News Flash

१९ सोंगट्यांची कहाणी!

घरोघरी परिचित आणि लोकप्रिय असलेल्या कॅरमला राज्यात स्पर्धात्मक रूप मिळाले त्याला आता सहा दशके पूर्ण झाली. काळाच्या ओघात या खेळात बरेवाईट बदलही झाले.

| August 31, 2014 01:39 am

घरोघरी परिचित आणि लोकप्रिय असलेल्या कॅरमला राज्यात स्पर्धात्मक रूप मिळाले त्याला आता सहा दशके  पूर्ण झाली. काळाच्या ओघात या खेळात  बरेवाईट बदलही झाले. मात्र तंत्र बदलल्याने हा खेळ पूर्वीच्या तुलनेत सोपाही झाला. या सर्वाचा  हा आढावा..
जवळपास आपण सारेच कॅरम खेळलोय, पण बऱ्याचदा मनोरंजन म्हणून. सध्याच्या घडीला कॅरम फक्त मनोरंजनापुरता खेळ राहिलेला नाही. महाराष्ट्राच्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देदीप्यमान यश संपादनही केले आहे. मुळात कॅरमचा जन्मच भारतातला. नवाबांच्या काळापासून कॅरम खेळला जात असल्याचे म्हटले जाते. कोलकात्यातील कार आणि महालानेबिस या क्रीडा साहित्य बनवणाऱ्या कंपन्यांच्या आद्याक्षरांवरून या खेळाला ‘कॅरम’ हे नाव ठेवले गेले. गेल्या १२५ वर्षांपासून कॅरम हा खेळ महाराष्ट्रामध्ये खेळला जात असल्याचे दाखले काही जाणकार आणि बुजुर्ग देतात. मात्र इतका जुना आणि घरोघरी परिचित असलेल्या या खेळाला स्पर्धात्मक रूप देण्याचे काम १४ ऑगस्ट १९५४ साली कै. मुख्तार अहमद यांनी केले. मुंबईतील चाळींबरोबरच विशेषत: नागपाडा परिसरातील मुस्लीम समाजात हा खेळ मोठय़ा प्रमाणावर खेळला जात होता. स्व. नेल्सन श्रीसुंदर यांच्या प्रयत्नांनी नागपाडा नेबरहूड हाऊस येथे बॉम्बे स्टेट असोसिएशनची स्थापना करण्यात आली. मुख्तार यांची मानद सचिव व कै. के. एल. सुरी (सुरको कॅरम कंपनीचे मालक) यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या काळात अब्दुल जब्बार, एन. एल. संगम, अली गोला, ऐश हैदराबादी, नंदू हळदीपुरे, दत्तू विजापुरे, मोहम्मद ताहीर व रमेश चिट्टी यांनी आपला ठसा उमटविला.
पुरुष गटाची पहिली राज्यस्तरीय स्पर्धा १९५५मध्ये नेबरहूड हाऊस येथेच झाली आणि पोलीस खात्यामध्ये कामाला असलेले शेख हजिमुद्दीन या स्पर्धेचे विजेते ठरले. या काळात स्टार क्लब बॉम्बे अ‍ॅमेच्युअर्स व नेबरहूड हाऊस येथे स्पर्धा होऊ लागल्या. आझाद मैदानात या काळात तंबू उभारून स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. मुख्तार यांनी या काळात खेळाची नियमावली बनवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. १९६५ साली  महिलांसाठी पहिली राज्य अजिंक्यपद स्पर्धा सुरू करण्यात आली आणि लिंडा पिंटो यांनी स्पर्धेचे जेतेपद पटकाविले.
