पन्नासहून अधिक वर्षांची देदीप्यमान वास्तुकारकीर्द लाभलेले चार्ल्स कोरिया यांचे नुकतेच निधन झाले. भारतीय वास्तुकलेवर आपली स्वतंत्र मुद्रा उमटवणारे कोरिया अनेक पिढय़ांचे प्रेरणास्रोत बनले. त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा..
‘बदलाचा जनक’ अशा अपेक्षेने वास्तुकाराकडे पाहिले जाते आणि ‘उद्याचा शोध’ घेणे हे त्याचे आद्य कर्तव्य ठरते.’ असे वास्तुकार चार्ल्स कोरिया म्हणत. वास्तुकाराची भूमिका इतक्या नेमक्या शब्दात क्वचितच कोणी मांडली असेल. या वाक्यातसुद्धा त्यांची वैचारिक उंची दिसून येते. किंबहुना ‘वैचारिक सुस्पष्टता’ हा त्यांच्या सर्व वास्तुकलेचा गाभा होता. तो त्यांच्या वास्तुकलेतून प्रकट होत असेच, पण त्यांच्या चपखल लिखाणातूनही प्रकट होत असे. एवढेच नव्हे तर जेव्हा तेच त्यांच्या मुखातूनही प्रकट होत असे, तेव्हा प्रेक्षक अवाक होऊन ऐकत असत. गोरा रंग, सव्वासहा फूट उंची आणि राजबिंडे व्यक्तिमत्त्व यामुळे पाहणाऱ्याला ते सहज जिंकून घेत. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाची छाप झटकन पडे. अशा गुणसमुच्चयाचा त्यांच्या यशामध्ये महत्त्वाचा वाटा असावा. आंतरिक सौंदर्य आणि बाह्य़ सौंदर्य यांचा एक सुंदर मिलाफ त्यांच्या स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात दिसतो. तसा तो त्यांच्या वास्तुकलेतही दिसतो.
Untitled-1
अनेक प्रसिद्ध वास्तुकारांप्रमाणे त्यांचीही वास्तुकारकीर्द तीन टप्प्यांमधून गेलेली दिसते. पहिल्या टप्प्यात त्यांनी आपले लक्ष पूर्णपणे हवामान नियंत्रण या प्रमुख घटकाकडे केंद्रित केले. घरांमध्ये हवेशीरपणा आणि थंडावा कसा आणायचा आणि तोसुद्धा रचनेच्या माध्यमातून, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी ब्रिटिशकालीन घराचे मॉडेल वापरले. या घरांचे वैशिष्टय़ म्हणजे मध्यभागी घर असे आणि कडेला चारी बाजूंनी व्हरांडय़ाची योजना असे. बफर झोन म्हणून आपल्याकडे नैर्ऋत्य ही दिशा आग ओकणाऱ्या उष्णतेची आणि पावसाची दिशा आहे. तसेच ती वाऱ्याचीपण दिशा आहे. आपल्याला घरामध्ये वारा तर यायला हवा, पण ऊन आणि पाऊस यांना घरामध्ये न येऊ देता. हे कसे जमावे? ब्रिटिशांनी त्यासाठी व्हरांडय़ाची योजना केली. मधल्या भागात घराची उंची २०७२० ठेवली आणि वरच्या भागात उष्ण हवा बाहेर जाण्यासाठी छोटय़ा खिडक्या ठेवल्या.

