प्रवाहपतितांच्या भाऊगर्दीत राहूनही विवेकाची कास न सोडणे हे थोरपणाचे लक्षण आहे. अशी विवेकनिष्ठ मंडळी भावनेच्या आहारी जात नाहीत आणि सत्तेच्याही कच्छपी लागत नाही. श्रीनिवास अय्यर रामस्वामी हे त्यापैकीच एक. आणीबाणीविरोधात लेखणी परजणाऱ्या मोजक्या पत्रकार, संपादकांत श्रीनिवास अय्यर रामस्वामी यांचे महत्त्वाचे स्थान आहे. नुकतेच त्यांचे निधन झाले. देशात इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीविरोधात उभ्या राहिलेल्या निडर पत्रकारांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आणीबाणीच्या त्या कालखंडाबाबत काही वर्षांपूर्वी त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलेली भूमिका, दिलेली माहिती.. त्यांच्या पत्रकारितेतील लढाऊ बाण्यावर प्रकाशझोत टाकणारी..

  • आणीबाणीच्या बातमीकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले? ती लागू होईल असे तुम्हाला वाटत होते का?

– आणीबाणी लागू होईल असा अंदाज वर्तविणारे लेखन करणारा मी देशातील एकमेव पत्रकार आहे. जे. बी. कृपलानी, जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई आणि इतर नेते तुरुंगात असल्याचे व्यंगचित्रही आम्ही प्रसिद्ध केले होते. नागरिकांचे मूलभूत हक्क पायदळी तुडविण्यात आल्याचे आम्ही त्या व्यंगचित्रातून दाखविले होते. आणीबाणीपूर्व परिस्थितीबाबत आम्ही थोडी अतिशयोक्ती केली, पण त्यातून भयसूचक इशाराच दिला होता.

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
Jupiter transits in Taurus sign
वृषभ राशीत गुरुचा प्रवेश होताच निर्माण होईल कुबेर योग! ‘या’ ३ राशींच्या लोकांना मिळेल अमाप पैसा!
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता
  • आणीबाणी जाहीर होईल असे तुम्हाला का वाटले? भारताला तसा काही पूर्वानुभव नव्हता.

– चंद्रशेखर यांच्यासह अनेकांशी मी बोलत होतो. मुख्यत्वे जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनामुळे पराभव होणारी लढाई लढत असल्याचे इंदिरा गांधी यांना वाटू शकेल, हे मी ताडले होते. अर्थात, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल ही आणीबाणीच्या निर्णयासाठी शेवटची काडी ठरली.

  • आणीबाणी जाहीर झाल्यानंतर तुमच्या अंदाजाला पुष्टी मिळाली असे वाटले का?

– व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाले तेव्हा, त्यांना या पदासाठी पुढे करणारे देवीलाल हेच त्यांचे पाय ओढतील आणि चंद्रशेखर यांना पाठिंबा देतील, असे मी म्हटले होते. तसेच घडले.

  • तुम्हाला तशी कुणकुण लागली होती का?

– नाही. मी वर्तवलेल्या अंदाजांची यादीच मी तुम्हाला देऊ शकतो. बांगलादेश किती काळ भारतासोबत मैत्रिपूर्ण संबंध ठेवेल, असा प्रश्न मी एका मुलाखतीत इंदिरा गांधी यांना विचारला होता. त्यावर तुम्ही असे का विचारता, असा प्रतिप्रश्न त्यांनी मला केला. माझे मत अतिशयोक्तीपूर्ण आहे, असे म्हणत त्यांनी माझ्या मताशी असहमती दर्शवली होती.

‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम’ने भारतात पाय रोवले तेव्हा तामिळनाडूसाठी हे धोक्याचे ठरेल, असे मी लिहिले होते. मी याबाबत मोहीमच उघडली. मात्र, मी अस्तित्वात नसलेला धोका अतिरंजित स्वरूपात मांडत असल्याचे सर्वाना वाटले. मी तामिळविरोधी आहे असेही अनेकांना वाटले; पण अखेर माझा अंदाज खरा ठरला. जनता सरकार सत्तेवर आले तेव्हा चरणसिंग यांच्याकडून धोका असल्याचे मी म्हटले होते. संजीव रेड्डी यांची राष्ट्रपतिपदी निवड झाली तेव्हा ते सरकारसाठी अडचणीचे ठरतील, असा अंदाजही मी वर्तवला होता.

  • आणीबाणी जाहीर झाली तेव्हा तुम्ही तुघलकचे संपादक होता. तुम्हाला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले?

