05 March 2021

News Flash

चोहीकडे? आनंद गडे!!

सुमारे पाच वर्षांपूर्वी लिहलेल्या माझ्या एका दीर्घ कवितेत नायक समाजातील विविध महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींना गुदगुल्या करीत असे. त्यामुळे सारा देश एक अतिविशाल ‘लाफ्टर क्लब बनून’

| June 7, 2015 12:20 pm

सुमारे पाच वर्षांपूर्वी लिहलेल्या माझ्या एका दीर्घ कवितेत नायक समाजातील विविध महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींना गुदगुल्या करीत असे. त्यामुळे सारा देश एक अतिविशाल ‘लाफ्टर क्लब बनून’ लोक गर्दीने जमून vishesh--1निमूटपणे हसत बेजार होत असत, अशा आशयाचे एक लांबलचक वर्णन आहे. ते लिहिताना कोकाकोलाचे Choose happiness हे जाहिरात सत्र सुरू झाले नव्हते किंवा ‘आंतरराष्ट्रीय योगा दिवस’ साजरा करण्याचे फर्मान निघणार आहे याचा साक्षात्कार मला झाला नव्हता.
आई, बाप, बहीण, भाऊ, काका, मामा, मावशी आत्या यांच्या नावाने रोज कसला कसला दिवस पाळून एकमेकाला फुकटचे व्हॉट्सअ‍ॅप संदेश पाठवणे त्या वेळी नुकतेच सुरू झाले होते. भेटवस्तू बांधणाऱ्या कागदाचे कपटे रस्तोरस्ती उडताना जसे दिसत होते तसे गुड मॉर्निग, गुड इव्हिनिंग, गुड नाइटचे हुकमी संदेश व त्याबरोबर येणाऱ्या हसऱ्या गुळगुळीत, सारख्या दिसणाऱ्या, सुळसुळीत कुठेही सहज बसवता येणाऱ्या व क्षणार्धात निखळून पडणाऱ्या स्माइलीजची अर्निबध देवाणघेवाण होण्याला त्या आधीच सुरुवात झाली होती. एका साच्यातून काढावे तसे एकाच पद्धतीने- अमेरिकन अध्यक्षांच्या हसण्यासारखे- हसणे चेहऱ्यावर बाळगून, फोटोशॉपने गुळगुळीत केलेले व सुरकुतलेले थोराड चेहरे जागोजागी प्रोफाइल फोटोपासून जाहिरातीच्या होर्डिग्जवर  आणि मोदी छाप निवडणूक प्रचार साहित्यापासून दु:खद निधनाच्या ‘क्लासीफाईड’पर्यंत झळकत होते.

 

पुरामध्ये माणसे वाहून जावोत, दुष्काळात होरपळून निघोत, नोकरी नसल्याने उपाशी मरोत, कर्जबाजारी होऊन आत्महत्या करोत किंवा बाजार उधळला जावो, वर चढो वा पडो अशा सर्वच प्रसंगांत जागोजाग हसण्याचे, फालतू विनोद करण्याचे आणि हसवण्याचे विविध प्रयोग चालू असलेले व सुरू झालेले आपल्याला गेल्या पाच-दहा वर्षांत अचानक वाढल्याचे जाणवू लागले आहे.

हशा आणि टाळ्या यांचे प्रीरेकॉर्डेड ‘पाश्र्वसंगीत’ असलेले विनोदाचे कार्यक्रम असोत वा ‘मोदी मोदी’ असा उन्मादी जयघोष करणारी पूर्वनियंत्रित गर्दी असो, सिनेतारे व तारकांच्या ‘डिझाइनड्’ हास्याची रेषा आखून विकली जाणारी विषारी रसायनेयुक्त मॅगीसारखी उत्पादने असोत, वा कधीही कोणतीही परीक्षा न घेतलेली ‘वित्त गुंतवणुकीची उत्पादने’ असोत हास्य आणि आनंदाची आपल्याभोवती केली जाणारी पखरण गेल्या काही वर्षांत अधिक वाढत चालली आहे काय? आपण नकळत अधिक हसतो आहोत काय? विनाकारण अधिक आनंदी होत चाललो आहोत काय? हसतो आहोत की हसवले जातोय, हसवले जातोय की फसवले जातोय, आनंदी आहोत की शिकवलेले मान डोलवणारे नंदी बनलो आहोत, असे प्रश्न सध्या जसे माझ्या मनात आहेत तसेच जगभरच्या काही मोजक्या तत्त्वचिंतकांच्या व मानसशास्त्रज्ञांच्या चिंतनाचा तो विषय बनला आहे.