या घरांमध्ये तापमान बाहेरच्या तुलनेत किमान ३/४ अंशांनी कमी होत असे. हवामान नियंत्रणाचा हा तोडगा त्यांनी आपल्या घरांमध्ये यशस्वीपणे वापरला. थोडेफार फेरफार करून देशभरात त्यांनी हे मॉडेल यशस्वीपणे राबवले. अहमदाबादच्या एकाच घरामध्ये (पारेख हाउस) उन्हाळी गच्च्यांची बाहेरच्या बाजूला रचना केली आणि हिवाळ्यासाठी आतल्या बाजूला ऊन खाता येणाऱ्या गच्च्यांची निर्मिती केली. विचारपूर्वक! हाच सिद्धांत त्यांनी मुंबईच्या गगनचुंबी फ्लॅट इमारतींसाठीही हुशारपणे वापरला. बाहेरच्या बाजूला त्यांनी टॉयलेट आणि व्हरांडय़ांची योजना केली. चारी बाजूला. बफर झोन म्हणून ही त्यांची युक्ती यशस्वी झाली. बफर झोनमुळे आतल्या भिंती तापत नसत. हा त्याचा मुख्य फायदा. हेच तत्त्व त्यांनी ‘कांचनजंगा’ या मुंबईच्या उंच वास्तूत वापरले. उंच इमारतीत मोठय़ा आणि हवेशीर गच्च्या असायला पाहिजेत यासाठी ते आग्रही असत. कांचनजंगामध्ये त्याचा त्यांनी पहिल्यांदा वापर केला. पण कांचनजंगाचे सौंदर्य त्याच्या डोकेबाज सेक्शनमध्ये आहे. त्याचा प्लॅन आणि सेक्शन त्यांनी अतिशय कल्पकतेने बसविलेला आहे. त्याचमुळे ती वास्तू मुंबईच्या आकाशरेषेमध्ये वेधक दिसते. जेव्हा झाली तेव्हा या वास्तूतल्या फ्लॅट्सची किंमत आजूबाजूच्या तुलनेत दीडपटपेक्षाही जास्त होती. ही सर्व त्यांच्या रचनेची किमया!
उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे बहारदार स्मारक
त्यांच्या सुरुवातीच्या कालखंडातली गांधी स्मारक संग्रहालय, अहमदाबाद ही रचनाही अतिशय गाजली. हे संग्रहालय म्हणजे ३०/३५ झोपडय़ांचा समूह आहे. सर्व चौकोनी झोपडय़ा आणि उतरत्या मंगलोरी छपरांच्या. मध्ये पाणी बाहेर काढण्यासाठी गटर, मध्ये मध्ये उघडे चौक आणि मध्यभागी एक मोठे पाण्याचे जलाशय! अशी काहीशी त्याची रचना आहे. म्हटली तर पारंपरिक म्हटली तर आधुनिक. पन्नास वर्षे उलटून गेली तरी रचनेची टवटवी आजही टिकून आहे. एका साध्या पण उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे तितकेच साधे पण बहारदार स्मारक क्वचितच कोठे पाहायला मिळते.
दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी आपले लक्ष प्राचीन भारतीय वास्तुवैशिष्टय़ांकडे वळविले. याला कारण जगभरच्या वास्तुरचनेमध्ये वाहणारे नवीन वारे. (पोस्ट मॉडर्ननिझम) इतिहासापासून प्रेरणा घेऊन वास्तूंच्या रचना व्हायला पाहिजेत, असे जोरदार प्रतिपादन या नव्या मोहिमेचे होते. याचे महत्त्व पटल्यामुळे असेल, त्यांनी प्राचीन भारतीय वास्तुरचनेचा अभ्यास केला. मानवावर तारामंडलाचा परिणाम होत असतो, अशी प्राचीन भारतीय स्थपतींची (आणि सामान्य माणसाचीसुद्धा) श्रद्धा होती. त्याचे त्यांनी शास्त्रही तयार केले होते. (वास्तुपुरुष मंडला) वास्तूद्वारा थेट ब्रह्मांडालाच गवसणी घालणाऱ्या आपल्या पूर्वजांकडे पाहून ते थक्क झाले. त्या काळी अशी वैज्ञानिक झेप जगात कुठेच नव्हती. त्यांच्या एका मुलाखतीत त्यांनी एक सुंदर उदाहरण दिले होते. इंडोनेशियातल्या ‘बोरोबुदूर’ मंदिराचे हे बुद्धिस्ट मंदिर म्हणजे ‘निर्वाणाच्या सात पायऱ्यांचा सुंदर आविष्कार आहे. सात उतरत्या टप्प्यांची पिरॅमिडसारखी ही वास्तू आहे. ‘निर्वाणाची कल्पना’ आपल्याच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशियामधील लोकभावनेत हजारो वर्षांपासून भिनलेली आहे. आपल्याला या लोकभावनेचा सुंदर आविष्कार येथे पाहायला मिळतो. लोकभावना ‘सत्य’ आहे म्हणून त्याचा आविष्कार सुंदर आहे आणि जे सुंदर आहे ते सत्य आहेच आहे. (सत्यम् शिवम् सुंदरम्) अशा थक्क करणाऱ्या कल्पनांनी ते भारावले होते. अशाच कल्पनांच्या आधारे त्यांनी आपली वास्तुकला समृद्ध केली होती.’