१९६०नंतर खेळाडूंची एक भक्कम फळी महाराष्ट्राला लाभली. या खेळाडूंना कै. दिनेश मंगेरीकर, कै. श्रीकृष्ण म्हसकर, श्रीकांत पितळे, कै. सुरेश तांबे आणि प्रकाश रेळे यांसारख्या कुशल कार्यकर्त्यांची साथ लाभली. याच काळात मुंबई राज्य असोसिएशन हे नाव बदलून महाराष्ट्र कॅरम असोसिएशन असे ठेवण्यात आले. एकीकडे महाराष्ट्रामध्ये कॅरमचा प्रसार होत होता, तर दुसरीकडे विदर्भ, तामिळनाडू, आंध्र प्रदेशसारख्या राज्यांमध्ये कॅरमची पाळेमुळे रुजत होती. हळूहळू राष्ट्रीय स्पर्धा होऊ लागल्या आणि महाराष्ट्राने सुरुवातीपासून स्पर्धामध्ये ठसा उमटविण्यास सुरुवात केली. स्व. अशोक भावे यांनी असोसिएशनची सूत्रे हाती घेतली आणि त्यानंतर मुंबईच्या बाहेरच कॅरम स्पर्धा होऊ लागल्या. ठाण्यापासून ते सिंधुदुर्ग-जळगावपर्यंत सर्व जिल्हे कार्यरत झाले आणि खेळाचा प्रसार व्हायला लागला. त्यानंतर असोसिएशनची सूत्रे नथुराम पाटील यांच्याकडे गेली आणि या काळात फार मोठय़ा प्रमाणात खेळाडूंना नोकऱ्या मिळू लागल्या. मुंबईत विविध ठिकाणी हा खेळ पसरत चालला होता आणि माझगाव डॉक, नेव्हल डॉकयार्ड, आयकर विभाग व बँकांमध्ये खेळाडूंना नोकऱ्या मिळू लागल्या. या काळात अरुण केदार, नागसेन एटांबे, महेंद्र तांबे, कै. जगन बेंगळे, अनुपमा केदार आणि संगीता चांदोरकर यांसारखे खेळाडू उदयाला आले.
१९८२-८३ साली राज्य सरकारनेही कॅरमची दखल घ्यायला सुरुवात केली. याच काळात ९ वेळा राष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा मान सुहास कांबळी यांनी पटकाविला. सुहास कांबळी आणि नलिनी बोळींजकर हे या खेळातील पहिले शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी ठरले. १९८५ साली बंगार बाबू यांच्या प्रयत्नांमुळे जर्मनी आणि स्वित्र्झलड येथे भारतीय संघ रवाना झाला. बर्लिन येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अरुण केदार यांनी जेतेपद पटकाविले. १९८८मध्ये चेन्नई येथे आंतरराष्ट्रीय महासंघाची स्थापना झाली आणि कॅरम जगाच्या नकाशावर पोहोचला. त्यानंतर खेळाडूंना नियमित परदेशवारी करण्याची संधी मिळू लागली, त्याचबरोबर खेळाडूंच्या सवलतीमध्येही वाढ होऊ लागली. २००० सालानंतर योगेश परदेशी, संदीप देवरूखकर, प्रकाश गायकवाड, हिदायत अन्सारीसारखे खेळाडू महाराष्ट्रात घडले, पण कंपन्यांकडून खेळत असल्याचा फटका महाराष्ट्राला बसला. अशा वेळी संजय मांडेने महाराष्ट्राची धुरा यशस्वीपणे पेलली.
कॅरमच्या साहित्यातील आमूलाग्र बदल
कॅरम बोर्ड, स्ट्रायकर या उपकरणांमध्येही मोठे बदल झाले आणि त्याचाच परिणाम खेळावर झाला आहे. पूर्वी स्ट्रायकर हस्तिदंताचे असायचे, आता प्लॅस्टिकचेही पाहायला मिळतात. पूर्वी कॅरमच्या फ्रेम्स शिसवाच्या असायच्या, आता ते राहिलेले नाही. कॅरमच्या पृष्ठभागावरही आता प्रक्रिया करण्यात येते, ते ‘वॉटरप्रूफ’ बनवण्यात येतात. त्यामुळे कॅरमचा जो नैसर्गिक स्ट्रोक होता, तो लुप्त झाला. पूर्वी जोरात स्ट्रायकर मारल्यावर तो साधारणत: साडेतीन वेळा फिरायचा, पण आताच्या घडीला जोरात मारलेला स्ट्रायकर ७-८ वेळा फिरतो. आता कॅरमवर बाऊन्स जास्त मिळतो, त्यामुळे खेळ सोपा झाला आहे. पूर्वी खेळाडूंचा कस लागायचा, पण आताच्या घडीला खेळाचा दर्जा खालावलेला नाही, फक्त तंत्र बदललेले आहे. आता खेळाडूंची संख्या वाढत आहे. पूर्वी जसे षटकार मारणे सोपे नव्हते तसेच ‘ब्रेक टू फिनिश’ करणेही सोपे नव्हते. पण आता हरभजन सिंग किंवा मोहम्मद शमीही षटकार खेचतो. तसेच आता ‘ब्रेक टू फिनिश’ करणे पूर्वीच्या इतके कठीण राहिलेले नाही.