– सुरुवातीला मी आणीबाणीचा निषेध म्हणून ‘तुघलक’चे दोन अंक प्रसिद्ध केले नाहीत. त्यानंतरच्या अंकाचे मुखपृष्ठ कोरेकाळे ठेवून मी आणीबाणीचा निषेध केला. बाबरी मशीद विध्वंसावेळीही मी निषेधाचा हा मार्ग अवलंबला होता.

  • दोन अंक वगळल्यानंतर पुन्हा अंक प्रसिद्ध करावेसे का वाटले?

– आणीबाणीच्या परिस्थितीला कसे भिडायचे याचा विचार करण्यासाठी मला काही वेळ हवा होता. काही भूमिगत नियतकालिकांसाठी मी लिहीतच होतो. मुख्यत्वे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशी नियतकालिके काढत होता. त्यामुळेच मी त्यांच्या संपर्कात आलो. सर्व समस्यांवर मात करीत ती मंडळी समर्पित भावनेने नियतकालिके प्रसिद्ध करत होती. त्यानंतर मी रामनाथ गोएंका यांच्याशी चर्चा करण्यास सुरुवात केली. त्या वेळी माझ्याकडे गमावण्यासारखे काही नव्हते, पण गोएंका यांच्याकडे खूप काही होते. मी म्हणायचो, माझ्या डोक्यावर गमावण्यासाठी एक केसही नाहीत; पण रामनाथ गोएंका यांचे संपूर्ण साम्राज्यच पणाला लागले आहे. मात्र, तरीही त्यांनी आणीबाणीला कडाडून विरोध केला. ते माझ्यापेक्षाही अधिक धाडसी होते.

  • आणीबाणीदरम्यान तुम्हाला कधी भीती वाटली का?

– माझ्या सुरक्षेची मला विशेष काळजी वाटली नाही. मृत्यू कोणी रोखू शकत नाही. माझ्या मृत्यूची वेळ येईल तेव्हा मला कुणी वाचवू शकणार नाही, अशी माझा ठाम धारणा आहे. मला मारावे, असे तुम्हाला वाटले तरी तुम्ही मला मारू शकत नाही.

मी जनतेला काही तरी संदेश देऊ शकतो, असे वाटल्याने मी साप्ताहिक पुन्हा सुरू केले. त्या वेळी ‘सर्वाधिकारी’ नावाचा तामिळ चित्रपट प्रदर्शित झाला होता. मी आणीबाणीच्या काळातच चित्रपटाची समीक्षा केली होती. या समीक्षेत मी हुकूमशाहीचा निषेध केला होता. आणीबाणीवर टीका करण्याचे असे अप्रत्यक्ष पर्याय होते.

  • सेन्सॉरची तुम्हाला कधी अडचण नाही वाटली?

– मी अशा प्रकारे आणीबाणीला विरोध करू लागल्यानंतर अगदी जाहिरातींवरही सेन्सॉरशिप लावण्यात आली. जाहिरातींच्या नावाखाली मी आणीबाणीविरोधी संदेश प्रसारित करीत होतो. त्यामुळे जाहिरातींवरही सेन्सॉरशिप लागू केलेले ‘तुघलक’ हे देशातील एकमेव साप्ताहिक आहे. शास्त्री भवनमध्ये सेन्सॉरपुढे मी नियमित जात होतो. एकदा मी माझे वेतन सेन्सॉरपुढे ठेवले आणि म्हणालो, संपादकपदाचे हे वेतन घ्या, कारण तुम्हीच संपादक आहात!

  • ते आश्चर्यचकित झाले असतील..

– गडबडलेच ते. ते असाहाय्य होते. राज्यपालांच्या सल्लागारांनी मला तंबी दिली होती; पण मला काहीच फरक पडत नाही, असे मी त्यांना सुनावले होते. ‘तुघलक’चा प्रत्येक अंक सरकारला अडचणीचा ठरत होता. माझ्यासह रामनाथ गोएंका, राजमोहन गांधी, इराणी आदी आणीबाणीविरोधात लढत होते.

  • तामिळनाडूतील वातावरण कसे होते? तिथे दडपशाहीच्या घटना घडल्या?

– करुणानिधी यांनी इंदिरा गांधींवर स्तुतिसुमने उधळली होती. त्यांनी संजय गांधींच्या पाच कलमी कार्यक्रमालाही पाठिंबा दिला होता. इंदिरा गांधींना पाठिंबा देऊन आपला बचाव करता येईल, असे त्यांना वाटत होते. मी तुमचा शत्रू नाही. अगदी तुमच्या विरोधात कोण आहेत, याबद्दल माहिती देण्याची माझी तयारी आहे, असे इंदिरा गांधींना सांगण्यापर्यंत करुणानिधी यांची मजल गेली होती.

  • एमजीआर यांनीही इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता?