भोपाळच्या भारत भवन आणि विधान भवन, जयपूरचे जवाहर कला केंद्र, दिल्लीची ब्रिटिश काउन्सिलची वास्तू, पुण्याची आयुका या वास्तूंच्या सौंदर्याचे रहस्य त्यांच्या विचारसरणीत सापडेल. भारत भवनची वास्तू ही एक सुंदर ‘पब्लिक स्पेस’ म्हणता येईल. इथे अर्धी वास्तू जमिनीखाली आहे. (उताराचा फायदा घेऊन) प्रथम पाहताना आपल्याला कमी-जास्त उंचीच्या गच्च्याच दिसतात. लोकांनी येथे संध्याकाळी यावे. हवेशीर गच्च्यांवर बसावे आणि समोरच्या तलावाचा आनंद लुटावा. इथे आदिवासींच्या कलाकृतींचे संग्रहालय आहे. आर्ट गॅलरी, एक छोटे रंगमंदिर आहे आणि या सर्व बसक्या वास्तूंमध्ये दोन चौक आहेत. ‘चौक’ हे त्यांच्या सर्व वास्तूंमध्ये असतातच आणि ते त्यांच्या वास्तूंची शान आहेत.  या चौकांमध्ये थोडय़ा भागात हिरवळ असते आणि बाकी फरसबंदी आणि एखादे चाफ्याचे झाडही. त्यामुळे त्या चौकांना एकदम जिवंतपणा येतो. वरच्या गच्च्यांवरही हिरवळ आहे. पायऱ्या आहेत आणि बसायला कट्टे आहेत. माझे येथे तीन-चार वेळा तरी जाणे झाले असेल. हिंडताना इथे नेहमीच प्रसन्न वाटते आणि तास-दोन तास कसे जातात हे कळतही नाही.
त्यांची जयपूरची जवाहर कला केंद्राची रचनाही अशीच हटके आहे. जयपूर शहराची रचना नवग्रहावर आधारित आहे. राजा जयसिंगाला खगोलशास्त्राची आवड होती. म्हणून त्याच्या स्थपतीने (विद्याधर चक्रवर्ती) नऊ सेक्टरमध्ये शहराची रचना केली. डोंगर मध्ये आल्याने दोन सेक्टर त्याने हलवून बाजूला लावले. कोरियांनी नेमकी हीच कल्पना उचलली. प्लॅनमध्ये त्यांनी तीन, तीन, तीन असे नऊ चौकोन एकाखाली एक असे बसविले आणि शेवटचा एक चौकोन थोडा तिरका केला आणि तिथूनच प्रवेश दिला. एकेक चौकोन एकेक ग्रहाची महती सांगतो. मुख्यत्वेकरून पौराणिक चित्रांच्या साहाय्याने आणि रंगसंगतीद्वारे! मधला चौक हा थोडा मोठा आहे आणि तो सूर्याचे प्रतिनिधित्व करतो. याच्या चारी बाजूला बसक्या उतरत्या पायऱ्या पायऱ्यांचे कुंड आहे. मोढेरा, हंपी अशा ठिकाणी अशी दगडी कुंडे आहेत. प्रतिमा म्हणून अशा कुंडांचा वापर त्यांनी अनेक वास्तूंमध्ये केला. अतिशय सुंदर पद्धतीने केला. आयुकामध्येही त्यांनी मधल्या चौकात या कुंडांचा वापर केलेला आहे. पण दोघांचे परिणाम पाहणाऱ्यावर वेगवेगळे होतात. हे चौक पाहताना आपण चकित होतो. किंबहुना त्यांच्या सर्व वास्तूंमध्ये अशी ‘स्तिमित’ करण्याची शक्ती आहे ती त्यांच्या वास्तुरचनेची ताकद आहे.
