अजेय लेले

चिनी क्रांतीच्या ७०व्या वर्धापनदिनी शक्तिप्रदर्शन झाले, तेव्हा बीजिंगचे आकाश निरभ्र नव्हते.. धूर-धुक्याने भरलेलेच होते. वास्तविक अशा महत्त्वाच्या प्रसंगी आकाश निळेच राहील याची काळजी घेण्याची ‘हवामान अनुकूलन’ तंत्रे चीनने विकसित केली आहेत आणि अनेकदा वापरली आहेत.. संयुक्त राष्ट्रांचा या तंत्रांना विरोध असतानाही चीन या बाबतीत पुढे जातोच आहे. यंदा ती तंत्रे निष्प्रभ ठरली की काही हिशेब चुकले, याविषयी आपण अंदाजच बांधू शकतो..

कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटीच्या ७० व्या स्थापनादिनी म्हणजे १ ऑक्टोबर रोजी चीनने भव्य लष्करी कवायती केल्या. चीनला कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, असे विधान अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी लष्करी कवायतीदरम्यान केले. लष्करी क्षेत्रात चीनच्या प्रगतीचे या कवायतींदरम्यान प्रदर्शन करण्यात आले. या वेळी प्रदर्शन करण्यात आलेल्या लष्कराच्या मोठय़ा अस्त्रांपैकी एक म्हणजे सुपरसोनिक आंतरखंडीय आण्विक क्षेपणास्त्र. सध्या शक्तिशाली देशांकडे असलेल्या क्षेपणास्त्ररोधी यंत्रणेला भेदण्याची क्षमता या चिनी क्षेपणास्त्राकडे आहे. मात्र, चीनने प्रदर्शित नव्हे, तर प्रात्यक्षिक करून दाखविणे अपेक्षित असलेल्या एका शस्त्राची या वेळी उणीव जाणवली. ते म्हणजे हवामानाचे शस्त्र.

लष्करी कवायती आणि अशा मोठय़ा सोहळ्यांच्या वेळी आकाश निरभ्र राहील, याची काळजी चीन सरकार नेहमीच घेत असते. मात्र, या वेळी बीजिंगच्या आकाशात ढगांची दाटी झाली होती. त्याने जनतेच्या उत्साहात काहीच फरक पडलेला नाही. मात्र, चीनचे कम्युनिस्ट सरकार अनेक गोष्टी आपल्या मर्जीप्रमाणे करू शकत असले तरी हवामानावर ते अद्यापही नियंत्रण ठेवू शकत नसल्याचे सिद्ध झाले. अर्थात, गतकाळात काही मर्यादित भौगोलिक क्षेत्रातील हवामानात आपल्याला हवे तसे बदल करण्यात चीनला यश आल्याची उदाहरणे आहेत. अनेक मोठय़ा सोहळ्यांआधी चीनने केलेल्या या प्रयत्नांना यश आले आहे. या वेळी तसे करण्यात यश न मिळण्यामागे अनेक कारणे असू शकतील.

गतकाळात अनेकदा चीनने आकाश निरभ्र ठेवण्यात यश मिळवले आहे. त्याची साक्ष देणारी बहुचर्चित घटना म्हणजे १० ते १२ नोव्हेंबर २०१४ रोजीची ‘एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन’ (अ‍ॅपेक) परिषद. दाट धुके आणि ढग मोठय़ा प्रमाणात असलेल्या बीजिंगवरचे आकाश या परिषदेदरम्यान निरभ्र राहील, याची काळजी चीनने घेतली होती. त्यानंतर हवे तेव्हा आकाश निरभ्र ठेवण्याची चीनची क्षमता ‘अ‍ॅपेक ब्ल्यू’ म्हणून ओळखली जाऊ लागली. बीजिंग आणि परिसरात कठोर प्रदूषणविरोधी उपाययोजना राबविण्यात आल्याने २०१४ मध्ये चीनला अनुकूल हवामान राखता आले. सुमारे ११ दिवस उत्सर्जनकपातीच्या उपाययोजनांचा हा परिणाम होता.

१ ऑक्टोबरच्या लष्करी कवायतीदरम्यान आकाश निरभ्र राखण्यासाठीही आधीपासूनच प्रयत्न करण्यात आले होते. २० ऑगस्टपासून एकाही ट्रकला बीजिंगमध्ये प्रवेश देण्यात आला नाही आणि बांधकाम क्षेत्रातील सर्व कामे थांबविण्यात आली. खाणकामावर निर्बंध घालण्यात आले होते आणि फटाक्यांवर पूर्णत: बंदी होती. जवळच्या उद्योगांना उत्पादन थांबविण्याचीही ‘विनंती’ करण्यात आली होती. त्यामुळे आकाशातील स्थिती चीनला अनुकूल होऊ लागली होती. मात्र, या सोहळ्याच्या काही दिवस आधी हवामान यंत्रणा प्रतिकूल बनली आणि बीजिंगभोवतालच्या प्रांतांमधील प्रदूषणाने बीजिंगला वेढा घातला. तसेच, काही कारणांमुळे चीनने प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कठोर निर्बंध लादले नसण्याची शक्यताही आहे.