– दिला होता. करुणानिधींपेक्षा एमजीआर अधिक विश्वासू वाटत असल्याने इंदिरा यांचे त्यांना प्राधान्य होते. त्यामुळे करुणानिधी यांना विरोधी गटात राहावे लागले आणि ते नाखुशीनेच आणीबाणीविरोधक बनले. मात्र, नंतर त्यांनी आणीबाणीचा थोर विरोधक म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली. मला अटक होईल, असा इशारा एमजीआर यांनी आपल्या भाषणांत दिला होता; पण मला अटक झाली नाही.

  • तुघलकमधून आणीबाणीविरोधात कठोर लेखन करूनही तुमच्यावर कारवाई न होण्याचे कारण काय वाटते?

– कामराज यांच्याशी जवळीक असे त्याचे एक कारण असू शकेल. दुसरे म्हणजे माझे वडील हे प्रतिष्ठित काँग्रेसवादी होते. तिसरे म्हणजे, मी प्रहसनकार असून, मला माझ्या पद्धतीने जे बोलायचे आहे ते बोलू द्यावे, असा विचार त्यांनी केला असावा.

  • तुम्हाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे धोका होता का?

– होता. माझ्याबद्दल काही तरी करा, असे संजय गांधी यांचे निकटवर्ती त्यांना सांगत होते. माझे काही उद्योजकमित्रही मला धोक्याचा इशारा देत होते, पण तसे काहीच घडले नाही.

  • आणीबाणीवर टीका करताना साहसाची अनुभूती आली का?

– माझे साप्ताहिक १९७० मध्ये सुरू झाले. आणीबाणीच्या वेळी पत्रकारितेचा मला केवळ पाच वर्षांचा अनुभव होता. त्यामुळे सत्ताधीशांविरोधात लढण्यातील रोमांचकता मी अनुभवत होतो.

  • आणीबाणी उठविण्यात येणार असल्याचा तुम्हाला अंदाज होता. ती उठविल्यानंतर ओझे हलके झाल्यासारखे वाटले का?

– तसा काही मोठा दिलासा वगैरे म्हणता येणार नाही; पण मी जनता दलासाठी भारतभर प्रचार केला. देशभरात जिथे जिथे तामिळ लोक राहतात तिथे बैठकांना हजेरी लावली.

  • आणीबाणी उठविण्यात आली तेव्हा सामान्य जनतेची मनोभावना काय होती?

– तामिळनाडूत आणीबाणीचे लोकांनी स्वागत केले. राज्यात सत्तेचा गैरवापर झालेला नाही. कदाचित एमजीआर यांनी आणीबाणीस विरोध केलेला नसणे हे त्याचे कारण असावे. मला वाटते देशभरातील मध्यमवर्गीयांनी आणीबाणीचे स्वागत केले. प्रामाणिकपणे सांगायचे तर काही दिवसांपूर्वी मी भाजपच्या बैठकीत उपस्थित होतो. आणीबाणी चुकीच्या व्यक्तीने, चुकीच्या वेळी आणि चुकीच्या कारणांसाठी लागू करण्यात आल्याचे मी बोललो. देशात अंतर्गत अस्थर्य नव्हते किंवा युद्धाचा धोका नव्हता. जयप्रकाश नारायण यांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाने इंदिरा गांधींनी सत्ता गमावली. आता देशातील सद्य:स्थिती पाहा. देशातील विविध भागांत नक्षलवाद फोफावला आहे. खलिस्तान चळवळ पूर्णपणे थांबलेली नाही. बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी ही मोठी समस्या बनली आहे. देशाच्या ईशान्येकडील भागांसह काश्मीरमधील परिस्थितीही चिंताजनक आहे. कामगार आपल्या कोणत्याही मागण्यांसाठी बंद आंदोलन करत आहेत. आणीबाणीत बंद आंदोलनाबाबत कोणी बोलतही नव्हते. आज प्रत्येक क्षेत्रातील सुधारणांना कोलदांडा घातला जात आहे. यामुळे ही आणीबाणीसाठी योग्य वेळ आहे.

  • तुम्ही विनोद करता आहात का?

– नाही. आजघडीला कोणालाही आपल्या कर्तव्याची जाणीव राहिलेली नाही. कायदे मोडण्यासाठीच आहेत आणि नियम वाकविण्यासाठी आहेत, असा दांडगटपणा वाढीस लागला आहे. ही देशातील सद्य:स्थिती आहे. चीन आपल्यापेक्षा वेगाने विकास का करत आहे? कारण शिस्त. जगातील सर्व लोकशाही देशांतील नागरिकांमध्ये आपण भारतीय नागरिक सर्वाधिक बेशिस्त आहोत.

(चो रामस्वामी यांनी ‘रेडीफ’ या संकेतस्थळाला २००५ मध्ये दिलेल्या मुलाखतीचा संपादित अंश.)