगानुयुगे काळोखाच्या खाईत अडकून पडलेल्या या वस्त्यांना प्रकाशवाट दाखविण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. आयआयसीआय बँकेच्या सहकार्याने जव्हारमधील हेदोलीसह सात पाडय़ांवर सौर ऊर्जेवर आधारित वीज निर्मिती केंद्र कार्यान्वित केले. आणि जणू या पाडय़ांत सूर्यच उगवला. या प्रकल्पाचे वैशिष्टय़ म्हणजे प्रकाशाबरोबरच या ऊर्जेमुळे पंखे, टी.व्ही., फ्रिज, घरघंटी आदी सुविधा या दुर्गम भागांतील रहिवाशांना वापरता येणार आहेत. वस्तीत एक टी.व्ही. सुरूही झाला आहे. पाणी आणि विजेचा पत्ता नसला तरी या वस्त्यांपर्यंत मोबाइल पोचले आहेत. फक्त एकाच खासगी कंपनीचे नटवर्क येथे मिळते. त्यामुळे त्या विशिष्ट कंपनीचेच सीमकार्ड येथे काम करणाऱ्यांना वापरावे लागते. वीज नसल्याने मोबाइल चार्ज करण्यासाठी त्यांना बराच त्रास होता. त्यांच्या या हतबलतेचा फायदा घेत काही व्यापारी मोबाइल चार्ज करण्यासाठी चक्क दहा रुपयेही आकारू लागले होते. आता तो त्रास वाचणार आहे. रोजच्या पिठासाठी येथील गृहिणींना जात्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आता प्रत्येक पाडय़ावर एक घरघंटी चालू शकेल. त्यामुळे एका तरुणाला रोजगार मिळेलच, शिवाय महिलांचाही त्रास वाचणार आहे.
योगायोग म्हणजे एकीकडे वीज आली असताना दुसरीकडे वस्तीवर खोदण्यात आलेल्या विहिरीला भरपूर पाणी लागले आहे. आता मे अखेरीसही या विहिरीत २०-२२ फूट पाणी आहे.
एकूण या दुर्गम पाडय़ांत आता कुठे सूर्य उगवला आहे म्हणायचे.. उन्हातून लाभणाऱ्या ऊर्जेने या पाडय़ांचे आयुष्य चैतन्यमयी बनले आहे. त्यामागे अनेकांचे हात आहेत. अनेकांची साथ आहे आणि ते झटणारे हात पाहिले की वाटून जाते मोहन भार्गव हे केवळ आशुतोष गोवारीकरांच्या ‘स्वदेस’मधील एक पात्र नव्हे. ती प्रवृत्ती आहे. आणि ती अजूनही कुठे कुठे प्रकाशमान आहे..
आता आम्हाला पावसाळ्यानंतर जगण्यासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. विहिरीतील पाण्यावर आम्ही भाजीपाला पिकवून येथेच जगू, असे रघुनाथ ढवळू किरकिरे या तरुणाने सांगितले. आता आम्हाला जगायला बाहेर जावे लागणार नाही, असेही तो म्हणाला.

प्रशांत मोरे