हसण्याचे, आनंदाचे, सुखस्रावाचे हे नवे कोणते, कोणाचे, कुणाच्या फायद्याचे राजकारण कोण करते आहे हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. आनंद आणि दु:ख, हास्य आणि विलाप, प्रेम आणि वंचना या व अशा मूलभूत भावभावनांच्या मानवी इतिहासाच्या टप्प्याटप्प्यावर उत्क्रांत झालेला; कला, संगीत, भाषा यांच्या माध्यमातून अभिव्यक्त झालेला, मानवी दु:ख व दारिद्रय़ यांच्या उच्चाटनाचे ध्येय घेऊन विकसित झालेला राजकीय व सामाजिक प्रयोगांची जी पुंजी आपण निर्माण केली, जिला आनंदाचा ठेवा मानले, तिचेच पद्धतशीर स्खलन करणारे व त्यातून एक विशिष्ट प्रबळ श्रीमंत वर्गाचे राजकारण कोणी करत असेल तर ते जाणून घ्यायला हवे.

व्यवस्थेला जेव्हा समाज घटकांच्या, विशेषत: दुर्बल घटकांच्या, गरजा भागवणे कठीण होते तेव्हा त्या घटकांनाच त्या त्या व्यवस्थेच्या गरजा भागवण्यासाठी स्वत:मध्येच बदल घडवणे व्यवस्था सक्तीचे करते अशा आशयाचे मार्क्‍स यांचे विधान मला या संदर्भात पुन्हा पुन्हा आठवते.

गॅरी बेकर या नोबेल विजेत्या अर्थशास्त्रज्ञाने नव्वदीच्या दशकात ‘मानवी भांडवला’ची नवी संकल्पना मांडली. मानवी श्रमशक्तीचे मूल्य वाढवता येणे शक्य आहे, ते स्थिर नसते हे सांगताना त्यांनी ‘यशस्वी समाजात’ मानवी भांडवलाची वृद्धी शिक्षण, आरोग्य आदी गोष्टींमुळे कसकशी वाढते याचे विवेचन केले. या अभ्यासातून ‘हसतमुख आनंदी माणूस अधिक यशस्वी होतो, व्यवस्थेच्या वाढत्या ताणतणावाना तोंड देऊ शकतो, अधिक काम करतो’ अशा आशयाच्या विवेचनाला सुरवात झाली.

सकृद्दर्शनी वरील विधानात फारशी गडबड दिसत नाही. परंतु जरा बारकाईने वाचले तर काय लक्षात येते? व्यवस्थेने गरजा भागवल्यामुळे माणूस हसतमुख वा आनंदी व्हावयास हवा, तर इथे हसतमुख आनंदी माणूसच व्यवस्थेच्या गरजा, जास्त काम करून वा तणावाला तोंड देऊन, अधिक खरेदी करून वा व्यवस्थेला यशस्वी करून व्यवस्था टिकवतो, वाढवतो असे शब्दजाल विधान केले गेले आहे. म्हणजे आनंदी नसताना हसण्याची नकळत केली जाणारी सक्ती हे नव्या व्यवस्थापनशास्त्राचे सूत्र आहे. शौन अकोरसारख्या प्रसिद्ध व्यवस्थापनतज्ज्ञांनी स्वत:चा आनंद वाढवल्यामुळे प्रतिस्पध्र्यावर कशी मात करता येते याचे धडे शिकवताना वा पॉल झ्ॉकसारख्या ‘न्यूरो अर्थतज्ज्ञांनी’ आनंदीपणा हा एक स्नायूच आहे असे मानून, व्यायामशाळेत जसा व्यायाम करून, प्रोटिन्स खाऊन स्नायू बळकट व पिळदार करता येतो तसा आनंदीपणा-एक स्नायू मानून त्याला विशिष्ट प्रशिक्षण देऊन अधिक घट्ट करता येते असे नवे ज्ञान देण्यास सुरुवात केली.

