X

आता पुढचं पाऊल समाज प्रबोधन..

अनेक मराठी भाषकांची भेट घेऊन समलैंगिकांबद्दल त्यांना समजावून सांगायला सुरुवात केली.

चित्रा पालेकर

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मला अत्यंत आनंद झाला आहे. एका समलैंगिक मुलीची आई या नात्यानं आणि समलैंगिक समुदायाच्या आई-वडिलांच्या वतीनं मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानते. जगातील सर्व वृत्तपत्रांनी आणि माध्यमांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे सगळ्यांना आणि या समुदायातील लोकांना घटनेने जे हक्क देतो, असं म्हटलं होतं ते हक्क आज खऱ्या अर्थाने सर्वोच्च न्यायालयाने दिले असल्याची माझी भावना आहे. आजपर्यंत त्यांचे हक्क नाकारले गेले होते, ते दुय्यम नागरिक ठरत होते. कोणताही गुन्हा न करता त्यांना गुन्हेगार ठरवलं जात होतं. कोणताही गुन्हा न करता माझ्या मुलीला गुन्हेगार का मानलं जावं? तिनं आपल्या आयुष्यात खूप यश संपादन केलं आहे. आम्हाला सगळ्यांना तिचा अभिमान आहे. ती एका बाईवर प्रेम करते म्हणून ती गुन्हेगार कशी ठरू शकते? प्रेम हे वैयक्तिक असतं, त्याला गुन्हा कसं म्हणणार?

शाल्मलीला आम्ही १९९३ मध्येच स्वीकारलं. काही लोकांनी शाल्मलीला स्वीकारलं, पण इतरांनी तिला स्वीकारलं नाही त्यांचं काय? शाल्मली समलैंगिक आहे, याची कल्पना आल्यावर मी त्यांच्या विश्वाबद्दल जाणून घ्यायला सुरुवात केली. मी अनेक लोकांना भेटले. त्यावेळी माझ्या लक्षात आले की १९९३ मध्ये या व्यक्ती समाजात पुढे येण्यास धजावत नव्हत्या. या समुदायातील खूप कमी व्यक्ती प्रकाशात आल्या होत्या. या समुदायात कोण आहे, काय आहे याबद्दल विचारपूस करीत मी सगळी माहिती गोळा करीत होते. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की अनेक पालक आपली मुलं समलैंगिक आहेत याचा स्वीकार करायलाच तयार नव्हते. अनेकांना जबरदस्तीनं लग्न करायला लावलं होतं. त्यामुळे अनेक जण उद्ध्वस्त झाले. परिणामी, अनेक महिला आणि पुरुषांना लग्नानंतर विविध अडचणींना तोंड द्यावं लागलं. यासाठी समाजाचं प्रबोधन होणं आवश्यक होतं. पण ही माहिती मराठी आणि प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध नव्हती. मराठी भाषेत याला शब्द नव्हते, मग अशा वेळेला वर्तमानपत्रातून लिहायला सुरुवात केली.

सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात २०१०मध्ये याचिका दाखल झाली होती. त्यावेळी याबाबतच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करून मी या समूहाला पाठिंबा दर्शविला होता. मग मी माध्यमांना मुलाखती देण्यास सुरुवात केली. त्या माध्यमातून जनजागृती सुरू केली. हा विषय जनसामान्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मराठी भाषकांमध्येही समलैंगिकांची संख्या लक्षणीय असून अनेक मराठी भाषकांची भेट घेऊन समलैंगिकांबद्दल त्यांना समजावून सांगायला सुरुवात केली.

आजचा दिवस आनंदोत्सव साजरा करण्याचा आहे. यापुढचं पाऊल म्हणजे समाजाचं प्रबोधन करून आई-वडील, पालकांचं मन वळविण्याची गरज आहे. या समुदायातील लोकांना स्वीकारायला हवं. त्यासाठी आता आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे हे सोपं होणार आहे. या समुदायातील मुलांना आपल्या पालकांशी बोलायला थोडा धीर मिळणार आहे. हा रोग नाही हे मानसशास्त्रज्ञांनी मान्य केले आहे.

हे सरकार लोकसभेत हा निर्णय मंजूर करील याची शाश्वती नव्हती. त्यामुळे मी निराश झाले होते. पण निराशा झटकून मी ही लढाई सुरू केली आणि आज चांगला निर्णय आला आहे.

आता पुढचं पाऊल म्हणजे समाज प्रबोधन. या समुदायातील लोकांना त्यांचे सर्व हक्क मिळेपर्यंत सर्वतोपरीने प्रयत्न करण्याचा आमचा मानस आहे.