चित्रपटांत गुंड-मवाल्यांचा खेळ
चित्रपटांमध्ये कॅरम या खेळाची प्रतिमा फारशी चांगली दाखवली नाही आणि त्याचाच परिणाम या खेळावर झाला. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’सारखे काही चित्रपट सोडल्यास सर्वच चित्रपटांमध्ये हा खेळ गुंड, मवाली दारूच्या अड्डय़ांवर खेळताना दाखवला गेला. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली असली तरी हिंदी सिनेमांमधले कॅरमचे चित्र मात्र बदललेले नाही. या खेळांच्या स्पर्धा, दर्जा, स्वरूप, असोसिएशन्स या लोकांपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. या खेळातली गुणवत्ता, तंत्र लोकांपर्यंत पोहोचू शकले नाही, हे दुर्दैव आहे.
कॅरममधील दिग्गजांचा सन्मान
महाराष्ट्रातील कॅरमला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल खेळाच्या प्रसारासाठी बरीच कामे करण्यात आली. कॅरमचे संकेतस्थळ तयार करण्यात आले. कॅरमच्या रॅलीमध्ये मोठय़ा संख्येने चाहतेही सहभागी झाले. महाराष्ट्र कॅरमच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन लाखांपेक्षा अधिक रोख पारितोषिके देण्यात आली. तसेच कॅरमविषयक जुन्या छायाचित्रांचे दालन उभारण्यात आले. महाराष्ट्रातील नावाजलेले खेळाडू आणि पंच अशा एकूण ७० जणांचा सत्कार करण्यात आला. गँड्रमास्टर प्रवीण ठिपसे, प्रवीण आमरेसारखे खेळाडू या वेळी प्रेक्षणीय सामन्यात सहभागी झाले.
कॅरमला ‘कॉर्पोरेट लूक’
आता या खेळाला ‘कॉर्पोरेट लूक’ येऊ लागला आहे. मुंबईतील चाळ संस्कृती संपत चालल्याने मुंबईतून हा खेळ जवळपास बंद होत चालला असला तरी या चाळींमधली मंडळी उपनगरांमध्ये गेल्याने तिथे हा खेळ आता फुलू लागला आहे. तो बहरण्यासाठी काही गोष्टींची नितांत गरज आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खेळाडू आणि आयोजकांनी खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि मानसिकता बदलण्याची गरज आहे. खेळाडू आणि आयोजक ठरीव चाकोरीबाहेर विचार करताना दिसत नाहीत. त्यामुळे खेळ पुढे नेण्यासाठी काही नवीन नियम केल्यास त्यांना विरोध होतो किंवा नवीन नियमांचे पालन होताना दिसत नाही. आयपीएल आणि प्रो-कबड्डी या लीगमुळे खेळांचा चेहरामोहरा बदलला. पण त्यासाठी त्यांनी नियमांमध्ये काही बदल केले, खेळ
अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे कॅरम या क्रीडाप्रकाराशी संबंधित लोकांनीही बदल स्वीकारण्याची तयारी दाखवायला हवी. खेळामध्ये अधिक शिस्त आणि व्यावसायिकपणा आणायला हवा. अशा काही गोष्टी गंभीरपणे घडल्या तर कॅरमचा स्तर नक्कीच उंचावू शकेल.
(लेखक माजी कॅरमपटू आणि प्रशासक आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2014 1:39 am

Web Title: chess in maharashtra
टॅग : Chess
Next Stories
1 धर्मसंसद : ना धर्मसंमत, ना कायदेशीर!
2 ‘आपल्या’हिंदू धर्मावरील संकट
3 साईबाबा होते तरी कोण?
Just Now!
X