आनंद ही मानसिक व अंतर्गत भावना आहे. तिचे रोपण बाहेरून करता येईल अशी शक्यता निर्माण झाल्याने जाहिरातबाजी व आनंदीपणाचे संदेश यांचा मारा समाजावर करण्यास गेल्या काही वर्षांत सुरुवात झाली. अशा नसलेल्या आनंदाचा उसना आनंद चेहऱ्यावर चढवण्यास आपल्या सगळ्यांना उद्युक्त करण्यात येऊ लागले.

समाज व्यवस्थेला नव्हे तर स्वत:ला बदला, असा हा नवा संदेश भांडवलशाहीच्या नव्या अवताराचा गाभा आहे. बदलाच्या राजकारणाच्या मुळावरच तो घाव घालतो. श्रीमंत व नवश्रीमंत मध्यमवर्ग हे या अवताराच्या अस्तित्वाचे मर्म आहे. गरीब, झोपडपट्टीत राहणाऱ्या, कर्जबाजारी आत्महत्याग्रस्त शेतकरी शेतमजुरांच्या, दुर्बल असंघटित कामगारांच्या, सर्वसामान्य माणसाच्या परिस्थितीत बदल करून त्याला त्याचे हक्क देणाऱ्या, व्यवस्था बदल घडवणाऱ्या राजकारणाला समाप्त करण्याचा हा डाव आहे. केवळ स्वत:ला बदला, आनंद शोधा, हसतमुख राहा, हसा, हसवा हे सांगताना राजकारण नको तर अध्यात्म हवे म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिन हवा किंवा रामदेव बाबाचा पतंजली हवा असा मानवी आकांक्षांना गुंगीचे औषध पाजणारा हा नवा प्लॅन आहे.

प्रचंड पैसा खर्च करून केलेला सत्ताधाऱ्यांच्या ‘इव्हेन्ट’ सभा, चलाख चुणचुणीत व उसन्या विक्रेत्यांची फौज, कार्यक्रमाऐवजी घोषवाक्ये, दृष्टिकोनाऐवजी जाहिरातबाजी, भंपक कलाकुसर, उथळ विधाने व भपकेदार मांडणी ही अशा हसतमुख समाजाची आत्मा हरवलेली लक्षणे असतात. आस्था चॅनेलवर दिसणारे गुटगुटीत साधू-संन्यासी आणि त्यांचे बटबटीत कार्यक्रम हे या समाजाचे अध्यात्म असते आणि सुटाबुटातील पोशाखी व्याख्यान हे अशा समाजाचे दिवाळखोर भान असते. विकासाच्या जपाचा धाक असतो आणि आजूबाजूला पसरलेल्या दीनदुबळ्यांच्या दु:खाकडे न बघण्याचा जाच असतो.

