15 December 2018

News Flash

माकड, माणूस, डार्विन आणि विज्ञान

वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण या वादाकडे कसे पाहणार?

मागच्या लेखात आपण विज्ञानावरील विविध आक्षेपांचा विचार केला. येत्या काही लेखांत, धर्मवाद्यांनी विज्ञानावर घेतलेल्या आक्षेपांचा व त्यांच्या विज्ञानविषयक दाव्यांचा सविस्तर परामर्श आपण घेणार आहोत. त्याची दोन कारणे आहेत – विज्ञानाचा विरोध किंवा त्याची समीक्षा करू पाहणाऱ्यांमध्ये सर्वात तीव्र स्वर धर्मवाद्यांचा आहे. तसेच सर्वसामान्य वाचकांना पडणारे बहुसंख्य प्रश्न विज्ञान व धर्म यांच्या संबंधातील आहेत. या लेखात आपण सध्या चच्रेत असलेल्या डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताच्या सत्यासत्यतेचा विचार करू या.

उत्क्रांतीविरोधी भूमिका

भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास खात्याच्या राज्यमंत्र्यांनी मागच्या महिन्यात एका जाहीर सभेत असे विधान केले की – ‘‘डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत शास्त्रीयदृष्टय़ा चुकीचा असल्यामुळे तो शाळा-कॉलेजातून शिकविणे बंद केले पाहिजे.’’ त्यामागील त्यांची कारणमीमांसा अशी होती की, ‘‘डार्विनचा सिद्धांत शास्त्रज्ञांनी ३०-३५ वर्षांपूर्वीच फेटाळला आहे. पृथ्वीतलावर माणूस सुरुवातीपासून माणूस म्हणूनच वास्तव्य करून आहे. आपल्या पूर्वजांसह कोणीही, लिखित किंवा मौखिक रूपात माकडाचे रूपांतर माणसात होत असताना पाहिल्याचे सांगितलेले नाही.’’ मंत्रिमहाशयांच्या समर्थनासाठी देशभर विविध माध्यमांतून प्रसारित करण्यात आलेल्या साहित्यातून असे सांगण्यात आले की ‘उत्क्रांतीच्या सिद्धांताला विरोध दर्शविणाऱ्या एका पत्रावर जगातील १००० वैज्ञानिकांनी सह्य़ा केल्या आहेत व त्यातील १५० जीवशास्त्रज्ञ आहेत. डार्विनचा सिद्धांत वैज्ञानिकदृष्टय़ा सिद्ध झालेला नाही. त्यामुळे मानवाच्या उत्पत्तीचे हेच सत्य प्रतिपादन आहे, असे समजून भारतातील अभ्यासक्रमात त्याचा समावेश करायचा की नाही, याचा पुनर्वचिार झाला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन हाच तर असतो. सतत शोध घेणे, नवनव्या संसाधनांनी प्रस्थापित सिद्धांतांचा पुन:पुन्हा पडताळा घेणे, जे मंत्रिमहाशयांनी केले आहे. ते रसायनशास्त्राचे पदव्युत्तर पदवीधारक आहेत. पृथ्वीवर जीव निर्माण होण्याआधी रसायनशास्त्र होते व त्यानंतर जीवशास्त्र तयार झाले. त्यामुळे उत्पत्तीबाबत बोलण्याचा अधिकार रसायनशास्त्रालाच आहे. त्यामुळे मंत्रिमहाशयांना नक्कीच आहे.’

वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण या वादाकडे कसे पाहणार?

आपण शेवटच्या मुद्दय़ापासून सुरुवात करू या. विज्ञानाशी संबंधित कोणत्याही प्रश्नावर बोलण्याचा अधिकार सर्वाना आहे. फक्त त्या विषयाचे ज्ञान आपल्याजवळ असले पाहिजे व आपली मांडणी वैज्ञानिक पद्धतीची असली पाहिजे. रसायनशास्त्रात अत्युच्च पदवी मिळविलेली व्यक्ती उत्क्रांतिशास्त्राच्या बाबतीत निरक्षर असूही शकते. शिवाय ‘जीव निर्माण होण्याआधी रसायनशास्त्र होते; जीवन निर्माण झाल्यावर जीवशास्त्र तयार झाले,’ हे विधानच मुळात अवैज्ञानिक आहे. पृथ्वीवर जीव निर्माण होऊन सुमारे ३.७ अब्ज वर्षे झाली व रसायनशास्त्रासह सर्व आधुनिक विज्ञानशाखा केवळ काही शतकांपूर्वी जन्मल्या आहेत. जीवशास्त्राशी संबंधित अनेक घटना, प्रक्रिया या (जैव) रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून समजावून सांगता येतात, एवढाच त्यांचा परस्परसंबंध आहे.