चीनचे उपपंतप्रधान हू चुन्नूआ यांनी लष्करी कवायत सोहळ्याआधी चीनच्या हवामान प्रशासनाची भेट घेऊन हवामानविषयक आवश्यक मदतीची सूचना केली होती, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. सामान्यत: पर्जन्यढगांवर क्षेपणास्त्र, अग्निबाणांचा मारा करून ते तिआनानमेन कवायत मैदानाकडे सरकण्याआधीच पर्जन्यवृष्टी केली जाते. असे अग्निबाण हे हवामानात अनुकूल बदल करण्यासाठी आणि सोहळ्याआधीच पर्जन्यवृष्टीसाठीच्या प्रयोगाचा भाग आहेत. साधारणत: असा पाऊस ढगांनी भरलेले वातावरण मोकळे करतो. मात्र यंदा कदाचित बीजिंग परिसरात आकाशात ढग दिसले नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे असे अग्निबाण सोडल्याचे वृत्त नाही. बरोबर दहा वर्षांपूर्वी ६०व्या राष्ट्रीय दिन कवायतीदरम्यान चीनने ढगांवर असा मारा करून आकाश निळे राखण्यात यश मिळवले होते. त्या वेळी जवळपास ४३२ अग्निबाण सोडण्यात आले होते, असे स्पष्ट झाले होते.

हवामान अनुकूल करण्यासाठीच्या पायाभूत सुविधा चीनने विकसित केल्या आहेत. आपल्याकडे सरकणारे ढग, धुके दूर करण्यासाठी हवेचा मारा करणारी विशेष वाहने चीनकडे आहेत. ८ ऑगस्ट २००८ रोजी ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्या वेळी चीनच्या ‘हवामान अनुकूलन विभागा’ने पाऊस पडू नये, यासाठी १,१०४ अग्निबाण सोडले होते. ऑलिम्पिक सोहळा होणार असलेल्या भागांत ढग निर्माण होऊ नयेत, यासाठी हे अग्निबाण सोडण्यात आले होते. हे काम आठ तास चालले आणि वेगवेगळ्या २१ ठिकाणांहून या अग्निबाणांचा मारा करण्यात आला होता.

गतकाळात अगदी युद्धातही काही देशांनी आपल्या सैन्याला अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठीच नव्हे, तर शत्रुदेशात पूरस्थिती निर्माण करण्यासाठी या तंत्राचा वापर केला आहे. व्हिएतनाम युद्धावेळी १९६७ मध्ये अमेरिकी सैन्याने ‘ऑपरेशन पोपेये’ राबवले होते. त्यामुळे मोठी पूरस्थिती निर्माण होऊन तीन वर्षांच्या सातत्यपूर्ण बॉम्बहल्ल्यांनी होऊ शकेल इतके नुकसान झाले होते.

सद्य:स्थितीत चीनने इच्छित वेळी हवामान अनुकूलनाचे तंत्र विकसित केले असून, त्यासाठी जगातील सर्वात मोठा हवामान अनुकूलन कार्यक्रम चीन राबवतो. त्यासाठी कोटय़वधी डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे. चीनने हवामान अनुकूलनाच्या प्रयोगासाठी विविध विमानांमध्येही त्यानुषंगाने बदल केले आहेत. तिबेटमधील हवामान पॅटर्न बदलण्याचे चीनचे प्रयत्न आहेत. बाष्पाची दिशा बदलण्यासाठी (स्काय रिव्हर प्रकल्प) हवामान अनुकूलन तंत्राचा वापर करण्याचे चीनचे नियोजन आहे. हवामानावर नियंत्रण मिळविण्यासाठी चीनचे अनेक शास्त्रज्ञ काम करत आहेत.

पर्यावरण अनुकूल करण्यासाठीच्या तंत्राबाबत संयुक्त राष्ट्रांचा एक करार आहे. देशांना लष्करी किंवा इतर देशांवर प्रतिकूल ठरण्यासाठी पर्यावरणीय बदल करण्याच्या तंत्राचा वापर करण्यावर या कराराद्वारे निर्बंध घालण्यात आले आहेत. अनेक मोठय़ा देशांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे. अगदी शांततेच्या काळातही पर्यावरणीय समतोल बिघडवू शकणारे मोठय़ा प्रमाणातील हवामान अनुकूलनाचे प्रयोग अयोग्य आहेत. हवामानात कृत्रिम बदल हे एका भौगोलिक क्षेत्रासाठी वरदान ठरू शकतील, पण शेजारच्या भागांसाठी ते मारक ठरू शकतील.

(लेखक नवी दिल्लीतील ‘इन्स्टिटय़ूट फॉर डिफेन्स स्टडीज अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस’मध्ये सीनियर फेलो आहेत.)