आयुका रचनेचाही मधला चौक हाच केंद्रबिंदू आहे. ब्रह्मांडाची प्रतिकृती ही आयुकाची थीम आहे. काळ्या विवरातून ब्रह्मांडाची निर्मिती झाली. मधल्या हिरवळीत हे काळे विवर त्यांनी करडय़ा-जांभळ्या पानांच्या वापरातून दाखविले आहे. शिवाय न्यूटन, गॅलिलिओ, आर्यभट्ट, कोपर्निकस अशा शास्त्रज्ञांच्या पुतळ्यांनी या चौकातल्या अवकाशाला जिवंतपणा आला आहे. अशा छोटय़ा छोटय़ा, पण अर्थपूर्ण गोष्टींचा वास्तूंमध्ये वापर करणे ही श्री. कोरियांची खासियत आहे. त्यामुळे वास्तूंची वैचारिक उंची अनेक पटीने वाढते. तशी ती इथेही वाढलेली आहे. उपयुक्ततेच्या पलीकडे जाऊन अशा चपखल वैचारिक गोष्टी पेरण्याचे कसब अगदी लाजवाब आहे. यामुळेच त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती आणि मानसन्मान लाभले. भारतीय वास्तुकला त्यांनी आंतरराष्ट्रीय मंचावर नेऊन ठेवली. त्यांच्या अनेक वास्तूंमध्ये त्यांच्या वैचारिक भूमिकेचा प्रत्यय येतो. पण विस्तारभयामुळे दोन-तीन वास्तूंचाच येथे उल्लेख केलेला आहे.
तिसऱ्या टप्प्यात त्यांच्या परदेशातल्या वास्तू येतात. त्या मोठय़ा आकाराच्या वास्तू आहेत आणि त्या पुढारलेल्या देशातल्या वास्तुकारांच्या तोडीस तोड उतरल्या आहेत. इथेही त्यांची प्रतिभा वेगळ्या अर्थाने बहरली आहे. परदेशात अशी मोठी कामे मिळणे यातच त्यांचे यश सामावलेले आहे.
वास्तुकलेबरोबरच नगर नियोजनातलीही त्यांची कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे. नवी मुंबईची कल्पना त्यांची आणि प्रवीणा मेहता, शिरीष पटेल यांची. ती कल्पना त्यांनी सरकारच्या गळ्यात उतरवली. ती त्यांच्या कल्पनेवर राबविली गेली असती, तर आज वेगळेच चित्र दिसले असते. रेल्वे कॉरिडॉरभोवती छोटी छोटी शहरे उभारणे श्रेयस्कर ही कल्पना त्यांना मुंबईवरूनच सुचली होती. ती त्यांनी सत्तरच्या दशकातच मांडली होती. कारण वाहतूक हा सर्व शहर नियोजनाचा कणा असतो हे त्यांनी खूप अगोदर ओळखले होते. मुंबई-दिल्ली कॉरिडॉर ही कल्पना चांगल्या पद्धतीने राबविली, तर ती त्यांना एका वेगळ्या प्रकारची श्रद्धांजली ठरेल.
खरे तर श्री. कोरियांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि त्यांची कामगिरी अशा छोटय़ा लेखातून मांडता येणे तेसुद्धा थोडय़ा वेळात, अवघडच. या लेखात त्यांच्या वास्तूंमधून त्यांचे द्रष्टेपण उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे.
ते गेल्यावर आज आठवते ते त्यांचे देखणे व्यक्तिमत्त्व, तितक्याच त्यांच्या देखण्या आणि आनंददायी वास्तू. त्यांनी मागे ठेवलेल्या या प्रसन्न आणि दिमाखदार वास्तू हेच त्यांचे खरे स्मारक आहे. येणाऱ्या तरुण वास्तुकारांना ते नेहमी स्फूर्ती देत राहील.