आता आपण वादाच्या गाभ्याचा विचार करू या. डार्विनचा सिद्धांत ‘माझ्या धार्मिक/वैचारिक दृष्टिकोनाच्या विरोधात असल्यामुळे मला मान्य नाही,’ अशी भूमिका कोणीही व्यक्ती घेऊ शकते. तो तिच्या विचारस्वातंत्र्याचा भाग आहे. (सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे मी मानले, तर कोणी का हरकत घ्यावी? ) पण कोणताही सिद्धांत वैज्ञानिकदृष्टय़ा चुकीचा आहे आणि/ किंवा तो पाठय़क्रमात शिकवला जाऊ नये, असे मी म्हटले, की आपली बाजू वैज्ञानिकदृष्टय़ा सिद्ध करण्याची जबाबदारी माझ्यावर येते. या बाबतीत एक गोष्ट आधी नोंदवितो, उत्क्रांतीच्या सिद्धांताला गेली दीडशे वर्षे जो तीव्र विरोध होत आहे, तो प्रामुख्याने ख्रिश्चन चर्च, विशेषत: रोमन कॅथॉलिक चर्चकडून होत आहे. िहदू धर्ममरतड त्याच्या विरोधात कधी उभे राहिले नव्हते. आताही या वादात डार्विनविरोधी भूमिकेच्या समर्थनासाठी जे संदर्भ देण्यात येत आहेत, ते सर्व चर्चद्वारा प्रेरित ‘इंटिलिजंट डिझाइन’ या संकल्पनेच्या प्रसारासाठी निर्मिलेले साहित्य आहे. गेली अनेक वर्षे ते जगभर उपलब्ध आहे. साहित्य कोणीही कशासाठीही निर्मिलेले असो, कोणत्याही धर्माची त्याविषयी काहीही भूमिका असो, ती विज्ञानाच्या चौकटीत बसते की नाही एवढेच आपण तपासले पाहिजे. त्यामुळे ‘आमच्या पूर्वजांनी आम्हाला असे सांगितले नाही, म्हणून ते चूक’ हा मुद्दाही येथे गरलागू ठरतो.

उत्क्रांती व वैज्ञानिक मान्यता

मुळात ‘माकडीण माणसाला जन्म देते म्हणजे उत्क्रांतीचा सिद्धांत’ असे म्हणणे हे मूळ सिद्धांताच्या विपर्यासाच्या पलीकडचे विधान आहे. पृथ्वीवरील मानव व अन्य कपींसह सर्व जीवसृष्टी समान प्र-जनकांपासून (पूर्वजांपासून) निर्माण झाली आहे, असे हा सिद्धांत सांगतो.

हा सिद्धांत शास्त्रज्ञांनी रद्दबातल ठरवला आहे का? कोणताही सिद्धांत वैज्ञानिक तेव्हाच स्वीकारतात, जेव्हा त्याच्या समर्थनासाठी पुरेसा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध असतो. त्यानंतर त्यावर आधारित निष्कर्ष चुकीचे ठरले किंवा त्याच्या विरोधात अतिशय सबळ पुरावा उभा राहिला तरच तो फेटाळला जातो. उत्क्रांतीच्या सिद्धांताला सुरुवातीला बराच विरोध झाला, कारण त्याच्यामुळे प्रचलित वैज्ञानिक धारणा मुळापासून बदलल्या. गेल्या दीडशे वर्षांत अनेक नवी तंत्रे विकसित झाली आहेत, अनेक नवे पुरावे समोर आले आहेत. त्यांच्यामुळे डार्विनचा मूळ सिद्धांत अधिकच बळकट झाला आहे. एवढेच नाही तर अनुवंशशास्त्र, उत्क्रांतीय जीवशास्त्र व त्यातून निर्माण झालेल्या अनेक विद्याशाखा यामुळे तर एखाद्या विराट वटवृक्षाप्रमाणे तो विस्तारला आहे. डार्विनने सुचविलेल्या उत्क्रांतीच्या साखळीतल्या काही बाबी जरी भविष्यात चुकीच्या ठरल्या, तरी तो सिद्धांत चुकीचा ठरणे कठीण आहे, एवढेच आता सांगता येते.