‘माइंड फूलनेस’, ‘योगा’, ‘ध्यानधारणा’, ‘विपश्यना’, ‘हिरवळ’, ‘झाडांच्या सान्निध्यात’ इथपासून ‘गावरान’, ‘चुलीवरील मटण’ इथपर्यंत आनंदाचे नवे मार्ग भांडवली अर्थव्यवस्थेचे सध्याचे परवलीचे शब्द बनू पाहत आहेत. दावोस येथील ‘जागतिक अर्थ परिषदे’साठी यावर्षी एक बौद्ध भिक्खू जगाच्या नेत्यांना व्यवस्थापकांना, संचालकांना ‘ध्यानधारणा’ व ‘मन:शांती’चे प्रयोग यावर धडे गिरवताना दिसत होता. जगातील जवळपास सर्व मोठय़ा उद्योगांच्या व्यवस्थापनात आता ‘चीफ हॅपिनेस ऑफिसर’ (सीएचओ) हे पद अपरिहार्य ठरू लागले आहे. राष्ट्रीय आनंद मानके किंवा वेलबिइंग इंडेक्स असे शब्द राष्ट्रीय योजनाकारांच्या संभाषणात हल्ली वारंवार प्रकटतात. आपण व आपली कुटुंबे कशी व किती हसरी आहेत याच्या ‘सेल्फी’ सतत प्रसारित करण्याचा मोह आपल्या पंतप्रधानांपासून सामान्य माणसापर्यंत कसा पसरला आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. बेकारी, गरिबी, अनारोग्य, कर्जबाजारीपणा, अशिक्षितपणा, महागडे व म्हणून वंचित करणारे शिक्षण, टुकार आरोग्य व्यवस्था, ढासळणाऱ्या अर्थव्यवस्था, उद्ध्वस्त संसार, अपुरी घरे, बकाली, वाढणाऱ्या झोपडय़ा, तुंबलेली गटारे ही व अशी अनेक उदाहरणे आनंदाची नव्हे तर वेदनेची मानके आहेत. अशा दाहक परिस्थितीला विसरणे, हास्याचा फवारा चेहऱ्यावर मारणे आणि योगासनात जाऊन ब्रह्मानंदी टाळी लावणे हा जर त्यावर उपाय असेल तर अशा योगी संन्यासांची भोंदू ध्यानधारणा जागोजाग भंग करणे असाहाय्य जनतेला क्रमप्राप्त ठरेल. बिल्डरपासून स्मगलपर्यंत आणि भ्रष्ट राजकारणी नोकरशहांपासून लठ्ठ पगाराच्या मठ्ठ माणसापर्यंत, समाजाचा प्रबळ वर्ग शवासनात जाऊन आनंदाचे तीर्थ प्राशन करीत असेल तर त्यांचा परमानंद सामान्यांच्या दु:खांच्या नि:श्वासावर विणलेला ताण आहे आणि असा ताण ही आनंदाची गाठ आहे हे विसरून चालणार नाही.

सकारात्मक मानसशास्त्र आणि विकासावर टीका करणे म्हणजे नकारात्मक राजकारण आहे असा समज पसरवण्यात नव्या भांडवलशाहीचे प्रवक्ते दुर्दैवाने आज यशस्वी झालेले दिसतात. ‘आनंदाचा स्नायू’ फुगवून ही मंडळी आपले नवे ‘आनंदी गडे’चे तत्त्वज्ञान सांगताना दिसतात. परंतु वैफल्यग्रस्त समाजाच्या जागोजाग जाणवणाऱ्या वेदनेचे रूपांतर सार्वजनिक असंतोषात होऊ शकते याचे भान त्यांना नाही. प्रेम आणि काम हे मानवी समाजाच्या कोनशिलेचे दगड आहेत असे फ्रॉईड म्हणाला होता. उद्ध्वस्त मानवी संबंध आणि वाढत चाललेली बेकारी यांच्यामुळे समाजाच्या पायाचे दगडच निखळतील अशी भीती आज अनेकांना वाटते. त्यामुळे योगासनाच्या आनंद कार्यक्रमात आपल्या दु:खांच्या कारणांचे ‘मेडिटेशन’ करणे हेच अधिक योग्य ठरेल. आनंदाचे राजकारण नव्हे.

६ लेखक चित्रकार, कलाचिंतक आणि नवतत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत. त्यांचा ई-मेल:

sanjeev.khandekar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2015 12:20 pm

Web Title: choose happiness
Next Stories
1 एम. फार्म : नवे नियम, नवा घोळ
2 साहित्य-सर्जनाचा संवाद
3 भारतीय परराष्ट्र धोरणात महाराष्ट्र
Just Now!
X