मग त्या पत्रातल्या १००० वैज्ञानिकांचे काय? पूर्वी सांगितल्याप्रमाणे उत्क्रांतीचा सिद्धांत बायबलमधील निर्मितीच्या सिद्धांताला छेद देणारा असल्यामुळे चर्चने त्याचा कसोशीने विरोध केला; पण लोकमत विज्ञानाच्या बाजूने उभे ठाकल्यामुळे त्यांनी बायबलमधील गोष्ट (ईश्वराने सहा दिवसांत अखिल सृष्टीची रचना केली व मानव हा तिच्या केंद्रस्थानी आहे.) कशी वैज्ञानिक पायावर उभी आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला. तोच हा तथाकथित ‘इंटिलिजंट डिझाइन’चा सिद्धांत. तथाकथित यासाठी की, आपली धार्मिक श्रद्धा खोटी ठरू नये म्हणून अभिनिवेशाने या सिद्धांताच्या समर्थनासाठी काही वैज्ञानिक उभे राहिले, तरी जगभरातील वैज्ञानिकांचे समाधान करेल किंवा उत्क्रांतीच्या समर्थनासाठी उपलब्ध असलेल्या डोंगरभर पुराव्यांना छेद देऊ शकेल असा कोणताही पुरावा त्यांना समोर आणता आला नाही. त्यामुळे जगातील वैज्ञानिकांच्या मते ‘इंटिलिजंट डिझाइन’ हे केवळ कृतक-विज्ञान (विज्ञानाचा शेंदूर लेपलेला दगड) आहे. असे असले तरी अमेरिका व अन्य देशांतील चर्चच्या प्रभावाखालील अनेक खासगी शाळांमध्ये आजही उत्क्रांतिवादाऐवजी हा सिद्धांत शिकविला जातो. तेथील सरकारी शाळांमध्ये उत्क्रांतिवाद शिकविला जातो. त्यासोबत समतोल साधण्यासाठी हाही सिद्धांत शिकविला जावा, म्हणजे विद्यार्थी योग्य ती निवड करू शकतील, अशी भूमिका घेऊन त्याच्या समर्थकांनी आघाडी उघडली. त्या संदर्भात तेथील सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निवाडा मननीय आहे –

‘विज्ञानाचा आधार लोकप्रियता नसून वैज्ञानिक पुरावा हा आहे. स्वीकारार्ह विज्ञान काय आहे हे लोकप्रिय भूमिका किंवा समतोल न्याय यावर ठरत नसून त्या क्षेत्रातील (जीवशास्त्रातील) वैज्ञानिकांचे कशावर एकमत आहे, यावर ठरत असते. त्यामुळे उत्क्रांती ही बाब सार्वजनिक क्षेत्रात विवादास्पद असली तरीही विषयतज्ज्ञांच्या क्षेत्रात त्याविषयी कोणताच वाद नाही. त्यामुळे उत्क्रांतीला छेद देणारा सिद्धांत शिकविण्याची मागणी मान्य होणे शक्य नाही.’

मंत्रिमहोदयांच्या विरोधात पत्रक काढणारे शास्त्रज्ञ ‘पाश्चात्त्य संस्कृतीने प्रभावित, परप्रकाशित, परभृत आहेत,’ असाही एक आक्षेप या संदर्भात घेतला गेला आहे. त्याची व संबंधित मुद्दय़ांची चर्चा आपण पुढील काही लेखांमध्ये करू.

– रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ 

ravindrarp@gmail.com

First Published on March 3, 2018 2:53 am

Web Title: charles darwin theory of evolution